Thursday, July 29, 2021

पेगाससचे बुमरँग


एखादे शस्त्र आपण वापरतो; पण ते आपल्यावरच बुमरँगसारखे उलटणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. आपण पाळलेले कुत्रे कितीही प्रामाणिक असले, तरी ते आपल्याला चावणारच नाही असे नाही. किंबहुना ते चावतेच. अगदी तोच प्रकार या अधिवेशनाच्या तोंडावर मोदी सरकारबाबत झालेला दिसून येत आहे. मोदी सरकारचे अधिवेशन म्हणजे काहीतरी नवीन कामगिरी करणार आणि काही महत्त्वाची विधेयके पास करणार आणि त्याची देशभर हवा होणार, असा काही अधिवेशनातला अनुभव असताना या अधिवेशनात मात्र मोदी सरकारची पूर्णपणे कोंडी झालेली दिसून येत आहे. असं म्हणतात की, मोदी सरकारला सगळा देशच नियंत्रित करायचा आहे. अर्थात हा जो त्यांच्यावर सतत आरोप होतो आहे, त्याला पाठबळ देणारा एक गौप्यस्फोट दोन दिवसांपूर्वी झाला आणि त्यातून मोदी सरकारला पहिल्यांदाच कोंडीत पकडायची विरोधकांना संधी मिळाली. ते प्रकरण म्हणजे हे पेगाससचे प्रकरण आहे. पेगासस हे इस्रायली हेरगिरीचे तंत्रज्ञान असून, ही हेरगिरी मोबाइल फोनच्या माध्यमातून केली जाते, म्हणजे या यंत्रणेद्वारे तुम्ही कोठे आहात, कोणाशी काय बोलत आहात येथपासून तुम्ही पाठवलेले किंवा तुम्हाला आलेले संदेश, ई-मेल याची सर्व इत्यंभूत माहिती मिळवता येते.


मोदी सरकारने हे तंत्रज्ञान इस्रायलकडून घेऊन त्याद्वारे भारतातील तीनशे जणांच्या फोनवर पाळत ठेवली होती व त्यांचा सारा व्यक्‍ितगत तपशील सरकारने अनधिकृतरीत्या गोळा करून हेरगिरीचा कळस केला असल्याचा आरोप होत आहे. ही बाब भारतातील कोणा विरोधी पक्ष नेत्यांनी उघड केलेली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांच्या एका समूहाने उघड केली आहे. त्या प्रकरणात सारवासारव करताना सरकारची मोठीच तारांबळ उडालेली दिसून आली. सरकारने या आरोपाचा तातडीने इन्कार केला असला, तरी तो परिणामकारक नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: अमित शहा यांना या प्रकरणात खुलासा द्यावा लागला आणि भारताची प्रगती ज्यांना बघवत नाही अशा देशविघातक शक्‍तींनी रचलेले हे कुभांड आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या विविध नेत्यांनी ठिकठिकाणी याबाबत माहिती देण्याचा प्रकार केला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नाही, त्यामुळे भाजपला पत्रकार परिषदा घेऊन सांगण्याची ही नामुष्की आली. म्हणजेच संसदेत स्पष्ट बहुमत असतानाही विरोधकांनी कामकाज बंद पाडले हे फारच धक्कादायक म्हणावे लागेल.

पण यातील जे नवनवीन तपशील हाती येत आहेत, त्यातून सरकारच्या सहभागाची बाब अधिकच ठळकपणे समोर आली आहे. यातला एक लक्षणीय मुद्दा असा की, हे तंत्रज्ञान इस्रायल कोणाही खाजगी संस्थांना विकत नाही. ते केवळ एखाद्या सरकारलाच विकत घ्यावे लागते. त्यामुळे भारतात, जर या यंत्रणेचा वापर करून हेरगिरी झाली असेल, तर ती सरकारनेच केलेली असू शकते ही बाब स्पष्टपणे लोकांपुढे आली आहे. एखाद्या फोनमध्ये गुप्तपणे हेरगिरी करणारी यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याची शहानिशा फॉरेन्सिक पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे ज्या-ज्या व्यक्‍तींवर पाळत ठेवली गेली आहे त्यातील काहींनी आपल्या फोनची अशा प्रकारे तपासणी करून घेतली आहे, त्यात अशा हेरगिरी करणाºया यंत्रणेचा वापर झाला आहे, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने केवळ इन्कार केल्याने हे प्रकरण आता शांत होण्यासारखे नाही. अर्थात हेरगिरी केली म्हणून विरोधकांनी इतके का भ्यावे लागले हा प्रश्न आहेच. देशविघातक कृत्य करणाºयांना आपली हेरगिरी होत असेल, तर काळजी करायला पाहिजे. विरोधक इतकी भीती का बाळगत आहेत, हे पण अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीकडून काही देशविघातक कृत्य होत असेल, तर त्याची हेरगिरी करणे, पाळत ठेवणे स्वाभाविक आहे. आता काँग्रेसचे काही नेते, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह यांच्यासारखे लोक पाकिस्तानला मदत करू पाहतात. ३७० कलम रद्द करण्यासाठी पाकिस्तानचे समर्थन करतात. अशांची हेरगिरी होणे आवश्यकच आहे; पण जे कांगावा करत होते, भाजपवर टीका करत होते, त्यांची कोणी हेरगिरी केली असण्याची सूतराम शक्यता नाही; पण टीका करण्यासाठी वक्तव्ये करत रहायचे. केली हेरगिरी म्हणून बिघडलं कुठं? काही सापडणारच नसेल, तर घाबरायचं कारण काय? आज संपूर्ण जग हे दशहतवादाच्या सावटाखाली आहे. हा दशहतवाद पोसण्याचे काम कुणी करत असेल आणि त्याची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी सरकार काही करत असेल, तर त्यांच्या तपासाचा भाग असू शकतो. संशयीत म्हणून कोणत्याही तपास यंत्रणेला कोणाचीही चौकशी करायचा हा अधिकार आहे. त्यामुळे विनाकारण कांगावा करण्याचे कामही विरोधकांनी करता कामा नये. आमची प्रायव्हसी, सिक्रेट जातील याची नाहक चिंताही करण्याचे कारण नाही. हेरगिरीत तुमच्या नग्नावस्थेला काहीही महत्त्व नसते, खाजगी आयुष्यात काय करत आहात याच्याशी काही देणे-घेणे नसते, देशविघातक काही करत असाल, तरच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आपण जर कोणतेही देशविघातक कृत्य करत नाही, तर हेरगिरी झाली, म्हणून चिंता करण्याचे कारण काय? आता प्रत्येक रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतात, दुकाने, मॉल, सार्वजनिक ठिकाणी असतात. हे तपासाचे, हेरगिरीचेच भाग आहेत. माणसांना चुका करताना रेड हँड पकडण्याची ती साधने आहेत. त्यामुळे त्याची चिंता विरोधकांना का वाटते? उलट याला विरोध करून हे हत्यार बुमरँगसारखे विरोधकांवरही उलटू शकते हे लक्षात घेतले पाहिजे.

काय संदेश दिला पाहा मालिकेनं!


डझनभर खून करणारा आणि समाजात उजळ माथ्यानं मिरवणारा देवमाणूस अर्थात डॉक्टर अजितकुमार देव याला सबळ पुराव्या अभावी न्यायालय निर्दोष मुक्त करतं. भर कोर्टात हा देवमाणूस पोलिसांची, वकिलांची आणि त्याच्याविरोधात साक्ष देणाºयाची नाचक्की करतो. आयपीएस अधिकाºयांची मती कुंठीत होते; पण चंदासारखी एक दारूचा अड्डा चालवणारी बाई आपल्या अक्कल हुषारीने अजितकुमारला पकडण्यासाठी सापळा रचते. पोलीस आणि तपासयंत्रणा मूर्ख आणि दारूचे गुत्ते चालवणारी यंत्रणा मात्र हुशार. काय मस्त संदेश दिला ना या मालिकेनं?


एकूणच या कथानकाकडे पाहिल्यावर खूप काही चमत्कार यात दिसतात. झी मराठीवरची ही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आहे; पण त्यात अनेक अनाकलनीय घटना घडताना दिसतात. अर्थात या अनाकलनीय घटनांपेक्षा टोन्याचा अगावपणा आणि सरू आजीच्या शिव्या ऐकायलाच जास्त मजा येते.

