समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील मूर्खलक्षणनाम या दुसºया दशकातील तिसºया समासात कुविद्या लक्षणे सांगितली आहेत. सुसंस्कृत माणसास न शोभणारी ही लक्षणे आहेत, एवढे ध्यानात ठेवावे. म्हणजे त्याचे अधिक वर्णन किंवा वर्गीकरण करायची जरुरी नाही. ती अतिशय हीन व वाईट लक्षणे आहेत. माणसाने त्यांचा त्याग करावा. ती ऐकली म्हणजे त्याचा त्याग घडतो. कुविद्येचा माणूस कसा असतो ते समर्थ येथे सांगतात. जन्मास येऊन तो स्वत:चे नुकसान करून घेतो. येथे सांगितलेल्या लक्षणांवरून तो ओळखता येईल. कुविद्येच्या माणसाच्या अंगी खूप अवगुण असतात. या कारणासाठी कोणी स्पष्ट उपदेश करू लागला तर त्याला तो आवडत नाही.
भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायातील चौथ्या ओवीचा अर्थ असा आहे की, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन अज्ञान असणे, ही आसुरी संपत्ती आहे. याचाच विस्तार समर्थ येथे करतात. ते म्हणतात की, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गुंडगिरी, सदा मस्ती, अभिमान, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तºहेवाईकपणा, कसे तरी काम उरकायची घाई, वटवट, सदा तक्रार करायची सवय आणि उलटेसुलटे करायचा स्वभाव या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठा रोगच आहे.
कुविद्येचा माणूस कुरूप असून हीन लक्षणी, अशक्त असून दुर्जन आणि दरिद्री असून, अतिशय कंजुष असतो. तो आळशी असून खादाड, दुर्बळ असून लाथा झाडणारा आणि फटकून वागणारा असून, अतिशय लबाड असतो, तो मूर्ख असून तापट, वेडपट असून वाचाळ आणि खोटा असून, अतिशय बोलका असतो. कुविद्येचा माणूस असा असतो की, स्वत:ला कळत नाही पण दुसºयाचे ऐकत नाही, स्वत:ला येत नाही पण दुसºयाकडून शिकत नाही आणि स्वत: करीत नाही पण अभ्यासदृष्टीने निरीक्षणही करीत नाही.
समर्थ या समासात सांगतात, तो अज्ञानी असून अविश्वासी, भलतेसलते अर्थ करणारा असून दोषी आणि स्वत: अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. तो पापी असून निंदक, दु:खी असून दुसºयाचा घात करणारा आणि स्वत: क्लेश भोगीत असून अतिशय निर्दय असतो. तो हीन असून ढोंगी, रोगी असून वाईट कर्मे करणारा आणि कंजुष असून अधर्मांत रमणाºया वासनेचा असतो. तो हीन देहाचा असून मोठा अभिमानी, वाह्यात असून फाटे फोडणारा. अर्थहीन बडबडणारा आणि स्वत: दुर्दैवी असून लोकांना ज्ञान सांगणारा असतो. तो भित्रा असून उद्धट, बेकार असून डौल मिरविणारा आणि डरपोक असून पराक्रमाच्या बाता मारणारा असतो. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ, विषयासक्त असून व्यसनी आणि द्वेष करणारा असून अतिशय भ्रष्ट असतो. तो मोठा अभिमानी असून बंधन न पाळणारा, पैशांची ओढाताण असून दुष्ट वृत्तीचा आणि ढोंगी असून, अतिशय उच्छृंखल असतो.
समर्थ पुढे सांगतात की, तो वाईट असून विकारधीन, खोटा असून अनुपकारी आणि स्वत: हीन लक्षणी असून इतरांचा अतिशय तिरस्कार करतो. तो बुद्धी बेताची असून वाद करणारा, भिकाºयासारखा असून टोचून बोलणारा आणि धूर्त किंवा कपटी असून वाईट शब्दांनी दुसºयास दु:ख देणारा असतो. तो मनाला बोचेल असे बोलणारा, अंगावर ओरडून बोलणारा, कपटाने बोलणारा, संशयाने बोलणारा, दु:ख होईल असे बोलणारा, झोंबेल असे बोलणारा क्रूर, निर्दय, दुष्ट माणूस असतो. तो दुसºयाचे व्यंग बोलणारा, घातकी बोलणारा, अशुभ बोलणारा, क्षणोक्षणी बोलणे बदलणारा, द्वेषाने बोलणारा, खोटे बोलणारा आणि धिक्कार करून बोलणारा असतो. तो कपटी, वाकड्या बुद्धीचा, आतल्या गाठीचा, क्षुद्र मनाचा, अंगचोर, द्वाड, रागीट, पापद्रव्य असलेला आणि अतिशय टवाळखोर असतो.
कुलक्षणी माणूस हा तो तापट, तामसी अविचारी, पापी, अनर्थ करणारा, फेफºया आणि अंगांत भूत, समंध यांचा संचार होणारा असा असतो. तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गायघातकी, ब्राह्मणघातकी, मातृघातकी, पितृघातकी, महापापी आणि भ्रष्ट असतो. तो सर्व दृष्टीने कमी, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रद्रोही विश्वासघातकी, कृतघ्न, परस्त्रीशी रमणारा, नरकाला जाण्यास योग्य, आततायी आणि बडबड्या असतो.
या समासात स्वामी पुढे सांगतात की, तो संशयी, भांडण, झगडा करणारा, कलहप्रिय, अधर्माने वागणारा, जनराहाटी मोडणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, भेद उत्पन्न करणारा आणि मोठा हट्टी असतो. तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, लोकांना चाळवणारा, कवडीचुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनाचा, घट्ट मुठीचा म्हणजे परोपकारासाठी काही न देणारा, शिरजोर आणि दुसºयाचे चांगले न पाहू शकणारा असतो. तो लबाड, मठ्ठ, भित्रा, बेपर्वा, लुडबुड्या, लफंगा, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसºयाची वस्तू लांबविणारा असतो. तो साहसी, स्वैर, उच्छृंखल, चटोर, चावट, गाजावाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, विषयासक्त, स्वजातीतून भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो. तो मारेकरी लुटारू, दरोडेखोर, घरांना खणती लावून धन शोधणारा, घातकी, भोंदू, परस्त्रीशी रमणारा, भूल देऊन भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो. तो नि:शंक, बेशरम, कळलाव्या, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उर्मट, चिवट, अक्षरशत्रु म्हणजे अगदी अशिक्षित, खट्याळ, नाटकी, सर्वांशी भांडणारा आणि विकारधीन असतो.
कुलक्षणी कोण हे सांगताना समर्थ पुढे सांगतात की, तो उतावळा, उगीच आळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकल्याने बेजार झालेला, थोटा, बहिरा, दमेकरी असून देखील अभिमान सोडीत नाही. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, भाग्यहीन, भिकारी, बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विद्रूप, उक्तीहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व क्षुल्लक असतो. त्याला वेळ कळत नाही, प्रसंग कळत नाही, अभ्यास कळत नाही, लोकांचे आर्जव करणे कळत नाही, मैत्री कशी करावी ते कळत नाही, सारांश त्याला काहीच कळत नाही, असा तो अभागी असतो.
असे अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी असतात. वाईट लक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येचा माणूस वाचकांनी याप्रमाणे ओळखावा. आतापर्यंत सांगितलेली कुविद्येची लक्षणे ऐकावी व ऐकून ती टाकावी. उगीच अभिमानाने इरेस पडून वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment