कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।। असे संत सावता माळी आपल्या अभंगातून म्हणतात. स्वत:चे काम सोडून देवाची भक्ती करण्याची गरज नाही. शेतात काम करताना कांदा, मुळा, भाजी या प्रत्येक गोड्यात मला विठ्ठलच दिसतो. आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच खरी सेवा. वारकरी संप्रदायात कर्मकांडाला थारा नाही तर कर्म करण्याला, आपले कर्तव्य चोख करण्याला महत्त्व आहे. देवाच्या मागे लागायचे नाही तर कर्म करत राहायचे. कर्म करणाºयाच्या अंतरंगात पांडुरंग प्रकट होतो हे सावता माळी दाखवून देतात.
संत सावता माळी हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक अत्यंत आदरणीय आणि महत्त्वाचे संत आहेत. संत सावता माळी यांचा जन्म १३व्या शतकात (साधारण १२५०च्या सुमारास) सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावी झाला. ते व्यवसायाने माळी (शेतकरी) होते. त्यांनी आपल्या शेतीतील दैनंदिन कामांनाच आपली पूजा आणि विठ्ठलभक्ती मानले. ते कधीही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहीत, कारण त्यांची अशी धारणा होती की, विठ्ठल त्यांच्या कर्मामध्ये आणि शेतातच सामावलेला आहे. ते संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन होते. संत नामदेवांनी आपल्या अभंगांत संत सावता माळी यांच्या भक्तीची आणि आध्यात्मिक अधिकाराची मोठी प्रशंसा केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ही अनुभूती विठ्ठलाकरवी नामदेवांना दिली आणि सावता माळी यांच्या कर्मयोगाची दृष्टी दाखवून दिली. त्यांनी १२९५मध्ये अरण या आपल्या जन्मगावीच जिवंत समाधी घेतली.
त्यांचे आध्यात्मिक विचार आणि कार्य हे कर्मयोगाला प्राधान्य देणारे असल्याने त्याला कर्मभक्ती असे म्हणता येईल. संत सावता माळी यांनी ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी॥’ या आपल्या प्रसिद्ध अभंगातून कर्मयोगाचा एक महान संदेश दिला. कर्म हाच ईश्वराचा मार्ग आहे. त्यांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या कर्मकांडाला विरोध केला. ईश्वरप्राप्तीसाठी घरदार सोडून जंगलात किंवा तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, तर आपले विहित कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजेच खरी भक्ती, हा विचार त्यांनी रुजवला. शेतातील प्रत्येक कृती (पेरणे, पाणी देणे, खुरपणे) करताना ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे अनेक अभंग आजही वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्रात मोठ्या आवडीने गाईले जातात. कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी॥ लसूण मिरची कोथंबिरी। अवघा झाला माझा हरी॥ मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥ सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायीं गुंतला गळा॥ या अभंगातून त्यांनी शेतीतून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडवले आहे.
आमुची माळियाची जात। शेत लाविले बागायत॥ आम्ही हरिकीर्तनाचे राते। गाऊ विठ्ठलाची गीते॥ या अभंगातून त्यांनी कर्म करताना त्यातच देव शोधला आहे. त्यांच्या अभंगांची भाषा अत्यंत सोपी, प्रासादिक आणि थेट शेतीशी निगडित असणाºया उपमांनी नटलेली आहे, ज्यामुळे ती सामान्य माणसाच्या मनाला चटकन भिडते. श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे आणि देवत्व देण्याचे काम त्यांनी केले आहे. हा खरा वारकरी संप्रदाय आहे.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
No comments:
Post a Comment