गांधी-नेहरू कुटुंबाच्या विविध पैलूंबद्दल भारतात नेहमीच एक कुतूहल राहिले आहे. सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी आॅफ लव्ह’ या आत्मचरित्राने हे कुतूहल अधिकच वाढवले आहे. त्यांनी जे लिहिले आहे, त्याच्या विविध पैलूंवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे आणि आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. तथापि, चर्चेचा एक प्रमुख विषय म्हणजे दोन सुना, सोनिया गांधी आणि मनेका गांधी यांच्यातील संबंध.
सोनिया गांधींच्या पुस्तकाने त्या दोघींमधील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. आपल्या आठवणींमध्ये सोनिया यांनी मनेका यांच्यासोबतच्या त्यांच्या बालपणापासून ते घर सोडून जाईपर्यंतच्या सुरुवातीच्या सहवासाचे वर्णन केले आहे. त्या मनेका यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वाईट वागणुकीवर उघडपणे टीका करत असल्या तरी वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी पती संजय गांधी यांना गमावल्यानंतर त्यांना झालेल्या वेदनांचीही त्यांना खोलवर जाणीव आहे.
सोनिया यांच्या मते सुरुवातीला मनेका यांच्यासोबत सर्व काही ठीक होते. मनेका अधूनमधून नखरे करत असल्या तरी इंदिरा आणि सोनिया त्यांना तरुण समजून त्याकडे दुर्लक्ष करत असत. तथापि, काही काळानंतर अगदी किरकोळ गोष्टींवरूनही घरात तणाव वाढू लागला. या कौटुंबिक तणावाचे लवकरच राजकीय मतभेदांमध्ये रूपांतर झाले, ज्यामुळे अखेरीस कुटुंबात मोठी फूट पडली.
सोनियांच्या आत्मचरित्रातून समोर आलेला आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, मनेका यांचे राजीव आणि संजय या दोन भावांसोबतचे संबंध कसे दिवसेंदिवस ताणले गेले होते. सोनियांच्या मते संजय यांच्या राजकीय कार्यात मनेका यांच्या वाढत्या हस्तक्षेपाचा राजीव आणि संजय यांच्यातील बंधुत्वावर अप्रत्यक्ष परिणाम झाला होता. सोनियांच्या पुस्तकापूर्वीही अनेक नामांकित विश्लेषक आणि लेखकांनी त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये वेळोवेळी उल्लेख केला आहे की, संजय आणि मनेका यांच्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच कुटुंबातील सदस्यांमधील संबंध किती ताणले गेले होते.
पेंग्विनने प्रकाशित केलेल्या सोनिया गांधींवरील ‘सोनिया : अ बायोग्राफी’ या पुस्तकात पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांनी उल्लेखलेली एक घटना लक्षणीय आहे. खुशवंत सिंग यांच्या मते एकदा राजीव आणि सोनिया त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी दोन्ही भाऊ आपापल्या पत्नींसोबत घराच्या वेगवेगळ्या टोकांना उभे होते, जणू काही त्यांचे एकमेकांशी काही देणेघेणेच नव्हते. बी. के. नेहरूंनी त्यांच्या ‘नाईस गाईज फिनिश सेकंड’ या चरित्रात, इंदिरा गांधींच्या १२, विलिंग्डन क्रेसेंट येथील घरातील बिघडत चाललेल्या संबंधांचेही वर्णन केले आहे. (जिथे त्या १९७७ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सुमारे अडीच वर्षे संपूर्ण कुटुंबासह राहिल्या होत्या) ते म्हणतात, ‘घरगुती कामांवरून वारंवार समस्या निर्माण होत असत. सोनिया स्वयंपाक करत असे आणि मनेका एकटीच जेवण वाढण्याचे काम करत असे. इंदिरांचे दोन मुलगे आणि त्यांच्या पत्नी यांच्यातील संबंध आता चांगले राहिले नव्हते.’
सोनिया गांधींपासून ते खुशवंत सिंग आणि बी. के. नेहरूंपर्यंतच्या आत्मचरित्रांमधून हे दिसून येते की, मनेका यांच्या प्रवेशानंतर कौटुंबिक वातावरण कसे कटू झाले. यात मनेका यांच्या स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेने भूमिका बजावली आणि त्यांच्या आई अमृतेश्वर आनंद यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सोनिया यांनीही त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संजय यांच्या मृत्यूनंतर मनेका यांच्या आईची इच्छा होती की, त्यांच्या मुलीने थेट राजकारणात प्रवेश करावा, तर इंदिरा गांधींचा आग्रह होता की त्यासाठी तिच्याकडे भरपूर वेळ आहे. सध्या तिने आपला काही महिन्यांचा मुलगा, वरुण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कदाचित मनेकांच्या आईला भीती वाटत होती की, संजय यांच्या मृत्यूनंतर मनेकाला पक्षात बाजूला सारले जाईल आणि संजय यांच्या कार्यकाळात तिला मिळालेला राजकीय प्रभाव नाहीसा होईल. राजीवला संजयचा राजकीय वारसा मिळेल या अफवांमुळे तिची भीती आणखी वाढली. हा मनेका गांधींसाठी एक मोठा धक्का होता, कारण इंदिरा गांधींनी तिला आपली वैयक्तिक सचिव बनवण्याचे वचन दिले होते.
तेव्हापासून मनेका यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी स्वतंत्र पावले उचलायला सुरुवात केली. राजकारणात नवीन असूनही तिने हुशारीने खेळी खेळली आणि इंदिरा यांच्या कुटुंबातून बाहेर पडण्याची वेळही स्वत: ठरवली. यानंतर इंदिरा यांच्या दोन्ही सुनांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. नंतर, जेव्हा सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा मनेका यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसला कट्टर विरोध करणाºया पक्षांमध्ये सामील होण्याचा मार्ग पाहिला.
गांधी कुटुंबाशी संबंधित इतर काही पुस्तकांमधूनही त्यांच्या नात्यावर प्रकाश पडतो. उदाहरणार्थ, कॅथरीन फ्रँक यांच्या ‘इंदिरा : द लाइफ आॅफ इंदिरा नेहरू गांधी’ या पुस्तकाने दोन्ही सुनांमधील मतभेदांच्या आगीत तेल ओतले. मनेका यांनी सोनियांवर आरोप केला की, पुस्तकात संजय यांच्याबद्दल बदनामीकारक कथांचा समावेश करण्यामागे त्यांचाच हात होता. सोनियांनी स्वत: या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु नटवर सिंग यांनी त्यांच्या वतीने मनेकांवर हल्ला करण्याची जबाबदारी स्वीकारली.
वेळोवेळी असे खुलासे होऊनही इंदिरा गांधींच्या दोन्ही सुनांमध्ये अनेक वर्षे एक प्रकारचा सलोखा टिकून होता. पण आता सोनियांनी त्यांच्या आत्मचरित्रातून मनेकांबद्दलची जुनी पाने उघडली आहेत. दोन कुटुंबांमधील या चालू असलेल्या शांततेवर कितपत परिणाम होईल हे संपूर्णपणे मनेका गांधींच्या भूमिकेवर अवलंबून असेल. सोनिया गांधींचे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून मनेका यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. त्या नेहमीप्रमाणेच योग्य क्षणाची वाट पाहत आहेत का? याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment