शिक्षण हे माणसाला शहाणे करुन सोडणारे असले पाहिजे. परंतु आपल्याकडे शिक्षण घेतल्यानंतर नेमके काय करावे यामुळे अनेकजण गोंधळलेले असतात. याचे कारण तार्कीक कसोटीवर आणि व्यवहारात उपयोगी न पडणारे शिक्षण आपल्याकडे परंपरेने शिकवले गेले. त्या शिक्षणाचा ज्ञान म्हणून फारसा फायदा व्यवहारात झालेला दिसला नाही. म्हणून कालबाह्य गोष्टी काढून टाकून नव्याने आवश्यक असणार्या गोष्टी आत्मसात करणारे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे शिक्षण खात्याचे धोरण असले पाहिजे.आता कोरोनामुळे एक फार मोठा बदल झालेला आहे. क्रांती झालेली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन आणि जीवनशैलीच बदलून गेलेली आहे. अशा परिस्थितीत शाळा कॉलेज सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह नाही. त्यामुळे शिक्षणाचा एकुणच अंधार आहे. अशा परिस्थितीत नव्या जीवनाचे शिक्षण आता दिले गेले पाहिजे. आजच्या या संकटात हे पारंपारीक शिक्षण काही कामाचे नाही, हेच अनुभवायला मिळाले आहे.विशेष म्हणजे गेल्या आठ दहा वर्षांपासून आपल्याकडे शिक्षणात अनेक बदल करण्यात आले. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही बाबत नेमका उद्देश समजून न घेतल्याने गफलत झाली. त्यामध्ये नापास न करण्याचा सरकारचा निर्णय टीकेस पात्र ठरला होता. याचे कारण मुलांना सरसकट नापास करायचे नाही तर त्याला ज्ञानी करुन सोडायचे आहे, त्याला सक्षम करुन सोडायचे आहे, त्याला समजेपर्यंत शिक्षकांनी शिकवायचे आहे. कोणीही नापास झाला नाही पाहिजे हा त्याचा उद्देश होता. पण त्यामुळे परिक्षापद्धतीत बदल करुन, नाममात्र परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांची ढकलगाडी सुरु झाली. त्याचा परिणाम शिक्षकांचे काही नुकसान झाले नाही पण विद्यार्थ्यांचे मात्र झाले. नंतर त्यात सुधारणा करुन सरकारचा हेतु समजवल्यावर त्यात बदल झाला. आता यावर्षी कोरोनामुळे कोणत्याच वर्गाच्या परिक्षा घेता आल्या नाहीत. सर्वांनाच पास करून टाकले आहे. पण दोन महिने अगोदर शाळा संपली, परिक्षा नाहीत तरीही मुले वरच्या वर्गात गेली आहेत. पण या कालावधीत त्यांना ज्ञान किती प्राप्त झाले? मुलांना तीन महिन्यात सवयी काय लागल्या आहेत? घरात टिव्हीसमोर बसायचे. जुन्या मालिका पुन्हा पुन्हा पहायच्या. 20 सेकंद हात धुवायचे. तोंडाला मास्क लावुन बसायचे. अंतर राखून वागायचे. सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन, सॅनीटरायझेशन हे नवे शब्द त्यांच्या ज्ञानात पडले आणि अभ्यास कसलाही नसताना मुले हात चोळत बसली, धुवत बसली. घासुन अभ्यास केला नाही पण हात घासत बसायची वेळ मात्र आली. आता पुढची दोन वर्ष तर मुलांचे हात चोळत बसण्यातच जाणार का असा प्रश्न आहे. आताही नव्याने येत असलेली अभ्यासक्रमातील पुस्तके ही अत्यंत महत्वाची आणि व्यवहारी ज्ञानाची अशीच आहेत. व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण देण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात पाऊल टाकण्यासाठी सरकार घेत असलेली ही झेप फार महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जे काही घडते त्याची उदाहरणे घेऊन अभ्यासक्रम रचला तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये अधिक रस निर्माण होतो. यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी न राहता तो खर्या अर्थाने ज्ञानार्थी होतो. असाच प्रयत्न दोन वर्षांपूर्वी नव्याने प्रसिद्ध झालेल्या दहावीच्या पुस्तकांमध्ये करण्यात आला होता. म्हणजे शिक्षण खात्याने गणित विषयात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर या संकल्पनांपासून ते कोरडवाहू शेतीच्या व्यवहारांपर्यंत अनेक उदाहरणे देण्यात आली आहेत. हे खूप स्वागतार्ह आहे. पण या सुट्टीच्या काळात या मुलांनी त्याचा व्यवहारात काही उपयोग करून घेतला का हा खरा प्रश्न आहे. शालेय शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर गुण मिळवण्यासाठी असते हे जे वर्षानुवर्ष बिंबवले गेले आहे ते चुकीचे आहे. कारण पूर्वीच्या बीजगणीतात ए प्लस बी बरोबर सी असले काहीतरी शिकवले जायचे. असे एबीसी किंवा एक्स वाय झेड देऊन व्यवहार पूर्ण होत नाहीत. व्यवहारासाठी रोकडाच लागतो. त्यामुळे बिजगणिताचा व्यवहारात कुठे उपयोग होतो हे कोणाला सांगताही येणार नाही. त्यासाठी आज हा केलेला अभ्यासक्रम नव्या विचारांचा आहे हे निश्चित. पण हे उपयोगात आलेले शब्द व्यवहारात आले तर मुले ज्ञानी होतील हे नक्की. आपल्या देशात 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे यावर विशेष भर देण्यात येतो. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी हा इयत्ता दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पण प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी कृती केली का? प्रश्नपत्रिका आणि कृतिपत्रिका मुलांनी सोडवल्या. यात फक्त नावात बदल झाला. पण कृती पत्रिकेतील कृती खर्या अर्थाने केली जाईल तेंव्हा त्याला ज्ञान म्हणता येईल. आपल्याकडे कृतीपत्रिकेवर आधारीत शिक्षण हे पारंपारीक आहे. गुरूकुलात कृतीशिक्षणच दिले जात होते. अगदी जंगलात जाउन लाकडं तोडून आणण्यापासून ते शेती करणे, गुरे राखण्यापर्यंतचे शिक्षण गुरूकुलातील पाठशालेत विद्यार्थी करत असत. त्यावर घेतल्या जाणार्या परिक्षा म्हणजे ज्ञानकोष असायचा. पांडवांना शिक्षण देताना द्रोणाचार्य हातात धनुष्य देउन काय दिसते हे विचारायचे. तेंव्हा कुणाला गुरूंचे पाय दिसायचे तर, कुणाला झाड, कुणाला झाडावरची फळं दिसली तर कुणाला फळाजवळ पोपटही दिसला. फक्त अर्जूनाला पोपटाचा डोळा दिसला. कारण लक्ष ते होते. असे लक्ष देणारे शिक्षण कोण घेतो आहे? जून महिन्यात कोरोनाने शिक्षणपद्धतीत अमूलाग्र बदल होणार आहेत, घरातून शिक्षण घ्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लक्षप्राप्ती देणारे व्यवहारी शिपण कसे मिळणार आहे?आता एखाद्या विषयावर संदर्भ शोधता यावे यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून काही माहिती शोधण्याचे या पुस्तकातून सूचित करण्यात आले आहे. याचबरोबर मागील इयत्तेमधील पाठाची उजळणी व्हावी म्हणून पाठाच्या सुरुवातीला काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडता यावे किंवा एखाद्या विषयावर त्यांचे मत तयार व्हावे यासाठी त्यांना काही प्रसंगांचे चित्र किंवा उदाहरणे देण्यात आली आहेत. त्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे मत नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. असे विविध ज्ञानाधारित शिक्षणाला पूरक बदल नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आले आहे. तसे माध्यमिक शिक्षणात प्रकल्पावर आधारीत अभ्यास गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेतच. त्यामुळे ही पद्धती नव्याने दहावीत जाणार्या विद्यार्थ्यांना अत्यंत सहजसोपी असेल. अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना कृतीवर गुण देतात. मात्र तसे न करता विद्यार्थ्याला गणिताचा पाया समजला आहे ना हे पाहून त्याला गुण द्या, अशी सूचना गणित विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी शिक्षकांना केली आहे होती. हा फार मोठा विचार आहे. पाठांतर, घोकंपट्टी नको तर नेमके समजले पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गणित सोडविणार्या विद्यार्थ्यांचे गुण कापण्यापेक्षा त्यांना शाबासकी द्या, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचा गणितात समावेश व्हावा या उद्देशाने गणितात दैनंदिन व्यवहारातील संकल्पना घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यात अर्थशास्त्राचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजे व्यवहाराचे गणित सोडवता आले पाहिजे, समस्या, प्रश्न सोडवता आले पाहिजे, परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचे शिक्षण हा नवा विचार देतो आहे. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तकापेक्षा काही वेगळी माहिती मिळावी या उद्देशाने पुस्तकामध्ये क्यूआर कोड देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो स्कॅन केल्यानंतर त्या पुस्तकाच्या संदभार्तील बाह्य माहिती मिळू शकणार आहे. यात व्हिडीओच्या लिंक्सही मिळू शकणार आहे. जेणेकरून विद्यार्थी त्या विषयाशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकेल. हे सारे आता व्यवहारात उपयोगी पडणारे शिकवले जात आहे हे चांगले आहे. संस्कृत भाषेची गेल्या वर्षी आठवी आणि नववी ची पुस्तके बदलली. यावर्षी दहावीची बदलली आहेत. त्यामध्ये चाकोरीबद्ध भाषांतरचा भार कमी करून संस्कृतभाषेच्या आकलन आणि प्रयोग यावर भर दिला आहे. संभाषण पद्धतीचा वापर केला आहे. प्राचीन भाषा आधुनिक माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न यातून केला आहे. त्याचप्रमाणेआजच्या विद्यार्थ्याला काय रुचेल याचा विचार करून व्हॉट्सअॅप संवादाचा लेआऊट करून त्यात संवाद लिहिले आहेत. विद्यार्थी आपल्या ग्रुपवर पिकनिकविषयी चर्चा करतात, कोण काय आणणार, काय करणार याबाबद्दलची चर्चा ईमोज सकट, त्यांच्या भावविश्वाशी जोडली आहेत. म्हणजे जे मुलांना चोरुन, आईवडिलांच्या नकळत करावे लागत होते ते आता सहजपणे उपलब्ध होणार आहे. अभ्यासातील सगळ्यात किचकट भाग म्हणजे व्याकरण. हे व्याकरण अध्ययन नीरस न होता अभिरुचीसंपन्न करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमात केला आहे. त्यामुळे दहाविची पुस्तके ही फक्त दहावीसाठी न राहता सर्वांना वाचनीय आणि अभ्यासास योग्य अशी आहेत. हा नवा प्रयोग यशस्वी होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पण आता कोरोनामुळे या प्रयोगाचे फलित समजलेले नाही. म्हणूनच ऑनलाईन शिक्षण किंवा कोरानानंतरचे बदललेले शिक्षण किती व्यवहारी असणार आहे यावर देशाचे भवितव्य असेल.
Monday, June 8, 2020
परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
आता पावसाची प्रतिक्षा
आपली संस्कृती आणि अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. सगळे सणवारही कृषीप्रधान आहेत. त्यामागे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे. पंचांगाप्रमाणे किंवा कालगणनेनुसार दरवर्षी 7 जूनला मृग नक्षत्र लागते. मृग नक्षत्राचा पाउस पडला की शेती चांगली होते हा आपला सिद्धांत आहे. त्यामुळे सात जूनला चार थेंब तरी पडावेत अशी शेतकरीवर्गाची अपेक्षा असते. आता सात जून ही पावसाच्या आगमनाची तारीख तशी नुकतीच दोन दिवसांपूर्वी मागे पडली. काही ठिकाणी पाउस पडला पण तो मृगाचा आहे की मानसूनपूर्व आहे हे समजले नाही. पण तरीही पावसाळी तयार झालेले वातावरण हे सवार्र्ना आनंद देणारे असेच आहे. यावर्षी पाउस चांगला होणार आहे आणि तो सरासरीच्या 102 टक्के पडणार आहे असे भाकीत नुकतेच हवामान खात्याने आणि स्कायमेटने केले होते. अर्थात आपल्याकडचे हवामानाचे अंदाज नेहमीच चुकतात. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाउस पडेल, 90 ते 97 टक्के पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण पावसाने गेल्यावर्षी इतका हाहाकार माजवला की महाराष्ट्रात अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या अंदाजावर तसे विसंबून राहता येणार नाही. पण मोसमी पाऊस अंदमान, केरळ व कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचला आहे पण, अद्याप मुंबई, महाराष्ट्र, कोकणात दाखल झाला नाही. त्यामुळेच 7 जूनचा मृग काही ठिकाणी कोरडा गेल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकी लागली. आता येत्या दोन दिवसात तो सर्वत्र पोहोचेल आणि यंदा चांगला बरसेल. देशात यंदा खरीप हंगाम यशस्वी होईल. सारी संकटे, अडचणी, मंदी यावर खरीप हंगामाची यशस्विता मात्रा ठरेल असे सांगितले जाते आहे आणि हवामान खात्याचा तोच अंदाज आहे. गेले चार दिवस निसर्ग वादळ घोंगावत होते. या वादळाचा मुंबईला तडाखा बसणार अशी भीती होती. सावधगिरीचे उपाय योजण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा मोठा असू शकतो. वित्तहानी, प्राणहानी प्रचंड होण्याची शक्यता असते. गेेले वर्षभर आपल्याला संकटांशी सामना करण्याची सवयच लागली आहे. सध्या कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे सारेच हबकले आहेत,अडचणीत आहेत. त्यात ही वादळाची भर म्हणून अवघा महाराष्ट्र चिंतीत होता. पण थोडक्यात निभावले. या वादळाने कोकण, उरण परिसराला धडक दिली. तेथे घरांचे, झाडांचे, बागांचे, कलमांचे नुकसान झाले पण, वादळ मुंबईत शिरले नाही. वादळात प्राणहानी झाली नाही. जे काही नुकसान झाले त्यासाठी ठाकरे सरकारने शंभर कोटींचे पॅकेज दिले आहे. तुर्त वादळाचा धोका टळला आहे. या वादळाचा फायदा मानसूनला होईल असेही सांगितले गेले होते. आता त्याही अंदाजाचे काय होणार हाही एक प्रश्नच आहे. पण गेल्या ऐशी वर्षात आपण हवामान खात्याचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा निर्माण करू शकलेलो नाही. पावसाचा किवा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा आपल्याकडे असेल तर आपण संगळी संकटे सहज पेलू शकू. त्यावर मातही करू शकतो. पण नेमकी तीच यंत्रणा आपली कुचकामी आहे. त्यामुळे कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना तोंड देण्याची वेळ येते. आता कोरोना या मानवनिर्मित संकटातून बाहेर पडण्याची तयारी असताना प्रत्येकाला यावर्षीचा मानून कसा असेल याची ओढ लागली आहे. मानसून चांगला झाला, पाउसपाणी छान झाले तर अर्थव्यवस्थेला ते पोषक असणार आहे. कोरोनाच्या संकटात, लॉकडाउनमध्ये झालेली हानी भरून काढायला हा पाउस धावून येईल अशी माफक अपेक्षा सर्वांची आहे.पण, एकीकडे कोरोना महामारीचा धोका वाढतोच आहे. आता सोमवारपासूनच सावधानता बाळगून अनेक गोष्टी ‘पुनश्च हरिओम’ या धोरणाने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट नाही तेथे काही प्रमाणात जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पावले टाकली जात असली तरी कोरोना दहशत संपलेली नाही आणि कोरोनावर परिणामकारक इलाज, औषध, लस सापडेपर्यंत संपणारही नाही. अनेक ठिकाणी एसटी वाहतूक जिल्हांतर्गत सुरू आहे. पण, माणसे घराबाहेर पडायला तयार नाहीत. दुकाने, हॉटेल्स वगैरे गोष्टी काही अटींवर सुरू आहेत. पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही. एकतर कोरोनाची धास्ती व दहशत आहे,जोडीला लोकांचे बजेट कोलमडले आहे. अनेकांना रोजगार नाही, पगार निम्म्यावर आले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. व्यवहार ठप्प आहेत. पुढे काय वाढून ठेवले आहे याची सर्वांना चिंता आहे. या साऱया अडीअडचणी, चिंता, समस्या, प्रश्न असले तरी पाऊस आला आहे. पावसाचे शेतीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगात इतरत्र पावसाचे वेगवेगळे ऋतु आहेत. भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर हा वर्षा ऋतु असतो. नैर्त्रुत्येकडून येणारे वारे पावसाचे ढग घेऊन येतात. हिंदी महासागर व अरबी समुद्रात पाण्याने भरलेले ढग हे वारे घेऊन येतात आणि या पावसाचा लाभ भारतीय शेतीला होतो. हा पाऊस परत जातानाही बरसतो. या परतीच्या पावसातही गहू, हरभरा, शाळू अशी रब्बीची पिके येतात. ओघानेच पावसाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळेच रविवारी 7 जूनला मृग नक्षत्राचा पाउस पडेल आणि सगळे काही ठिक होईल अशी स्वप्न प्रत्येकजण पहात होता. पावसाची वाट पाहण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. कवीला कविता करायला बहर येतो, तर प्रेमिकांना भिजायला आवडते, कोणाला पावसाळी पर्यटनाची आवड असते तर आमचा बळीराजा काळी आई भिजली म्हणजे सर्वाना तृप्त करेल या आशेने पावसाची वाट पहात असतो. कोरोनोचे संकट धुवून काढायला हा पाउस येईल अशी भोळी आशा प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा वेळेत आणि चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. गेली काही वर्षे चांगला पाऊस या शब्दाचीही भीती वाटावी अशी स्थिती झाली आहे. सांगली-कोल्हापूर हे जिल्हे आणि सीमाभाग महापुराच्या तडाख्यातून अजून सावरलेला नाही. सन 2005 चा आणि 2019 चा महापूर आणि पाठोपाठ कोरोना व आता पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता. यामुळे नागरिक विशेषतः कृष्णा, वारणा, पंचगंगाकाठ हादरला आहे. पावसाळयाची सरकारी पातळीवर आणि व्यक्तीगत पातळीवर जो तो तयारी करतो आहे. पूरपट्टयातील गावे, वस्त्या, नदीकाठची गावे, घरे चिंतेत आहेत. सरकारी पातळीवर त्यांना सावधानतेचे इशारे व नोटीसा दिल्या जात आहेत. यावेळी महापूर येऊ नये म्हणून धरणातील पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते आहे. पण अलीकडे ढगफुटीसारखे पावसाचे प्रकार उद्भवताना दिसत आहेत. बंधारे फुटणे वगैरे दुर्घटना आहेत. मुंबईपासून बेळगावपर्यंत आणि पुण्यापासून सांगली, कोल्हापूर पंढरपूरपर्यंत सर्वत्र हा धोका आहे. पण सावध राहणे योग्यवेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. माणसे पार्किंगमध्ये पाणी आले तरी घर सोडत नाहीत. हा गतवर्षीचा अनुभव चांगला नाही. यावेळी महापूर येऊ नये आणि चांगला पाऊस यावा, खरीप हंगाम यशस्वी व्हावा अशी अपेक्षा आहे. निसर्ग वादळाने काही भागात पाऊस झाला आहे. ओघानेच खरीप पेरण्यांना सुरूवात झाली आहे. बांधावर खत, बांधावर बियाणे अशा सरकारी घोषणा असल्या तरी बियाणे,खते यामध्ये लिकींग व लूट असते हे वेगळे सांगायला नको. यंदा हमीभाव आधी जाहीर होतील असे वाटते आहे. पण तेलबिया, डाळी यांची कमतरता आहे. शेतकऱयांनी पारंपरिक ज्वारी, बाजरी या पलीकडे जाऊन तेलबियांचे व वेगवेगळया डाळी, भाज्या यांचे चांगले वाण घेऊन नेमकेपणाने शेती केली पाहिजे. लॉकडाऊनमुळे हवा, पाणी, नद्या, यात सुधारणा झाली आहे. शेतीला त्याचा फायदा होईल. पण टोळधाडीसारखी धास्ती आहेच. जोडीला अनेकांचे रोजगार गेल्याने आणि शहरी मंडळींचे गावाकडे स्थलांतर झाल्याने नवे काही प्रश्न उभे राहणार आहेत. शेतकऱयाला पाऊस, रोगराई याच जोडीला चोरी, पळवापळवी याचाही फटका असतो. उघडया शेतात बियाणे, खते घालून तो नशीब आजमावतो. खरीपासाठी सर्वांची तयारी झाली आहे. पीककर्ज व बियाणे, खते यांची टंचाई नाही. यंदा चांगला पाऊस झाला आणि खरीप हंगाम यशस्वी झाला तर मंदी संपवण्याची शक्ती बळीराजात आहे. शेतकऱयाचे उत्पन्न वाढवणार अशी मोदी सरकारची घोषणा होती. ठाकरे सरकारही माझा शेतकरी माझा शेतकरी असा जप करते. यंदा पावसाच्या रूपाने होणारी चैतन्याची बरसात साऱया चिंता नष्ट करेल अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन संपून पुन्हा जनजीवन सुरळीत होते आहे. पण, धोका संपलेला नाही. अशावेळी अधिक सतर्क राहून पावले उचलायला हवीत. सारी जबाबदारी सरकारची नाही. आपणही कर्तव्य आणि जबाबदारीचे पालन करायला हवे. पण पावसाळी वातावरण तयार झाले तरी जोपर्यंत तो बरसत नाही तोपयर्ंत त्याचे काही खरे नसते. त्यामुळेच या पावसाची प्रतिक्षा प्रत्येकजण करताना दिसतो आहे. गेल्या वर्षभरात निर्माण झालेली सगळी संकटग्रस्त परिस्थिती धुवून टाकण्यासाठी त्याने आता यावे हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणूनच आपली पारंपारीक कविता ये रे येरे पावसा म्हणून त्याची आळवणी करायची वेळ आलेली आहे. फक्त त्याला कसलेही आमिष दाखवून खोटा पैसा कोणी देउ नका. नाहीतर तो गेल्यावर्षीसारखा धोधो धुवून काढेल सर्वांना. पावसाची ओढ सर्वांना लागलेली आहे. पण तो जास्त प्रतिक्षा करायला न लावता वेळेवर येईल आणि हवामानखात्याचा अंदाज यावर्षी तरी खरा ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यावर्षी आषाढी वारी नसली तरी पावसाच्या सरी झाल्याच पाहिजेत. शेतीची कामे करून वारीला जायचे आणि परत येईपर्यंत शेती वाढलेली असते. तो शेतकरी वारकरी त्या विठ्ठलावर सगळे सोपवून मोकळा होतो आणि शेतीची कामे, पेरण्या करून पायी वारीला निघतो. तू परत जाशील तेंव्हा तुझे पिक कमरेएवढे वर आले असेल असा संदेश विठोबा आपल्या कमरेवर हात ठेवून देतो. यावर्षी वारीला ब्रेक लागला आहे. पण पावसाने मात्र वेळेवर आलेच पाहिजे.
ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
आपल्याकडे ज्योतिषशास्त्र हे फार पूर्वी प्रगत होते. किंबहुना केंव्हा काय होणार आहे हे ज्योतिषशास्त्र पूर्वी सांगायचे. म्हणजे आपल्या अनेक पुराणकथा आणि धर्मात ज्योतिष वर्तवून संकटाची चाहूल करून दिलेली आहे. जेंव्हा तंत्रज्ञान प्रगत नाही असे म्हटले जात होते तेंव्हा आपण कोणीतरी भविष्य वर्तवले आणि अमूक एक संकट टळले असे आपण अनेकदा ऐकले आहे. पण जर ज्योतिष शास्त्रच असेल तर जगभरातल्या नाही पण भारतातल्या एकाही ज्योतिषाने कोरोनाचा अंदाज का वर्तवला नाही हे न उलगडणारे कोडे आहे. आपल्याकडे ज्योतिष हे शास्त्र न राहता एक थोतांड झाले आहे. भारतात आज मितीला एकही ज्योतिषी असा नाही की जो अचूक भविष्य वर्तवू शकेल. केवळ लोकांच्या भावनांशी खेळणे आणि फसवणे हाच प्रकार आजच्या ज्योतिषांकडून होताना दिसतो आहे. म्हणूनच जर ज्योतिषी अंदाज वर्तवू शकत नसतील तर त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो आहे.गेली अनेकवर्ष आपण ऐकतो की नॉस्टरडॅमसने चारशे वर्षांपूर्वी अमूक एक सांगितले, तमूक एक सांगितले. पण हे भाकित केले होते असे ती घटना घडून गेल्यानंतर सांगितले जाते. संकटापासून सावध करण्याचे काम जर ज्योतिषाने करायचे असेल तर ते केले जात नाही.आपण पुराण पोथ्यांमधून अनेक कथा ऐकल्या आहेत. पराशरादी गणिती येउन कोणावर काय संकट येणार आहे याचे अचूक भविष्य वर्तवायचे. त्यावर उपाय केला जायचा. पण आज असा एकही ज्योतिषी भारतात नाही का या देशात अमूक एक संकट येणार आहे असे सांगू शकेल? आपल्यापैकी अनेकांनी शिवलिलामृत वाचले असेल, त्यातील कथा ऐकल्या असतील. त्यामध्ये सिमंतीनीच्या अध्यायात सिमंतीनीवर वयाच्या चौदाव्या वर्षी संकट ओढवणार आहे. तिच्यावर वैधव्याचा योग येणार आहे असे सांगितले जाते. मग त्यासाठी तिला सोमवारचे व्रत करायला सांगितले जाते. मग तरीही चौदाव्या वर्षी संकट येते. तिचा पती नदीत जलक्रिडा करताना वाहून जातो. मग त्याला नागलोक वाचवतात वगैरे वगैरे. ही सर्व कृपा सिमंतीने केलेल्या सोमवारव्रतामुळे होते. पण ती कृपा शंकराने करावी यासाठी तिच्या आयुष्यात असे संकट येणार आहे असे भविष्यकथन केलेले होते.याच पोथीत अकराव्या अध्यायात राजपुत्र आणि प्रधानपुत्राचे भविष्य वर्तवताना सात दिवसांनी राजपुत्राचा मृत्यू होणार आहे असे भविष्यकथन केले जाते. त्यासाठी रूद्राध्याय हा उपाय सांगितला जातो. तो उपाय केल्यावर राजपुत्राचे मरण टळते आणि यम त्याला 10 हजार वर्षांचे आयुष्य असल्याचे सांगतो वगैरे वगैरे.पण ज्योतिषशास्त्र हे भविष्यात येणारे संकट दाखवणारे शास्त्र आहे. असे असताना आज मितीला भारतात एकही ज्योतिषी अस्तित्वात नसावी की जो अचूक भविष्य कथन करून या संकटाचे भाकीत केले असेल. भारतातील हे शास्त्र आहे. सनातन आणि पुरातन आहे. असे असताना आज ते खोटे ठरत आहे. किंबहुना त्यात भोदुगिरी आली असावी किंवा अर्धवट ज्ञानाने भाकीते केली जात असावीत.आपल्याकडे ज्योतिष हे भविष्य कथनासाठी नाही तर भूतकथनासाठी सांगितले जाते हा फार मोठा विनोद आहे.आता सोमवारपासून झी मराठी या वाहिनीवर सकाळी 8 वाजता अतुलशास्त्री भगरे यांचे भविष्य कथन सुरू झाले आहे. 8 जूनचाच त्यांचा पहिला दिवस होता. चार महिन्यांनी त्यांचे आगमन झाल्याने झी मराठीने त्याची जाहीरातही भरपूर केली. अतूलशास्त्री हे विद्वान आणि अभ्यासू आहेत. त्यांच्या भविष्य कथनाची शैलीही खूप चांगली असते. विशेष म्हणजे भविष्यातल्या ज्या गोष्टी सामान्यांना समजत नाहीत त्या न सांगता साध्या सोप्या भाषेत कथन करण्याची त्यांची शैली चांगली आहे. म्हणजे अमूक एक दिवशी राहू काल केंव्हा आहे असे न सांगता आजचा अडचणींचा काळ किती ते किती आहे असे ते सांगतात. म्हणजे अमूक एक ग्रहाची तमूक एक ग्रहाबरोबर युती झाली आहे, त्रिकोण योग झालेला आहे, असले अनाकलनीय काहीही न सांगता सामान्यांना समजेल अशा भाषेत ते सांगतात. पण त्यांच्याकडूनही असे भविष्य कथन का केले गेले नाही याचे आश्चर्य वाटते आहे. अर्थात ते जर त्यांनी केले असते तर आज भारताचे तारणहार ते ठरले असते. जगभर त्यांचा नावलौकीक वाढला असता. तसे आज अनेक नामांकीत ज्योतिषी या देशात आहेत. पण यांचेच नाव घेण्याचे कारण म्हणजे त्यांनी सोमवारी केलेले भाकित आणि कथन.सोमवारी पहिल्याच एपिसोडमध्ये अतुलशास्त्री भगरे म्हणाले की, 24 मार्चपर्यंत आपल्याकडे विकारी नाम संवत्सर होते. 25 मार्चपासून गुढी पाडव्यापासून शार्वरीनाम संवत्सर सुरू झाले आहे. कोरोना हा रोग डिसेंबर महिन्यातील ग्रहणामुळे आलेला आहे. पाच दुष्ट ग्रह एकत्र आल्याने आणि विकारी नाम संवत्सर असल्याने मोठा विकार येणारच होता असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे कथन पूर्णपणे पटलेही. पण भविष्य नाही . हा तर भूतकाळ झाला. ज्योतिषाने भविष्य सांगायचे असते. आता गेल्यावर्षीच्या पाडव्याला जर अतुलशास्त्री भगरे यांनी सांगितले असते की आजपासून विकारी नाम संवत्सर सुरू झाले आहे. या वर्षात एका फार मोठ्या रोगाची साथ येणार आहे. एखादा विषाणू येणार आहे. कारण हे विकारी नाम संवत्सर आहे. असे कथन जर त्यांनी तेंव्हाच केले असते तर त्यांचे कौतुक करावेसे वाटले असते. शिवाय भारतातील ज्योतिषशास्त्र किती पुढे गेले आहे याचा साक्षात्कार संपूर्ण जगाला झाला असता. पण ही संधी भारतीय ज्योतिषांनी गमावली. असे जर भविष्य त्यांनी गेल्यावर्षीच्या पाडव्याला म्हणजे मार्च 2019 मध्ये केले असते तर आज झी वाहिनीने याची फार मोठी न्यूज केली असती. आमच्या वाहिनीवरील भविष्यकथनात या संकटाची चाहूल आदरणीय अतुलशास्त्री भगरे गुरूजी यांनी आधीच करून दिली होती वगैरे वगैरे. मग लगेच विविध वाहिन्यांवर अतुल शास्त्रींना बोलावून त्यांना सन्मानाने विचारणा केली गेली असती. त्यांना उपाय विचारले गेले असते. अगदी त्यांना पद्म पुरस्कार देण्यापर्यंत शिफारसी झाल्या असत्या. पण हे काहीच झाले नाही. असे घडणार होतेच, कारण हे विकारी नाम संवत्सर होते हे आज सव्वा वर्षांनी सांगितले त्याऐवजी फक्त हे तेंव्हाच सांगायला हवे होते.आज भारतीय ज्योतिषशास्त्राचे वाभाडे सगळीकडे निघत आहेत. हे फार मोठे शास्त्र या देशाची एकेकाळची संस्कृती होती. पण आज ते करमणुकीचे साधन झाले आहे. त्यात कसलेही तत्थ्य आता राहिलेले नाही. कारण या शास्त्रातील भोंगळपणा आता समोर आलेला आहे. आजकाल आपल्याकडे ज्योतिषी जे भविष्य कथन करतात ते तुमच्या भुतकाळात डोकावतात. तुम्हाला ते आजमावतात. तुमच्याकडून काढून घेतले जाते. भूतकाळातील घटना कशा अचूक सांगितल्या असे भासवून आपण अचूक भविष्यवेत्ते आहोत अशी पार्श्वभूमी केली जाते. त्यामुळे लोक भविष्यकथनावर विश्वास ठेवतात. वास्तविक निवडणुकीत अनेकजण भविष्यकथन करत असतात. अमूक एक पार्टी जिंकणार, तमूक एक मुख्यमंत्री होणार वगैरे वगैरे. पण कोणाचेच भविष्य कधीच खरे ठरत नाही. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे होतील असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा पंतप्रधान होतील असेही कोणी सांगितले नव्हते. पण लोक विसरून जातात. वर्तवलेले भविष्य खोटे ठरले म्हणून कोणी ज्योतिषाला शिक्षा करत नाही. दुसर्या घटनेने, घडलेल्या निकालाने सगळे वर्तवलेले भविष्य विसरून जातात. ही मानसिकता वर्षानुवर्ष ज्योतिषांना धंदा करण्यास प्रोत्साहन देते. 1991 मध्ये असेच ज्योतिषांचे पेव फुटले होते. तेंव्हा असाच एका ज्योतिषाने भलामोठा दावा केला होता. राजीव गांधी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असा छातीठोकपणे दावा केला होता. पण राजीव गांधींची त्या निवडणुकीत प्रचारादरम्यान हत्या करण्यात आली. एकाही ज्योतिषाने त्यावेळी राजीव गांधींना धोका आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असे भविष्यकथन केले नव्हते. एकाने तर राजीव गांधी मोठ्या फरकाने विजयी होतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील असे वर्तवले होते. त्या ज्योतिषाला विचारले की हे कसे काय खोटे ठरले? राजीव गांधींच्या मृत्यूचे किंवा त्यांच्यावर फार मोठे संकट येणार आहे असे का सांगता आले नाही? त्यावर त्या ज्योतिषाने सारवासारव केली होती की म्हणे, तेंव्हा राजीव गांधींच्या कुंडलीत मृत्यूयोग नव्हताच. पण सोनिया गांधींच्या कुंडलीत वैधव्य योग होता. त्यामुळे राजीव गांधींचा मृत्यू झाला. इतका बोगस ज्योतिषी आजही राजकीय भवितव्ये करताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे एकुणच या शास्त्रावरचा विश्वास उडत चाललेला आहे. ज्योतिषशास्त्र हे भविष्यकथनाचे शास्त्र आहे, भूतकाळातील घटना सांगण्याचे शास्त्र नाही.झी मराठीवरच्या अतुलशास्त्री भगरे यांच्या सोमवारच्या कथनावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. पण एका फार मोठ्या ज्योतिषाने एक चांगली संधी गेल्यावर्षी घालवली. ती संधी जर साधली असती तर आज चॅनेलचेही भविष्य फार चांगले झाले असते.
Wednesday, June 3, 2020
अनेक भाव मनात आहेत...
1 जूनपासून देशामध्ये लॉकडाऊनची पाचवी आवृत्ती सुरू झाली आहे. पुनश्च हरिओमचा पहिला टप्पा आज 3 जूनपासून राज्यात सुरू होत आहे. अर्थातच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करून यावेळी बहुतेक सर्व बंधने खुली करण्यात आलेली आहेत. रेस्तराँ, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आदी पूर्ववत सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊन टाकली आहे आणि राज्यांची हरकत नसेल तर राज्यांतर्गत मुक्तपणे ये-जा करण्याचीही मुभा दिलेली आहे. केंद्र आणि राज्य एकमेकांवर जबाबदारी टाकून काही निर्णय घेत असले तरी सामान्य माणसांमध्ये मात्र वेगवेगळे भाव निर्माण झालेले आहेत. कोणी आनंदीत आहेत. कोणी घाबरलेले आहेत. कोणी बिथरलेले आहेत. कोणाला आता आपल्याकडे कमी दिवस आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कमवायचे आहे असे वाटू लागले आहे. आपल्याकडे काहीच नाही, काहीच बचत नाही, काहीच शिल्लक नाही, होते ते गेल्या दोन महिन्यात गेले या विचारानेही अनेकजण खिन्न झालेलेे आहेत. त्यामुळे आगामी काळात सगळं सुरू झालं तर काय करता येईल याचा विचार अनेकजण करत आहेत.आजपासून हे सगळं सुरू होत असलं तरी अर्थात, कोरोनाचा प्रसार दुसरीकडे शिगेला पोहोचलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार एकामागोमाग एक निर्बंध शिथिल करीत चालले असले, तरी राज्य सरकारांची त्याच्याशी फारशी सहमती दिसत नाही. तामीळनाडू, बिहारसारख्या राज्यांनी आपापल्या जनतेचा विचार करून लॉकडाऊनमध्ये वाढ करून टाकली आहे आणि इतर राज्यांनीही या ना त्या प्रकारे निर्बंध कायम ठेवून कोरोनाशी झुंज सुरू ठेवली आहे. पण महाराष्ट्राला तसे जास्त काळ करता येणे शक्य नाही. कारण महाराष्ट्र बंद म्हणजे सगळा देश बंद असेच गणित आहे. मुंबई बंद म्हणजे महाराष्ट्र बंद आणि महाराष्ट्र बंद म्हणजे भारत बंद अशी अवस्था असते. म्हणूनच देश चालवण्यासाठी मुंबई सुरू ठेवण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. पण तरीही सामान्यांच्या मनात एकप्रकारची भिती आहे. आज केंद्र सरकारवर अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्याचा दबाव आहे आणि त्यापोटीच गेले काही दिवस निर्णय घेतले जात आहेत. निर्बंध शिथिल झाले त्याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला वा कमी झाला असा मुळीच नाही. उलट कोरोनाची प्रतिदिन रुग्णसंख्या आता आठ हजारांपार गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक समाजमाध्यमांवर, व्हॉटसअपवर एक मार्मिक संदेश व्हायरल झाला. लॉकडाऊन 1.0 मध्ये सरकार सांगते की तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. नंतर पुढच्या टप्प्यांमध्ये सरकार सांगते की तुम्ही हे करू शकता, पण ते करू शकत नाही. असे करता करता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा येतो, जेव्हा सरकार सांगते की ‘तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही काही करू शकत नाही!’ यातला विनोदाचा भाग जरी सोडला, तरी खरोखर त्या स्थितीलाच आज आपण जवळजवळ येऊन ठेपलेलो आहोत, कारण केंद्र आणि राज्य सरकारांनी आटोकाट प्रयत्न करूनही कोरोनाला अटकाव करता येऊ शकलेला नाही. काही लोकांनी हट्टीपणाने नियम पाळले नाहीत, त्याचा फटका संपूर्ण देशाला बसतो आहे. त्यामुळे जर सरकारने हात झटकले तर करायचे काय? अत्यंत वाईट स्थिती आहे. यात फक्त दिलासादायक बाब एकच आहे ती म्हणजे त्यातून बरे होण्याचे प्रमाण आता जवळजवळ अर्ध्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे त्याच भरवशावर आता सरकारने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करून अर्थव्यवस्थेची अंगे खुली करण्याच्या दिशेने पावले टाकलेली आहेत. अर्थात, त्यातही थोडी सबुरी ठेवावी लागली आहे, कारण जी परिस्थिती अद्याप नियंत्रणाखाली आहे, ती हाताबाहेर जाऊ नये याचीही खबरदारी सरकारला घेणे भाग आहे. म्हणूनच येत्या आठ जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स खुले करीत असताना शाळा, महाविद्यालये आणि शिकवणीवर्गांना मात्र जुलैनंतरच खुले करण्याची परवानगी सरकार देणार आहे. अर्थात याबाबतही दुमत आहे. कारण काही ठिकाणी धार्मिकस्थळे, मॉल, रेस्टॉरंट, हॉटेल, मेट्रो सुरू करण्यास परवानगी नाकारलीही आहे. महाराष्ट्रात तरी 30 जूनपर्यंत यातले काही सुरू होण्याची शक्यत नाही. पण यामुळे अनेकजण साशंक झालेले आहेत. घाबरलेले आहेत. आपले पुढे काय होणार आहे याची चिंता प्रत्येकाला लागलेली आहे.सक्तीची सुट्टी मिळाल्याने अनेकाना काही समजेनासे झाले आहे. आपण परत कामावर कधी जाणार? जाणार की नाही? आपल्याला कामावर परत घेतले जाईल की नाही अशीही चिंता अनेकांना भेडसावते आहे. कोरोनाच्या लॉकडाउनची आलेली संधी अनेक कंपन्या सोडणार नाहीत. कॉस्टकटींगची आलेली संधी साधून अनेकांना नारळ दिला जाईल. याची भिती आज बहुतेक सर्वांना भेडसावत आहे. त्यामुळेच सरकारलाही याची चिंता आहे. आपण लॉकडाउचा निर्णय घेउन लोकांना घरी बसवलं पण हजारो संसार यामुळे उघड्यावर आले. अनेक कुटुंबे यातून उद्धवस्त झालेली आहेत. होत आहेत. होणार आहेत. हे सरकारला समजले असले तरी आज तरी या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणताही उपाय सरकारकडे नाही. खरं तर या लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या, नुकसान झालेल्या उद्योगांना, व्यवसायांना सरकारने मदत देण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत, कारण नसताना कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नका, त्याचा रोजगार हिरावू नका, सरकार तुम्हाला मदत देण्यास तयार आहे असा दिलासा उद्योजकांना सरकारने देणे गरजेचे आहे. गरीबांना पैसे वाटप, धान्य वाटप करण्यापेक्षा त्यांना रोजगार देणारे जे आहेत त्या लोकांना पॅकेज देण्याची गरज आहे. सरकार गरीबांना तातपुरती मदत करेल पण हे लोक कायम स्वरूपी रोजगार देत असतात. त्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. पण मतांचा बाजार आणि पक्षिय राजकारणात गरीबांना खूष करण्याच्या नावाखाली मध्यमवर्गीयांचा घात सरकार करते आहे. आज सुरू झालेल्या या पाचव्या लॉकडाउन किंवा अनलॉकमध्ये आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवरील बंदी अजूनही कायम आहे. मेट्रो बंद ठेवण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, सभागृहे हे सगळे बंद राहणार आहे. रात्री नऊ ते पहाटे पाच या काळात संचारबंदीही कायम असेल. पण ज्या काळात देश सुरू असेल तेंव्हा काय परिस्थिती असेल?यापुढे आपल्याला कोरोनासोबतच जगायचे आहे याची जाणीव पंतप्रधानांनी रविवारच्या आपल्या ‘मनकी बात’मध्ये करून दिली आहे. जनतेच्या सामूहिक संकल्पशक्तीवर त्यांनी त्यात विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्धची आजवरची मोहीम सरकारने राबवली, परंतु यापुढील मोहीम जनतेला राबवायची आहे म्हणजेच ‘पीपल ड्रिव्हन’ राहणार आहे हे त्यांनी त्यात सूचित केलेले आहे. कोरोनापासून वाचायचे असेल तर त्यासाठी सर्व समाजघटकांकडून स्वयंशिस्त आणि खबरदारी या दोन गोष्टींची आत्यंतिक गरज आहे.पण ती घेतली तर हे साध्य होणार आहे. आज अनेक ठिकाणी सारे काही आलबेल आहे या निर्धास्तपणे व्यवहार चालले आहेत, हे धोकादायक आहे.सरकार म्हणते त्यावर विश्वास ठेवला तर राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांत कित्येकजण लागोपाठ बरे होऊन घरीही गेले आहेत. परंतु परराज्यांतून स्थलांतरीत होत असलेल्या प्रवाशांची रीघ काही ओसरलेली नाही. भरून जाणार्या रेल्वे गाड्या काय सूचित करतात? या सर्वांना कोविड चाचणी सक्तीची करण्याचा शहाणपणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण त्यातही पळून जाण्याचे प्रकार होत आहेत. पोलीसांवर हल्ले, स्थानिक नागरिकांवर होणोर हल्ले, अशा संशयित रूग्णाला वाळीत टाकण्याचे, त्याला मारहाण करण्याचे होणारे प्रकार हे अत्यंत वाईट आहेत. या व्यवस्थेतील त्रुटीही गेल्या काही दिवसांत नजरेस आल्याच आहेत. विमानतळांवरच प्रवाशांची कोविड चाचणी घेतली जाते, तशी रस्तामार्गे येणार्या प्रवाशांची सीमांवर घेतली जात नाही. तेथे गर्दीमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार होताना दिसते आहे, परंतु ही कोविड तपासणी आपल्या हिताची आहे याची जाणीव या प्रवाशांनी ठेवण्याची व थोडा संयम पाळण्याची, थोडी गैरसोय सोसण्याची तयारी ठेवली पाहिजे. ही तपासणी होईपर्यंत आपण कोरोनाचे संभाव्य रुग्ण असू शकतो याची जाणीव ठेवून त्यानुसार जबाबदारीने वागले पाहिजे. सरकारला शिव्या घातल्याने तुम्ही कोरोनामुक्त होऊ शकणार नाही. आरोग्य खात्यानेही आपली तपासणी क्षमता वाढविण्याचा, त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न जागरूकपणे केला पाहिजे. विमान प्रवाशांना एक न्याय आणि रस्तामार्गे येणार्या सर्वसामान्यांना वेगळा न्याय योग्य नव्हे. कोविड तपासणीसाठी येणार्यांची ही गर्दी रोखण्यासाठी कोणत्याही राज्यात, जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीच्या परवान्यावर सीमा पार करण्याची तारीख ठरवून देऊन प्रत्येक दिवशी ठराविक संख्येनेच प्रवासी येतील याची तजवीज करता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे केवळ नियोजनाची. पण आपल्याकडे प्रत्येकाला घाई असते.आता केंद्र सरकारने जरी हॉटेल्स सुरू करा असे सांगितलेले असले, तरी सध्या तरी हॉटेल्स सुरू करणे आम जनतेच्या दृष्टीने घातक ठरणार नाही ना याचा विचार करूनच त्यासंबंधी निर्णय सरकारने घेणे आवश्यक आहे. जनतेचे आरोग्य हे सर्वोच्च आहे आणि ते सर्वस्वी राज्य सरकारच्या हाती आहे. सामूहिक संकल्पशक्ती वगैरे भाषणात सांगायला ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर जनतेकडून हा संकल्प पाळला जातो आहे की नाही हे कोणी पाहायचे? मास्कविना लोक अजूनही राज्यात सर्रास हिंडता फिरताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगला तर अनेक ठिकाणी केव्हाच हरताळ फासला गेलेला दिसतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रे खुली करीत असतानाच या किमान गरजेच्या गोष्टींचे पालन जनतेने करावे यासाठी व्यापक जागृती आणि शिस्तपालनासाठी दंडात्मक कारवाई याचीही व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे.काही लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागतात. थुंकू नका सांगितले तरी सवयीने हे लोक थुंकतात. त्यांना एक हजार रूपये दंड केला आहे पण हे जाता जाता गाडीने थुंकतात, चालताना थुंकतात. त्यांच्याकडून दंड वसूल करणार कोण? बायका बघत नाहीत, प्रवासी बघत नाहीत सरळ रस्त्यावर थुंकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचे नियोजन सरकार करत नाही. कारण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते पाहिले तर त्याच्या तोंडात तंबाखू, गुटखा असे काही ना काही असते. आज या देशात एकही पक्ष असा नसेल की जो ठामपणे सांगेल की आमचा कार्यकर्ता तंबाखू खाणारा नसेल. त्यामुळे सत्ताधारी, विरोधी पक्षाचे कार्यक़र्तेच थुंकून घाण करत असतात त्यामुळे त्यांना आवर कोण घालणार? अनेक पोलीस रस्त्यावर तंबाखू मळताना दिसतात. ते कुठेतरी थुंकतच असतात. मग हा रोग कसा रोखला जाणार आहे? सरकार दंडाचा नियम करेल पण जनतेने तो गुन्हा करू नये म्हणून लक्ष ठेवण्याची जी यंत्रणा आहे, तीच जर बरबटलेली असेल तर काय उपयोग?अशा वातावरणात काम करताना प्रत्येकाच्या मनात अनेक विचार आहेत. असुरक्षिततेची भावना आहे. या परिस्थितीचा फायदा घेउन आपल्याला लुटणारे कोण आहेत याची भिती प्रत्येकाच्या मनात आहे. आज भाजीवाल्यापासून ते सलूनवाल्यापर्यंत प्रत्येकजण वाटेल तितके दर वाढवत आहे. मनमानी करत आहे. भाजीवाल्याबाबत बोलले की काहीजणांना कनवळा येतो. शेतकर्याला दोन पैसे मिळू देत म्हणून कांगावा केला जातो. पण भाजी आपल्या दारात घेउन येणारा शेतकरी नाही. त्याला हा पैसा मिळणार नाहीये. हा पैसा दलालांनाच जातो आहे आणि शेतकर्याला तो परिस्थितीचा गैरफायदा घेउन कमी पैशात भाव पाडून लुटत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण प्रत्येकजण अशाप्रकारची भिती, दहशत निर्माण करत आहे. या वातावरणात आपण कसे जगायचे याची चिंता प्रत्येकाला लागलेली आहे.
तारणहार....
कोरोनाच्या संकटानंतर माणसांना घरात बसून करमणूक मिळावी आणि माणसं घराच्या बाहेर पडू नयेत म्हणून सरकारने अनेक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमध्ये जुन्या पौराणिक मालिकांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला गेला. यात सर्वप्रथम दूरदर्शनवर इतिहास घडवणार्या रामायण या मालिकेचे प्रसारण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महाभारत आणि नंतर उत्तर रामायण या मालिकांचे प्रसारण केले. मग लगेच श्रीकृष्ण आणि विष्णू पुराण या मालिका सुरू झाल्या. दूरदर्शनने सगळा टीआरपी खेचला, प्रेक्षक खेचला म्हणून सगळ्या वाहिन्यांनी लगेच त्याचेच रतीब सुरू केले. स्टार प्लसने दूरदर्शनच्या रामानंद सागर यांच्याच रामायणाचे पुन:प्रक्षेपण सुरू केले. त्याबरोबर अन्य वाहिन्यांनीही त्याच विषयावरील अन्य निर्मात्यांच्या पौराणिक मालिका दाखवायला सुरूवात केली. कोणी मूळच्या हिंदी असलेल्या मालिकांचे डबिंग स्थानिक भाषेत करून त्याच प्रसारण केले. एकुणच सगळे वातावरणच अध्यात्मिक, पौराणिक बनून गेले. त्या ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवून माणसं हळवी बनली. कारण या भौतेक सर्व मालिकांमध्ये कोणतेही संकट, प्रलय आला की त्या माणसाला तारण्यासाठी तो तारणहार येतो. म्हणूनच आज या कोरोनाच्या संकटातून आम्हाला तारणारा तारणहार कधी येणार याची वाट प्रत्येकाला आहे.अशा मालिका पाहून हळवी झालेली माणसे, खेड्यातील माणसे, वृद्ध माणसे एक वाक्य हमखास व्यक्त करत आहेत. ते म्हणजे, कलियुग आहे. माणसं पाप करायला लागली, त्यामुळे हे संकट आले आहे. आता प्रश्न पडतो की कोणत्या माणसाने पाप केले? काय पाप केले? ते एकाच माणसाने केले का? एकाच माणसाने पाप केले असेल तर त्याचा फटका संपूर्ण मनुष्यजातीला का बसतो आहे? एक पापी आणि एक पुण्यवान असेल तर पापी माणसाचेच पारडे जड का? जे काही पुण्यात्मे आहेत त्यांच्या पुण्यकर्माला काहीच अर्थ नाही का? वाईट गोष्टीचा, संकटाचा फटका जर पापी आणि पुण्यवान दोघांनाही सारखाच बसणार असेल तर पाप आणि पुण्य यात नेमका फरक काय राहिला? पोटाची चिंता पापी माणसाला आहे तेवढीच पुण्यवानालाही आहे. पुुण्यवानाच पोट भरण्यासाठी कोणता देव आला आहे का? पण कलियुग आहे आणि माणसाने सगळा नाश केला आहे, पाप वाढले आहे त्यामुळे माणसाचा नाश होत आहे, असा कोरोनासारखा प्रलयंकारी रोग आला आहे अशी भावना माणसाच्या मनात निर्माण केली आहे, झाली आहे, होत आहे. पण या पौराणिक मालिकांप्रमाणे खरोखरच कोणीतरी तारणहार आता येणार आहे का? जो या रोगाचे समूळ नष्ट करेल असे कोणी आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही अन घरात अडकून पडलेले आपण उगीचच भावूक होउन त्या पुराणकाळात जातो.म्हणज त्या कंसाने बंदी केलेले अनेक निरपराध लोक साधू, सामान्य माणसांप्रमाणे आम्हालाही असेच कोंडून ठेवले आहे काय अशी भावना मनात येते. जरासंधाने बंदी केलेल्या राजे राजकुमारांप्रमाणे आपण बंदी झालो आहोत का? रावणाने पायाशी बांधून ठेवलेल्या नवग्रहांप्रमाणे आपण कोणाच्या पायी तुडवले जात आहोत का? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होताना दिसतात. तरीही कुठेतरी भोळा भाव असतो की कोणीतरी तारणहार येईल आणि आम्हाला वाचवेल. या संकटातून मुक्तता होईल. पण आज मानव जातीच्या इतिहासात पहिल्यांदाच निसर्गाने सार्या विश्वाला आपल्या कह्यात घेतले आहे. सारी पृथ्वी एकाच वेळी कोरोना विषाणूशी संघर्ष करत आहे. निसर्गाचे तर्क आणि नियमांचे तंत्र विचारात घेता या महामारीचा मुकाबला कसा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण यासाधी कोणी तारणहार असेेल या आशेवर माणूस जगतो आहे. किती असहाय झाला आहे माणूस? आज प्रत्येकाला जगायचे आहे. त्याला जगण्याची ओढ लागली आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्यांना जगवायचे आहे. त्यामुळेच लोक आपला व्यवसाय टिकवण्यासाठी, वेतन मिळवण्यासाठी उतावीळ आहेत. पण हे करताना आपण आपल्या बुरसटलेल्या कल्पनांना कुरवाळत बसलो आणि धर्म, जात, कुलाचार यातच अडकून पडलो तर या रोगाशी, संकटाशी मुकाबला करणे केवळ अवघड आहे. चारच दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टपणे बोलून दाखवले होेते. आम्ही दिल्लीतील कार्यक्रम रोखू शकलो असतो तर या रोगाचा प्रसार झाला नसता. म्हणजे एकीकडे सगळे सण समारंभ, लग्न, सभा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. परंतु एखाद्या विशिष्ठ धर्माचे लोक मात्र आपल्या धार्मिक भावनांशी धर्मांधतेने चिकटून राहिले आहेत. गर्दी करायची नसतानाही त्यांनी दिल्लीत हा कार्यक्रम केला आणि संपूर्ण देशभरात हा रोग पसरवला. म्हणजे सरकारने, राज्यकर्त्यांनी जागे करूनही आम्ही शहाणे झालो नाही का? अमूक एक गोष्ट करू नका त्यामुळे संकट ओढवेल हे सांगूनही काही लोक हेतुपुरस्सर ऐकत नसतील तर करायचे काय? परंतु जर मास्क वापरणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी टाळण्याच्या भूमिकेला प्रकृतीचा सन्मान समजण्याऐवजी व्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान मानत असाल तर ती मोठी चूक करत आहात. आपण लक्षात घेतले पाहिजे की, निसर्ग केवळ रसायने, जीव आणि भौतिक विज्ञान आहे आणि त्यास कार्यान्वित करते ती प्राकृतिक निवड. प्रत्येक जीवाचा हाच शोध आहे. पारिस्थितिक आश्रय मिळवून स्वत:ला सुरक्षित ठेवणे, संवर्धित आणि विकसित होणे, आपला डीएनए पुढच्या पिढीस देण्यासाठी संघर्ष करणे जेणेकरून ते तसेच घडू नयेत, ज्यांना बनवणार्यांकडे परत पाठवले आणि ते पुन्हा फिरून आलेच नाहीत आणि विषाणू हेच करतात. ते बचावासाठी धडपडत असतात. आपणही त्या विषाणूप्रमाणे प्रसार करण्याचे काम करतो आहोत हे या लोकांना सांगणार कोण? पाप म्हणजे काही वेगळे नसते. कितीही मालिका आणि काही आदर्शपाठ समोर ठेवला तरी त्याचा अर्थच कळला नाही, चांगले वागण्याचे धोरण ठेवले नाही तर या मालिकांचे प्रसारण आणि कथा पाहणे हे पालथ्या घड्यावर पाणी आहे. अष्टादश पुराणेशु व्यासस्य वचनं द्वयं... परोपकाराय पुण्याय, पापाय परपिडनम ... इतके सोपे वर्णन आपल्या सुभाषितात केलेले आहे. आपल्या गर्दी करण्याने, मास्क न वापरण्याने संपूर्ण देशाला त्रास होतो आहे हे न समजणेच पापकर्म आहे. पण या कलियुगात पापी माणसांच्या कर्माचा त्रास सामान्यांना होत आहे. त्यामुळे हे पापी आणि साथीच्या रोगांचे जंतू यात फरक तो काय? म्हणजे कोरोना विषाणू हा जंगली वटवाघळासोबत राहिला, वाढला. त्यास मानवी शरीरात आश्रय मिळाला, आता तो जीवघेणा ठरला आहे. आपल्यापैकी कोण अधिक सुदृढ आहे हे पाहण्यासाठी तो आता प्रकृतीचे आणखी एक माध्यम ठरला आहे. प्रकृती निर्दयी देखील आहे. मानव ज्याची पूजा करतो त्या ईश्वरासारखी ती कनवाळू नाही. प्रकृती हिशेब ठेवत नाही. ती काहीही करू शकते. म्हणजे सोमवारी आजीला विषाणूद्वारा छळू शकते. दुसरे दिवशी वादळात आपले घर उडवू शकतो आणि पुन्हा एखाद दिवशी तळघरात पाणी भरू शकते. काहीही करू शकते. पण याची जाणिव असली पाहिजे. आज नियती, परिस्थितीमुळे तुम्ही लॉकडाऊनला उबगला आहात यामुळे ती लक्ष देत नाही असे नाही, तिच्यावर फरक पडतो तो केवळ समन्वयामुळेच. ती श्रीमंत, गरीब, हुशार असा भेद विचारात घेत नाही. ती फक्त सर्वाधिक अनुकूल असणार्यालाच बक्षिसी देते, केवळ तोच जो तिच्या शक्तीचा सन्मान करतो. जर तिचे विषाणू, जंगलातील वणवा, दुष्काळ, वादळ, महापूर आदींचा सन्मान करणार नाहीत तर, ते आपल्या शेजार्यांना, नागरिकांना हानी पोहोचवणारच. निसर्ग कधीच भेदभाव करत नाही. ठराविक लोकांनी गर्दी करून कोरोनाचा विषाणू वाढवला आहे म्हणून त्यांनाच त्याचा त्रास होईल हे समजणे भाबडेपणाचे आहे. आपल्या देशाची एक संस्कृती आहे. आपण श्रद्धेवर जगणारी माणसं आहोत. पाप पुण्य, बरे वाईट हे आपल्याला कळते. त्याचा हिशोब आपण करतो. दहावेळा वाईट वागलो तर थोडे तरी चांगले वागून पाहू असा विचार करणारा आपला समाज आहे, आपला देश आहे. अन्य देशात तसे नाही.दुसर्याचे बळकावणे, हिसकावणे, हिरावणे ही राक्षसी संस्कृती आहे. तीच त्यांनी जोपासली आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निसर्गाचा सन्मान करीत नाहीत, कारण ते प्रत्येक बाबीला पैसा आणि मार्केटचे मापदंड लावतात. पण विशेष म्हणजे निसर्गही त्यांनाच इनाम देतो, ज्यांची अनुकूल प्रतिक्रिया सर्वाधिक वस्तुनिष्ठ आणि समजूतदार तसेच सामंजस्यपूर्ण असते. आपण या पौराणिक मालिकांमधून काय पाहिले आहे यापेक्षा वेगळे? रावणाला शंकर महादेव प्रसन्न होतो. आत्मलिंग काढून देतो. हिरण्यकश्यपूला हवे तसे मरण देण्याचा वर देतो. अनेक राक्षसांना तो सर्वशक्तीमान ईश्वर वश होतो. पण सामान्य माणसे मात्र भयभीत झालेली असतात. वाईट वागणारांनाचा ईश्वर कसा काय शक्ती देतो? डोनाल्ड ट्रम्प हे स्वार्थाने बरबटलेले आहेत. त्यांच्याकडे शक्ती एकवटते आहे. चीनी डॅ्रगनने या राक्षासाची, रोगाची निर्मिती केली. पण त्याचा फटका चीनला काहीच बसला नाही. चीनमध्ये जेमते 80 हजार रूग्ण आहेत तर दोन हजार माणसे मेली आहेत. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात सर्वात कमी विध्वंस या रोगाने केला आहे. तर कमी, मर्यादीत लोकसंख्या असलेल्या देशांना मोठा फटका बसला आहे. हे असे का घडते?निसर्ग आणि निसर्गातील शक्ती या सर्वांकडे समान दृष्टीने बघतात. तो विषाणूंना अशा पद्धतीने विकसित करतो की, ते खासगी किंवा सामुदायिक प्रतिकार क्षमतेतही कमजोरी शोधतात. जर तुमचे कुटूंब किंवा समाज विषाणूशी एकोप्याने लढले नाहीत तर त्यांना थोडीशी संधी मिळाली तर मोठ्या प्रमाणावर फैलावतील आणि त्याची किंमत सर्वांनाच चुकवावी लागेल. निसर्ग हे रसायन, जीव आणि भौतिक विज्ञानाने बनले आहे याचा उल्लेख यापूर्वीच केला आहे. कोरोना निरनिराळ्या क्षेत्रात, हवामान आणि समाजावर निराळ्या पद्धतीने हल्ला करतो, हे खरे आहे. यासाठी अनुकूल असण्याच्या पद्धतीही निराळ्या असतील. परंतु मिनेसोटा विद्यापीठातील अॅपिडेमिलॉजिस्ट मायकल ओस्टरहोम यांनी म्हटले आहे की, ‘हा विषाणू तोपर्यंत अस्तित्वात राहील जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तो संक्रमित करू शकणार नाही किंवा जोपर्यंत लस किंवा नैसर्गिक कठोर प्रतिकार क्षमता उपलब्ध होणार नाही.’ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. डेव्हिड कॅटज् यांनी आपत्तीच्या सुरुवातीलाच सांगितले की, आम्हाला एकूण हानी किमान राखण्यासाठी टिकाऊ रणनीतीची आवश्यकता असेल. जेणेकरून अनेक जीव आणि चरितार्थाची साधने टिकाव धरतील. निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांचा निरनिराळा जोखीम स्तर शोधून सर्वाधिक असुरक्षित असलेल्यांना वाचवणे आणि जे कमी जोखीम वर्गातील आहेत, त्यांना कामावर परतण्याची रणनीती आपण बनवू शकतो. म्हणजेच काय सुरू करायचे आणि बंद ठेवायचे यामध्ये सर्वोत्तम सामंजस्य राखावे लागेल. त्यामुळेच आज वर्क फ्रॉम होम, कमीत कमी माणसे कार्यालयात ठेवा, अंतर राखा हे जे सांगितले जात आहे ते त्यासाठीच आहे.चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि स्वीडनसह अनेक देश निसर्गाचा सन्मान करत खुले होत आहेत, सामंजस्य आणि विज्ञानाला आधार बनवून कामकाज सुरू करत आहेत. जोपर्यंत प्रतिकार क्षमता सक्षम होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत राहावा लागेल. याउलट अमेरिकेची स्थिती अतिशय वाईट आहे. मुळात आपण एकमेकांच्या विरोधात उभे नाहीतच, निसर्गाच्या समोर उभे आहोत. सार्या बाबी पुन्हा सुरू करणे आणि अनुकूल बनवण्याची गरज आहे पण ते समजण्याची गरज आहे. हे सगळे विसरून आपण नेमके काय करत आहोत याचे भान नाही.तारणहार कोण असणार आहे? तो कधी येईल या आशेवर या मालिकांच्या जगात जगताना विचार केला पाहिजे की तारणहार म्हणजे नवा अवतार असेल. तो म्हणजे या रोगावरची लस निर्माण करणारा देश, शास्त्रज्ञ हाच तारणहार असेल. त्याची प्रतिक्षा करूया. पाप पुण्य, स्वर्ग नरक या कल्पना आपणच निर्माण केलेल्या आहेत. स्वर्ग नरक म्हणजे स्वच्छता आणि अस्वच्छता एवढात त्यातला अर्थ घेतला तर या घाणीतून कोण बाहेर काढतो आहे तो तारणहार. रस्त्यावर घाण करणारे, कचरा टाकणारे हे सगळे दानव आहेत तर स्वच्छता करणारे , आरोग्यदूत हे सगळे दानवांशी लढणारे आहेत. पुराणातील वानगी म्हणजे दाखले तिथेच सोडून दिले तरी नवे दाखले लक्षात घेउन आता तारणहार हा स्वच्छता राखणारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
कोरोनाच्या संकटाने माणसाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगपासून ते स्वच्छता, सोवळे हे सगळे काही शिकवले आहे. यात प्रदुषण, पर्यावरण या गोष्टींचे महत्वही पटले आहे. निसर्गाच्या सानिध्यात, स्वच्छ हवेत राहणे किती फायद्याचे असते इथपासून ते मोकळा श्वास घेणे किती आवश्यक असते हे सगळे यातून आपल्याला दिसून आले आहे. पण या सर्वांशी निगडीत आहे तो निसर्ग. निसर्ग आणि पर्यावरण हा महत्वाचा दिवस आहे. जून महिन्यातील पाच तारीख ही आपल्याकडे पर्यावरण दिन म्हणून साजरी केली जाणारी तारीख आहे. या निमित्ताने आपण वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबवतो आणि पर्यायवण समतोलाचा प्रयत्न करत असतो. पण हे काम सातत्याने केले पाहिजे याचीच जाणिव कोरोनाने दिली आहे. आज मी जाईन तर दुसरा कोणी राक्षस येईल. त्यासाठी लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली पाहिजे. तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. ते सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे असाच संदेश या कोरोनाने दिलेला आहे. म्हणून यावर्षीचा पर्यावरण दिन महत्वाचा आहे. कारण दोन महिने लॉकडाउनमुळ कारखाने बंद राहिले. उद्योग बंद राहिले. विमाने, रेल्वे आणि असंख्य वाहने बंद झाल्यामुळे वातावरणात सुटणारा दुषित वायू कमी झाला. वातावरणातील होणारे प्रदुषण दोन महिने कमी झाले. त्यामुळे निसर्गातील असंख्य प्राणीही मानवी वस्तीतून मोकळा श्वास घेत हिंडू लागल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. कारण माणसापेक्षा अन्य प्राण्यांची श्वास घेण्याची, ग्रहण करण्याची, गंध आकलनाची शक्ती जास्त असते. कुत्र्याला तर कित्येक किलोमीटर लांबचा वास येतो. त्यामुळेच पोलीस तपासात त्यांची मदत घेतली जाते. पण या प्रदुषणामुळे हे प्राणी लांब लांब जात होते. माणसांची गर्दी असलेली जागा त्यांना श्वास घेण्यास त्रासदायक होत होती. पण वाहने बंद झाली, धूर कमी झाला आणि प्राणी रस्त्यावर फिरू लागले. हवा शुद्ध झाली. नकळत 60 दिवस पर्यावरणाचा समतोल साधला गेला. आज पृथ्वीतलावर प्राणिमात्राला सभोवताली शुद्ध हवामानाची गरज असते. सशक्त जीवन जगण्यासाठी हवामाना इतकेच पर्यावरणही महत्त्वाचे आहे. पर्यावरण निसर्गाचा एक घटक असून त्यात मानव हा जैविक घटक आहे. तो निसर्गातील घडामोडीला समजावून घेऊन त्यावरून कृती करू शकतो. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान जर कोणी असेल तर तो मानव! त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. त्यामुळे अशी संकटे आपल्याकडे येउ लागली.एखाद्या व्यक्तीकडून किंवा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. पर्यावरण म्हणजे विविध प्रकारची जीवसृष्टी तसेच मानवी समूह, समाज ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील घटकांना पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. दरवर्षी पाच जून हा जगभर ‘पर्यावरण दिवस’ ‘ म्हणून साजरा केला जातो. पण यावर्षी निसर्गाशी संबंधित असणारा पर्यावरण दिवस हा वेगळ्या वातावरणात येत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण दिनाच्या दिवशीच यावर्षी वटपौर्णिमेचा दिवस आलेला आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळे त्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एकजरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे असे वाटत नाही का? पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा र्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की सध्याची जागा अपुरी वाटू लागते आणि घर बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा संतुलन बिघडतो. निसर्गाचे संतुलन बिघडण्याला तोच कारणीभूत आहे आणि तोच त्याला आळाही घालू शकतो. वाढत्या उद्योगधंद्यांमुळे बेलगाम जंगलतोड होत आहे. वृक्ष नष्ट झाले म्हणजे वनव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक नष्ट झाला. वन्य पशुबरोबर पक्षी जीवनही धोक्यात आले. पक्षी पर्यावरणाचा समतोल साधण्यास फार महत्त्वाची भूमिका बजावतात. कृषिप्रधान देशात कृती संतुलनात पक्षी व सूक्ष्म जिवाणू महत्त्वाचे कार्य करतात. आपण अन्नाशिवाय काहीकाळ ,पाण्याशिवाय काही तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही. तसेच ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून मानवास उपयुक्त असा ऑक्सिजन हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती,वृक्ष यांची लागवड व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा कमी होत चालला आहे. त्यामुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. पाऊस कमी पडल्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्रतेने जाणवत आहे.वृक्षाचे महत्त्व अपरंपार आहे हे आपले पूर्वज सुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराजांनी ‘ वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे, असा संदेश दिला आहे. पण हे फक्त अभंग गाण्यापुरते मर्यादीत ठेवून कसे चालेल? त्या वृक्षवल्लींशी असलेली सोयरीक टिकवण्याचे प्रयत्न आम्ही करतो काय याचा विचार केला पाहिजे. आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे सत्तर टक्के जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये सौरऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौरऊर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एक प्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपण आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर ऊर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. शुद्ध वातावरण व हवामान राहण्यासाठी समाजातील सर्व तरुण वर्गाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखले पाहिजे.हवामान निरोगी राहण्यासाठी जे घटक महत्त्वाचे आहेत त्याचा विचार केला पाहिजे. शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीचे जागृत धडे दिले पाहिजे. यासाठी गल्लोगल्ली फेर्या काढून हवामान शुद्ध कसे राहील याविषयीची माहिती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. कृत्रिम शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. हवामान दूषित झाले आहे. प्रदूषण म्हणजे दूषित वातावरण. जसे आपल्या सभोवताली वातावरण तसे आपल्या शरीराचे आरोग्य. आज विज्ञान युगात जितके औद्योगिकरण तितके नवनवीन आजार. त्याचे मुख्य कारण कारखान्यांमधून निघालेले प्रदूषित धूर आणि रासायनिक पाणी जी वातावरणाला प्रदूषित करीत आहे. प्रदूषण तीन माध्यमांद्वारे प्रसारित होते. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, आणि ध्वनीप्रदूषण या तिन्ही प्रकारच्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन आजार होतात. या प्रदूषणामुळे मानवाचे आयुष्यमान निरनिराळ्या प्रकारे कमी होत आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी तसेच शुद्ध हवा प्रत्येकालाच मिळाली तर मानवाचे आयुष्यमान नक्कीच वाढेल. परंतु शुद्ध हवा व पाणी हे आता दुर्मिळच! माणसाने प्रगती केली परंतु प्रगती करताना प्रदूषणाकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष केले. त्याचा दुष्परिणाम भोगावे लागत आहे असे हे पर्यावरणाचे महत्त्व आहे. आपल्या भारतात हिंदू धर्मानुसार अनेक सण समारंभ साजरे होतात. पण त्याचा रूपकात्मक अर्थ समजून घेतला पाहिजे. आपले सगळेच सण निसर्गाची पूजा करण्याचा संदेश देणारे आहेत. पण निसर्गाची पूजा याचा अर्थ त्याचे जतन करणे हा आहे. त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न आजकाल पहायला मिळतो. म्हणजे मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात दरवर्षी येणारी पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. हा दिवस उद्या आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. वटपौर्णिमेला वटवृक्षाला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू पुराणांनुसार वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव स्थित असतात, खोड आणि फाद्यांमध्ये विष्णू असतात आणि शेंडयामध्ये भगवान शंकर स्थित असतात. म्हणून वटवृक्ष हा शिवरूपी असून त्याची पूजा करून म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरनेच! नवीन लग्न झालेल्या स्त्रियांची वेगळीच मजा असते. त्यादिवशी पतीसाठी उपवास धरतात. सर्व स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुषी लाभावे आणि आपला संसार सुखाचा जावा म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वडाचे झाड हे दीर्घायुषी झाड आहे. हे व्रत केल्याने पुढील सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. वटपौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या व्रताने पतीवरील संकटे, अडचणी दूर होतात आणि पतीला दीर्घायुष्य लाभते. अशा या दैवगुणी वृक्षाच्या छायेखाली साधना व्रत केल्यास पूर्ण होतात. या वृक्षाची षोडपचार पुजा करून या वृक्षाला सुती धागा बांधण्याची प्रथा असून वटवृक्षाजवळ पाच फळे ठेवतात. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. त्यामुळे अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया स्वतःला व आपल्या पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभु दे, धनधान्य, मुले व नातू यांनी माझा प्रपंच विस्तृत व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. अशाप्रकारे वटपौर्णिमेचे महत्व आहे. पण हल्ली शहरामधून यादिवशी घरोघरी वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा केली जाते ही एकप्रकारे पर्यावरणाला घातकच नाही का?पण आता लॉकडाऊनमध्ये कुठे सण-समारंभ? जे करायचे ते घरीच पूजा-अर्चा करून समाधान मानायचे!कोरोनाने आपोआपच वृक्षतोडीवरच बंदी आणून निसर्गाचे संरक्षण केले आहे आणि माणसाला डांबून ठेवले आहे. आज धकाधकीच्या शहरी जीवनात आपणाला रोजच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आज प्रत्येक शहरवासीयांना भोगावे लागत आहे. पण या लॉकडाऊनमुळे निसर्गाला नक्कीच आनंद झाला असेल. सगळीकडे मोकळीक, निरभ्र आकाश, शुद्ध हवा तसेच स्वच्छ आणि संथ वाहणार्या नद्या, मोकळे रस्ते त्यामुळे निसर्ग समाधानी. अशी स्वच्छ हवा आपल्या सर्वांना मिळत आहे. सगळीकडे रंगीबिरंगी फुले, पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्राण्यांचा मुक्त संचार मनाला आनंद देत आहेत. म्हणून पर्यावरण ही काळाची गरज आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पण त्यासाठी आपण योग्य पावले उचलली नाहीत तर आपल्यावर कोरोनासारखी संकटे येतील. नाहीतर निसर्ग सारखे वादळ घोंगावत येईल.
मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
फेब्रुवारी महिन्यात ’मराठी भाषा दिनाचा’ मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या विधिमंडळानं राज्यातल्या सर्व राज्यांमध्ये मराठी हा विषय आता इयत्ता दहावीपर्यंत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता.÷त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे परिपत्रक नुकतेच काढले. आता सर्व शाळांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. पण तरीही काही फरक पडेल का अशी शंका आहे. कारण जोपर्यंत आमच्या रक्तात मराठीपण उतरत नाही तोपर्यंत आम्ही मराठी भाषा सर्वत्र पोहोचवू शकणार नाही. मराठीचा अभिमान आम्हाला फक्त राजभाषा दिनाच्या दिवशी, 1 मे रोजी किंवा निवडणुका जवळ आल्यावर होत असेल तर ती शाळांमधून सक्तीची करूनही टिकणार नाही. सरकारने मराठी भाषा सक्तीची करताना सर्वात महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे तो म्हणजे बोर्डाच्या परिक्षेत मराठी ऑपशनला टाकता येणार नाही. बेस्ट फाईव्ह मध्ये मराठी सक्तीची असली पाहिजे. बाकीचे कोणतेही विषय वगळा पण बेस्ट 5 मध्ये मराठीचे मार्क पकडणे सक्तीचे असेल. तरच मराठीकडे गांभिर्याने पाहिले जाईल. त्यासाठी मराठी अभ्यासक्रमात नाही तर रक्तात उतरवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासोबत इतर सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय आता असावाच लागेल, असा शासनादेश सरकारने सोमवारी म्हणजेच 1 जून रोजी जारी केला.त्यानुसार, राज्यात 2020-2021 या शैक्षणिक सत्रासाठी पहिली ते सहावीपर्यंत मराठी अनिवार्य आहे, तर 2021-2022 मध्ये दुसरी ते सातवीपर्यंत, 2022-2023 तिसरी ते आठवी आणि पुढे दहावीपर्यंत मराठी शिकणं सक्तीचं असणार आहे.ज्या शाळा या कायद्याची अमलबजावणी करणार नाहीत त्या शाळांच्या प्रमुखांना 1 लाख रुपये दंड करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2020-21 या वर्षापासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल.येत्या शैक्षणिक वर्षात पहिली ते सहावीसाठी मराठी विषय सक्तीचा होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्यानं पुढील इयत्तांसाठी मराठी अनिवार्य होत जाईल. अशा प्रकारे पहिली ते दहावीसाठी मराठी सक्तीचा विषय होईल.खरं तर यासाठी आपल्याकडे कायदा करावा लागतो हेच दुर्दैव आहे. शेजारी दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांची प्रादेशिक भाषा अत्यंत कडवटपणे जपली जाते. कर्नाटकाने बेळगाववर ताबा मिळवला तो भाषेच्या जोरावरच. जास्तीत जास्त लोकांना नाही तर प्रत्येकाला कानडी सक्तीची करून तिथला मराठी माणूस कानडी करून टाकला आहे. त्यामुळेच त्यांनी बेळगांव महाराष्ट्रात येण्याचे मार्गच एकप्रकारे बंद केले आहेत. हा भाषेचा अडसर त्यांनी न्यायालयात पोहोचवला आहे. आम्ही फक्त मुंबईत मोर्च काढतो, कर्नाटकातल्या गाड्या फोडतो. पण तिकडे मराठी शाळा काढण्याचे धोरण आखत नाही. जोपर्यंत न्यायालयाने बेळगांव कर्नाटकचा आहे हे जाहीर केलेले नाही तोपयर्र्त आपण तिथे मराठी शाळा काढू शकतो हे लक्षात घेतले नाही. कसे घेणार कारण आम्ही भाषेची सक्ती मुंबईत आणि अन्य महाराष्ट्रात करू शकत नाही तिथे कर्नाटकात काय घुसखोरी करणार? हे करण्यासाठी भाषा आमच्या रक्तात उतरली पाहिजे.आता नव्या परिपत्रकात काढलेल्या नियमाप्रमाणे शाळेत मराठी बोलण्यावर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत असेही या कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत सरकारी आणि विरोधी पक्षांनी एकवाक्यता दाखवली आणि एकमतानं हे विधेयक मंजूर केलं. ही समाधानाची बाब आहे. पण काही शाळा या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतात. त्यात पळवाटा काढण्याची शक्यता आहे. त्याबाबत कठोर कारवाईची गरज आहे.अर्थात मराठी सक्तीची होण्यानंतरही ती प्रत्यक्षात येईपर्यंत अनेक आव्हानं आहेत. अमराठी शाळांच्या संचालकांचे आणि संस्थाचालकांचे मत हे नेहमीच मराठी विरोधी आहे. ते म्हणतात की मुलांचं आणि पालकांचं मत, जी अमराठी कुटुंबं आहेत, सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याशिवाय अन्यही व्यावहारिकतेची आव्हानं आहेत. ही व्यावहारीकता नेमकी काय आहे? तर मराठी शिक्षकाची नेमणूक करायला लागणे हेच त्याचे कारण आहे. वरकरणी अनेकजण म्हणतात की मराठी भाषेसाठी काही निर्णय घेतला आहे तो स्वागतार्हच आहे, पण तो राबवणं कठीण आहे. म्हणजे मराठी या प्रश्नावर लढणारे आणि राजकारणाचा महत्वाचा मुद्दा करणारे नेते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे ही आंदोलने खोटी ठरतात. त्यामुळे मराठी ही गरीबांची भाषा बनलेली आहे हे वास्तव समोर येत आहे. आज अन्यक बोर्डांची अनेक केंद्रीय विद्यालयं महाराष्ट्रात आहेत. जिथे हिंदी प्रथम भाषा आहे. ती यासाठी आहेत की केंद्र सरकारच्या नोकरीत असणा-या पालकांच्या मुलांना बदली होऊन कोणत्याही राज्यात गेलं तर शिक्षण विनासायास घेता यावं. पण तिथेे मराठी भाषा शिकवली जात नाही अशी परिस्थिती आहे. म्हणूनच केवळ मराठी सक्तीची नाही तर ती महाराष्ट्रात प्रथम भाषा असली पाहिजे. पण बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा किंवा अन्य बोर्डाच्या शाळांचा याला विरोध आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. आज यासाठी विद्यार्थी, पालक, भविष्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असली कारणे दाखवून मराठी भाषेला विरोध होतो आहे. पण मराठी माणसे काय मोठ्या पदावर गेली नाहीत का? मराठी माध्यमातून शिकून किंवा मराठी विषय घेउन कोणीच या देशात मोठा झाला नाही का? पण केवळ स्वार्थासाठी मराठी भाषेला संस्थांकडून विरोध केला जातो आहे. हा विरोध होतो आहे कारण आम्ही मराठीचे राजकारण करतो आहोत. आम्हाला या भाषेचे राजकारण नको आहे तर ती गरजेची भाषा आहे असे दाखवता आले पाहिजे. त्यासाठी ती रक्तात उतरवली पाहिजे. त्यासाठी आज कोरोनोच्या निमित्ताने संधी आलेली आहे, त्याचा फायदा घेतला पाहिजे.मुलांची वा पालकांची गैरसोय होईल हे केवळ सांगण्यासाठी पुढे केलेलं कारण आहे. जर मराठी दहावीपर्यंत शिकवायचं ठरवलं तर ते नक्की शक्य आहे. यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, मराठी ही आम्हाला रक्तात भिनवावी लागेल. मराठी भाझा अन्य भाषिक शाळांमध्ये सक्तीची करणं यावरून यापूर्वीही महाराष्ट्रात अनेक भाषिक आणि राजकीय चर्चा झाल्या आहेत. त्याच्या व्यावहारिकतेवरूनही गट इथे पडले आहेत. पण आता विधिमंडळानं एकमतानं दहावीपर्यंत मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याची अंमलबजावणी कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज अन्य भाषिक शाळांची निर्मिती का झाली? मुंबईत दाक्षिणात्य भाषांची शाळा आहे, कन्नड, तेलगू, मल्याळम, तमिळ, उर्दू या भाषांच्या शाळा आहेत. याचे कारण त्या भाषिक लोकांची संख्या इथे वाढली आहे. आम्ही आमचा टक्का घसरवत नेला. त्यामुळे त्यांच्यासाठी तयार झालेल्या शाळांमध्ये आम्ही प्रवेश घेउ लागलो. त्यांची संस्कृती आम्ही सुरू केली. आम्ही आमची मराठी संस्कृती विसरलो, मराठीपण आमच्या रक्तात उतरले नाही म्हणून ही वेळ आली. आज सकाळी रोज पौवाक आवाज करत इडलीवाला सायकल घेउन येतो. ठिकठिकाणी इडली वडा याचे स्टॉल दिसतात. आम्ही हे पदार्थ खायचे सोडून सकाळचा नाष्टा मराठी करू. ब्रेकफास्टला तिलांजली देउन टाकू आणि त्याऐवजी नाष्टा करू, न्याहरी करू. मराठी भाषेतील शब्द घरात वापरू. म्हणजे आमच्या शिव्या जर आंतरराष्ट्रीय होतात. आयला ही शिवी अन्य भाषेत रूजते, मायला सगळीकडे जाते तर त्यातील सुंदर गोष्टी का जात नाहीत? आमचा आहार, विहार, पोषाख हा मराठी असला पाहिजे. ट्रॅडिशनल डे नावाचे फॅड आजकाला शाळा कॉलेजमधून असते. त्यात गुजराथी, बेंगाली, दाक्षिणात्य पद्धतीने साडी नेसण्याचे काम मुली करतात. काही हौशी मुली नउवारी साडी नेसतात. पण ती तयार शिवलेली नेसली जाते. गुजराती, राजस्थानी लोकांनी मेहेंदी क्लासेस घेउन, कोपर्याकोपर्यावर मेहेंदीचे कोन पोहोचवून त्यांची संस्कृती देशभर पसरवली. तशी आम्ही नउवारी शिकवणी का घेत नाही? नउवारी साडी कशी नेसावी याचे एक दिवसाचे कोर्स सुरू करावेत. धोतर तयार न वापरता ते नेसायचे कोर्स असले पाहिजेत. मराठी पोषाक नक्की कोणता आहे असे विचारले तर आज आम्हाला सांगता येत नाही. म्हणजे तमिळी लोक लुंगी एका स्टाईलमध्ये नेसतात. त्यांचे तरूण नायकही मस्तपैकी मागच्या पायाने लुंगी उचलतात. पण आमच्या मुलींना साडी नेसतात की घालतात असे विचारले तर साडी घालून कॉलेजला चालले म्हणतात. भेटली ती साडी घातली. हे काय वाक्य झाले का? साडी भेटते का मिळते? त्यामुळे अन्य भाषांमधून आलेल्या शब्दांनी बलात्कारीत झालेली भाषा जर आम्ही व्यवहारात वापरत असू तर शाळांमध्ये या भाषेची सक्ती करून मराठी नाही आपण शिकवू शकणार. त्यासाठी ही भाषा आम्हाला रक्तात भिनवली पाहिजे. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी हे फक्त फेब्रुवारी महिन्यात म्हणायचे गीत नाही. त्यासाठी आम्हाला मराठी जगता आले पाहिजे. म्हणजे दाक्षिणात्य माणूस सहजपणे ओळखता येतो. गुज्जूभाई ओळगता येतो. पंजाबी माणूस पगडीवरून ओळखता येतो. भैय्या ओळखता येतो. पण मराठी माणसाची ओळख काय? बाकी सर्व भाषिकांशी त्यांच्या भाषेतून बोलणारा माणूस ही ओळख आज आमची झाली आहे. त्यापेक्षा मराठी बोलणारा तो मराठी माणूस म्हटला पाहिजे. महाराष्ट्रात तोडके मोडके का होईना मराठीत बोलून आपले मराठीपण दाखवण्याचा प्रयत्न करणारे अनेक गुजराती, मारवाडी लोक इथे आहेत. भाजपचे एक माजी खासदार तर महत्प्रयासाने मराठीत बोलतात. काही उच्चार करताना लोक त्यांना हसतात. त्यांना बोबडा म्हणून सोशल मिडीयावर हिणवले जाते. पण आपली भाषा बोलणारे ते नेते आहेत म्हणून त्यांचे कौतुक कोणी करत नाहीत. आज ही मनोवृत्ती आपल्याला बदलली पाहिजे. आमची मराठी भाषा जे रक्तात भिनवून घेत आहेत त्यांचे स्वागत केलेच पाहिजे पण आमच्या रक्तात आम्ही ती कशी भिनवू शकतो याचा विचार केला पाहिजे.
Monday, June 1, 2020
महायुद्धाची नांदी
संपूर्ण जग हे एका नव्या युद्धाच्या किंवा तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धाचा केंद्रबिंद हा अर्थातच चीन असणार आहे. किंबहुना कोरोनाच्या निमित्ताने चीनने तशी गुप्तपणे सुरूवात केलीही आहे. हे युद्ध आर्थिक सत्ता, महासत्ता आणि नवा साम्राज्यवाद यासंबंधी असल्याने त्याचे पडसाद भारतावर उमटणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने चीनच्या कुरापती वाढत आहेत. भारतालाही सज्ज राहावे लागत आहे. सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्याचे जवान चार दिवसांपूर्वी आमने-सामने आले. यावेळी दोन्हीकडील सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आले. तसे पाहिले असता सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात. अशी परििदुसरीकडे नेपाळनेही भारताचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच याला चीनचीच फूस असू शकते. हे सगळे नकटे एकत्र आले असतील तर त्यांची नकटी नाके ठेचावीच लागतील.अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित शिष्ठाचारानुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात. ही घटना बर्याच दिवसांनी घडली असल्याचे चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे दिसते. जम्मू-काश्मीर प्रश्नावर चीन सतत वक्तव्ये करताना दिसत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रातील चीनच्या कायमस्वरुपी मिशनच्या प्रवक्त्याने जम्मू-काश्मीरवर काही वक्तव्ये केलेली आहेत. त्या वक्तव्यातील भूमिकेला भारताने नाकारलेले आहे. भारताची भूमिका चीनला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्दे भारताची अंतर्गत बाब आहे. असे असले तरी, चीनचे सैन्य लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सतत फिरत असते. डोकलाम मुद्दाही दोन्ही देशांदरम्यान बराच काळ धुमसत राहिलेला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अरुणाचल प्रदेशजवळील भारत-चीन सीमा हा दोन्ही देशांदरम्यानचा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे. कोरोनाने उद्धवस्त केल्यानंतर आता चीन अशाप्रकारे सीमेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यावेळी चीनचा काटा काढायला अमेरिका रिंगणात उतरेल आणि त्यातून महायुद्धाची नांदी गायली जाईल असे चित्र आज दिसत आहे. कारण चीनने लादलेला कोरोना हा रोग अमेरिकेच्या पोटात खुपत आहे. त्याचा सूड उगवण्याची काही संधी मिळाली तर अमेरिका ती घेणारच यात शंका नाही. त्यातून दुसर्या भूमिवर जाउन उत्पात माजवायला अमेरिकेला आनंदच असतो.भारत-चीन सीमेवर वास्तविक नियंत्रण रेषेपर्यंत जाणारा पूल बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (बीआरओ) सुरू केला आहे. या पुलावरून चीनच्या सीमेपर्यंत 40 टन वजनी वाहने जाऊ शकणार आहेत. या नव्या पुलामुळे भारत आणि चीनदरम्यान आणखी एक नवा वादाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. कारण नव्या पुलामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला असून आता कोणत्याही अडथळ्यांविना भारतीय सैनिक सीमेपर्यंत जाऊ शकतील. चीनच्या सुरू असलेल्या कुरापतींना आवर घालण्यासाठीही भारताची ही रणनीती आहे. केंद्र सरकारने थेट परदेशी गुंतवणूक नियमात बदल केल्यानंतर भारत चीनच्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मज्जाव करत असल्याचे सांगत चीनने नाराजी व्यक्त केली होती. अशात आता भारताने चीनच्या सीमेपर्यंतचा मार्ग प्रशस्त केला आहे. ज्या डोकलाम पठारावर चीनने दावा ठोकला होता त्याच भागात हा पूल आहे. हा पूल कमकुवत झाल्यामुळे तुटला होता. हा पूल दापरिजो आणि सुबानगिरी नदीच्या पलिकडील गावांना जोडण्याचे काम करतो. या पुलामुळे सियांग पट्टा वरच्या सुबानगिरीशीही जोडला जातो. हा पूल म्हणजे भारत आणि चीनमधील वास्तविक नियंत्रण जवळील रणनीतीसंदर्भातील एक दुवा असल्याचेही मानले जात आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर याच मार्गाने रेशन, बांधकामाचे साहित्य, औषधे अशा सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकटकाळात सर्व प्रकारची काळजी घेत अत्यंत कमी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चीनला थेट आव्हान देण्याची क्षमता फक्त भारतातच आहे, हे चीनही जाणून आहे, त्यामुळे या दोन्ही देशांतला सीमाप्रश्न जटिल झाला आहे. तो अधांतरी ठेवण्याचा आणि कुरापती काढून दबावाचे राजकारण खेळण्याचा चीनचा डाव आहे. भारत-भूतान-सिक्कीम सीमेवर नुकत्याच उद्भवलेल्या पेचप्रसंगाने भारताच्या अनिश्चित सीमांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भारताची भूसीमा पाकिस्तान, चीन, नेपाळ, भुतान, बांगलादेश आणि म्यानमारशी जोडलेली आहे. पण खरा सीमावाद हा चीनबरोबरच आहे, कारण बांगलादेशबरोबरचा सीमावाद दोन्ही देशांनी सामंजस्याने सोडवलेला आहे. नेपाळ, भुतान आणि म्यानमारशी असा काही वाद नाही. पाकिस्तानबरोबर सीमावाद नाही, पण आहे तो वाद काश्मीरविषयी आहे आणि तो संपूर्ण काश्मीर राज्य कुणाचे याविषयी आहे. पाकिस्तानने कच्छच्या सीमेविषयी वाद निर्माण केला होता, पण तोही शांततेने सोडविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या खरा सीमावाद आहे तो फक्त चीनशी. दोन्ही देशांतील मतभेदांचे मूळ कारण असलेला सीमावाद मिटवणे आवश्यक आहे. पण हा वाद कसा मिटवायचा हा खरा पेच आहे. हेच कारण नवे युद्ध सुरू होण्याचे असू शकते. जगभरात 62 देश आज चीनच्या विरोधात गेल्याने चीनला आता युद्धाला सामोरे जावे लागेलच. त्यासाठी भारताची खोडी काढण्याचे निमित्त होउ शकते. पण ही आजची परिस्थिती एकप्रकारे नव्या महायुद्धाची वात पेटण्याच चीन्ह आहे हे निश्चित. यात भारत, चीन आणि अमेरिका या तीन देशांचा समावेश असणार आहे. कारण मोठ्या लोकसंख्येमुळे भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे. तिच्यावर कब्जा करण्यासाठी चीन आणि अमेरिका या दोघांचे प्रयत्न आहेत. तसेच महासत्ता म्हणून वर्चस्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने अमेरिका भारताची ढाल करून चीनवर वार करेल आणि त्याचा फटका भारताला बसेल असा प्रयत्न करेल हे नक्की.यापूर्वी 2017 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी निर्माण झालेला तणाव इतका मोठा होता की भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही अनेक दिवस या ठिकाणी मुक्काम केला होतो. यामध्ये 17 व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंगही सामील होते. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयानेही दखल घेतली होती. त्यामुळे तेव्हापासून धुमसत असलेले हे युद्ध आता पेटू शकते.
या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
लॉकडाउनचा चौथा टप्पा जरी 18 तारखेपासून सुरू झाला असला तरी त्याची नवी नियमावली उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे 22 मे पासूनचे नवे जग कसे असेल हा प्रश्न आहे. आता अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळेल हे नक्की. पण यातून प्रत्येक माणसाची, राज्याची, देशाची आणि जगाची आर्थिक स्थिती भविष्य काय असेल हे आपल्याला पहावे लागेल.कोरोना व्हायरसने आज संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मनुष्याने ओढवून आणलेले किंबहुना चीनने लादलेले हे संकट दिवसेंदिवस गंभीर होते आहे. आज जगभरात वर्चस्वाची जी स्पर्धा लागली आहे, त्या स्पर्धेतूनच कोरोनाचा जन्म झाला आणि हे पाप विस्तारवादी, साम्राज्यवादी चीनने केले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी उघडपणे म्हटले आहे. त्यांनी तर कोरोनाला ‘चिनी व्हायरस’ असेही म्हटले आहे. चीनला सुपरपॉवर होण्याची घाई झाली आहे आणि या घाईतूनच चीनने या व्हायरसची निर्मिती केली, असा आरोपही केला जात आहे, जो चीनचा स्वभाव लक्षात घेता खरा मानला पाहिजे. एखादा देश किंवा एखादी व्यक्ती आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते, हे कोरोनाच्या प्रसाराने दाखवून दिले आहे. याला साक्ष आहे ती चीनमधल्या प्रसाराची. चीनमधला बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत अल्प आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने आपला आकडा मर्यादीत ठेवत संपूर्ण जगाला वेठीस धरले. संपूर्ण जग गेले चार महिने बंद पाडून त्यांच्या अर्थव्यवस्थेला खिळ घातली आहे. मात्र यातून चीन नामानिराळा राहु पहात आहे. कोरोना व्हायरस हे एकप्रकारचे जैविक अस्त्रच आहे, ज्याने जगभर थैमान घातले आहे. असंख्य अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत असताना, जिथे चीन जगभरच्या कंपन्या विकत घ्यायला निघाला आहे, तिथे अनेक विदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडू पाहात आहेत. अनेक कंपन्यांनी चीनमधील आपला गाशा गुंडाळायलाही सुरुवात केली आहे. जगभरातल्या गळेकापू स्पर्धेतून या व्हायरसचा जन्म झाला असावा, असे मानण्यास आजतरी जागा आहे. आज आपल्याजवळ जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कमवा, असे आजचे अर्थशास्त्र शिकविते. यातून अधिकाधिक कमावण्यासाठी अनैतिक स्पर्धा सुरू होते आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक पैसा कमवायचा, त्यातून स्वत:ची ताकद वाढवायची आणि वाढलेल्या ताकदीतून विस्तार करायचा, हा प्रकार भांडवलवाद जन्माला घालून खतपाणी देणाराच म्हटला पाहिजे. यामध्ये एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय षडयंत्रही असल्याचा कधीकधी भास होतो. म्हणजे सामान्य माणसांना लागणारी नियमीत औषधेही औषध दुकानातून मिळत नाहीत. आपले नेहमीचे डॉक्टर, कन्सल्टंट हे किरकोळ ताप, सर्दी असल्या आजारांवर औषधे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे दुखणी अंगावर काढणे भाग पडते आहे. विकोरीयल, अॅनासीन, अॅक्शन 500, विक्स असल्या गोळ्याही मेडीकल स्टोअरमधून दिल्या जात नाहीत. तशी मागणी केली तर लगेच कोरोनाची शक्यता आहे म्हणून पिटाळले जाते. त्यामुळे हा एकप्रकारचा छळ आहे. कारण ताप येणे, सर्दी पडसे होणे हा एक सवयीचा, शरीरधर्माचा भाग असतो. तो अधूनमधून येत असतो. त्यासाठी किरकोळ औषधे आयुर्वेदीक, अॅलोपथी घेउून आराम मिळतो. त्रिभुवन किर्ती, अडुळसा ही औषधे आपल्या घरच्या बटव्यातील औषधे आहेत. असे असताना ती दिली जात नाहीत आणि सामान्य नागरिंकाचे आजार वाढवले जातात. हे सगळे काही औषध कंपन्या, फार्मास्युटीकल कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? अशा अनेक शंका आज निर्माण होत आहेत.त्याचप्रमाणे रूग्णांची, बाधितांची जी संख्या दिली जात आहे, ती पण खूप संशयास्पद आहे. एखाद्या घरातील एक़ा व्यक्तीला लागण झाली तर त्या घरातील पाचही व्यक्तींना अॅडमीट केले जाते. त्यांच्या संपर्कातीला पाच पंचवीसच लोकांना पकडले जाते. हा एकत्रित आकडा फुगत जातो , तो प्रसारमाध्यमे जाहीर करतात आणि घाबरवून सोडतात. त्यामुळे यात काही षडयंत्र आहे काय असाही प्रश्न निर्माण होतो. पण एकुणच जागतिक वर्चस्वाच्या या लढाईतून, स्पर्धेतून अनेक देशांनी महासंहारक शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. या महासंहारक शस्त्रांचा वापर वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांविरुद्ध झाला, तर संपूर्ण जग त्यात उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज जगातल्या अनेक देशांकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत. यांचा दुरुपयोग झाला तर मनुष्यजातीसह या धरतीवरील सगळे पशू, पक्षी आणि प्राणी नष्ट होतील. तोच प्रकार कोरानाच्या संसर्गाने झालेला आहे. काही ठिकाणी वन्य पशूंना वाघांनाही हा रोग झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तर काही ठिकाणी माकडांना झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. म्हणजे हे नक्की काय चालले आहे आहे? यातून कधी बाहेर पडायचेच नाही काय? आता भविष्यातील नुकसान टाळायचे असेल, तर आजच त्यावर विचार होणे गरजेचे आहे. आपली अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, तिचे स्वरूप कसे असावे, यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आज आपण ज्याला अर्थव्यवस्थेचा सिद्धांत असे म्हणतो, त्याचा आधार एकमेव आहे आणि तो म्हणजे भौतिकवाद. अर्थशास्त्राच्या प्रत्येक मूळ कल्पनेचा आधार हाच आहे. हाच त्याचा दृष्टिकोनही आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने मानवाचे जे व्यवहार आहेत, ते उत्पादक वा अनुत्पादक असू शकतात. मनुष्याच्या ज्या व्यवहारामुळे काही ना काही प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या भौतिक गरजा पूर्ण होतात, त्याला उत्पादक व्यवहार असे आपण म्हणू शकतो. अर्थशास्त्राचे हे स्वरूप समजून घेणे तसे कठीणच आहे. पण, ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. मनुष्यजातीचे अस्तित्व सुरक्षित करायचे असेल, तर वर्चस्वासाठीच्या लढाईला पूर्णविराम कसा देता येईल, याचा विचार करावा लागेल. आपल्या गरजा किती आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून जगभरातील देशांना आपली धोरणे सुनिश्चित करावी लागतील. अन्यथा, यापूर्वी झाले नसेल एवढे प्रचंड नुकसान भविष्यात होईल, हे कायमचे लक्षात ठेवावे लागेल. जगाचं जे काय व्हायचं ते होत राहील. आपण भारताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी आली असतानाही आणि अमेरिकेसारख्या देशाने गतकाळात आर्थिक निर्बंध लादले असतानाही आपली अर्थव्यवस्था तग धरून राहिली होती. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमुळेच हे शक्य झाले. आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. लॉकडाऊन चारची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही नवी कल्पना देशवासीयांपुढे मांडली आणि ती सगळ्यांना आवडलीही. प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर कसे होता येईल आणि स्वावलंबी बनून देश मजबूत कसा करता येईल, याचा विचार मांडताना मोदींनी काळाची पावलं ओळखली आहेत, हेही तेवढेच खरे! अमेरिकेसारख्या देशाला औषधांचा पुरवठा करून भारताने जगाला आपली ताकद आणि क्षमता यांचा परिचय करून दिला आहे. तरी अजूनही बरेच काही करण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न व्हायचे, ते सुरू आहेत आणि राहतीलच. पण, या देशाचा एक सतर्क आणि कर्तव्यदक्ष नागरिक या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाने स्वदेशीचा अंगीकार करायला शिकले पाहिजे. चीन आणि सर्वच परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार हेच या युद्धाचे मुख्य हत्यार असणार आहे.आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. मनुष्यजात स्वत:ला घरात कोंडून बसली आहे, नव्हे, कोरोनाने माणसाला घरात बसण्यास बाध्य केले आहे. पण ही मरगळ झटकण्याची हीच वेळ आहे.
पुनश्च हरिओम
आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे. या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी आधार दिला आहे. या संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणाच दिली आहे. त्याचाच मंत्र आहे पुनश्च हरिओम. गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनोच्या संकटात अडकून पडले आहे. भारतही गेली तीन महिने या संकटात आहे. दोन महिने आपण लॉकडाउन झालो आहोत. आपण कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकलो होतो. आता त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे आहे. आता हा चक्रव्यूह भेदायचा कसा, ते कळणारे बरेच आहेत, पण वळणारे किती आहेत हे महत्वाचे आहे.एकदा या चक्रव्यूहात आत गेल्यावर त्यातून बाहेर पडणेच कठीण असते. या लॉकडाउनच्या काळात महाभारत दाखवल्यामुळे सर्वांनी चक्रव्युहाची परिस्थिती पाहिली आहे. त्याची भीषणता पाहिली आहे. म्हणजे अर्जुनपुत्र अभिमन्यू माता सुभद्रेच्या गर्भात होता. कृष्ण हा आपली भगिनी सुभद्रेला चक्रव्यूह भेदून आत जायचे कसे, हे सांगत असताना तिला झोप लागली तरीही पोटात असलेला अभिमन्यू हुंकार देउन आतून त्याला प्रतिसाद देत राहिला. त्यामुळे त्याला चक्रव्यूहात दाखल व्हायचे कसे हे कळले. दरम्यान, सुभद्रा झोपी गेल्याचे कृष्णाच्या लक्षात आल्यावर त्याने बाहेर कसे पडायचे ते सांगितले नाही. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूह मोडून बाहेर पडता आले नाही आणि रणांगणावर तो धरातीर्थी पडला. हे सगळे आपण सरकारच्या कृपेने पुन्हा एकदा महाभारत प्रसारीत झाल्यामुळे या लॉकडाउनच्या चक्रव्यूहात अडकल्यावर पाहिले आहे. अनेकांनी ते वाचून ऐकलेही असेल. तशीच काहीशी अवस्था आज संपर्ण जगाची झालेली आहे. या चक्रव्यूहात संपूर्ण जग अडकले आहे. आता त्यातून कोण बाहेर पडणार आणि कोण अडकणार हे समजत नाही. पण आता आपण तशी तयारी केली आहे. पण आज जगात कोरोनाशी लढताना अनेकांचा असा अभिमन्यू झालेला आहे. जवळपास सारे जगच कोरोनाच्या प्रभावात आल्यावर एकच उपाय दिसत होता, तो म्हणजे सोशल डिस्टन्सींग पाळणे. मास्क, सॅनिटायझर हे जीवनावश्यक झाले. मुळात कोरोनाबद्दल अद्याप बरीच साशंकता आहे. तो पूर्णपणे कुणालाच कळलेला नाही.या सोशल डिस्टन्सिंगबाबत अनेकांचे अनेक विचार आहेत. याची काही आवश्यकता नाही असेही मत अनेक देशांतल्या तज्ज्ञांनी मांडले होते आणि काही देशांत हे सोशल डिस्टन्सिंग न पाळताही कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात त्यांना यश मिळाले. विशेष म्हणजे या कोरोनोचा जो निर्माता आहे, जो प्रसारक आणि प्रचारक आहे त्या चीनमध्ये या रोगाचा प्रसार फारच कमी झालेला आहे. त्यावर सहज नियंत्रण त्यांनी मिळवले. अर्थात हा चक्रव्यूह त्यांनी सगळ्या जगाला अडकवण्यासाठी मांडला असला तरी आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आहे. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे.या संकटात भारतासारख्या खंडप्राय विकसनशील देशाने काय करावे, असा प्रश्न होता. कारण कोरोनाचा प्रभाव देशागणिक बदलतो आहे. भारताने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे ठरविले आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भारतीय जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव तुलनेने फार लवकर ओसरतो आहे. आता तो पूर्ण आटोक्यात आलेला नाही; पण आर्थिक परिस्थितीचाही विचार करावाच लागणार आहे. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडावेच लागणार आहे. त्याची तयारी आपण आता करत आहोत. राज्यात 3 जून, पाच जून आणि 8 जून अशा तिन टप्प्यात आपण बदल घडवत आहोत. हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण देशात सर्वात जास्त चक्रव्यूहात महाराष्ट्र अडकलेला आहे. त्यातही मुंबई अधिक प्रमाणात अडकली आहे. त्यामुळे हे कार्य आपल्यालाच हाती घ्यावे लागणार आहे हे नक्की. वास्तविक पाहता संपूर्ण जगालाच आता कोरोनासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. लस निर्माण करण्याचे प्रयत्न जगभरात 124 ठिकाणी सुरू आहेत. पैकी कुणाला यश मिळेल हे आज तरी सांगता येत नाही, पण तोवर थांबून राहणे शक्य नाही. म्हणून आता पुनश्च हरिओम म्हणत आपल्याला बाहेर पडायचे आहे. म्हणून भविष्यात बाहेर पडताना खबरदारी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाचा चक्रव्यूह आपण भेदला आहे, पण त्यातून बाहेर नीट पडल्यावरच ते खरे यश आहे, असे म्हणता येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. जणू काही सगळीकडे काळे ढग जमले होते. जगाच्या वेशीवर अंधारच दाटून आला होता. आता त्याचे जाळे विरळ होते आहे. नजर रोखून पलीकडे अंधूक का होईना दिसू लागले आहे. कोरोनानंतरचे जग, यावर आता विचार सुरू झालेला आहे. त्यात कोरोनाइतकीच महत्त्वाची चिंता ही अर्थकारणाची आहे. मधल्या काळात जग ठप्प झाले होते. त्यामुळे अगदी छोट्या-मोठ्या उद्योगांची कवाडे बंद होती. बेरोजगारी जगातच प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेसारखा जागतिक महासत्ता असलेला देश हातघाईवर आलेला आहे. उद्योग, व्यापार सुरू करायचे झाले तर गर्दी होईल आणि मग भौतिक दूरतेचे नियम पायदळी तुुडविले जातील. कोरोना वाढेल. लॉकडाऊन कडक केला तर आर्थिक स्थिती आणखीच नाजूक होईल, अशी अवस्था आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’.अर्थात त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. संपूर्ण जगात वैद्यकीय तज्ज्ञांचे मत हेच होते. लॉकडाऊन अंमलात आणणे सोपे आहे, मात्र तो भेदून बाहेर पडणे कठीण आहे. भारताने त्यावर केलेला पाचव्या ‘अनलॉकडाऊन’चा प्रयोग किती यशस्वी ठरावा, ते येता काळच सांगणार आहे. मात्र, या अनलॉकडाऊनची संहिता मात्र आता तरी आश्वासक अशी वाटते आहे. केंद्राने पहिले पाउल टाकले आहे. त्याला महाराष्ट्र सरकारने चांगला प्रतिसाद देत पुढचे पाउल टाकले आहे. पुनश्च हरिओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, आभार मानले पाहिजेत. आता थोड्या प्रमाणात का होईना आमची मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे. या कोरोनानंतर जगाच्या व्यवस्थेतच आमूलाग्र बदल होणार आहे. जगाच्या एकुणातच व्यवस्थेची पुनर्स्थापना होण्यासाठी किती दिवस लागतील हे आज सांगता येणे कठीण आहे. त्यासाठी ही पहिली तीन वर्षे जास्त महत्त्वाची आहेत. जग तसेही जागतिकीकरणाच्या व्यवस्थेशी झगडू लागले होते. स्थानिक व्यवस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग जगात प्रशस्त होऊ लागला होता. त्याला आता कोरोनाने अधिक वेग दिलेला आहे. त्यामुळे आता स्वदेशी हा बिनीचा शब्द होणार आहे. 12 मे च्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीयांना याचीच जाणिव करून देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला होता.आता जागतिक व्यवस्था पुनर्स्थापित होण्याचा वेग, कोरोनाने आणलेल्या स्थगितीतून बाहेर कसे पडतात सारे देश, यावर अवलंबून राहणार आहे. त्यासाठी भारताने चौथ्या लॉकडाऊनच्या स्थितीतच पॅकेज दिले होते. त्याची अंमलबजावणी करायची तर आता सावधता बाळगत मोकळीक द्यावी लागणार आहे. छोट्या, मध्यम उद्योगांना बळ देत चालना द्यावी लागणार आहे. त्याची तरतूद 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये करण्यात आलेली आहे. मधल्या काळात देशभरात कोट्यवधी मजूर आपापल्या गावी पोहोचले आहेत. याचे कारण त्यांना एकतर कोरोनाची भीती आहे आणि कॉस्ट कटींगच्या नावाखाली कामगार, मजुरांना कमी करण्यात येत आहे. त्यात नेमकी आवश्यकता किती आणि कोरोनाच्या स्थितीचा गैरफायदा घेणे किती, हे आताच मोजता येणार नाही. पण बेरोजगारीचे संकट यात फार मोठे आहे. त्यामुळे या चक्रव्युहात सामान्य, मजूर, कामगारवर्ग पहिला बळी पडणार आहे. नेमका अभिमन्यू कोणाचा होणार त्याच्या छाताडावर नाच करणारे शकुनी, दुर्योधन, दु:शासन, कर्ण, अश्वत्थामा असे कोण असणार आहेत हे आज तरी सांगता येणार नाही. कारण तसला प्रश्नही आता विचारणे अडचणीचे आहे. थोड्याबहुत प्रमाणात त्याचा गैरफायदा घेतलाच जाणार नाही, असेही नाही. कामगार, मजूर आणि ग्राहक यांची पिळवणूक भांडवलदार करतील आणि त्यांना प्रश्न विचारणे हे या काळात अपवित्र ठरणार आहे. त्यातून वाढणारी अस्वस्थता एका नव्या क्रांतीला जन्म देते काय, ते पाहायचे. अर्थात, ती क्रांती नेहमीप्रमाणे आधी युरोपात येईल आणि मग भारतात पोहोचेल. पण आता हळहळू सगळे मोकळे होणार आहे. होते आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ही मोकळीक असेल. प्रतिबंधित क्षेत्र हा एकच निकष असेल आणि तो कसा ठरवायचा, त्याचे निकष हे स्थानिक प्रशासनाचे असतील. आताच लोक घरात बसून कंटाळले आहेत. एखाद्दुसरा रुग्ण आढळला म्हणून काही तो परिसरच प्रतिबंधित करायचा का? त्याला आताच विरोध होऊ लागला आहे. थोड्याच अंतरावर सगळेच कसे मोकळे असताना प्रतिबंधित क्षेत्रात मात्र आधीसारखेच कडक नियम असतील आणि ते तिथल्या नागरिकांना असह्य होणार आहे. ते मोकळ्या जगात जाणारच नाहीत, असे नाही. त्यामुळे अमेरिकेत आता सगळेच मोकळे करण्याचा अंमल केला जातो आहे. आता लॉकडाउन उठवण्याची सगळ्या जगात चढाओढ लागली आहे. कोणी तीन महिन्यांनी, कुणी दोन महिन्यांनी लॉकडाउन उठवतो आहे. यातून सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असते आणि ती स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता 8 जूननंतर भारतातही हॉटेल्स, मॉल्स, मंदिरे मोकळी केली जाणार आहेत. अर्थात, त्यातही नियम पाळावे लागणार आहेत. त्यातून अर्थातच हा सामूहिक प्रतिकारशक्तीचा उद्भव होणार आहे. आताच काही ठिकाणी तो दिसू लागला आहे. पण एक मात्र नक्की की, लोकांच्या अंगवळणी बर्याच गोष्टी पडल्या आहेत. स्वच्छता आणि भौतिक दूरता लोक स्वत:हून पाळू लागले आहेत. अगदी छोट्या किराणा दुकानांत, आस्थापनांत सॅनिटायझेन, मास्कचा वापर केला जातो आहे. खूप वर्षे पिंजर्यात असलेला पक्षी अचानक मोकळ सोडला तरीही तो एकदम उडून जात नाही. एकतर त्याची उडण्याची क्षमता आणि बळ, मानसिकता क्षीण झालेली असते. तो काही वेळ इकडे तिकडे बागडतो आणि मग लघु पल्ल्याची उडाणे केल्यावर भरारी घेतो. तसेच नागरिकांचेही होणार आहे. हॉटेल्स खुली झाल्यावरही एकदम गर्दी होणार नाही. मॉल्स, मंदिरातही एकदम गर्दी होणार नाही. क्षितिजाच्या पलीकडे प्रकाश दिसू लागला आहे, आकाश मोकळे होते आहे, पण एकदम भरारी घ्यायची नाही, हे माणसांना कळले आहे! त्यासाठी राज्यात अनेक नामांकीत मंडळांनी विशेषत: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा, माघ महिन्यात साजरा करण्याचा, मूर्तीचा आकार कमी करण्याचा निर्णय घेउन बदल स्विकारला आहे. कारण प्रत्येकाला यातून बाहेर पडायचे ओह. पुनश्च हरिओम म्हणायचे आहे.
अनलॉक व्हायचे आहे....
माणसाला कोणत्याही गोष्टीची पटकन सवय लागते. अगदी आपण कुठे चार दिवस प्रवासाला गेलो तरी तिथली सवय होते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला सहवासाची सवय पटकन होते. अगदी मुंबईच्या गर्दीतही आम्हाला तशी सवय असतेच असते. म्हणजे आपले लोकलमधले सहकारी, ऑफीसचे सहकारी, सहप्रवासी, रस्त्यावर दिसणारे, दुकानात दिसणारे, हॉटेल रेस्टॉरंट बारमध्ये नेहमी दिसणारे लोकही आपले पटकन ओळखीचे होतात. तिथले विक्रेते, वेटर, सर्व्हीस बॉय, पेट्रोल पंपाचवरचा माणूस हे सगळे आपल्या सवयीचे झालेले असतात. कारण त्यांच्यासोबत आपले आयुष्य अगदी यंत्रवत होउन गेलेले असते.पण या यंत्राची गती गेल्या दोन महिन्यात बदलली होती. म्हणजे पिठाच्या गिरणीत नेहमी गव्हावर गहू दळले जातात. पण एखादवेळी ज्वारीचे दळण आले तर? मग अजून कोणाची ज्वारीची दळणे येतात का याची वाट तो गिरणीवाला पाहतो आणि एकदम दळतो. मग त्या गिरणीला थोडा चवीत बदल मिळतो. गव्हाची चव बदलून ज्वारी पिसायला मिळते तेंव्हा सुरवातीला थोडी कुरकुर होते आणि नंतर पुन्हा पट्टा नेहमीसारखा सुरू होतो. या दोन महिन्यात माणसाची अवस्था तशीच झालेली दिसली.विशेष म्हणजे या काळात त्याला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आपल्या आयुष्यात इतके छान दिवस येतील असे वाटले नव्हते असेही कोणाला वाटले असेल. म्हणजे वर्षानुवर्ष जे लोक आपल्या घरच्यांना वेळ देवू शकत नव्हते त्यांना या कोरोनाने, लॉकडाउनने एकत्र आणले. घरात सारखा टिव्ही पाहून कंटाळा आल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने अनेकांच्या नसलेला संवाद सुरू झाला. जे बायकोला कायम ऑर्डर सोडत होते तेच लोक स्वयंपाकातही बायकोला मदत करू लागले. आपल्या जोडीदारांचे माहित नसलेले गुण एकमेकांना कळले ही तर त्या कोरोनाची कृपाच म्हणावी लागेल. त्यामुळेच निरोप घेताना जसे डोळ्यात छुपे अश्रू निर्माण होतात तसे या कोरानाच्या लॉकडाउनमधून बाहेर पडताना कोणाच्या डोळ्यात उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको. पण निरोपाचे अश्रू आपल्याला पुनरागमनायचे असे सांगत असतात. पण या अश्रूंना तसे सांगायला नको हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त एकच करायचे आहे की कोरोनाला स्मरून शक्य तितका वेळ या लॉकडाउनमधून बाहेर पडल्यानंतर अधूनमधून आपल्या जोडीदाराला दिला पाहिजे हे समजण्याची हीच वेळ आहे. याची समज या लॉकडाउनने दिली आहे.आपल्या जोडीदाराच्या अंगात किती गुण आहेत हे अनेकांना या लॉकडाउनने दाखवले असेल. म्हणजे आपल्या नवर्याला स्वयंपाकातील काही छान पाककृती येतात याचे आकलन अनेकांना यातून झाले असेल. एकमेकांच्या कलागुणांची कदर करण्याची संधी या लॉकडाउनने दिलेली आहे. त्यामुळे अनेकजण थॅक्स लॉकडाउन असेही म्हणत असतील. म्हणजे आपली पत्नी इतकी छान गाणे म्हणते याचीही जाणिव अनेकांना झालेली असेल. आपली मुले आपल्या आईवडिलांची काळजी करतात, त्यांना त्यांचे प्रेम हवे असते हेही अनेकांना यातून समजले असेल. पण आता आपल्याला अनलॉक व्हायचे आहे. अर्थात अनलॉक फक्त कोरोनापासून व्हायचे आहे. एकमेकांत गुंतागुंत तशीच असली पाहिजे. हीच तर या लॉकडाउनची शिकवण असणार आहे. संकटात माणसं जवळ येतात. एकमेकांना मदत करतात, हे आपण मुंबईत नेहमीच पाहतो. 26/11 असो, 26 जुलैचा महाप्रलय असो वा बाँम्बस्फोट असो. माणसं एकमेकांना मदत करत असतात. म्हणून तर त्यांना मुंबईकर म्हणतात. पण ही मदत आपण घरच्यांना करायची असते, घरच्यांपासूनही आपण खूप तुटक असतो याची जाणिवही कधीतरी होणे आवश्यक असते. तसे या संकटाने करून दाखवले आहे. या संकटाने बरंच काही बदलून गेले आहे. म्हणजे नेहमी काय करायचे हा प्रश्न गृहीणींना भेडसावत असतो. आज डब्याला भाजी कोणती द्यायची? जी करणार ती त्यांना अवडेल का? नवर्याला वांग्याची आवडत नाही. मुलाला दुधभोपळा नको. मुलीला पालेभाजी नको. उसळी दिल्या तर त्यावरून कुरूकुर. मग करायचे काय? खरंच त्या गृहीणीची स्वयंपाक म्हणजे कसरतच असते. सर्कसच असते. म्हणजे सर्कस पाहताना प्रेक्षक नेहमी टाळ्या वाजवतात. पण त्या आतल्या रिंगणातून पाहणारा असतो तो विदूषक असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असते. कारण हा जीवघेणा प्रकार करताना आपला सहकारी सुरक्षित राहिल का? काही अपघात तर होणार नाही ना? अशा अनेक विवंचना त्याला छळत असतात. हाच प्रकार गृहीणींच्या बाबतीत असतो. आपण केलेली कसरत या मंडळींना आवडेल का? नवरा खूष असेल का? त्याच्या कपाळावर आठी तर नाही ना उमटणार? मुलं चीडचीड नाही ना करणार? या विचाराने स्वयंपाक करणार्या गृहीणीची हीच कसरत घरात बसलेल्या नवरोबांनी या साठ दिवसात पाहिली. घरात काय आहे काय नाही याचा विचार न करता आपण ऑर्डर सोडतो पण हे करणे किती अवघड आहे हे त्याला समजून चुकले, थॅक्स कोरोना. हो असेच म्हणावे लागेल. कारण घरात अडकून पडलो होतो दोन महिने. सुरवातीला काहीच मिळत नव्हते. जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय तर फक्त गहू तांदूळ डाळच होती. भाजीपाल्याचा विचार नंतर आला. मग दारावर येईल ती भाजी घेण्याची तयारी झाली. मानसिक तयारी झाली. दारात शेपू विकायला आळु आला, न आवडणार्या अनेक भाज्या विकायला आल्या. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो पाहून कंटाळा आला. तरी त्या असूदेत. उपयोगाला येतील म्हणून खरेदी केल्या गेल्या. आपल्याला आवडत नसतानाही खरेदी केल्या गेल्या. त्याच जेवताना गोड वाटू लागल्या. तुझ्या हातची वांग्याची भाजी खूप छान आहे म्हणून कौतुक झालं. पण वांग्याची भाजी इतकी मसालेदारा, खमंग आहे हे समजायला कोरोनाचे संकट यावे लागले. शेपूची भाजी वाईट नसते, उग्रपणा घालवूनही आई ती छान करते हे कळायला मुलांना घरात थांबावे लागले. म्हणजे बाहेरची हॉटेल बंद झाली. चायनीज कॉर्नर बंद झाले. कोपर्यावरचा वडापाव, पावभाजी, मिसळ सारे बंद झाले आणि आईच्या हातचा शेपूही किती चवीष्ट आहे हे समजून चुकले, थॅक्स कोरोना. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली आपल्या नवर्याला काय काय कामे करावी लागतात. कशी बोलणी खावी लागतात. काय काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि तरीही हसत मूड ठेवण्याचा त्याचा चाललेला आटापिटा आपल्या घरकामापेक्षा खूपच मोठा आहे हे तिलाही कळून चुकते. बाहेरून आल्यावर कधीतरी त्रासून येणारा नेमका का त्रासत होता? लोकलप्रवासात त्याला काही झाले का याची जाणिव तिला झाली.लॉकडाउनने अनेक लांब गेलेली माणसे जवळ आली. अनेक वेळा मनाने लांब गेलेली माणसेही जवळ आली. घरातील धुसफूस कमी झाली. एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. कित्येकांच्या घरात आनंद आला. म्हणजे अनेकांना प्रायव्हसी मिळत नव्हती. आता चान्स घ्यायचा की नको याचा विचार होत होता. अनेक समस्या आहेत, खर्च आहेत याचा बाउ होत होता. पण सोशल डिस्टन्सिंगच्या काळातही त्यांना शरीराने आणि मनाने जवळ आणले. अनेकांकडे त्यामुळे मोकळीक मिळाल्याने गुडन्यूजही आली.आता लवकरच सर्वांना अनलॉक व्हायचे आहे. निरोप घ्यायचा आहे. पण एकमेकांची दोन महिने एकत्र राहण्याची लागलेली सवय आता डोळ्यात पाणी आणते आहे. दीड दिवसांचा गणपती जातानाही आपल्या डोळ्यात पाणी येते. आता दोन महिने घरात राहिलेला नवरोबा पुन्हा कामावर जाण्याची कल्पनाच डोळ्यात पाणी उभे करू लागली. सीमेवर लढणारे सैनिक वर्षातून कधीतरी दोन एक महिन्यांसाठी येतात आणि जाताना निरोप घेतात, तेंव्हा त्यांच्या मनात काय असेल याची जाणिव यामुळे झाली.पण आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरीओम म्हणायचे आहे. नव्याने जुना डाव सुरू करायचा आहे. चांगल्या बदललेल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. आता बाहेर पडायचे आहे. हा विचार प्रत्येकाच्या मनात आज घोळत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)