नामसंकीर्तन साधन पैं सोपें। जळतील पापें जन्मांतरीचीं।। असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. संसारात राहून भगवंताला मिळवण्याचे ‘नामस्मरण’ हे सर्वात सोपे साधन आहे. यामुळे अनेक जन्मांची पापे जळून खाक होतात. त्यामुळे वारीची ताकद ही नामसंकीर्तनात आहे. त्यासाठी हरिपाठ म्हटला जातो. हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानदेवांनी हे सातत्याने निरनिराळ्या श्लोकांतून सांगितले आहे.
ज्ञानदेव म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ। वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥ रामकृष्ण नामीं उन्मनी साधली। तयासी लाधली सकळ सिद्धि॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले। प्रपंची निमाले साधुसंगे॥३॥ ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा। तेणें दशदिशा आत्माराम॥४॥ इथे संत ज्ञानेश्वर म्हणतात, ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्णनामाचे वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ज्यांनी रामकृष्ण नामाच्याच भजनाने संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मस्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्मसिद्धी प्राप्त झाली अथवा त्याला जगातील सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. भगवद्चिंतनाने बुद्धीला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धी होते, देहतादात्म्याने पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविधतापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांति साधूंच्या संगतीने होते. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनाने माझ्या हृदयांत रामकृष्णस्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्यायोगाने दाही दिशांमध्ये आत्माराम भरलेला भासत आहे.
यासाठी या वारीमध्ये हरिपाठाचे पठण केले जाते. ज्ञानदेव म्हणतात, हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय। पवित्रचि होय देह त्याचा॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप। चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे॥२॥ मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार। चतुर्भुज नर होऊनि ठेले॥३॥ ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें। निवृत्तीनें दिधलें माझें हातीं॥४॥ म्हणजे, हरिचा जप करून वाणीनें हरिची कीर्ति जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. हरिनामसंकीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याने अगणित तप केले तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव्य करतो. तसेच आईबाप, भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रजही सर्व मनुष्ये चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात; म्हणजे त्यांना सरूपतामुक्तीचा लाभ होतो. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरू निवृत्तिनाथ यांन्ी माझे हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालो. ज्ञानेश्वर सगळे श्रेय गुरूला देतात.
पुढच्या श्लोकात ते म्हणतात, हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन। हरिविण सौजन्य नेणे कोणी॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें। सकळही घडलें तीर्थाटण॥२॥ मनोमार्गे गेला तो तेथें मुकला। हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी। रामकृष्णी आवडी सर्वकाळ॥४॥ म्हणजे जो हरिवंशपुराण वाचतो, आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो व हरिवाचून दुसरे कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे. मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरिभजनामध्ये जो स्थिर झाला तोच धन्य होय. म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्णस्वरूपीच आवड आहे. या प्रत्येक ठिकाणी नामस्मरणाला महत्त्व दिले आहे. सर्वात सोपा भक्तीचा मार्ग हा नामस्मरण भक्ती आहे, तीच वारीची ताकद आहे, म्हणून लाखो वारकरी या नामस्मरणात लीन होतात.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी। पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचें तप एक नाम। सर्व मार्ग सुगम हरिपाठी॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया। गेले ते विलया हरिपाठी॥३॥ ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म। हरिविण नेम नाहीं दुजा॥४॥ म्हणजे, हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांनी जोड केलेली असते, त्यायोगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहीशी होतात. अनंतजन्मी केलेल्या तपांचे फल एक हरिचे नामस्मरण आहे. सर्व साधनामध्ये हरिचे चिंतन हे सुलभ साधन होय. अष्टांगयोग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरिच्या चिंतनाने लयाला जातात. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणीं यज्ञ, याग, क्रिया, धर्म सर्व काही हरि आहे. त्यावांचून दुसरा काही नेमधर्म नाही.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
No comments:
Post a Comment