अजितकुमारला म्हणे एक जुळा भाऊ होता. आई-बापाबरोबर काम करत असताना, रस्त्याने जाणारी एक गाडी धडक देते आणि त्यात या दोन मुलांचे हे आई-बाप मरतात. ही जुळी मुलं अनाथ होतात. त्यातला एक सज्जन आहे. अनाथ आश्रमात जाऊन तो शिकतो. दुसरा मात्र आपण शिकणार नाही. आपल्याला शाळा आवडत नाही, म्हणून गुन्हेगारी, उनाड जगात चोºया माºया करून मोठा होतो. आश्रमात शिकणाºयाला कोणीतरी दत्तक घेते. डॉक्टर करते. मुंबईत हॉस्पिटल सुरू करतो. नाव कमावतो. त्याचे नाव अजितकुमार देव. हा दुसरा देवीसिंग आपल्या भावाचा अजितकुमारचा खून करून येतो आणि अजितकुमार नावाने वावरायला सुरुवात करतो. कधीही शाळेत गेलेला नाही, लिहिता वाचता येत नाही, इंग्रजी कुठे शिकलेला नाही; पण अजितकुमार देव म्हणून बदलून आलेला देवीसिंग व्ययस्थित उपचार करतो आहे. औषधे लिहून देतो आहे. त्याचा सायकॉलॉजीचा अभ्यास आहे, म्हणजे सारखा दिसणाºया भावाचा चेहरा, नाव घेऊन वावरणाºया देवीसिंग उर्फ अजितकुमारने आपल्या भावाचे ज्ञान कसे मिळवले याचे उत्तर या मालिकेच्या लेखकाने प्रेक्षकांना दिले पाहिजे.


कपडे घालून कोणी ज्ञानी होतो का? कसलेही शिक्षण न घेतलेला हा देवीसिंग आपली केस आपणच लढतो आणि पोलीस आणि न्यायव्यवस्थेला पद्धतशीर गुंडाळतो, म्हणजे शिक्षणाशिवाय माणूस काहीही करू शकतो. देवमाणूस होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही, असाच संदेश ही मालिका देते का? निष्णात वकिलासारखी प्रश्नांची सरबत्ती करून समोरच्याला जाळ्यात पकडण्याचे काम एखादी न शिकलेली व्यक्ती कशी काय करू शकते? पोलिसांचे वाभाडे काढून, दिव्यासिंहची पुरती बदनामी करून अजितसिंह निर्दोष सुटतो; पण त्याला पकडण्यासाठी पुढचे जाळे टाकायला कोण येते तर चंदा.

लोफर असताना हा अजित चंदाच्या जिवावर जगत होता. ही चंदा दारूचा गुत्ता चालवते. भल्या भल्या दारूड्यांना फटकावून हाणामारी करून जगणारी चंदा हिला फसवून तिचे पैसे घेऊन दुबईला जातो सांगून तो पळून जातो. अजितकुमारच्या खटल्याची बातमी टीव्हीवर पाहून ती निकालादिवशी तिथे येते; पण काहीही न करता बाहेर थांबते. त्याचवेळी निकाल वाचनापूर्वी ती थेट कोर्टात आली असती, तर किती सोपे झाले असते. पोलीस, वकिलांना ती सगळे पुरावे सहज देऊ शकली असती, कारण तिला समोर पाहून अजितकुमारला चक्करही आली होती. मग ही लांबड का लावली गेली? अजितकुमारच्या पाठोपाठ वाड्यावर येऊन मला त्याची सेवा करायची आहे, म्हणून घरात घुसण्याचा आणि सरू आजीशी हातमिळवणी करून याला फासावर लटकवण्याचा केलेला प्लॅन पोरकट वाटतो.


आर्या जर हायकोर्टात अपिल करणार आहे, तर त्यासाठी चंदाची मदत तिला झाली असती. तिने सरळ पोलिसात जाऊन माहिती देण्याची गरज होती; पण वाड्यात घुसून जो प्रकार चालवला आहे आणि तिने तपासकार्य सुरू केले आहे ते म्हणजे पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस तपास करू शकणार नाहीत, ते निकम्मे आहेत, तर दारूचा अड्डा चालवणारी चंदाच त्याला पुरून उरते हे दाखवण्याचा हा अट्टाहास अनाकलनीय आहे; पण मालिकांमध्ये कुछ भी चलता हैं. कथा म्हणून सोडून द्यायचे आणि मालिका कधी संपते याची वाट पहायची. अजून तीन आठवडे १४ आॅगस्टपर्यंत ही मालिका चालणार आहे. त्यामुळे अखरेच्या भागात पोलिसांपेक्षा गुंडच किती हुशार हे बिंबवण्याची संधी ही मालिका साधते हे नक्की.

अर्थात पडत्या काळात झी मराठीला या देवमाणूसच्या टीआरपीने सांभाळले आहे; पण त्यात असलेला अस्सल ग्रामीण बाज प्रेक्षकांना आवडतो, म्हणून ही मालिका रंजक झाली. कुठलेही पात्र कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक पात्राचा अभिनय चांगला आहे. अस्सल ग्रामीण ठसका आहे. नणंद-भावजयींची भांडणे आहेत. साधेपणा आहे तोच प्रेक्षकांना भावला आहे. जे-जे कृत्रिम होते, ते मात्र प्रेक्षकांनी नाकारले होते. दिव्यासिंग ही पोलीस अधिकारी आहे. तिला तिची चोख कामगिरी करायला, तपासासाठी विशेष पाठवले आहे; पण ती तपासापेक्षा सुंदर दिसण्यात आणि दाखवण्यात लेखक-दिग्दर्शक गुंतले. सुरुवातीला तिची सौंदर्यस्थळे पाहून झाल्यावर प्रेक्षकही कंटाळले आणि तिच्यापेक्षा सरू आजीच लोकांना अधिक आवडू लागली; पण बºयाचवेळा जे काही दाखवले जात होते ते अत्यंत अतर्क्य आणि अनाकलनीय होते; पण एकूणच पोलीस निष्क्रिय आहेत, हा संदेश देतानाच दारूचे अड्डे चालवणारे जास्त चलाख आहेत, हे या मालिकेने दाखवले हे नक्की.


छोटा पडदा/ प्रफुल्ल फडके

9152448055\\

ही एकप्रकारची अडगळच...


सध्या देशात राजद्रोह आणि त्याविषयीच्या कायद्यांचा विषय चर्चेत आहे. त्याचा फारसा कोणी अभ्यास आणि दखल न घेता सरकार काही तरी वेगळं करतंय एवढंच समजून घेतलं जात आहे. म्हणजे मोदीभक्त आणि मोदी विरोधक यांच्यात त्यावरून धुमशान चाललं आहे. सोशल मीडियावर तर तथाकथित विद्वान, पुरोगामी, विचारवंत आणि अंधभक्त, सनातनवादी यांच्यात जणू युद्धच सुरू असल्याचे वातावरण आहे; पण हे नेमके काय चालले आहे, हे समजण्याचा आणि समजून सांगण्याचा आणि समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. धूर दिसला की, आग... आग... म्हणून आवई उठवायची आणि तो धूर नसतोच एखादं रॉकेट गेल्याचा पट्टा असतो. तसा हा प्रकार आहे. आता ज्या कायद्यांची चर्चा सध्या सुरू आहे ते ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे आम्ही किती वर्ष ब्रिटिशांच्याच ओंजळीने पाणी प्यायचे? किती वर्ष ब्रिटिशांचे कायदे वापरायचे? आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यावरही आम्ही ब्रिटिशांचे कायदे पाळण्याचा आग्रह धरत असू, तर आम्ही वैचारिक पारतंत्र्यातच आहोत, असे म्हणावे लागेल. कोणताही कायदा हा तत्कालीन परिस्थितीशी असतो. कालौघात त्याचे विसर्जन होणे क्रमप्राप्त असते. ते कालबाह्य होत असतात. ब्रिटिशांनी सतीची चाल बंद करणारा कायदा केला होता. तेव्हा सती जाण्याची वाईट प्रथा होती. आज तशी परिस्थिती नाही. असे किती तरी कायदे आता कालबाह्य झालेले आहेत. ही अडगळ दूर करण्याची, जळमट काढून टाकण्याची गरज आहे. तसाच एक अडगळीतला कायदा म्हणजे राजद्रोहाचा कायदा.


खरं तर इंग्रजांनी हा कायदा आणला, तेव्हा राजसत्ता होती. अनेक संस्थाने होती. आता भारत हा प्रजासत्ताक देश आहे. प्रजेने सरकारच्या कामातील दोष दाखवणे, आपल्या हितासाठी मत मांडणे अपेक्षित आहे. जनता प्रजा सार्वभौम आहे. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विरोधात जो कायदा वापरला तो आजच्या काळात कायम का ठेवावा? हा सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांचा सवाल योग्यवेळी आला आहे. देशद्रोहाचा कायदा व त्यातही एका कलमाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय दंड संहिता अथवा फौजदारी कायद्यातील १२४ अ या कलमाचा दुरुपयोग झाल्याचे दिसत असताना, हा कायदा व ते कलम का हवे? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायालयाने या कलमाच्या मर्यादेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखून द्यावीत, असे अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले आहेत. आता या मुद्यावर केंद्र सरकारने आपले मत न्यायालयास सादर करणे अपेक्षित आहे. या कलमाखाली पोलीस कोणाही व्यक्तीस वॉरंट खेरीज अटक करू शकतात आणि जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे आजन्म कारावास आहे. आपल्या सत्तेविरुद्ध आवाज उठवणारे लोकमान्य टिळक नंतर महात्मा गांधी यांच्यासारखे स्वातंत्र्य सेनानी व अन्य स्वातंत्र्य सैनिकांचा आवाज दडपण्यासाठी इंग्रजी राजसत्तेने हा कायदा आणला व त्याचा निष्ठुरपणे वापर केला. या कायद्याच्या वापराचा नजीकच्या भूतकाळातील इतिहास फारसा चांगला नाही. गेल्या ७ वर्षांत त्याचा गैरवापर जास्त झाल्याचे दिसते. म्हणूनच हा कायदा रद्द करण्याची गरज आहे. यावर जनतेची मते मागवून त्याचा विचार केला पाहिजे.

आपली सत्ता व कार्यपद्धती यावर आवाज उठवणाºयांना नेस्तनाबूत करणे इंग्रजांचा हा कायदा व संबंधित कलम आणण्यामागे हेतू होता. दुर्दैवाने अजूनही त्याचा वापर त्याच कारणांसाठी होत असल्याचे दिसते. २०१०पासून एकूण ८१६ प्रकरणांत १० हजार ९३८ व्यक्तींविरुद्ध या कायद्याखाली आरोप ठेवण्यात आल्याचे एका खाजगी संशोधन संस्थेने दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्याचा वापर वाढल्याचे आढळून येते; मात्र यूपीए सत्तेत असताना, देखील २०११मध्ये कुदानकुलम अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाºया १३० जणांविरुद्ध याच कायद्याने कारवाई झाली होती; मात्र २०१४ ते २०१९ या काळात ५५९ जणांना या कायद्याखाली अटक करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदीवरून स्पष्ट होते. सरकारविरुद्ध बोलणाºयास अडकवण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होत आहे. देशद्रोहाचा आरोप लावताना त्यात जबाबदारी, अकाऊंटिबिलिटी दिसत नाही, असे निरीक्षण १२४ अ या कलमाच्या गैरवापराबद्दल बोलताना सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. हे जास्त महत्त्वाचे आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करणाºया अनेक जणांना याच कलमाखाली अटक झाली होती. बंगलोरमधील दिशा रवी या तरुणीसही गेल्या फेब्रुवारीत या कलमाखाली अटक झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजपच्या एका नेत्याची मोटार अडवणाºया शेतकºयांविरुद्धही या कलमाचा वापर झाला. २०१९मध्ये या कलमाखाली ९३ जणांना अटक झाली. त्यामध्ये १८ ते ३० या वयोगटातील तरुणांचा भरणा जास्त आहे. २०१६च्या तुलनेत २०१९मध्ये या कलमाचा वापर वाढल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदीवरून दिसते.


आज अशी परिस्थिती आहे की, मोदी सरकार विरुद्ध मत व्यक्त केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मोदी विरोधक तसा प्रसारही करताना दिसत आहेत. हेच देशात दुही माजवण्यास कारणीभूत होताना दिसते आहे. सोशल मीडियावरील यावरून होणारे शाब्दिक युद्ध हे कधीकधी भयावह असे वाटते. खरं तर जेव्हा राष्ट्राची सुरक्षितता, सार्वभौमत्व यांना धोका निर्माण होतो, तेव्हा या कलमाचा वापर संयुक्तिक ठरतो. देशातील सर्व नागरिकांना घटनेने उच्चार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यावर काही निर्बंध जरूर आहेत; पण सरकारच्या निर्णयांवर टीका करणे, सरकारी धोरणांविरुद्ध बोलणे किंवा असंतोष प्रकट करणे म्हणजे देशद्रोह नाही, हे सर्वोच्च्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केले आहे.

अनेकवेळा पत्रकार, व्यंग्यचित्रकार, लेखक जनतेचे मत मांडत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी १२४ अ कलमाचा वापर न करण्याची ताकीदही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस व अन्य संस्थांना दिली आहे, तरीही हे कलम वापरले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, धर्माच्या आधारे हल्ले झाले, तर त्याविरुद्ध जनतेने आवाज उठवू नये, असे केंद्र सरकारला वाटते काय? लोकशाहीत लोकांनी मत व्यक्त करणे हा कोणता व कोणाशी द्रोह ठरतो?


आज कोरोनामुळे इतकी गंभीर परिस्थिती आहे की, सामान्यांना नोकरीसाठी, कामासाठी बाहेर पडणे अवघड आहे. लोकलप्रवास करण्यास परवानगी नाही. लोकांची उपासमार होत आहे. या विरोधात आवाज उठवला, तरी आपल्यावर गुन्हे नोंदवले जातील याची भीती वाटते. द्रोह, विद्रोह, बंड, विरोध यांच्या व्याख्या आता कायद्यानेच स्पष्ट करण्याची गरज आहे; पण जे कालबाह्य आहे ते टाकून दिले पाहिजे. अडगळ जमवून त्याचा भार होता कामा नये.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द ला ईन्स


9152448055\\

हा ढोंगीपणा नको आहे.


केंद्र सरकारने विविध विभागांतील निवृत्त अधिकाºयांना निवृत्तीनंतर काहीही लिखाण करण्यास प्रतिबंध केला आहे. तसा नियम विविध विभागांतील कर्मचाºयांसाठी लागू करण्यात आला असून, आता तर पेन्शन आदेशातही त्या अनुषंगाने काही बदल सरकारने करून हा विषय पेन्शनशीही निगडित केला आहे. ही एक स्वागतार्ह बाब आहे. आपल्याकडे निवृत्तीनंतर शहाणपण सुचण्याचे पेव नेहमीच फुटते. अधिकारी निवृत्त झाले की, ते भ्रष्टाचारावर गप्पा मारायला, लिहायला सुरुवात करतात; पण कार्यरत असताना डोळ्यादेखत घडत असलेले पाप झाकण्यासाठी आटापिटा करतात. आपल्याकडे आजवर अनेक निवृत्त अधिकारी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करतात, कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला आहे यावर भरभरून बोलतात; पण प्रत्यक्ष कार्यरत असताना मूग गिळून बसलेले असतात. हा दुटप्पीपणा योग्य नाही, म्हणूनच सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.


ज्येष्ठ नेते, मंत्रिगणही निवृत्तीनंतर, राजकारणातून बाहेर पडल्यानंतर आपली आत्मचरित्रे लिहितात आणि त्यात काही वादग्रस्त गोष्टी सांगतात, म्हणजे सत्तेत असताना, कार्यरत असताना एखादी गोष्ट चुकीची आहे, वाईट आहे, भ्रष्ट आहे हे सांगण्याचे धाडस त्यांच्यात नसते; पण निवृत्तीनंतर मात्र करून करून भागले अन् देवपूजेला लागले, अशी अवस्था त्यांची झालेली दिसते. त्यामुळे अशा तºहेची बंधने आवश्यक होतीच.

विशेषत: सुरक्षा व गुप्तचर विभागाशी संबंधित निवृत्त अधिकाºयांना जर काही लिखाण करायचे असेल, तर त्यांनी त्यासाठी आधी आपल्या विभागाची अनुमती घेतली पाहिजे, पुस्तक लिहिण्यास अनुमती तर घ्यावी लागेलच; पण एखादा लेख लिहिण्यासाठीही या अधिकाºयांना आपल्या विभाग प्रमुखाची अनुमती घ्यावी लागणार आहे. या दुरुस्त्या पेन्शनशी निगडित करण्यात आल्याने आता नियम भंग करणाºयांची पेन्शनच रद्द होऊ शकते. ही एक चांगली बाब झाली, असेच म्हणावे लागेल. काही जणांना सरकारचा हा आदेश हुकूमशाही वाटेल; पण त्यात काही अर्थ नाही. कार्यरत असताना आपण कोणाच्या दबावाने, आमिषाने गैर काम करायचे आणि नंतर शहाणपण शिकवायचे हे योग्य नाही. कामावर असताना कोणताही गैर प्रकार होऊ नये ही जबाबदारी अधिकाºयांची असते; पण त्यांनी पिते दूध डोळे मिटून जात मांजराची याप्रमाणे गप्प रहायचे आणि नंतर गुरगुरायचे हे काही योग्य नाही. कामावर असताना काय चुकीचे आहे ते ताबडतोब सांगा; पण नंतर त्यावर भाष्य करणे यात काही अर्थ नाही. जुनी मढी उकरून काढून उगाच चर्चेला वाव देणे यात काही अर्थ नाही. त्यामुळे असा कायदा झाला असेल, तर याचे स्वागत केले पाहिजे. म्हणजे निवृत्तीपूर्वी तोंड उघडतील. अनेक अधिकारी बातमीदाराला नाव न छापण्याच्या अटीवर माहिती पुरवत असतात, जर ती गैर गोष्ट आहे, तर बातमीदारांचा दुरुपयोग कशाला करता? सरळसरळ प्रशासनाला, शासनाला विरोध करा; पण आपली बदली होईल, कारवाई करतील, शिक्षा होईल असल्या भीतीने तेव्हा तोंड बंद ठेवायचे आणि नंतर लेख लिहून आपले पावित्र्य दाखवायचे याला भोंदुगिरी म्हणावी लागेल. त्यामुळे अशा कायद्याला पाठिंबाच दिला पाहिजे.


सरकारच्या या दुरुस्त्यांवर १०९ निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाºयांनी जाहीर पत्र लिहून आक्षेप घेतला आहे. पेन्शन कायद्यात अशा स्वरूपाची दुरुस्ती लागू करण्याची सरकारला का गरज वाटते आहे, असा जाहीर सवालही या निवृत्त सनदी अधिकाºयांनी केला आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाºयांमध्ये माजी विदेश सचिव शाम सरण, माजी गृह सचिव जी. के. पिल्लाई, प्रसार भारतीचे माजी प्रमुख जवाहर सिरकार अशा ज्येष्ठांचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांचीही या पत्रावर सही आहे; पण त्यांनी जुन्या गोष्टीवर काही लिहिले आणि त्यात तथ्य असले, तर त्यांच्यावर निवृत्तीनंतर कारवाईची सोयही असली पाहिजे. तेव्हा एखादी गोष्ट चुकीची घडत असताना, त्याचे समर्थन का केले? याचा जाब विचारण्याची सोय असली पाहिजे. तरच या अधिकाºयांना या तरतुदीला विरोध करण्याचा हक्क असेल. आपल्या काळातील एखादे भ्रष्ट प्रकरण निवृत्तीनंतर बाहेर काढायचे, त्यावर राजकीय काथ्याकुट सुरू करायचा; पण त्यावेळी हे माहिती होते तेव्हा ते गप्प का बसलात? सरकार काही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नसते. ते काम प्रशासनाने करायचे असते. असे असताना सरकारला दोष देण्यात प्रत्येक वेळी अर्थ नसतो. जर कोणा मंत्र्यानं दबाव टाकला असेल, काही गैरप्रकार घडला असेल, तर त्याचवेळी निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी त्या अधिकाºयांची आहे. आता आपण सरकारी कर्मचारी नाही, म्हणून आता आपल्याला काहीही बोलायला हरकत नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. उलट सेवेत असतानाच अधिकाºयांनी लिहिले बोलले पाहिजे. तर त्याला वजन येईल हे लक्षात घेतले पाहिजे.

पेन्शन कायद्यांमध्ये बदल करून या ज्या नव्या अटी लागू करण्यात आल्या आहेत त्या अत्यंत अस्वस्थ करणाºया असून, आम्हाला त्यामुळे धक्‍का बसला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निवृत्त सनदी अधिकाºयांच्या लिखाणाने सरकारला भय वाटण्याचे कारण काय, हा यातला प्रमुख मुद्दा आहे. या आधी अनेक निवृत्त सनदी अधिकाºयांनी आपली आत्मचरित्रे प्रकाशित करून सरकारच्या आतल्या घडामोडींवर सविस्तर प्रकाश टाकला आहे; पण हा प्रकाश सगळं घडून गेल्यानंतर टाकून उपयोगाचा नाही. कोणतीही गोष्ट घडण्यापूर्वी त्यांनी तो रोखण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे काम करत असताना कातडी बचाव धोरण आखायचे आणि निवृत्तीनंतर पावित्र्याचा आव आणायचा हा ढोंगीपणा नको आहे.

Tuesday, July 20, 2021

आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी

आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राचे डोळे आज पंढरपूरकडे लागलेले आहेत. दरवर्षी जे आठ-दहा लाख लोक आजच्या दिवशी पंढरपुरात जातात; पण गेले दोन वर्ष कोरोनामुळे जाऊ शकले नाहीत, ते शरीराने आणि मनाने तिथे आहेत आणि जे शरीराने तिथे नाहीत, तेही मनाने आज पंढरपुरात आहेत. आजचा हा दिवस भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणाºयांचा सगळ्यात मोठा सण आहे; पण सण असूनही तो चित्त शुद्धीशी जोडलेला आहे.


आषाढी उपवासाचा सगळ्यात मोठा अर्थ शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धीतून विठुरायाच्या पावलांशी लीन होणे आणि नामदेवाच्या भाषेत विठ्ठल पाहणे असा आहे. त्या विठ्ठलाच्या नामस्मरणाचा हा दिवस आहे. जगातल्या सगळ्या धर्मात उपवास आहेत. ते चित्तशुद्धीकरिता आहेत, शरीरशुद्धीकरिता आहेत. आजचा उपवास हा चिंतनाकरिताही आहे, म्हणून आषाढीचे विशेष महत्त्व आहे. आपल्याकडचे सणवार आणि उपवास हे निसर्गाशी जोडलेले आणि निसर्गाशी नाते सांगणारे असे आहेत. चिंतन, मनन आणि भजन यातून आत्मशुद्धी होत असते. हा उपवास विठुरायाशी जोडलेला आहे. या उपवासाची जी रचना आहे, ती बघितली तर आषाढी, कार्तिकी आणि महाशिवरात्र हे तिन्ही उपवास बरोबर १२० दिवसांच्या फरकाने आलेले आहेत. आषाढीच्या आधी शेतीची कामे आटोपलेली आहेत आणि मग श्रमशक्तीला विश्रांतीची जोड दिलेली आहे. शिवाय बदलत्या ऋतुचक्रात पचनशक्तीला विश्रांती हा आणखी एक महत्त्वाचा शास्त्रीय उद्देश आहे.

दुसरा उपवास कार्तिकीचा, तो शिशिर ऋतूच्या म्हणजे हिवाळ्याच्या टप्प्यावर आणून ठेवलेला आहे. तिसरा उपवास महाशिवरात्रीचा. तो उन्हाळ्याच्या टप्प्यावर आलेला आहे. या प्रत्येक उपवासाचे अंतर १२० दिवसांचे आहे आणि ते शास्त्रीय आहे. त्याला धर्माचा संदर्भ घातला ते त्याचे पालन व्हावे म्हणून; पण तिन्ही उपवासांचा संदर्भ शास्त्रीय आहे. निसर्गाच्या बदलत्या ऋतू चक्राशी जोडलेला आहे, म्हणून आपल्याला सण आनंद देतात, उपवास आनंद देतात.


आजच्या एकादशीचा मुख्य उद्देश नामस्मरणाशी जोडलेला आहे. विठुचा गजर करण्याशी जोडलेला आहे. आत्मज्ञान होण्याशी जोडलेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी ही जी संत मंडळी आहेत, त्यांना आदराने, सन्मानाने आणि भावनेने संत म्हटले, तरी मुळात ते सर्व तत्त्ववेत्ते आहेत. शिकलेले नसले, तरी हरिनामाच्या सामर्थ्याने त्यांना आलेले जीवनातील अनुभव जीवनाचे तत्त्वज्ञानच बनले आणि त्यांच्या वाणीतून आत्मज्ञान प्रकट झाले.

ज्ञानोबा, तुकोबा यांची गोष्ट फारच वेगळी आहे. संत परंपरेचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि तुकोबा कळस झाला. मधल्या चारशे वर्षांत नामदेव आले, त्यांनी पाहावा विठ्ठल सांगून द्वैत-अद्वैताचा भ्रम दूर करून टाकला. म्हणून या परंपरेत नामदेव खूप मोठे झाले. विठुच्या गजरात नामाचाही गजर आहे. बाकी अठरापगड जातीतले जे संत निर्माण झाले, ते कोणत्या विद्यापीठात शिकले होते?; पण त्यांच्या तत्त्वज्ञानाला आत्मज्ञानाचे केवढे मोठे सामर्थ्य होते. गोरा कुंभार होता. मडकी करत होता. कच्चे मडके भाजत होता, पक्के करत होता आणि अंगठ्याजवळच्या दोन बोटांनी त्या भाजक्या मडक्यावर ठोकून मडके कच्चे की पक्के असे विचारत होता. हे विचारता, विचारता गोरोबाला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्याच डोक्यावर दोन बोटे आपटून एक प्रश्न विचारला, ‘अरे, मी इतकी मडकी भाजतो आहे. कच्चे की पक्के विचारतो आहे; पण माझे हे मडके कच्चे की पक्के? कसे कळणार?’ तिथे गोरोबाला आत्मज्ञान झाले.


सावता माळी मळ्यातल्या भाजीमध्ये आलेले तण उपटणारे. ते आत्मज्ञानाची भाषा बोलू लागले. ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी.’ आणि मग ते म्हणतात, ‘जमिनीतले तण मी उपटले. पण, माझ्या मनातल्या अविचारांचे तण मी उपटले काय? ते तसेच आहेत.’ हा विचार येणे हीच आत्मज्ञानाची पायरी असते.

संत सेना महाराज त्यांच्या व्यवसायाप्रमाणे लोकांची डोकी साफ करीत. ती करता-करता ते तत्त्वज्ञान सांगून जातात की, ‘माझ्या डोक्यातला मळ मी साफ केला आहे का?’ गोरा, सावता, सेना, रोहिदास महाराज या विविध जाती-जमातीतल्या संतांना आत्मज्ञान झालेले आहे. तुकोबा तर त्याच्या पुढे गेले? आणि त्यांनी विठ्ठल मनामनात बसलेले असल्याचा दृष्टांत दिला. गाडगेबाबा त्यांच्या पुढचे. गाडगेबाबांनी सांगितले की, ‘अरे, तू म्हणजेच देव’. गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे, ‘देवळात गेलो, देवाच्या गाभाºयात काळोख, देव दिसेना. मग बापुरावाला सांगून दिवा आणला. देव दिसला. कोणामुळे दिसला, दिव्यामुळे दिसला. मग देव मोठा की दिवा मोठा?’ गाडगेबाबांचे हे तत्त्वज्ञान देव एक आहे. त्याची रूपे अनेक असतील. धर्म अनेक आहेत, पण त्यांची शिकवण एक आहे. हेच आत्मज्ञान. त्यांची शिकवण देणारी परंपरा म्हणजेच वारकरी परंपरा.


या आत्मज्ञानाच्या ओढीने प्रत्येक जण पंढरपुरात जमतो. आत्मज्ञान झालेल्यांमुळे मग अवघी विठाई एक होऊन जाते. जगाची सूत्रे चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, असे एकदा मान्य केले, तर मग त्याला नाव काहीही द्या. त्या अदृश्य शक्तीचा धाक हाच तुम्हाला सरळ मार्गाने चालायला प्रेरित करणार आहे. शेवटी अहंकाराने भरलेले आपण सर्व काही इथे टाकून जाणार आहोत. जगाचा सगळयात मोठा अनर्थ तेव्हा झाला असता, जर माणसाला मरणाची तारीख समजली असती. आपली मालमत्ता वर घेऊन जायला परवानगी असती. या दोन गोष्टींचे बंधन नसते, तर माणसाने कुणालाच जुमानले नसते. ते जुमानण्यासाठी हरिनाम आणि त्याकरिता उपवास. आपले दैनंदिन जीवन शुद्ध ठेवायचे, असे संत शिकवतात. जेवढे जीवन हातात आहे, ते सत्प्रवृत्तीने जगा, असे आषाढी सांगते. संयमाने जगा. आहारामध्ये, विहारामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये संयम आणि सभ्यता ठेवा. मग एका आत्मिक बळाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आषाढीचा तोच खरा अर्थ आहे. दहा इंद्रिये आणि अकरावे मन अशा एकादश वासनांना शमविण्यासाठी ही एकादशी असते. ही सर्व एकादश अंगे तृप्त झाली की, माणूस माणूस नाही, तर विठ्ठल होतो.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

अनुभूती

 २०२० आणि २०२१ ही सलग दोन वर्ष खºया अर्थाने वारी झाली नाही, तरीही ही वारी नित्यनेमाने करणारा आमचा वारकरी मनाने गेले १९ दिवस चालत त्या ‘मानस वारी’चा अनुभव घेत आहे. गेले १९ दिवस सुरू असलेली ही पंढरीची वारी आजअखेर पंढरपुरात येऊन दाखल झाली. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या जीवनाचे कृतकृत्य झाले असे समजायचे. हा भोळा भक्तीभाव या वारीत पहायला मिळतो. आमचा वारकरी हा विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तो केव्हाही आसुसलेला असतो. असे असताना आषाढी एकादशीचे असे काही महत्त्व आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या दिवसाला विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागले आहे; पण मनाने मात्र आपण सर्व जण पांडुरंगाचे दर्शन घेतले पाहिजे नव्हे तिथे आहोतच.


नेमके काय आहे हे आषाढी एकादशीचे महत्त्व तेही समजून घेतले पाहिजे. आषाढी एकादशीलाच ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या मागचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाºया कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात.

या देवशयनी आषाढी एकादशीचे नेमके महत्त्व आता जाणून घेतले पाहिजे. ज्या दिवसासाठी आमचा वारकरी अत्यंत व्याकूळ झालेला असतो, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतूर झालेला असतो. देवांच्या या निद्राकालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. त्याची सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. विष्णूला आपला पालनकर्ता, तारणहार किंवा रक्षक म्हटले आहे. त्याचे स्मरण यासाठीच केले जाते. विष्णूची अनेक नामे आहेत, परंतु या दिवशी श्रीविष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना वेळेअभावी किंवा प्रकृती, वयमानानुसार चालत वारी करता येत नाही ते लोक वाहनाने का होईना येऊन पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतात.


हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपºयातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो आणि वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

पुराणातील एका कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल, असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्यांचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो. ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते आणि ते गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला, आहे असे म्हटले आहे.


एका कथेनुसार मृदुमान्य राक्षसाशी विष्णू खूप वेळ युद्ध करत होता. त्या युद्धात विष्णूला झोप आली, म्हणून त्याने गुहेत येऊन झोप घेतली. तेव्हा त्याच्या शरीरातील अकरा इंद्रियांमधील तेजापासून एक शक्ती तयार झाली. त्या शक्तीचे नाव एकादशी. त्या एकादशीने त्या राक्षसाचा वध केला. तेव्हा जागा झालेल्या विष्णूने या एकादशीला वर दिला की, जो कोणी तुझ्या या नावाने उपवास करेल त्याचे रक्षण मी करेन. अशा एकादशीबद्दल अनेक कथा आहेत. थोडक्यात काय तर परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

शास्त्रार्थाने, आयुर्वेद आणि वैद्यक शास्त्रानुसार आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ हा प्रकृतीसाठी जपण्याचा दिवस असतो. यालाच आपल्याकडे चातुर्मास म्हणतात. या काळात व्रते केली जातात. व्रत म्हणजे जागृत राहणे. जागे राहिले, काळजीपूर्वक वागले म्हणजे कोणतेही संकट येत नाही. या जागे राहण्याच्या काळाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासूनची असते. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि तिसरी लाट येऊ नये म्हणून जागृत राहण्याचे असेच व्रत यावर्षी करावे लागणार आहे, म्हणजेच देव झोपले की, आपण जागले पाहिजे. या काळात कांदा, वांगे खाल्ले जात नाही. याचे कारण या काळात ते शरीरास अपायकारक असते, म्हणून त्याचे प्रमाण कमी करायचे असते. देवाला आवडत नाही म्हणून कांदा खायचा नाही, तर तुमच्या शरीराला, पोटाला मानवणार नाही म्हणून तो खायचा नसतो. या काळात जप केला जातो. हा जप नामस्मरणाचा असला, तर तो स्वत:ला जप असेच सांगत असतो. अशा प्रकारे एकादशी, वारी हे जागृती निर्माण करणारे घटक आहेत. जागृती निर्माण करणाºया शक्ती आहेत. त्यांचा सन्मान म्हणजेच भक्ती शक्तीयुक्त, असा वारकरी संप्रदाय. अशी वारी केली की, ती वारंवार करावी असे वाटते. त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यायची आहे.

मोदी-पवार भेटीचे चर्चा चर्वीचरण


अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि सुमारे तासभर चर्चा केली. या भेटीमुळे सगळ्यांच्या विशेषत: माध्यमांच्या भुवया इतक्या उंचावल्या की, ही भेट म्हणजे जणू काही फार मोठी आपत्ती आहे, आश्चर्य आहे, खूप मोठी घडामोड आहे, असा आव आणून दिवसभर त्यावर मंथन केले गेले. लगेच त्याचा संबंध महाराष्ट्रात काही राजकीय उलथा पालथ होणार का, इथपासून ते फडणवीस भेटले, राजनाथ सिंह भेटले आता काहीतरी नक्कीच गडबड होणार, असं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. हे किती पोरकट आणि आचरपटणाचे होते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून का बघितले जाते?


शरद पवार हे खासदार आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना भेटून आपली मते मांडणे, काही कामे करून घेणे हा कामाचा एक भाग आहे. त्याची एवढी चर्चा आणि बातमी कशासाठी करायची? नुसते भेटले भेटले भेटले; पण ते कशासाठी भेटले यावर काही भाष्य नाही. शेवटी शरद पवारांना ट्विट करून सहकार कायद्यासंबंधी आपण पत्र देण्यासाठी भेटलो, असे जाहीर करावे लागले. सरकार आणि विरोधी नेत्यांनी परस्परांना भेटणे पाप आहे का? ते काही शत्रू नाहीत, परस्परांचे हे कधी समजणार आहे या माध्यमांना? प्रत्येक गोष्टीची बातमी कशासाठी केली जाते? पवार घरातून बाहेर पडले. ठाकरे घराच्या बाहेरच पडले नाहीत. राऊत पवारांना भेटले. अजित पवार मुंबईला आलेच नाहीत. राणे दिल्लीला गेले. फडणवीस नागपूरला गेले. या काय बातम्या आहेत? ते कशासाठी गेले, त्यांनी काय केले हे सांगा; पण इकडे गेले, तिकडे गेले, वाटेत कुठे उतरले. विमानतळावर कोण भेटले. कुणाच्या घरी गेले. कुणाच्या घरी गेलेच नाहीत. या चर्चांना काहीही अर्थ नाही. हा पोरकटपणा वाहिन्यांनी थांबवला पाहिजे.

या वाहिन्यांमुळे शरद पवारांचे दिल्लीतील घर एकाएकी राजकीय पॉवर हाऊस बनले. राजकीय विश्लेषकांची पतंगबाजी सुरू होऊन पवारांच्या राजकीय भूतकाळाची उजळणी केली जाऊ लागली. एकूण काय तर नियमित होणारी बैठक, भेट फक्त जागा बदलून मोदींच्या निवासस्थानी झाली आणि तिने माध्यमांमध्ये मोठी जागा व्यापली. हे सगळं अनाठायी आहे. सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनात कशावर बोलायचे, काय मुद्दे असतील यावर चर्चा होणे अपेक्षित असते. त्यासाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटले, तर त्याचा केवढा कालवा केला गेला. जणू काही आभाळ कोसळलं, फार मोठं पाप घडलं असाच आव या वाहिन्यांनी आणला. म्हणजे वसंत कानेटकरांनी आपल्या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडी टाकलेल्या संवादाप्रमाणे, ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना?’ असे विचारावेसे वाटते. विरोधकांनी, सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांना भेटूच नये काय?, असा आभास हे निर्माण करतात. नेमकी बातमी, अचूक बातमी, ठाम मत, उघडा डोळे असे दावे करायचे आणि अचुकपणे चुकीचे काहीतरी दाखवायचे हे तंत्र निर्माण करून चव्हाटा किंवा गावातली चावडी जमवल्यासारख्या चर्चा करत राहायचे.


मोदी-पवार भेटले की, लगेच त्या अंजली दमानिया बार्इंच्या पोटात गोळा उभा राहिला. अगोबाई भेटले का? मग महाराष्ट्राचे वाटोळे झालेच आता, अशी टिप्पणी करून त्या मोकळ्या झाल्या. कशासाठी अशा टिप्पण्या केल्या जातात? या नेत्यांना आपण कामासाठी निवडून देत असतो. त्यांनी काही जनतेच्या कामासाठी, काही नियोजनासाठी भेटीगाठी घेणे हे क्रमप्राप्त असते. त्याचा एवढा गजहब कशासाठी केला जातो? पवार-मोदी भेटले, पवार-ठाकरे भेटले, नाना दिल्लीला गेले, याशिवाय बातम्या दिसत नाहीत का यांना? कोरोनाच्या निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार गेला, उपासमार होते आहे, लोकल बंद, बससेवा नसल्यामुळे श्रमिकांचे होणारे हाल, शैक्षणिक नुकसान, वैद्यकीय भ्रष्टाचार, लोकांची होणारी लूट, परप्रांतियांकडून होणारी मराठी माणसाची लूट हे काहीच दिसत नाही का? जनहिताचे प्रश्न सोडून साप साप म्हणून दोरी धोपटत बसण्याचे प्रकार या वाहिन्यांनी सुरू ठेवले, तर त्याला काय अर्थ आहे? हे प्रकार थांबले पाहिजेत.

लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चर्चा, भेटीगाठी होणे आवश्यक असते. प्रत्येकवेळी सगळ्या चर्चा सभागृहातच होतात असे नाही. सभागृहाबाहेरही काही चर्चा होत असतात. त्या चर्चांना साधक बाधक असे समजून त्यातून काही काम उभे राहणार असेल, तर अगोदरच त्याची चर्चा कशासाठी बाहेर फोडली जाते? अनावश्यक दांडोरा पिटून दिवसाच्या दिवस भेटले भेटले, म्हणून जणू काही पेटले पेटले, असा आव आणायचा. अशा बातम्यांना काहीही अर्थ नसतो. म्हणजे पवार-मोदी भेटले याचा अर्थ काही राजकीय उलथा पालथच झाली पाहिजे, अशी अपेक्षा निर्माण करून बातमी दाखवयाची. आता हे दोघे एक होणार आणि जणू काही महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार. मग त्यावर शिवसेनेला काय वाटते, काँग्रेसला काय वाटते याचा अंदाज घेत बसायचा. यातून काही साध्य होत नसते; पण सशाच्या पाठीवर झाडाचे पान पडते आणि तो आभाळ कोसळले पळा पळा म्हणत धावू लागतो. ससा घाबरून पळतोय म्हणून लांडगा, कोल्हा, हरिण हे सगळे प्राणी पळा पळा... आभाळ कोसळलंय पळा पळा म्हणून आसºयाला गुहेत जातात आणि वाघाच्या तोंडची शिकार होतात. तसला काहीतरी प्रकार यातून घडतो. हे प्रकार थांबले पाहिजेत.


- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

91524498055\\

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा

 दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्यक्षात न घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. खरं तर नेहमी आधी बारावीचा मग दहावीचा निकाल लागतो; पण गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्रात फारच उलथा पालथ झाल्यामुळे ना कोणती टर्म समजत आहे, ना कोणते शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू झाले याचा अंदाज येत आहे. क्रमिक अभ्यासक्रमात बराचसा भाग वगळून थोडक्यात शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे एकूणच शिक्षणाचा बोºया वाजलेला आहे.


खरं तर आज शिक्षण क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. कालानुरूप अनेक बदल घडून आले आहेत. काही परिणामकारक सिद्ध झाले आहे, तर काही कुचकामीही ठरले आहेत. बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मान्य केले, तर भविष्यात आणखी बदल करावे लागणार आहेत, जे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतील. कोरोना हा प्राणघातक विषाणू आला नसता, तर आज जे बदल आपण अनुभवतो आहोत, ते कदाचित अनुभवास आलेही नसते. कोरोना विषाणूने जसे मानवी जीवनात संक्रमण घडवून आणले आहे, तसेच संक्रमण शिक्षण क्षेत्रातही घडून आले आहे आणि त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी काही काळ आपल्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. कदाचित कोरोना आला नसता, तरीही आॅनलाईन शिक्षण आले असते आणि हा बदल घडला असता; पण बारावीबाबत जो काही निर्णय आहे त्याची उत्सुकता नक्कीच आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावीच्या परीक्षेला आत्यंतिक महत्त्व आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जरी वेगळ्या प्रवेश परीक्षा घेतल्या जात असल्या, तरी उच्च शिक्षण घेण्यासाठी बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश देताना बारावीत मिळालेले गुण हे अवश्य विचारात घेतले जातात. त्यामुळे बारावीची परीक्षा ही एक मोठी कसोटीही मानली जाते. कोरोनामुळे यंदा बारावीची परीक्षा झालीच नाही; पण पुढल्या वर्षी जी परीक्षा घेतली जाणार आहे, तिचे प्रारूप आणि स्वरूपच बदलण्यात आले आहे. प्रस्तावित परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. आता ही पद्धती किती प्रभावी ठरेल आणि काय परिणाम होतील, हे येणाºया काळात कळेलच. त्यामुळे कोरोना महामारी येवो अथवा अन्य कुठला साथरोग; बारावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घ्यायची की, आभासी प्रणालीच्या माध्यमातून पार पाडायची, मूल्यांकन आधीच्या वर्गातल्या कामगिरीच्या आधारावर करायचे की, आणखी वेगळ्या पद्धतीने, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचारमंथन सुरू ठेवले पाहिजे. देशातली अनेक महाविद्यालये अशी आहेत की, ज्यामध्ये बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. अशा महाविद्यालयांवर प्रचंड दबाव असतो.


प्रवेशासाठी मोठ्या संख्येत अर्ज येतात आणि विद्यार्थी संख्या अतिशय मर्यादित असते. अशा वेळी बारावीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीला फार महत्त्व प्राप्त होत असते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी जरी प्रवेश परीक्षा होत असल्या, तरी अन्य अनेक जे अभ्यासक्रम आहेत, त्यासाठी प्रवेश परीक्षा नव्हे, तर बारावीत मिळालेले गुण विचारात घेतले जातात. काही महाविद्यालयांचा जो कट आॅफ असतो, तो पाहून तर आश्चर्याने बोटे तोंडात घालण्याची वेळ येते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे महत्त्व कायम आहे. आपल्याकडे सगळी चांगली महाविद्यालये ही मोठमोठ्या शहरांमध्येच असल्याने लहान-लहान गावांमधील विद्यार्थ्यांचा कल हा शहरांकडेच असल्याचे जाणवते. त्यामुळे शहरांवरील ताण वाढतो; शिवाय शहरात आपल्या पाल्याला शिकायला पाठवायचे म्हणजे पालकांच्या खिशावरील आणि डोक्यावरील ताणही तेवढाच वाढतो. आपल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा; आपले भवितव्य उज्ज्वल व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते आणि ते स्वाभाविकही मानले पाहिजे. पण, स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी आवश्यक गुण मिळविणारे आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणारे विद्यार्थी व त्यांचे पालक आर्थिक आणि अन्य प्रकारचा ताण सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे असे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. शहरांमधील स्पर्धेत एखाद्याचाच नंबर लागतो आणि इतर शेकडो विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे आपल्या समाजात जी विषमता निर्माण होते, ती पुढे समाज आणि देशासाठीही घातक सिद्ध होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे भवितव्य, शहरांवर येणारा अतिरिक्त ताण या व अशा अनेक बाबींचा विचार करून सरकारने प्रत्येक जिल्हा स्थानी उच्च व दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा. त्याचप्रमाणे निकाल देताना किंवा परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण होईल, असे वातावरण तयार होता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल.

शिक्षणाचा कायाकल्प करण्याची क्षमता आपली आपल्यालाच निर्माण करायची आहे. भारतात प्रत्येक राज्याचे शिक्षण मंडळ आहे. सीबीएसईसारखे अखिल भारतीय शिक्षण मंडळही आहे; मात्र, प्रत्येकाचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि मूल्यांकनाची पद्धतीही वेगळी आहे; पण उच्च शिक्षणासाठी देशभरातले सगळे विद्यार्थी समान पातळीवर स्पर्धेला सामोरे जातात. यात अनेक विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात. खरे तर हे अन्यायकारक आहे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. देशभर एकसमान शिक्षण प्रणाली लागू करीत सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली गेली, तर कुणावरही अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

खरेच परिस्थिती चांगली हाताळली का?


राज्य असो वा केंद्र सरकार असो, कोरोना काळात आपण खूप चांगले काम केल्याचे दावे करत आहेत. पूर्वी आपल्याकडे आरोग्यसुविधा कमी होत्या. आता किती भरमसाठ आहेत याची आकडेवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक फेसबुक लाइव्ह वरील भाषणात देतात. ही फक्त कागदोपत्री आकडेवारी आहे की, खरोखरच परिस्थिती सुधारली आहे याचा कोणीच विचार केलेला नाही. आज प्रत्येक घरातील माणसं अस्वस्थ आहेत. सरकार घराबाहेर पडू देत नाही, कामावर जाण्याची सोय नाही, सरकारी नोकरीचे ओळखपत्र असेल तरच लोकल प्रवासाला परवानगी. आता सरकारी नोकºया काय खिरापतीसारख्या असतात का? त्या ठरावीक लोकांनाच मिळतात. म्हणजे खºया अर्थाने कोरोना (कोणताही रोग नाही) अशा माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हे सरकार देत नाही का? एवढाले दावे करून निष्पन्न काय? माणसांनी फक्त घरातच बसायचं? जगायचं कसं? हातावर हात ठेवून घरात बसून रोजीरोटी कशी चालेल? माणसांनी उपासमारीनं मरावं असं सरकारला वाटतं का?

             गेल्या दीड वर्षात मग सरकारने केले तरी काय? बंद करण्याशिवाय कोणताच उपाय सरकारला सापडत नसेल, तर सरकारी कार्यक्रम का चालवले जातात? राजकीय नेत्यांचे समारंभ कसे दणक्यात होतात? फक्त सामान्य माणसांवरच नियंत्रणे का? आज मंत्रिमंडळात असलेल्या बहुतेक मंत्र्यांना कोरोनाने ग्रासले होते. तरीही ते आपल्या कार्यक्रमांना बाहेर पडतात, गर्दी करतात, पण पोटासाठी, रोजीरोटीसाठी कामाला बाहेर पडणाºया सर्वसामान्य माणसांना बाहेर पडू दिले जात नाही. हे एक प्रकारचे शोषणच नव्हे का?


कामावर जाण्याची लोकलची परवानगी नाही, बसची सुविधा नाही. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. एक तर लसीकरणाचा वेग सरकारला वाढवता येत नाही. लसींची उपलब्धता नाही. केंद्राने राज्याला जबाबदार धरायचे, राज्याने केंद्राला जबाबदार धरायचे या तू तू - मैं मैं मध्ये सामान्य माणसाचे हाल होत आहेत. खासगी रुग्णालयात पैसे देऊन मुबलक लसी आहेत, पण मोफत सरकारी लसींचा तुटवडा आहे. ही एक प्रकारची लूटच नाही का? याकडे सरकार दुर्लक्ष का करते आहे? मोफत लस देण्याची जबाबदारी सरकारची असताना खाजगी क्षेत्राकडे त्या लसींचा साठा जातोच कसा काय? आपण लसी देण्यास असमर्थ आहोत, तर त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला, सर्वसामान्य माणसांना का? सर्वसामान्य माणूस म्हणजे जो सरकारी नोकर नाही तो. सरकारी नोकरांना भरमसाठ पगार आहेत, महागाईभत्ता आहे, सर्व काही मिळते. सामान्य माणसांना काम केले तरच पैसे मिळतात अशी हातावरची पोटं आहेत. त्यांना कामावर जाण्यापासून रोखून सरकार काय साध्य करू पाहात आहे? सामान्य माणसांना कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. एसी गाडीतून हिंडणाºया आणि घरात बसून कारभार करणाºया मंत्र्यांनाच कोरोना झालेला आहे. असे असताना कोरोना बाधित मंत्रीगण, त्यांचे कार्यकर्ते, आमदार, खासदार मोकाट फिरतात आणि निरोगी लोकांना कोंडून ठेवले जाते. हा कुठला न्याय आहे?

आज मुंबई लोकलचा प्रवास करता येत नसल्यामुळे अनेक लोकांची उपासमार होत आहे. बसमधून जाण्याची परवानगी असली, तरी बसची उपलब्धता नाही. पहिल्या स्टॉपवर बसमध्ये बसलात तरच जाता येते. मध्ये अध्ये बस थांबत नाहीत. सर्वसामान्यांनी करायचे कसे? यातून सामान्य माणूस फक्त आत्महत्या करू शकतो. काही लोक गुन्हेगारी जगताकडे वळण्याची शक्यता आहे. कोरोना हा आता कधीच संपणारा रोग नाही, हे सिद्ध झालेले असताना माणसांना घरात कोंडून, उपासमार करून ठेवण्यात सरकारला कोणती धन्यता वाटते आहे, हे न कळण्यासारखे आहे. आज सामान्य माणूस सरकारच्या नावानं अक्षरश: बोटं मोडत आहे. आम्हाला ना कसल्या सवलती, ना कसलं आरक्षण, ना कसली सुविधा. आहे ती खासगी नोकरी आमच्या कौशल्यावर आम्ही मिळवली, तर तिथे जाण्यासाठी लोकलमधून प्रवास करू दिला जात नाही. त्यामुळे रोजगार गमवावा लागतो. या घटना सातत्याने घडत असताना कोरोना या रोगापेक्षा भयानक इलाज सरकार करत आहे. लॉकडाऊन हा कधीच कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. सर्व खुले केल्यानेच सगळे ठीक होईल. आज लोकलमधून प्रवास करणारे लोक पाहिले तर अनावश्यक माणसेच प्रवास करत आहेत. महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, फिरते विक्रेते, तंबाखू, गुटखा खाऊन पचापचा थुंकणारे यूपीचे भैय्ये, या लोकांसाठी मुंबई लोकल आणि सामान्य माणसांना मात्र ‘दाजिबाचा सुभा, तिथं नाही कुणाला मुभा’ असे बरळत राज्यकर्ते शोषण करत आहेत. अर्थात, हे फार काळ टिकणार नाही. हा सगळा राग सामान्य माणूस येत्या निवडणुकांमधून काढल्याशिवाय राहणार नाही. मग मुंबईसह सर्व महापालिका निवडणुका असोत वा विधानसभा, लोकसभा निवडणुका असोत, हा तळतळाट, राग, झालेल्या नुकसानीचा वचपा मतपेटीतून बाहेर पडेल आणि या सामान्यांवर अन्याय करणाºया सरकारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज सरकारची अवस्था म्हणजे शिशुपालाची शंभरी भरल्यावरच त्याला शासन घडते तसे होताना दिसत आहे. सामान्य माणसांची जेवढी छळवणूक हे सरकार करत आहे, त्यांचा रोजगार हिरावून घेत आहे, त्यांची उपासमार करत आहे, त्यांना लोकल प्रवासापासून जेवढे रोखत आहे, तेवढा त्यांचा घडा भरत आहे. हा घडा भरल्यावर सामान्य माणूस न भूतो न भविष्यती अशी गर्दी करून मतदानाला उतरेल. मतदानासाठी कोणी किती आमिषे दाखवली, पैशाचा, बळाचा वापर केला, तरी न भिता मतदार मतदान करेल आणि या राज्यकर्त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही. आमची रोजीरोटी काढून घेणाºया, आम्हाला कामावर जाण्यापासून रोखणाºया, आम्हाला लोकल प्रवास करू न देणाºया सरकारला आम्ही घरी बसवू, असा पण आज सर्वसामान्य माणसे करत आहेत, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा. आम्ही कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली का? याचे उत्तर तेव्हाच मिळेल.

रंगभूमीवरचे शरद तळलवकर


मराठी रंगभूमीच्या इतिहासातील शरद तळवलकर हे एक मोठे नाव आहे, म्हणजे केवळ अक्षरांनीच नाही, तर त्यांच्या अभिनयक्षमतेने व्यापलेले असे हे मोठे नाव. प्रत्यक्ष नावात कोणताही काना, मात्रा, वेलांटी, उकार असला विकार नसलेला निर्विकार कलाकार म्हणजे शरद तळवलकर. असंख्य चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या असल्या तरी मूळचा रंगभूमीवरचा हा महान कलाकार.


चेहºयावरील भावातूनच विनोद आणि वेदना दाखविणारे शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु:खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहºयावर दाखवीत. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वत:चे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्रे त्यांनी अतिशय सुंदर रितीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या नाट्यविकास मंडळीत त्यांनी नोकरी केली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी मिलिटरी अकाऊंट्‌समध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.


विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. त्यानंतर अनेक सिंधू झाल्या, पण बालगंधर्वांनंतर कान्होपात्रा ते मधुवंती दांडेकर अशा अनेक सिंधू झाल्या, तरी तळीराम हा शरद तळवलकरांचाच कायम होता. या तळीरामावर त्यांची चांगलीच छाप होती.

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. इंदू नावेलकर आणि शरद तळवलकर ही जोडी एकच प्यालामधील गीता आणि तळीराम, तर लग्नाची बेडीत गोकर्ण आणि गार्गी अशी गाजली होती. याशिवाय शरद तळवलकरांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.


काही काही नाटके तर १९७०-८० च्या दशकात खास शरद तळवलकरांसाठी लिहिली होती. वसंत सबनीस यांनी आप्पाजींची सेक्रेटरी हे नाटक खास शरद तळवलकर यांचा चेहरा समोर ठेवून लिहिल्यासारखे वाटते. यात आपले टक्कल झाकण्यासाठी वापरलेला विग आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती प्रेक्षागृहाची छतं उडवणारी असायची. आप्पाजींची सेक्रेटरीत आपल्याला कशी सेक्रेटरी हवी याची जाहिरात देण्यासाठी केलेला पांचट अभिनय प्रेक्षकांमधून हास्याची कारंजी नाही, तर धबधबे उडवत असे. सेक्रेटरी कशी सशस्त्र हवी हे वाक्य उच्चारत असताना केलेले हावभाव अत्यंत अफलातून होते. प्रत्यक्षात सेक्रेटरी म्हणून शलाका या तत्कालीन सेक्सी अभिनेत्रीची एंट्री झाल्यावर रसिक प्रेक्षक शिट्टी घालत असे. मग शरद तळवलकर आणि शलाका यांच्यातील धमाल रंगभूमीवर पाहायला मिळायची.

सखी शेजारणी नाटकातही त्यांनी अशीच धमाल उडवून दिली होती. याशिवाय घरोघरी हीच बोंब या नाटकातील त्यांची दाजीबाची भूमिका अत्यंत गाजली होती. ही नाटके त्यांनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की, या विनोदी नाटकांचे नंतर पुनरुज्जीवनच झाले नाही. अर्थात यात लता थत्ते यांची राधाकाकू आणि शरद तळवलकर यांचा दाजिबा ही जुगलबंदी प्रेक्षकांना गुंगवून ठेवत असे. हे नाटकही वसंत सबनीस यांनी शरद तळवलकरांना समोर ठेवून लिहिल्यासारखेच वाटायचे.


संगीत संशयकल्लोळ या नाटकातील शरद तळवलकरांचा फाल्गुनराव हा अत्यंत नैसर्गिक अभिनयाचा नमुना होता. तशी भूमिका कोणीच केल्याचे जाणवत नाही. चार वर्षांपूर्वी प्रशांत दामलेंनी हे नाटक नव्या स्वरुपात आणले, पण त्यात फक्त राहुल देशपांडे हेच खास आकर्षण होते. शरद तळवलकरांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली फाल्गुनरावाची भूमिका प्रशांत दामलेंना गाठता आली नाही हे निर्विवाद सत्य आहे, पण चित्रपट क्षेत्रात विनोदी आणि चरित्र भूमिका करत असताना सातत्याने रंगभूमीवर प्रयोग करण्याचे काम शरद तळवलकरांनी केले होते. अचूक शब्दफेक, टायमिंग याबाबत तर काही बोलायलाच नको.

करायला गेलो एक या बाबुराव गोखले यांच्या नाटकात स्वत: बाबुराव गोखले, राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांची विनोदाची जुगलबंदी अफलातून होती. यात शरद तळवलकर यांनी शंखनाद ही वर्तमानपत्रातील उपसंपादकाची भूमिका केली होती. प्रत्येक संवाद हा बातमीच्या स्वरूपात बोलण्याची त्यांची ती स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली होती.


या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणाºया ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले. विनोदासाठी त्यांनी आपल्या टकलाचा वापर नेहमीच चांगल्या प्रकारे करून घेतला होता. ते आपले बलस्थान असल्याचे ते मानायचे. एका मुलाखतीत तुम्हाला टकलामुळे कधी त्रास झाला नाही का? लहान वयात मोठ्या वयाच्या माणसाच्या भूमिका कराव्या लागल्या असे वाटते का? यावर त्यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले होते. टकलाचा मी भूमिकांसाठी फायदाच करून घेतला. फक्त वास्तव जीवनात सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड कुठपर्यंत धुवायचे असा प्रश्न पडतो, असे सांगून समोरच्यांना हसवले होते.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055

निकाल की भुरळ?


शुक्रवारी दहावीचा निकाल लागला. सगळेच विद्यार्थी पास झाले याचा आनंद आहे, पण यांचे भवितव्य काय असणार आहे? हा निकाल म्हणजे एकप्रकारची भुरळ आहे असेच वाटते, कारण लाखो विद्यार्थी दहावी पास झाले आहेत. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. कित्येकांनी शंभर टक्के गुणही मिळवले आहेत. त्यामुळेच या सर्वच विद्यार्थ्यांच्या पुढील अकरावी प्रवेशाचे काय होणार ही चिंता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली किंवा प्रवेश परीक्षा घेतली, तर त्या स्पर्धेत कोण टिकेल? ती खरी दहावीची परीक्षा असेल. शंभरपैकी शंभर गुण मिळवणाºया किती विद्यार्थ्यांना यात यश मिळेल हे सांगता येणार नाही, पण जे विद्यार्थी ७0 ते ८0 टक्के मिळवलेले आहेत त्यांचे काय होणार? कमी गुण मिळवून जे पास झालेले आहेत, पन्नास, साठ टक्केवाल्यांचे भवितव्य काय असणार, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन मिळाला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची जी आकडेवारी जाहीर केली आहे, ती आश्चर्यकारक अशीच आहे. मूल्यमापन आणि कोणालाच नापास करायचे नसल्याने खिरापत वाटल्यासारखे मार्क दिले गेले. त्यामुळे दहावीच्या निकालाचा गर्दी रोखण्याचा स्पीडब्रेकर होता तो काढून टाकला गेला. सगळेच सुसाट सुटले. त्यामुळे आता खरा प्रश्न ट्रॅफिक जामचा होणार आहे. त्यावर राज्य सरकारने काय धोरण आखले आहे? सर्वांना पास केले आहे, पण सर्वांना अकरावी प्रवेश मिळणार आहे का? याचे नियोजन कसे असणार आहे? दरवर्षी दहा ते पंधरा टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात तरीही अनेकांना अकरावी प्रवेश मिळत नाही. आता ही वाढलेली दहा ते पंधरा टक्केची गर्दी कुठे ठेवणार आहोत हे शिक्षण विभागाने सांगितले पाहिजे. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातल्या इतर विभागांच्या निकालात पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १०० टक्के असा आहे. राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४.६५ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे सर्वच शहरात अकरावी प्रवेशाची समस्या निर्माण होणार आहे. या प्रवेशासाठी फारमोठी आर्थिक उलाढाल करावी लागणार आहे. खाजगी शिक्षण संस्थांकडून विद्यार्थी, पालकांना प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात लुटले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून, त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे, तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून, त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. ही आकडेवारी पाशवी अशी आहे. सर्वांनी यशस्वी झाले पाहिजे, पास झाले पाहिजे, शिक्षणाची संधी प्रत्येकाला असली पाहिजे हे नक्की, पण इतके गुण मिळवूनही विद्यार्थी ज्ञानी झाले आहेत का? शाळांनी आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा, त्याची जाहीरात करता यावी यासाठी अंतर्गत मूल्यांकनात सढळ हस्ते मार्क दिले आहेत हे त्याचे कारण आहे. जे विद्यार्थी जेमतेम ७५ टक्के कसेबसे मिळवू शकतात, त्यांना ९५ टक्के मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता प्रवेशासाठी शिक्षणाचे बाजारीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको. हा जो मोहजाळ निर्माण केला आहे त्यावर काहीतरी उपाय होणे गरजेचे आहे. शंभर टक्के विद्यार्थी पास झाले, पण त्यांना पुढे शिकण्याची, प्रवेशाची संधी मिळाली नाही तर त्यासारखा दुसरा अनर्थ कोणताही असणार नाही हे नक्की. आपल्याकडे चांगले मार्क मिळाले की विद्यार्थी सायन्स साईड घेतो, मध्यम मार्क मिळाल्यावर कॉमर्स आणि उर्वरित कला शाखेकडे जातात. अशी परंपरा तयार झालेली आहे. त्यामुळे कला शाखेकडे चांगले गुण मिळालेले विद्यार्थी कधी येत नव्हते. प्रत्येकाला डॉक्टर, इंजीनिअर व्हायचे असल्याने विज्ञान शाखाच निवडली जायची. आता या विज्ञान शाखेकडे जाणाºयांची संख्या किती वाढली आहे याचा विचार करावा लागेल. त्यामुळे या गुणांच्या मृगजळात सामान्य विद्यार्थ्यांना असामान्य मार्क मिळाल्याने एकप्रकारची भुरळ घातली जात आहे असे वाटते, पण काही असो त्यांच्या पुढील शिक्षणाची सोय होणे अत्यंत आवश्यक आहे.