समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील दुसºया दशकातील दुसºया समासात उत्तम लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण यांचे वर्णन त्यांनी केलेले आहे. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल. प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारल्याखेरीज जाऊ नये. फळ खायचे असेल तर ते ओळखल्यावाचून खाऊ नये. वस्तू पडलेली दिसली तरी ती चटकन उचलून घेऊ नये. फार वाद करू नये, मनामध्ये कपट ठेवून वागू नये, कुळशीलाची नीट चौकशी केल्यावाचून मुलीशी लग्न करू नये.
समर्थ म्हणतात की, विचार केल्याशिवाय बोलू नये, ध्यानात घेतल्यावाचून काम सुरू करू नये, नीतीधर्माच्या मर्यादा पाळल्याशिवाय हालचाल करू नये. प्रेम नसेल तेथे रुसू नये. चोराला ओळख विचारू नये, रात्री एकटेपणे प्रवास करू नये. लोकाशी सरळपणाचे वागणे सोडू नये, पापमार्गाने द्रव्यसंचय करू नये, नीतीधर्माचा मार्ग कधी सोडू नये.
येथे स्वामी म्हणतात की, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये, कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीने काढून घेऊ नये. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नयेत. लोकात फूट पाडू नये, काही झाले तरी विद्याअभ्यास सोडू नये. तोंडाळ माणसांशी भांडू नये, वाचाळ माणसाशी वाद घालू नये. मनामध्ये सज्जनाची संगती विसरू नये. बेसुमार रागावू नये, प्रेमाच्या माणसांना दुखवू नये. दुसºयाकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये. पदोपदी रुसू नये, खोटे मोठेपण सांगू नये, केला नसेल तो पराक्रम सांगू नये. दिलेला शब्द विसरू नये, योग्य प्रसंगी बळाचा उपयोग केल्यावाचून राहू नये. आपण करून दाखवल्याशिवाय दुसºयाचा उपहास करू नये. आळसाचे सुख मानू नये, कोणाची चुगली चहाडी करण्याचे मनात सुद्धा आणू नये, सर्व बाजूंनी विचार केल्यावाचून कोणतेही काम करू नये. देहाला फार सुख, आराम देऊ नये, माणसाने प्रयत्न कधी सोडू नये, सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये.
रामदास स्वामी या समासात सांगतात की, सभेमध्ये लाजू नये, पण आचरटपणे भलते बोलू नये, काही झाले तरी पैज मारू नये. कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये, आळशीपणाने दिवस घालवू नये, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतलाच तर तो फेडल्यावाचून राहू नये, दुसºयाला दु:ख देऊ नये, त्याचा विश्वासघात करू नये. स्वच्छतेशिवाय राहू नये, घाणेरडे वस्त्र नेसू नये, बाहेर जायला निघणाºयाला कुठे जातोस म्हणून विचारू नये. उदार दृष्टिकोन सोडू नये, दुसºयावर ओझे घालू नये, कोणाच्या आधीन होऊ नये. दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणे-घेणे करू नये, हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये, साक्षीपुराव्याशिवाय कोर्टकचेरी करू नये. खोटी हुज्जत घालू नये, सगळी सभा खोटी ठरवू नये, जेथे आपल्याबद्दल आदर नाही तेथे साहजिकच आपण बोलू नये. महत्त्वाच्या गोष्टीची हेळसांड करू नये, अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये, आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून पाजीपणाने वागू नये. अतिआहार करू नये, फार झोप घेऊ नये, दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये. केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये, आपला मोठेपणा आपण सांगू नये, गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये.
येथे समर्थ सांगतात, धूम्रपान करू नये, मादक पदार्थ सेवू नयेत, बोहोचक किंवा चोंबड्या माणसाशी मैत्री करू नये. उद्योगावाचून राहू नये, कोणी टाकून बोलला तर सहन करू नये, वडिलांचेही अन्न मिंधेपणाने खाऊ नये. तोंडात शिवी असू नये, दुसºयाला पाहून कुत्सितपणे हसू नये, चांगल्या कुळांतील माणसाच्या अंगी हीनपणा चिकटवू नये. पाहिलेली वस्तू चोरू नये, फार कंजुषपणा करू नये, प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये.
स्वामी सांगतात की, कोणाचा नाश होईल असे त्याचे नुकसान करू नये, खोटी साक्ष देऊ नये, वेद, शास्त्र, संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये. चहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरू नये, कोणाचेही कमीपण त्याच्या मागे बोलू नये.
समर्थ दासबोधात सांगतात, नुसत्या नीतीमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही. त्यामध्ये भगवंताला स्थान हवे. प्रसंग पडेल तेव्हा दुसºयास मदत देण्यास चुकू नये, सात्विक वृत्ती टाकू नये, शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये. थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत्त होऊ नये, भगवंताच्या भक्तीला कधी लाजू नये, पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी वागू नये. मूर्खाशी संबंध ठेवू नये, अंधारात हात घालू नये, निष्काळजीपणाने आपली वस्तू विसरू नये. स्नानसंध्या सोडू नये म्हणजे नित्योपासना सोड नये, कुळाचार मोडू नयेत, आळसाने व चुकारपणाने, अनाचाराने वागू नये. हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये, प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये.
देवाचा नवस फेडल्यावाचून राहू नये, आपल्या धर्माला विरोध करू नये, त्याला वाईट म्हणू नये, नीट विचार केल्यावाचून भलते काम करण्याच्या भरीला पडू नये. कठोरपणा करू नये, फार पाऊस असता किंवा वेळ योग्य नसता प्रवासाला जाऊ नये. योग्य वेळी उत्तर देण्यास टाळू नये. गुरूवाचून असू नये. ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारी समजू नयेत. खरा मार्ग सोडू नये, खोट्या मार्गाने जाऊ नये, खोट्याचा अभिमान कधी धरू नये. अपकीर्ती बाजूला सरावी, सत्कीर्ती वाढेल ते करावे, सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो, असे सांगून या समासाची समाप्ती समर्थ करतात.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment