Thursday, January 28, 2021

भिजत घोंगडं


दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत खडाजंगी झाली; पण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय होऊ शकला नाही. ही काँग्रेसची पराभूत मानसिकता त्यातून दिसून आलेली आहे. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवड २१ जून नंतर म्हणजे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर होईल, असे जाहीर करून ही बैठक उरकली. निर्णयक्षमता नाही हा काँग्रेसचा दुर्गुण यातून अधोरेखित झालेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना, मंत्र्यांना पूर्वीपासूनच कोणत्याही कामाची गळ घातली की बघू, करू अशाप्रकारे कामे लटकत ठेवण्याची सवय होती आणि आहे. तोच गुण त्यांच्या आता अंगलट येत चाललेला आहे. अनेक प्रश्न, देशहिताचे प्रकल्प अशा निर्णय न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, दुर्गुणामुळे या देशात लटकत राहिले आणि देश मागे राहिला. आता काँग्रेस अध्यक्षपद दीड वर्ष रिकामे असूनही त्या जागी फूल टाइम अध्यक्ष काँग्रेसला निवडता येत नाही, हे अत्यंत वाईट आहे.


राहुल गांधी यांनाच काँग्रेसचा अध्यक्ष करावे, त्यांनाच लोकनेता म्हणून पुढे आणावे, हा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आग्रह म्हणजे केवळ पुत्रमोह आहे! या पुत्रमोहातून सोनिया गांधी बाहेर पडत नाहीत आणि पक्षात खºया अर्थाने लोकशाही नांदू देत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस येणर नाहीत, हे यातून स्पष्ट झालेले आहे.

खरं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतील सर्वाधिक जुन्या पक्षाची आज जी वाईट अवस्था झाली आहे, ती भारतीय लोकशाहीलाही लाजवणारी आहे. बिगर गांधी अध्यक्षपद देऊनच खरे तर आता काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. पण नेतृत्वहीन काँग्रेस असा चेहरा समोर आणून आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने मैदान सोडले आहे, हे स्पष्ट दिसते. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर राहुल गांधींनाच अध्यक्ष करायचे आहे तर ते आता का नको? पण जर या पाच राज्यांतही काँग्रेसची अवस्था वाईट झाली, यश मिळाले नाही, तर राहुल गांधींच्या माथी अपयश नको म्हणून त्यांची निवड लांबणीवर केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने हार पत्करल्याचे हे चित्र आहे.


खरं तर काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची आणि लोकनेता होण्याची राहुल गांधी यांची क्षमता आहे काय, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यांची राजकीय परिपक्वताही देशाने अनुभवली आहे. जेव्हा पक्षाला गरज असते, तेव्हा राहुल गांधी विदेशात जातात. संसदेचे अधिवेशन असताना ते इटलीत आजीला भेटायला जातात. काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारविरोधात जेव्हा एखादे मोठे आंदोलन छेडतात, नेमके तेव्हाच राहुल गांधी परदेशात गेलेले असतात. सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी उपलब्ध असलेले सगळ्यात मोठे व्यासपीठ म्हणजे संसद. संसदेच्या अधिवेशनात सरकारवर तुटून पडण्याची संधी असताना ते उपस्थित राहात नसल्याने सभागृहांत काँग्रेसच्या एकूणच कामगिरीवर परिणाम होतो. असे असतानाही त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा हट्ट धरणे हे चुकीचे आहे.

काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कुणातच क्षमता नाही, असे सोनिया गांधींना का वाटते आहे? २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका तशा राहुल गांधींच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या. पण, संविधानाने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी जी अट घातली आहे, ती पूर्ण करण्यासाठी लागणारे संख्याबळही काँग्रेसला गाठता आले नाही, हे राहुल गांधींचे दोन निवडणुकांमधील फार मोठे अपयश होते. अन्य कोणा बिगर गांधी नावाच्या व्यक्तीकडून असे अपयश आले असते, तर काँग्रेसने त्या व्यक्तीला अध्यक्षपदावर राहू दिले असते का? मग राहुल गांधींसाठी हा हट्ट का धरला जात आहे? का प्रियंका गांधींना अध्यक्ष करण्यासाठी ही खेळी आहे? राहुल नको तर प्रियंकाला करा, असे सांगण्यासाठी ही खेळी सोनिया गांधी करत आहेत? म्हणजे विजय मिळाला, तर तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींमुळे आणि पराजय झाला, तर त्यासाठी सामूहिक जबाबदारी, हे जे काँग्रेसचे धोरण आहे ते अप्पलपोटी आहे. या निर्णयक्षमता नसल्यामुळे अध्यक्षपदाचे घोंगडे भिजत पडले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पक्षात लोकशाही नांदावी आणि पक्षाला अंतरिमऐवजी स्थायी अध्यक्ष असावा, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली होती; पण पत्र लिहिणाºया या नेत्यांपैकी अनेकांची आज काय अवस्था झाली आहे? खरं तर पत्रावर सकारात्मक विचार करून पक्षहिताचा निर्णय होण्याऐवजी अनेक ज्येष्ठ नेत्यांना कसे डावलण्यात आले, हे संपूर्ण देशाने पाहिले. कधीकाळी सर्वाधिक मजबूत पक्ष असलेल्या काँग्रेस पार्टीची आज जी दुर्दशा झाली आहे, त्याला जबाबदार कोण, हे त्या पक्षातील नेत्यांना माहिती आहे. पण, ते उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. कारण, हिंमत दाखवणाºयाला कशी बाहेरची वाट दाखविली जाते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे. ते हतबल झाल्याचे पाहायला मिळते आहे. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांसारख्या निष्ठावंत नेत्यांनाही अपमानीत केले जाते. तिथे सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल? खरं तर शशी थरूरसारखा चेहरा काँग्रेसला नवा विचार देऊ शकतो; पण लोकशाही मार्गाने निवडणुका घेऊनही अध्यक्ष निवडायचा नाही आणि फक्त भिजते घोंगडे ठेवायचे एवढाच अजेंडा सध्या काँग्रेस राबवते आहे, दुसरे काही नाही.

मुंबईतील भारत


भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सण आहे. यावर्षी ७१वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर होणारा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन असल्याने एकूणच पाहुण्यांविना होणारा हा दिवस आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पण खºया अर्थाने दिल्ली राजधानी असली, तरी आर्थिक राजधानी मुंबईत संपूर्ण भारताचे चित्र दिसते. सर्व प्रांतातील लोक इथे असल्यामुळे अख्खा भारत मुंबईत एकवटलेला असतो.

भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी, १९५० रोजी अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी, १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.


२६ जानेवारी, १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिन भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक यावेळी सादर केली जाते. भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. नवी दिल्ली येथे होणाºया संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

यामागचा इतिहास असा आहे की, ४ नोव्हेंबर, १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारला गेला. तेव्हापासून म्हणजे २६ जानेवारी, १९४९ पासून दर वर्षी भारताच्या राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाºया वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू हाण्यापूर्वी ध्वजारोहण होते आणि २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. यावर्षी कोरोनामुळे परदेशी पाहुणे नाहीत. अगोदर ब्रिटिश पंतप्रधानांना आमंत्रित केले होते; पण ते कोरोनामुळे रद्द केले गेले. गेली सात दशके या पारंपरिक पद्धतीने हा आनंदोत्सव या देशात साजरा केला जातो. याचे कारण भारतीय राज्यघटने इतकी सुंदर घटना कुठेही पहायला मिळत नाही. या घटनेने या देशातील प्रत्येकाला सर्व काही दिले आहे. खºया अर्थाने प्रजेचे राज्य आल्याचे या घटनेने आपल्याला दिसून येते.


गेल्या काही वर्षांपासून या देशाला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे; पण या दहशतवादाचा सामना करण्याचे बळ या देशातील घटनेमुळेच आपल्याला मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे. २६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईत फार मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. एकप्रकारे पाकिस्तानने पुकारलेले ते छुपे युद्धच होते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते; तरीही मुंबई अवघ्या २४ तासांत सुरूळीत सुरू झाली. कोणताही कारभार बंद पडला नाही. मुंबईतील लोकल, बस, टॅक्सी आणि सार्वजनिक सेवा सुरळीत होत्या. मुंबईतील माणूस नेहमीप्रमाणे कामावर जात होता. याचे कारण मुंबई ही संपूर्ण देशाची प्रतिनिधीत्व करणारी जादुईनगरी आहे; पण कोरोनामुळे मुंबई बंद पडली होती. देशाचे नुकसान झाले आहे. लाइफलाइन लोकल बंद राहिली, ही खंत मनात बाळगून हा दिवस आपण साजरा करत आहोत. मुंबईत देशातील प्रत्येक प्रांतातील माणूस मुक्तपणे वावरत असतो. विविध देशातील लोक येत असतात. अशा संकटातही तो सुरक्षितपणे वावरू लागला, कारण या मुंबईतील लोकांनी, ज्ञात-अज्ञात व्यक्ती, शक्तींनी कसलाही भेदभाव न करता एकमेकांना मदत केली. संकटग्रस्त परिस्थितीत एकमेकांना मदत करणारी प्रवृत्ती म्हणजे आपली मुंबई आहे. हे खºया प्रजासत्ताकाचे लक्षण आहे. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे खरे चित्र दिसते, ते या संकट काळात प्रखरपणे दिसते. या विश्वासाच्या जोरावरच या देशाला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

कृषी क्षेत्रावरची संकटे


यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला आहे. राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात यावर्षी मान्सूनची कृपा झालेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ही दिलासा देणारी बाब आहे. बहुतेक सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, त्यातील अतिरिक्त पाण्याचा विसर्गही केला गेला आहे. त्यामुळे सुजलाम्, अशी परिस्थिती यावर्षी आहे. असे असताना कृषी कायद्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे. सरकार अडून बसले आहे, शेतकरी हट्टाला पेटला आहे. ११ बैठका तोडग्याविना निष्फळ ठरल्या.


खरं तर चांगला पाऊस झाल्यामुळे सुफलाम्ची अपेक्षा आता केली जाणार हे निश्चित; पण तोडगा काढण्यात फळ न आल्याने यावर्षी सुफलाम् असे चित्र दिसत नाही, हे वास्तव आहे. अजून चार दिवसांनी अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यावेळी काय चित्र असेल हा प्रश्न यामुळे निर्माण होतो.

भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्याने इथली सगळी आर्थिक गणिते पावसावर मापली जातात. आपल्याकडे शेतीच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न पावसाने सुटत असतो. त्यामुळे पावसाची कृपा झाली, तर आर्थिक घडी बसते. म्हणूनच यावर्षी नागरिकरण संकटात असताना, उद्योग संकटात असताना, कृषी आणि ग्रामीण भागाकडून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असे दिसते. पण आज दोन महिने पंजाबचा शेतकरी ठिय्या मांडून बसलेला आहे. देशातला शेतकरी अस्वस्थ आहे. त्यामुळे निसर्गाने भरभरून दिले असतानाही आम्ही आपले नुकसान करत आहोत हे चित्र दिसते आहे.


यावर्षी जूनमध्ये १५ टक्क्यांनी जास्त पाऊस पडला. सुरुवात चांगली झाली की, सगळे व्यवस्थित होते. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला; पण पावसाने अवकृपा केली नाही, हे महत्त्वाचे होते. हा २०१३ नंतरचा सर्वाधिक पाऊस होता. त्यामुळे खरीपाची विक्रमी पेरणी, बंपर उत्पादनामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता. पण काही ठिकाणी अवकाळीचे ग्रहण लागले आणि बेसावध असलेल्या शेतक­ºयाला फटका बसलाच. ग्रामीण भागावर यावर्षी अर्थव्यवस्थेची भीस्त असताना अवकाळी आणि आंदोलन ही कृषी क्षेत्रावरची आलेली संकटे अर्थव्यवस्थेला मारक अशीच आहेत.

सगळीकडे लॉकडाऊन आणि बेरोजगारीचे संकट असताना यावर्षी मे महिन्यात देशांतर्गत बाजारात ट्रॅक्टरची विक्री ४ टक्क्यांनी वाढली, ही माहिती आश्चर्यकारक होती; पण हेच ट्रॅक्टर आज आंदोलनासाठी दिल्लीत उतरले हे पण दुर्दैव म्हणावे लागेल. पण ते अर्थव्यवस्थेला ग्रामीण भाग, कृषी क्षेत्र हातभार लावणार असल्याचे ते संकेत होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती असल्याचे हे द्योतक होते. ग्रामीण भागात वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकते, असे यातून चित्र तयार होते.


जूनमध्येच अगदी वेळेत संपूर्ण देशात मान्सून पसरला आणि कोरोनाच्या संकटाचे ढग झाकोळले गेले. सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा दिला गेला. या तीन महिन्यांत आॅगस्ट अखेर या पावसाने सातत्य राखून कृषीक्षेत्राला खूश केले.

आपल्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये यावेळी सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस झाला. २०१३ नंतर यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. हिमालयीन राज्ये आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भाग वगळता देशाच्या इतर भागात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने यंदा सामान्य पावसाळ्याचा अंदाज वर्तविला होता; पण नेहमीप्रमाणेच तो खोटा ठरवत चांगला पाऊस झाला आणि जनतेची चिंता मिटवली आहे. विशेषत: ग्रामीण भागात या पावसाने बºयाचशा आशा पल्लवित केल्या. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे आणि शहरी भागात विकासाचे चाके रखडले आहेत. अशा निराशेच्या वातावरणात ग्रामीण भागातून मागणी वाढून अर्थव्यवस्था सावरण्याची अपेक्षा होती; पण कृषी कायदे आणि त्यावरून निर्माण झालेले आंदोलन हे या अर्थव्यवस्थेला बाधक ठरत आहेत.


अर्थशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट दिग्गजांचा असा विश्वास आहे की, आता मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून नवी ऊर्जा मिळेल. शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे संकेत देशातील बाजारपेठेतील झालेल्या बदलांवरून दिसून आले होते; पण शेतकरी पेटून उठल्यामुळे हे सर्व अंदाज खोटे ठरले, असे म्हणावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. कुठेतरी तोडगा काढून हा वाद मिटवला गेला पाहिजे.

केवळ चांगल्या पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची अपेक्षा करीत नाहीत. ते यासाठी तीन प्रमुख कारणांवर विचार करतात. पहिले कारण असे आहे की, २५ मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन असूनही, शेती चालूच राहिली, तर उत्पादनाला मोठी मागणी येईल. दुसरे, सरकारी एजन्सीच्या मते, यावेळी जास्त पेरणी झाली आहे. तिसरे कारण म्हणजे जे शहरांमधून आपल्या खेड्यात परतले ते कामगार आता शेतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांत जो कृषीक्षेत्रावरचा रोजगाराचा भार सार्वजनिक आणि सेवा उद्योगाकडे वळला होता, तो पुन्हा एकदा कृषीक्षेत्राकडे वळल्याचे चित्र यावर्षी दिसून आले. त्यामुळे आता कृषीक्षेत्रावरच्या अर्थव्यवस्थेवर यावर्षी भार पडला आहे, वाढला आहे. कृषीक्षेत्राकडूनच फार मोठी अपेक्षा आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनात दोन-दोन महिने वाया जातात हे कुठेतरी चिंताजनक असे आहे.


विशेष म्हणजे यावर्षी पेरणीने एक नवीन विक्रम केला आहे. यावेळी खरिपाचे भरपूर पीक आले आहे. यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढली; पण शेतमालाला योग्य भाव हा प्रश्न ऐरणीवर आला आणि सगळं वातावरण बिघडलं. यावर्षी सगळे निकष या कोरोनाने बदलल्यामुळे उद्योग आणि बाजारपेठेला वेगळीच सवय या काळात लागली आहे. बाजारपेठेचा मूड आणि आवड बदललेली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्वच्छता व कल्याण विभागात ५ नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. स्वच्छता आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या जंतुनाशकांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आता ग्रामीण भागातही अशा उत्पादनांना मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरी ग्राहकांपेक्षा वेगळा आम्ही मानत नाहीत. आता हा फरक अगदी किरकोळ आहे.

जी उत्पादने पूर्वी फक्त शहरातच वापरली जात होती, ती आता ग्रामीण भागातही वापरली जात आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातून अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. केंद्र सरकारने कृषी विपणन सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, परंतु राज्ये त्याची अंमलबजावणी कशी करतात यावर परिणाम अवलंबून असेल, असे वाटत असताना वादळासारखा विरोध सुरू झाला आणि या अपेक्षा फोल ठरल्या.


नांदायला जाण्याअगोदरचा सासुरवास


झी मराठीवर ४ जानेवारीपासून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झालेली आहे. तीन आठवड्यांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. मुख्य म्हणजे ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेची प्राइम टाइम या मालिकने घेतली आणि सुरुवात तरी चांगली झालेली आहे. त्यामुळे त्या राधिका, सौमित्र आणि तो गोतावळा पाहून प्रेक्षकांना आलेला कंटाळा या मालिकेने घालवला आहे हे विशेष. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्याची जी जाहिरात प्रोमो केला होता त्यावरून या मालिकेचे कथानक हे लोकांना समजले होते. फक्त ते मांडले कसे जाते हे फार महत्त्वाचे होते. त्यात पहिल्या तीन आठवड्यांत या मालिकेला यश आलेले आहे.


शुभांगी गोखले, दिप्ती केतकर, आदिती सारंगधर या मालिकांमध्ये रुळलेल्या कलाकारांची यात भूमिका असल्याने या मालिकेने पटकन जोर पकडलाच, पण मालिकेसाठी शाल्वा किंजवडेकर आणि अंविता फलटणकर ही निवडलेली जोडीही प्रेक्षकांना आवडली आहे. विशेषत: प्रेक्षकांची नाडी कशी पकडायची याची दिग्दर्शकाला कल्पना असल्याने पटकथा आणि संवादही चांगल्याप्रकारे लिहिलेले दिसतात. थोडी भावनाप्रधान अशा वातावरणातून जाणारी ही मालिका आहे. खरं तर कथानकात नवीन असे काही नाही. पुरणाची पोळी किंवा स्वयंपाक प्रत्येकजण करतो, पण प्रत्येकाची चव वेगळी असते तसाच हा प्रकार आहे. तरीही लोक चाखूनचापून जेवत आहेत तसाच हा प्रकार आहे.

म्हणजे सलमान खान आणि भाग्यश्रीला नायक-नायिका म्हणून सादर करताना सूरज बडजात्यांनी जे कथानक निवडले होते तसेच आहे हे. फक्त तिथे दोन मित्र होते, इथे दोन मैत्रिणी आहेत. भाग्यश्रीला काही दिवस आपल्या मित्राच्या घरी राहण्यासाठी ठेवले जाते आणि तिथे त्यांची मैत्री जमते, प्रेम होते. तोच ढाचा या ठिकाणी आहे. नोकरीनिमित्ताने अंबरनाथची मुलगी मुंबईत राहायला येते असे या कथानकात दाखवले आहे. मैने प्यार कियामध्ये लांब पहाडी भागातून मुंबईसारख्या शहरात राहायला येते असे दाखवले आहे. इथे अंबरनाथ येथून मुंबईला येते असे दाखवले आहे. तशी ती चूकच म्हणावी लागेल, कारण अंबरनाथवरून मुंबईत दररोज लोकल प्रवास करून हजारो महिला नोकरी करत असतात. त्यासाठी मुंबईत तिची राहण्याची सोय कुठे होणार याची चिंता अंबरनाथमधील कुटुंबीयांना वाटणे हे तसे हास्यास्पद आहे. कोल्हापूर, सातारा किंवा मराठवाड्यातून, विदर्भातून मुंबईत नोकरीला आली असेल तर गोष्ट वेगळी होती, पण मालिकांना जागेवर चित्रीकरण लागते. लांबचे लोकेशन नको असते म्हणून त्यातल्या त्यात लांबचे स्टेशन म्हणून अंबरनाथ दाखवले आहे, पण तरीही प्रेक्षक मुकाटपणे बघत आहेत.


जाड असलेल्या स्विटूचे जाडीमुळे लग्न ठरत नाहीये, अठरा ठिकाणांहून नकार आलेला आहे. तिला सुंदर असा काटकुळा नायक दाखवण्याचे छान धाडस या मालिकेत केले आहे. अर्थात काही वाहिन्यांवर ‘रंग माझा वेगळा’, ‘मुलगी झाली हो’ अशा काही मालिकांमधून वर्णद्वेश, लिंगद्वेश असा दाखवला जात असताना रंगरूप, आकार हे प्रेमाच्या आड येऊ शकत नाही, असा संदेश ही मालिका देत असल्यामुळेही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. अर्थात जाड असली तरी स्वीटू ही गोड दिसते. हडकुळा असला तरी ओमकार पाप्याचं पितर वाटत नाही.

काही बाबी अतिरंजीत आहेत हा भाग वेगळा. म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय करणारे घर आहे. दररोज ३०० चपात्या विकत देतात, खाद्यपदार्थ, पुरणपोळ्या करून विकणारे सहा माणसांचे साळवी कुटुंब आहे, तिथे घरातील सामान सगळं संपलं आहे. डाळ, तांदूळ घरात काहीच शिल्लक नाही, म्हणून सगळे उपाशी राहतात. हे अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणावे लागेल. कृष्ण-सुदाम्याप्रमाणे शकू आणि नलू या मैत्रिणी खूप वर्षांनी भेटतात असेच दाखवले आहे. आता सुदाम्याच्या घरचे पोहे म्हणजे नलूच्या घरची पुरणपोळी, बटाटा वडा, पातळ आमटी खाल्ल्यामुळे शकू त्याची परतफेड करणार हे साहजिकच आहे, पण खात्यापित्या घरातील लठ्ठ मुलगी सर्वांची मर्जी जिंकते आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका चालते. अर्थात कुठून तरी दोन-चार कुटुंबे आणायची. हिरॉईनला छळणारी एक बाई मालिकेत लागते तसे ते काम या मालिकेत तायडी अर्थात मालविका म्हणजे आदिती सारंगधरकडे आलेले आहे. ‘होणार सून...’मध्ये जान्हवीचा सासुरवास करण्यासाठी सहा सासवा होत्या. इथे एकट्या आदितीवर ती छळण्याची जबाबदारी आलेली आहे, पण गरीब-श्रीमंत या भेदभावाच्या, वर्गवारीच्या किंबहुना नव्या प्रस्थापित जातीवरूनच ही मालिका चालवली जाणार आहे.


आता यात परदेशातून आलेली मोमो ओमकारच्या प्रेमात पडणार का? ती प्रेमात पडावी म्हणून आदितीच्या कुरघोड्या आणि त्याला स्वीटू देणारी उत्तरे यातून दर आठवड्याला काहीतरी नवीन घडणार आणि वर्षभर ही मालिका चालणार हे नक्की. फक्त लग्न होण्याआधीच स्वीटू सासरी राहायला आल्यामुळे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ असे न राहता नांदायला येण्यापूर्वीच तिने पाया भक्कम करायचे ठरवले आहे.

शकू म्हणजे खानविलकर कुटुंबीयांचे फिटनेस सेंटर आहे आणि डाएट कसे असावे यावरून प्रत्येकाचा आहार नियंत्रित केला आहे. त्यामुळे श्रीमंताचे कुपोषण म्हणजे डायटिंग, तर गरीबांचे खाणे म्हणजे संतुलित आहार. या दोनमधला संघर्षही इथे पाहायला मिळणार, पण पहिल्या तीन आठवड्यांत असंख्य चुका असल्या आणि कथेत नाविन्य नसले तरी प्रेक्षकांना ही मालिका आवडते आहे हे नक्की. मालिकांमध्ये सुनांना छळण्यासाठी किंवा सुनांनी सासवांना छळण्यासाठी लग्न व्हावे लागते, पण इथे स्वीटू आधी सासुरवासाची परीक्षा देणार आहे आणि मग बोहल्यावर चढणार आहे हे नाविन्य म्हणावे लागेल.



योग्य निवड


येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिकला होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची झालेली निवड ही अत्यंत योग्य बाब आहे. त्यांच्या निवडीने या साहित्य संमेलनांच्या आजवरच्या महान परंपरेत खोवला गेलेला एक मानाचा तुरा आहे असेच म्हणावे लागेल. याचे कारण काहीसे वेगळे करण्याचा प्रयत्न आजवर संमेलनाने केलेला नव्हता. वैज्ञानिक आणि साहित्यिक असलेल्या नारळीकरांना ही संधी देण्याचे केलेले काम नक्कीच चांगले आहे. यामुळे ज्ञानाला विज्ञानाची जोड मिळणार आहे.

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पद्मभूषणने सन्मानित झालेला नारळीकरांसारखा बुद्धिमान आणि विज्ञाननिष्ठ लेखक संमेलनाध्यक्ष पदावर विराजमान होणे ही या संमेलनाची गुणवत्ता वाढविणारी बाब म्हणावी लागेल. हा सन्मान त्यांना केवळ ते जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आहेत म्हणून मिळालेला नाही; मराठीमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञान कादंबरीची रुजवण करण्यामध्ये आणि त्याचबरोबर बाल आणि युवा पिढीमध्ये वैज्ञानिक लेखनाद्वारे गणित, अंतराळ, खगोल शास्त्र, अशा विषयांची आवड निर्माण करण्यामध्ये नारळीकरांनी आजवर दिलेले योगदान केवळ अतुलनीय आहे. जेव्हा टीव्ही हे माध्यम रुजलेले नव्हते त्या काळात ४० वर्षांपूर्वी नभोनाट्य किंवा श्रृतिकांच्या माध्यमातून त्यांनी पोहोचवलेल्या कथाही लक्षणीय आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेला मान हा रास्तच आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन म्हटले की, नानात‍ºहेचे वादविवाद हे चित्र पहायला मिळत होते, पण साहित्य परिषदेने काहीतरी वेगळं करून दाखवलं म्हणून त्यांचे कौतुक करावे लागेल.


खरं तर विज्ञान विषयावर लिहिणारे अनेक लेखक, साहित्यिक आहेत, परंतु अगम्य संकल्पना आणि बोजड शब्दांमुळे या विज्ञानपर साहित्याला जेवढी मिळायला हवी होती तेवढी वाचकप्रियता लाभू शकलेली नव्हती, पण डॉ. जयंत नारळीकर याला नक्कीच अपवाद आहेत. ते सोप्या भाषेत, सर्वसामान्यांना समजेल अशाच शब्दांत विज्ञानातून ज्ञान देत असतात. हे त्यांचे फार मोठे बलस्थान आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेमध्येदेखील वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात आणि विज्ञानकथा वा कादंबरीही रंजक आणि वाचनीय ठरू शकते हे त्यांनी आपल्या लेखनातून आजवर दाखवून दिले आहे. विशेषत: नव्या पिढीला साद घालणारे जे विज्ञाननिष्ठ लेखन नारळीकरांनी केले आहे, त्याला तोड नाही.

साहित्यासाठी काहीतरी भाषेत नवीन भर टाकायची असते. अनेकांनी तसे प्रयत्न केलेही आहेत. डॉ. नारळीकरांनीही यासाठी आपला वेगळा विचार मांडला आहे. प्रेषितसारखी पहिली विज्ञान कादंबरी त्यांनी लिहिली तेव्हा त्यामध्ये इंग्रजी शब्द वापरले गेल्याने काहींनी टीकाही केली होती. परंतु विज्ञान कथालेखन करताना इंग्रजी शब्द बिल्कूल वापरू नयेत हा अट्टाहास आपल्याला मान्य नाही आणि जर अशा शब्दांनी मराठी भाषा दबणार असेल तर तिला कमकुवत म्हटले पाहिजे. इतर भाषांची अतिक्रमणे पचवून कोणतीही भाषा समृद्ध होते. इंग्रजी भाषाही त्यामुळेच समृद्ध झाली आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. टीकेने खचून न जाता आपल्या मताशी प्रामाणिक राहून आपला इंग्रजी शब्द वापरण्याचा नेमका काय उद्देश होता हे त्यांनी ‘वामन परत न आला’ या आपल्या दुस‍ºया विज्ञान कादंबरीच्या प्रास्ताविकात दाखवून दिले आहे. हा अतिशय नम्रपणा होता. तो फार कमी लोकांना साधतो, पण आपली मर्यादा न ओलांडता, सभ्यता न सोडता, नेमकेपणाने लिहिणारे विज्ञान साहित्यिक असा लौकिक नारळीकरांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांचा झालेला हा सन्मान, झालेली ही रास्त निवड म्हणजे साहित्य संमेलनाचा सन्मान वाढवणारी बाब आहे. खूप दिवसांनी एक चांगले साहित्य संमेलन नाशिकला पहायला मिळेल, असा विश्वास त्यामुळे निर्माण झालेला आहे.


यापूर्वीच जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारही लाभला आहे. मराठी विज्ञान कथा, कादंब‍ºयांचे दालन तर नारळीकरांनी समृद्ध केले आहेच, परंतु आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलांसाठी, तरुणांसाठी विपुल लेखन त्यांनी आजवर केले. वैज्ञानिकांनी आपले ज्ञान दुसºयांना दिले पाहिजे हे त्यांनी वागून दाखवले आहे. नव्या पिढीला विज्ञानामध्ये रस वाटावा यासाठी डॉ. नारळीकरांनी अथकपणे केलेल्या या लेखनामुळे लाखो मुलांना आजवर विज्ञानाची, खगोल शास्त्राची, गणिताची गोडी लागली असेल यात शंका नाही. साहित्य संमेलनाध्यक्षपदी झालेली नारळीकरांची निवड मराठी साहित्यामध्ये विज्ञाननिष्ठ लेखनाचे एक नवे पर्व निर्माण करील आणि मराठी भाषेला व साहित्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, याबाबत कोणतीही शंका मनात बाळगायची गरज नाही. साहित्याला राजकारण शिवलेले आपण पाहतो आहोत, पण आता खºया अर्थाने दर्जेदार संमेलन पाहण्याची संधी यावर्षी मिळणार आहे.

नाशिकचे साहित्य संमेलन म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा गौरव आलाच. त्याशिवाय हेच नाही तर कुठलेच साहित्य संमेलन पूर्ण होऊ शकत नाही, पण आणखी एक बाब म्हणजे, कुसुमाग्रज नावाचा एक ग्रह अंतराळात आहे आणि खगोल शास्त्राचे वैज्ञानिक साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत हाही योग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही निवड अधिक योग्य आहे.

Sunday, January 24, 2021

वादग्रस्त नाटके


एखादे नाटक रंगमंचावर आल्यावर त्यामुळे वाद निर्माण होणे हे मराठी रंगभूमीला नवीन नाही. घाशीराम कोतवालमुळे १९७०च्या दशकातील वाद पेटला होता; पण असे वाद नाटकांबाबत सतत होत राहिले आहेत. वादग्रस्त नाटके निर्माण होत राहिली आहेत आणि ती तशीच चालली पण आहेत. अशाच काही नाटकांवर आज नजर टाकूया. कधी सरकारने, कधी विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्‍न केलेली काही नाटके आपल्याकडे पुष्कळच आहेत. विशेषत: ऐतिहासिक घटनांवर एखादे नाटक असले की, त्यावर वाद हा निर्माण होणारच.


दहा एक वर्षापूर्वी असेच एक नाटक आले होते. त्याचं नाव एक चावट संध्याकाळ. (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली.) फक्त पुरुषांसाठी असे नाटक असल्याची जाहिरात केल्यामुळे महिला संघटना आक्रमक झाल्या. अशोक पाटोळे आणि अजित केळकर दोघेच भेटतात आणि एकमेकांना अत्यंत पांचट, अश्लील असे जोक सांगतात. नाटकात फक्त विनोद ऐकायला म्हणूनच जायचे; पण हे अत्यंत अश्लील विनोद असल्यामुळे महिलांना या नाटकाला बंदी होती; पण महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला, आम्हालाही हा चावटपणा बघायचा आहे असा आग्रह धरला, त्यावर वाहिन्यांवर टॉक शो झाले, महिलांना का नाही? म्हणून आग्रह केला आणि महिलांनाही हा चावटपणा पहायला मिळाला; पण त्यामुळे हे नाटक गाजले. अशोक पाटोळे यांच्यानंतर ते बंद पडले.

अर्थात ही परंपरा खूप जुनी आहे. अगदी शंभर वर्षांपूर्वी संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली होती. का तर म्हणे नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे त्यावर बंदी घातली होती. आपल्याकडे कोणत्या कारणाने कोणाला वाईट वाटेल, भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो. त्यावरून हे वाद निर्माण होतात आणि नाटके वादग्रस्त ठरतात. कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती, म्हणून वाद झाले होते.


पण १९७०च्या दशकातील घाशीराम कोतवाल या नाटकाने खूपच वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर होते. त्यांनी या नाटकात नाना फडणीसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता. अर्थात त्याचा काही परिणाम झाला नाही. हे नाटक देश-विदेशातही गाजले आणि त्याने रंगभूमीला एक फार मोठा नवा चेहरा दिला. नवा फॉर्म दिला. एकाचवेळी जास्तीत जास्त पात्र रंगभूमीवर आणण्याचा विक्रमही याच नाटकाने केला.

१९९०च्या दशकात पती माझे छत्रपती या संजय पवार यांनी लिहिलेल्या नाटकाने वाद निर्माण झाला होता. मच्छिंद्र कांबळी या नाटकात प्रमुख भूमिकेत होते. छत्रपती या शब्दाने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर या नाटकाचे नामकरण पती माझे छत्रीपती, असे करण्यात आले आणि हा वाद मिटला.


आणखी एक जुने नाटक म्हणजे बंधविमोचन. या नाटकाचे लेखक गोपाळ गोविंद सोमण हे होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.

या वीस वर्षांत सर्वात वादग्रस्त ठरलेले आणखी एक नाटक म्हणजे, मी नथुराम गोडसे बोलतोय. हे लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेले नाटक. नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप या नाटकावर होता. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका होती. या नाटकाचे ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत; पण काँग्रेसने या नाटकाला तुफान विरोध केला. या नाटकाची बस जाळण्याचा प्रकारही काँग्रेसने ठाण्यात केला होता. सुदैवाने त्या बसमध्ये कोणी कलाकार नव्हते; पण हे नाटक चांगले चालले आणि आजही यू-ट्यूबवर ते पाहिले जाते.


महिलांसंबंधी असलेल गेल्या दहा वर्षांतील एक वादग्रस्त नाटक म्हणजे, योनीमनीच्या गुजगोष्टी. याचे मर्यादितच प्रयोग झाले. अतिशय संवेदनशील आणि कोणी बोलू शकणार नाही असे विषय यात होते. या नाटकावर बोरिवलीच्या नाट्यगृहाची बंदी होती, तसेच ठाणे महापालिकेचीही बंदी होती. त्यामुळे ठाण्यात याचे प्रयोग झाले नाहीत.

वस्त्रहरण हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आले, तेव्हा वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर. महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून कोणाच्या भावना दुखावतील, असा समज करून याला विरोध केला. पण पु. ल. देशपांडे यांनी याला चांगली पसंती दिली. अभिप्राय दिला आणि हे नाटक तुफान चालले. ५ हजारांपेक्षा जास्त प्रयोग या नाटकाने केले. वस्त्रहरणमुळे मच्छिंद्र कांबळी यांची वेगळी ओळख महाराष्ट्रालाच नाही, तर जगाला झाली. मालवणी भाषेचा गोडवा त्यांनी सर्वदूर पोहोचवला; पण त्याची सुरुवात वादाने झालेली होती.


नाटकावर बंदी असताना प्रयोग केला म्हणून किंवा त्या नाटकामुळे कोणाला शिक्षा झाल्याच्या घटना फारशा नाहीत; पण विजयतोरणा या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. लेखक विवेक बेळे यांनी शॅम्पेन आणि मारुती या नावाने एक नाटक आणले होते; पण त्यामुळे खूप वाद निर्माण झाला. त्यामुळे या नाटकाचे नाव बदलून माकडाच्या हाती शॅम्पेन असे करावे लागले. हे नाटक खूप गाजले. विशेष म्हणजे १९व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले हे नाटक आहे.

विजय तेंडुलकरांची नाटके नेहमीच वादग्रस्त ठरली. घाशीराम कोतवालप्रमाणेच सखाराम बाइंडर या नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता; पण न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांच्या गिधाडे नाटकातही गर्भपाताचे दृष्य आहे. पोटात गुडघा मारून गर्भपात केला जातो आणि रक्तस्त्राव होतो म्हणून लाल रंग साडीला लागतो. या लाल रंगाला आणि रंगभूमीवर असे दाखवायला सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली; पण यातून पळवाट म्हणून लालच्या ऐवजी निळा रंग वापरून या नाटकाचे प्रयोग सुरू केले गेले. यातील निळा रंग लाल आहे असे समजावे असे अगोदर सूचीत केले गेले होते; पण हा वाद मिटवला गेला होता.


मी नथुराम गोडसे बोलतोय नंतर हे राम नथुराम या नावाचे नाटक लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे यांनी आणले होते. या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. १९-१२-२०१६ ची म्हणजे अवघ्या चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. पण तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाºया कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.

काही वाद कोर्टात गेले, काही गाजले, पण रंगभूमीवर अनेक वादग्रस्त नाटके आली आणि त्यांनी नवे काही तरी दाखवूनही दिले, ही परंपरा वर्षानुवर्षांची आहे. पण यात प्रत्येक खेपेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंकलेले आहे. कोणाच्याही दडपशाहीने नाटक बंद पडले नाही. त्यात किरकोळ बदल प्रसंगी केले गेले; पण नाटक ‘शो मस्ट गो आॅन’ या न्यायाने होत राहिले.


- 

आगीच्या वाढत्या घटना

 ातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् ेनाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सुरिभि:  बृहद्देवता २.२.४


गेल्या काही दिवसांत राज्यात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या महिन्यातच भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेली आगीची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक होती. यात दहा चिमुकल्यांचा बळी गेला. त्यानंतर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग. या आगीतही पाच जणांचा बळी गेला. छोट्या मोठ्या घटना, तर घडतच आहेत. भिवंडीत गोदामांना आगी लागणे, शुक्रवारी ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेली आग. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील आग. मुंबईत मालाडमध्ये लागलेली आग. या घटना आपल्याकडे सातत्यानं घडत आहेत, तरी आपण आगीचे प्रकार रोखण्यासाठी कुठे कमी पडत आहोत याचा शोध घेण्याची गरज आहे.


प्रत्येकवेळी शॉर्टसर्किटने आग लागली असे म्हणून वीजयंत्रणेवर खापर फोडण्यात अर्थ नाही. शॉर्टसर्किट का होते याचा तपास आम्ही करणार आहोत का? वायरिंग कमकुवत झाल्यानंतर, जुनाट झाल्यानंतर त्यातून शॉर्टसर्किट होत असते. मग हे वायरिंग वेळच्या वेळी चेक करणे, त्याचा मेंटनन्स ठेवणे, देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रत्येक आस्थापनेने नेमली पाहिजे. काही ठराविक दिवसातून, ठराविक कालावधीनंतर चेक करण्याची जबाबदारी कोणावर तरी दिली पाहिजे. भंडाºयातील घटनेनंतर दोन परिचारिका आणि शल्य चिकित्सकांना निलंबित करून काय साध्य झाले? परिचारिकांनी रुग्णांची दखल घ्यायची की, लाइटची, वायरिंगची? डॉक्टरांनी पेशंट तपासायचे, शल्य चिकित्सकांनी माणसाचे शल्य जाणून घ्यायचे की वीजेचे? त्यामुळे ही जबाबदारी योग्य संबंधित व्यक्तीकडे सोपवली नसल्याने हे बळीचे बकरे बनले आहेत. हे वायरिंग धोकादायक आहे, त्याची दखल घेण्यासाठी कोणीच सूचना केल्या नव्हत्या का? अगदी पूर्ण बंद पडेपर्यंत, आग लागेपर्यंत वाट का पाहिली गेली? कारण कोणावर जबाबदारी सोपवली नाही म्हणून.

सीरमच्या आगीत वेल्डिंगच्या ठिणगीमुळे आग लागल्याचे बोलले जाते; पण वेल्डिंग करताना ठिणग्या उडणार हे माहिती असतानाही तिथे ज्वालाग्राही ज्वलनशील वस्तू कशा काय ठेवल्या गेल्या? आपल्याकडे त्याबाबत सूचना देऊनही माणसे त्याचे पालन करत नाहीत. पेट्रोल पंपावर गाडीला किक मारू नका, मोबाइल घेऊ नका असे सांगितले असले, तरी अनेक जण तिथे स्टार्टर मारतात, कीक मारतात, मोबाइल घेतात. यातून एखादा मोठा भडका उडू शकतो. हे सगळे आगीशी खेळण्याचे प्रकार आहेत. पाण्याशी आणि आगीशी कधी मस्ती करायची नसते. अग्नीचे तत्वच सर्व भस्मसात करणे आहे. त्याला शांत आणि संयमीत ठेवायचे असते; पण आम्हाला आगीशी खेळण्यात मोठेपणा वाटतो. त्यामुळे आम्ही धोके निर्माण करतो. सीरमसारख्या महत्त्वाच्या संस्थेत बांधकाम कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे वेल्डिंगमुळे आग लागली. हे लांछनास्पद आहे. एका युद्धपातळीवर काम करणाºया संस्थेत, महत्त्वाच्या दिवसात असे प्रकार होत असतील तर ते चुकीचे आहे. वेल्डिंग करताना ठिणग्या उडतात हे माहिती असताना तिथे ज्वालाग्राही वस्तू ठेवल्या गेल्या, हे त्या कामगारांनी अगोदर सांगणे गरजेचे होते. विषाची परीक्षा कशासाठी घेतली जाते?


जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत्नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सूरिभि: ेबृहद्देवता २.२.४ असे अग्नीचे अग्नीपुराणात वर्णन आढळते. म्हणजे, सर्व भूतांच्या आधी जन्मलेला भूत म्हणजे पंचमहाभूत असा, यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत. विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप आहे. त्याला जाळणे, भस्मसात करणे हेच माहिती आहे. भक्षण करणे हे त्याचे काम आहे. त्यामुळे कुठेही अग्नी निर्माण करायचा नसतो. त्याला नियंत्रित करायचे असते; पण अग्नी निर्माण होण्याची म्हणजे सर्व स्वाहा होण्याची आम्ही मुभा देत असू तर हे प्रकार वाढणारच ना. आग नियंत्रणात आणणे सोपे काम नसते. आगीशी सामना करताना अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांना जीव धोक्यात घालावा लागत असतो. त्यामुळे अग्नीप्रतिबंधक सुविधा आपल्याजवळ असल्याच पाहिजेत. आज मुंबईत खूपच उंच इमारती आहेत. काही इमारती चाळीस पन्नास मजल्यांपेक्षा जास्त आहेत. पुणे, ठाणे या भागातही २० ते २४ मजल्यापर्यंत अनेक इमारती आहेत. या इमारतीत अग्नीशमनाची सोय आहे काय याचा किती जण विचार करतात. आपल्याकडे असलेल्या अग्निशमन बंबाची शिडी जास्तीत जास्त कितव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते याचा अभ्यास सगळ्या महापालिकांकडे आहे का? दहाव्या माळ्यापर्यंत पोहोचतील इतक्या उंच शिड्या आहेत, पण जर पंधरा ते वीस मजल्यादरम्यान आग लागली तर काय करणार? या कशाचेच आमच्याकडे नियोजन नाही. त्यामुळे आम्हाला या आगीशी खेळावेच लागणार आहे. आगीच्या धोक्याशी सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच आपण आगी न लागण्याच्या कारणांची सोय केली पाहिजे. शॉर्टसर्किटचे निमित्त होणार नाही, असे पाहणे गरजेचे आहे. ज्वालाग्राही पदार्थांची सुरक्षितता राखणे गरजेचे आहे. आग हे असे संकट आहे की, ते फस्त केल्यावरच संपते. म्हणून काळजी घेणे आणि सावध राहणे हाच त्यावर उपाय आहे.

Saturday, January 23, 2021

तेव्हापासून...

 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७


राजकारण म्हटलं की महत्त्वाकांक्षा आलीच. मग ती तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असो वा राज्याच्या. अशीच एक महत्त्वाकांक्षा नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्त केली. पाटील यांनी एका मुलाखतीत ‘आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं’, असं म्हटलं होतं. अर्थात तो त्या मुलाखतकर्त्याने ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का’ विचारल्यावर त्यांनी ‘हो’ म्हटले. कोणालाही वाटणारच, पण माध्यमांनी मात्र ती फार मोठी महत्त्वाकांक्षा वगैरे असे काही नाही, पण त्यावरून एक हवा निर्माण करण्याची संधी साधली. त्यावर लगेच अजित पवारांना काय वाटते, रोहित पवारांना काय वाटते, विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय वाटते, मुख्यमंत्र्यांना काय वाटते, अशा प्रतिक्रिया घेण्याचा प्रकार केला तो अत्यंत हास्यास्पद होता. नको इतके महत्त्व त्याला दिले गेले.

शरद पवारांनीही हे कारण नसताना वाढवलेल्या प्रसारमाध्यमांच्या आगाऊपणाला तसेच उत्तरे दिले. शुक्रवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली, त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का? असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असणाºया नेत्यांना द्यायचा तो संदेश दिला.


वास्तविक मुख्यमंत्री होण्याची काँग्रेसच्या राजकारणात प्रत्येकाला इच्छा असते. १९८० च्या दशकात तर काँग्रेसचा कोण मुख्यमंत्री केव्हा होईल याचा नेम नसायचा. वरून मनात आले तर कोणालाही लॉटरी लागत होती. त्यामुळे प्रत्येकाला वाटायचे आपणही मुख्यमंत्री होणार. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ मस्त कथा सांगायचे. एका सभेत त्यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस नेत्यांच्या समोर एक किस्सा सांगितला होता. एक राजा शिकारीला निघालेला असतो. तेव्हा वाटेत एक कुंभार त्याला नमस्कार करतो. ‘महाराज कुठे निघालात’ असे विचारतो. राजा सांगतो, ‘शिकारीला चाललो आहे’. त्यावर तो कुंभार म्हणतो, ‘पण आता पावसाचे चिन्ह आहे, शिकारीला कसे जाणार?’ तेव्हा तो राजा म्हणतो, ‘आमच्या हवामान खात्याने आज बिल्कूल पाऊस पडणार नाही, असे सांगितले आहे. मग तू कसा सांगतोस?’ असे म्हणून राजा जंगलात शिरतो. काही वेळातच ढग जमतात आणि पावसाला सुरुवात होते. राजाला माघारी यावे लागते. तो आश्चर्याने दुसºया दिवशी दरबारात त्या कुंभाराला बोलावून घेतो. ‘आजपासून तुला राज्याचा मुख्य मंत्री करणार आहे. कारण आमच्या एकाही मंत्र्याला पावसाचा अंदाज आला नाही, त्यांची यंत्रणा बरोबर नाही. त्यामुळे तू आजपासून राज्याचा मंत्री’. कुंभार म्हणाला, ‘महाराज आपल्याला त्यातलं काही कळत नाही. पण माझं गाढव आहे. ते पाऊस येणार असेल तर आपले कान हलवते आणि मला समजते’. राजा खूष झाला. त्यानं सांगितलं की, ‘ठीक आहे. मग तुझ्या गाढवालाच मी मुख्य मंत्री बनवतो’ आणि खरोखरच गाढवाला तो राजा मंत्री बनवतो, पण त्यामुळे झाले काय, राज्यातील सगळ्या गाढवांना स्वप्न पडू लागली की आपणही मुख्यमंत्री होणार. बॅ. गाडगीळांनी बस हा किस्सा ऐकवल्यावर उपस्थितांमध्ये हशा यायचाच, पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सगळे नेतेही खजील व्हायचे, पण आज राष्ट्रवादीत असे स्वप्न पाहिले जात असले तरी ते मूळचे काँग्रेसचे रक्त आहे. त्यामुळे हा किस्सा तिथेही लागू होतो, पण कारण नसताना माध्यमांनी राईचा पर्वत बनवल्याने जयंतरावांना मात्र मनस्ताप झाला असण्याची शक्यता आहे.

खरं तर राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा लागते, पण नुसती महत्त्वाकांक्षा नाही तर सतत कर्म करत राहणे महत्त्वाचे असते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ या गीतेतील श्लोकाप्रमाणे फळाची अपेक्षा न करता जो काम करतो त्याला फळ मिळते. तसे मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीत किती उत्सुक आहेत याची गणतीच नाही. या सगळ्यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यात अजितदादा पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील असे अनेकजण होते. मोहिते-पाटील यांनी पक्ष बदलला असला, तरी राष्ट्रवादीची ही यादी काही कमी झालेली नाही. आता नव्या इच्छुकांच्या यादीत जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे असे कितीतरी आहेत, पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पक्षाला आपले संख्याबळ जास्तीत जास्त वाढवण्याची गरज असते. नाहीतर मग फळाची अपेक्षाच करायची नाही. जे काही पदरात पडते आहे ते गोड मानून काम करायचे तत्त्व असले पाहिजे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गहिवरून सांगितले होते की, सुरुवातीला सरपंच झालो होतो, पण काँग्रेसने मला सरपंचपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले. तेव्हापासून राज्यातल्या प्रत्येक सरपंचाला वाटू लागलं होतं की, आपणही कधीतरी मुख्यमंत्री होऊ. त्यामुळे स्वप्न पाहणं वाईट नाही, पण ते पूर्ण होणं मात्र सुप्रिमोंच्या हातात असते, कोणत्या गोष्टीने ते दुखावतील आणि आमटीत पडलेल्या झुरळाप्रमाणे झटकून दूर करतील हे सांगता येत नसते. त्यामुळे असे स्वप्न जरी असले तरी त्याची जाहीर वाच्यता राजकारणात करणेही आजकाल अवघड होऊन बसले आहे.

कलाकारांचे पाठीराखे शिवसेनाप्रमुख



कलाकारांना राजमान्यता असल्याशिवाय आपल्या कलेला काही अर्थ आहे असे वाटत नाही. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना जोपर्यंत आपल्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून होत नाही तोपर्यंत त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही. याचे कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कलोपासक होते, कलेचे दर्दी होते. त्यामुळे कायम कलाकारांच्या पाठीशी राहून कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कलेला राजमान्यता म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी दिलेली पाठीवर थाप हेच समीकरण गेली ५० वर्षं दिसत होते.


चित्रपटसृष्टीतील सर्वाेच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार, देशातील मानाचा भारतरत्न पुरस्कार मिळवणाºया लता मंगेशकर असल्या काय किंवा लिटील चॅम्प्सचे छोटे कलाकार असोत, सर्वांना शिवसेनाप्रमुखांना आपला पराक्रम दाखवताना आनंद वाटायचा. त्यामुळेच काय होते हे समीकरण? कलाकारांना शिवसेनाप्रमुख आपले का वाटायचे? काय दैवीशक्ती त्यांच्यात होती हे पाहण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

             इरावती कर्वे यांची कथा आहे ‘परिपूर्ती’ या नावाची. या कथेत त्या एके ठिकाणी व्यासपीठावर गेलेल्या असताना, त्यांची ओळख थोर विदुषी, लेखिका, विचारवंत अशा अनेक बिरुदावलींनी करून दिली जाते, पण तरीदेखील ही ओळख अपूर्ण आहे असे त्यांना वाटत असते, पण एकदा रस्त्याने त्या जात असताना दोन खेळणारी मुले एकमेकांशी बोलताना ‘अरे ती बघ आमच्या वर्गातल्या मुलाची आई’ अशी इरावतीबार्इंची ओळख करून देतात. आई ही ओळख करून दिल्यानंतर त्यांना आपली ओळख पूर्ण झाली, परिपूर्ती झाली असे वाटते. अगदी त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसेनेने कलाकारांची पाठ थोपटली, कौतुक केले की, कलाकारांना परिपूर्ती झाल्यासारखे वाटते. सर्वच कलकार, क्रीडापटूंचे कौतुक हे शिवसेनाप्रमुख करायचे, पण आपण आज फक्त चित्रपट कलावंतांचाच विचार करणार आहोत. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत किती कलाकारांच्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुखांनी केले याची गणतीच नाही.


             शिवसेनेच्या स्थापनेनंतर फक्त जनतेच्या मदतीसाठी उतरणे हे ध्येय शिवसेनाप्रमुखांनी राखले होते. साधारण १९७० च्या सुरुवातीला मराठी, हिंदी चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढू लागले तसे त्यांच्या समस्याही वाढू लागल्या. अनेक कलाकारांना अडचणी येऊ लागल्या. ‘मोलकरीण’सारखे दर्जेदार चित्रपट काढणारे निर्माते गजानन शिर्के यांनी या गोष्टी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोलून दाखवल्या. त्यावर उपाय म्हणून चित्रपट कलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी शिवसेना चित्रपट शाखा सुरू करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दादरच्या विष्णू भुवन लॉजवरच्या पहिल्या माळ्यावर १९७० मध्ये चित्रपट शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी चॉकलेट हीरो देवानंद याला आमंत्रित केले होते. देवानंदच्या हस्ते शिवसेनेच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यावेळी सर्व चित्रपट निर्माण करणाºया संस्थांना आमंत्रित केले होते. सर्वांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरुदत्त हा जातीने उपस्थित होता. त्यावेळी सर्व कलाकारांना खूप आनंद झाला होता. साक्षात बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठिशी असल्यावर आता आपल्या अडचणी संपल्या, हा विश्वास तिथेच कलाकारांना मिळाला. तो शब्द बाळासाहेबांनी कायम पाळला. चित्रपट शाखेचे शाखाप्रमुखपद गजानन शिर्के यांना दिले, तर हे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी शिवसैनिक सदानंद देऊलकर यांना देण्यात आली आणि या चित्रपट शाखेचा शुभारंभ झाला.

त्यानंतर आसपासच्या सर्व स्टुडिओंनी, रूपतारा, रणजीत स्टुडिओ यांनी आपल्या स्टुडिओत शिवसेना चित्रपट शाखेसाठी कार्यालय सुरू केले आणि या शाखेची वाटचाल वेगाने सुरू झाली. रामदयाल नावाचे एक निर्माते होते. त्यांनी संजय खानला घेऊन ‘हसिनों का देवता’ म्हणून चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती, पण संजय खान हा चित्रपट तारखा पुढे ढकलून, शूटिंग कॅन्सल करून रखडवत होता. त्यामुळे निर्मात्यांचे पैसे अडकून पडले होते, खर्च वाढत चालला होता. ही गोष्ट रामदयाल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या कानावर घातली. शिवसेनाप्रमुखांनी तातडीने संजय खानला बोलावून घेतले. आपल्या भाषेत समजावले आणि मार्ग काढून हा चित्रपट पूर्ण केला. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना शिवसेनेबद्दल आत्मियता वाटू लागली. शिवसेनेकडे गेल्यावर आपली कामे होतात हे लक्षात आल्यामुळे चित्रपट कलावंत सभासद होत गेले. त्यामुळे हे कलाकार कायम बाळासाहेबांसाठी काहीतरी आपण केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन अशा कलाकारांनी शिवसेनेचा स्थापना दिवस, शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, मार्मिकचा वर्धापन दिन अशा निमित्ताने कार्यक्रम करायला सुरुवात केली. शंकर जयकिशन नाइट, कल्याणजी आनंदजी नाइट, आर. डी. बर्मन नाइट, किशोर कुमार नाइट, वैजयंती माला नाइट अशा प्रकारे रफी, मुकेश, आशा भोसले, महेंद्र कपूर असे कलाकार शिवसेनेसाठी उत्साहात कार्यक्रम करू लागले. हे सगळं शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमापोटी, विश्वासापोटी घडत होते. म्हणजे बाकीच्या राजकीय पक्षांना गर्दी जमवण्यासाठी सिनेकलावंत आणावे लागतात. प्रचारसभांना अभिनेते लागतात, पण शिवसेनेच्या गर्दीचा आणि कामाचा फायदा कलाकार घेत होते. शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी कधी कलाकारांची गरज भासली नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच एक हुकमी एक्का होता. नाहीतर मनात आणलं असतं तर आख्खं बॉलिवूड शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाखातर प्रचाराला उतरले असते, पण तसा कधीही कलाकारांचा फायदा बाळासाहेबांनी घेतला नाही. आपण कलाकारांच्या पाठीशी राहायचे आहे, त्यांची मदत नाही घ्यायची हा फार मोठा विचार होता.


             राजीव गांधींच्या आग्रहाखातर सुपरस्टार अमिताभ बच्चन काँग्रेसमधून इलाहाबाद मतदारसंघातून हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून लोकसभेत गेला, पण काँग्रेसने त्याला बोफोर्स प्रकरणात अडकवले. त्यावेळी अमिताभ बच्चन शिवसेनाप्रमुखांना भेटायला आला आणि मदत मागितली. बाळासाहेबांनी फक्त, तू काही केलं नाहीस ना? घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला आणि त्या प्रकरणातून त्याला बाहेर काढले. कलाकारांना कोणत्याही राजकारणाने विटाळता कामा नये हे बाळासाहेबांचे ध्येय होते. १९८२ साली कुलीच्या शूटिंगच्या वेळी अमिताभला अपघात झाला होता तेव्हा सर्वात प्रथम शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली होती. बेंगलोरवरून मुंबईत आल्यावर त्या काळात शिवसेना ब्रीच कँडीपाशी सतत अमिताभसाठी झटत होती. कारण बाळासाहेब हे कलाकारांचे पाठीराखे होते.

१९९२ च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्त अडकला होता. त्याला अटक झाली होती. एक नायक रातोरात खलनायक झाला. त्यावेळी काँग्रेसचे खासदार आणि मंत्री असलेले सुनील दत्त बाळासाहेबांना भेटायला आले. आपण या प्रकरणाने खूप दु:खी असल्याचे सांगितले. त्यावेळी सुनील दत्त यांच्या पाठीवर हात ठेवून शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, काळजी करू नको, मी त्याला सोडवतो. त्याप्रमाणे बाळासाहेबांनी संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढले.


             दादा कोंडके यांची शिवसेनाप्रमुखांशी मैत्री आणि सेना प्रेम तर जगजाहीर आहे. पहिलाच चित्रपट ‘सोंगाड्या’ काढल्यावर टॉकीज मिळत नव्हते आणि हिंदी निर्मात्यांनी अडवणूक केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी कोहिनूर टॉकीजवर केलेले आंदोलन आणि लावलेले ‘सोंगाड्या’चे फलक हा शिवसेनेच्या इतिहासातील फार मोठा अध्याय आहे. १४० आठवडे हा चित्रपट तिथे चालला. त्यानंतर दादा कोंडके अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणूनच जगले.

‘अलबेला’सारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे आणि शेकडो चित्रपटांत भूमिका केलेले अभिनेते मास्टर भगवान, पण त्यांचा शेवट फार वाईट झाला. अखेरच्या काळात आर्थिक ओढाताण होती. पैसे नव्हते. तेव्हा त्या काळात बाळासाहेबांनी त्यांना २५ हजार रुपयांची मदत केली होती. आजारपणाचा सगळा औषधोपचाराचा खर्च शिवसेनाप्रमुखांनी केला होता. मुंबईत कलाकार बनायला येणारे कलाकार शिवसेना मुंबईत आहे म्हणून येऊ लागले ते यासाठीच. रणजीत भूतकर म्हणून एक कलाकार होते. त्यांनाही अशीच आर्थिक मदत म्हणून शिवसेनाप्रमुख पगार दिल्याप्रमाणे दरमहा पैसे देत होते. कलाकार जगला पाहिजे हे त्यांचे ध्येय होते. म्हणून ते कलाकारांच्या पाठीशी होते.


भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्यांनी घातला त्या दादासाहेब फाळके यांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती, पण त्यांचा मुलगा देवदत्त हा मुंबईत अगरबत्ती विकून गुजराण करतो हे समजल्यावर त्याला मानधन सुरू करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. हा कलाकारांबद्दल असलेला जिव्हाळा फार महत्त्वाचा होता. कलाकारांची कदर कलाकारच करू शकतो. बाळासाहेब स्वत: जातीवंत कलाकार होते. त्यामुळेच ते कायम कलाकारांच्या पाठीशी राहिले.

नाना पळशीकर हे एक ज्येष्ठ कलाकार होते. त्यांनाही त्यांच्या राहत्या घराची काही समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख मदतीसाठी धावले होते. आय. एस. जोहर हा एक विनोदी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होता. तोही एका प्रकरणात अडकला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनीच त्याला मदत केली आणि त्यातून सोडवले होते. शिवसेना चित्रपट शाखेच्या माध्यमातून कलाकारांच्या पाठीशी राहण्याचे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा कलाकारांना विश्वास देणारे शिवसेनाप्रमुख होते. या चित्रपट शाखेचे अध्यक्षपद शाखाप्रमुख म्हणून गजानन शिर्के स्वत: सांभाळत होते. कार्यालय प्रमुख म्हणून सर्व कलाकारांच्या समस्या जाणून त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचे काम सदानंद देऊलकर करत होते. तशी यंत्रणाच शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केली होती.


धर्मंेद्र, मनोज कुमार, संजीव कुमार, किशोर कुमार हे तर शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांना शिवसेनाप्रमुखांबद्दल प्रचंड प्रेम होते. केवळ अडचणी सोडवण्यासाठीच नाही, तर बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी हे कलाकार आवर्जून येत असत. कलाकारांना शिवसेनाप्रमुखांकडून एक प्रकारची ऊर्जा मिळत असे. आपले सच्चे पाठीराखे ते आहेत हे कलाकारांना वाटत असे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्याकडे कधीही अपेक्षेने पाहिले नाही. कसलीही अपेक्षा केली नाही. त्याला मदत केली म्हणजे तो आपल्या शिवसेनेसाठी काम करेल, असा विचारही बाळासाहेबांनी केला नाही. फक्त कलाकार म्हणून पाहिले. त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, प्रांत पाहिला नाही की पक्ष पाहिला नाही. निरपेक्षपणे फक्त त्याच्यातील कलाकार जाणला. नाहीतर सुनील दत्त काँग्रेसचे खासदार, मंत्री होते तरीही त्यांच्यातला कलाकार जाणून मदत केली. अमिताभ बोफोर्समध्ये अडकला तेव्हा काँग्रेसचा खासदार होता, नंतर समाजवादी पार्टीशी जवळीक होती, पण शिवसेनेत या असे आमंत्रण कधी दिले नाही. कलाकारांना मदत केली, त्यांच्या पाठीशी राहिले, पण तुमच्या लोकप्रियतेचा फायदा आमच्या पक्षाला द्या असे कधीच बोलले नाहीत. कारण शिवसेनाप्रमुख हेच इतके मोठे होते की त्यांचा त्यांच्या कामावर विश्वास होता. आपण जिथे जाऊ तिथे गर्दी जमणारच, त्यासाठी कलाकारांना वेठीस धरणे त्यांना मान्य नव्हते.

आत्ताही जे कलाकार शिवसेनेसाठी काम करतात ते स्वयंस्फूर्तीने करतात, पण अन्य पक्षाच्या विचारांचे कलाकार असले तरी त्यांना तितकाच मान शिवसेनेत मिळतो. कारण भेदभाव करणे हे शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या रक्तात नसते. आज आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुशांत शेलार हे तरुण कलाकार पक्षाची जी जबाबदारी घेत आहेत ते स्वयंस्फूर्तीने घेत आहेत. वास्तव कशात आहे, कलाकारांचे पाठीराखे कोण आहेत, हे समजल्यावरच उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत दाखल झाल्या. कारण कलाकारांची कदर करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख झालेली आहे. आज शिवसेनाप्रमुख नसले तरी कलाकार उद्धव ठाकरे यांना भेटायला जातात आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन येतात. ही परंपरा फार चांगली जपली जात आहे.


Friday, January 22, 2021

एक पाऊल मागे पण...

 जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकल्यानंतरही आनंद गमावून बसते.


नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकºयांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले, पण आजवरचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा प्यादे एक घर मागे येते तेव्हा तेव्हा नंतर मोठा विजय मिळवल्याचे आपला ईतिहास सांगतो. मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरावी लागते हे तर राजकारणाचे तत्त्व बनले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे जिंकले आहेत, असे म्हणता येणार नाही.


ब्रिटिशांनी जेव्हा १९०५ साली बंगालची फाळणी केली होती तेव्हा संपूर्ण भारतातून लाल-बाल-पाल पेटून उठले होते. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी एकजुटीने लढा देत ब्रिटिशांना नमवले आणि फाळणी मागे घ्यायला लावली होती. ब्रिटिशांचे एक पाऊल मागे आले, पण त्यानंतर त्यांनी मोठे युद्ध जिंकले होते. १९४७ ला पाकिस्तानच्या रूपाने भारताचा मोठा तुकडा तोडला, १९०५ पेक्षा मोठी फाळणी झाली. त्यामुळे एक पाऊल मागे घेतले जाते तेव्हा फार मोठी झेप प्रतिस्पर्ध्याची असते. भारताची फाळणी झाल्यावर पंजाबचा मोठा भाग गेला, बंगालचा भाग पाकिस्तानकडे गेला. महाराष्ट्र आत असल्यामुळे ते शक्य झाले नाही, तरी हैदराबादचा प्रश्न चिघळवला होता.

एक पाऊल मागे घेतल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे २०१४ ला भारतात मोदीलाट आली होती, त्याचवेळी दुसरी लाट आपची होती. अरविंद केजरीवाल यांनी नवे आव्हान उभे केले होते, पण लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. आप दोन नंबरचा, तर काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. जेमतेम चार आमदार होते, पण भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आपला पाठिंबा आपला दिला. भाजपच्या हेच फायद्याचे झाले. आपला दिल्लीतच अडकवून ठेवले. त्यासाठी पुन्हा झालेल्या निवडणुकीत भाजपने दुय्यम उमेदवार उभे केले आणि आपला जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची संधी दिली. परिणामी केजरीवाल दिल्लीच्या सत्तेत गुंतले. त्यामुळे देशभरात त्यांची लूडबूड थांबली. एक पाऊल मागे घेऊन भाजपने केंद्रातली सत्ता मिळवली होती. त्यामुळेच आज दीड वर्षासाठी सरकार मागे गेले असे वाटत असले, भविष्यात हा कायदा माथी मारलाच जाणार नाही असे नाही. अर्थात तो कायदा संपूर्ण वाईट असेल असेही नाही. कदाचित तो खरोखरच शेतकरी हिताचाही असू शकतो. विरोधासाठी विरोध म्हणून विरोध असू शकतो. त्यामुळे भविष्यात काय घडते याकडे लक्ष द्यावेच लागेल.


आता केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली, मात्र केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. शेतकºयांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला, तर दीड वर्षासाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ शकते. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकºयांच्या बैठकीत दर्शवली. शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाºया बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला, पण त्यातून नेमके काय साध्य होणार हे समजत नाही. हे कायदे नेमके काय आहेत, त्यात काय म्हटले आहे, याची बाजू आजपर्यंत कोणीच न पडताळता त्याला विरोध केला गेला आहे, असेही दिसते. विरोध करणाºया कितीतरी जणांना विचारले तर या कायद्यात नेमके चुकीचे किंवा बरोबर काय आहे हे सांगा, असे विचारले तर सांगता येत नाही. नेत्यांनी सांगितले म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असे म्हणणारेही आहेत. पण आपला शेतकरी सृजनशील आहे. तो आपल्या हिताचा निर्णय घेईल आणि त्यासाठी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करेल आणि मग निर्णय घेईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

एक छान सुविचार आहे, ‘जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकल्यानंतरही आनंद गमावून बसते.’ एक पाऊल मागे याचा अर्थ यशापासून थोडेच दूर आहोत. त्यामुळे आज सरकारने एक पाऊल मागे घेतले असले असे वाटत असले तर सरकार नमले आहे असा अर्थ काढून घेण्यात अर्थ नाही. यात शेतकºयांचे काहीच नुकसान होणार नाही, पण हा विषय घेऊन जे राजकीय पक्ष मैदानात उतरतील त्यांना त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हा विषय बुमरँगसारखा विरोधी पक्षांच्या अंगावर उलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण हा कायदा किती जणांनी प्रामाणिकपणे वाचला आहे हे सांगता येणार नाही. त्यात खरोखरच शेतकºयांचे हित असेल आणि आगामी काळात दीड-दोन वर्षांनी भाजपने त्याचा फायदा उठवला तर विरोधक याच मागे आलेल्या पावलामुळे, मागे घेतलेल्या एक प्याद्यामुळे नामोहरम होतील हे लक्षात घेतले पाहिजे.

रिमेक

 


एखादा चित्रपट दुसºया कोणत्यातरी चित्रपटावरून घेतला आहे, असे आपण सहजपणे बोलतो. पण चांगली रंजक कथानके, स्टोरी आपणही करावी, असे निर्माता, कलाकारांना नेहमीच वाटत असते. त्यातून अन्य भाषांतील चित्रपट आपल्या भाषेत आणण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. मराठी माणसांनी या चित्रपटसृष्टीचा पाया घातला तेव्हा व्ही. शांताराम, प्रभात यांसारख्या कंपन्या एकाचवेळी मराठी आणि हिंदीत चित्रपट बनवत असत, पण कालांतराने प्रत्येक भाषेतील चित्रपटांची खासियत बनली आणि आपल्या मातीतील चित्रपट बनू लागले, पण दुसºया मातीतील कथानके आपल्या मातीत चपखल बनवणे हा प्रकारही जोरात सुरू झाला. त्यामुळे अनेक हॉलिवूडचे चित्रपट बॉलिवूडमध्ये येऊ लागले. अनेक हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीत होऊ लागले. तसेच कित्येक मराठी चित्रपटांचे हिंदीतही चित्रपट येत गेले. यातून आमचा रुपेरी पडदा गाजत राहिला आहे.

‘जेम्स बाँड’च्या बाँड पटाचे हॉलिवूडला एकेकाळी वेड लागले होते. त्यामुळे हिंदीत जितेंद्रच्या रूपाने नवा बाँड आणला गेला. ‘फर्ज’ हा त्यातला पहिला चित्रपट होता, पण त्या मालिकेतील दुसरा चित्रपट ‘बाँड 303’ यायला जवळपास २५ वर्षं लागली आणि तोपर्यंत जितेंद्र हा बाँड न राहता कौटुंबिक, पोषाखी, विनोदी, दाक्षिणात्य चित्रपटातील आणि महिलांना आवडणारा चॉकलेट हीरो बनून गेला, पण जेम्स बाँडचे चित्रपट येतच होते. शॉन कॉनरी, रॉजर मूर असे कालानुरूप जेम्स बाँड 007 बदलत गेले, पण चित्रपट येत राहिले. हे सातत्य हिंदी सिनेमाला जमले नाही. त्यानंतर असाच एक बाँड आणला तो १९७९ च्या दरम्यान. कराटे खेळणारा असा ‘गनमास्टर जी 9’च्या रूपाने. गरीबांचा अमिताभ अशी ओळख असलेला मिथुन चक्रवर्ती अवतरला. ‘गनमास्टर जी 9’ या बाँड नेमने त्याने ‘सुरक्षा’, ‘वारदात’ असे काही चित्रपट काढले, पण नंतर तोही दाक्षिणात्य हिंदी चित्रपटात गुंतला आणि आमचा बाँड संपला.


पण विनोदी आणि कौटुंबिक कथानकांचे चित्रपट जसेच्या तसे काढले किंवा त्यांच्या रिमेक केला तर मात्र आमच्याकडे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो हे सातत्याने दिसून आले आहे. १९८५ साली महेश कोठारे यांनी चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यापूर्वी बालकलाकार ते कलाकार असा त्यांचा प्रवास झाला होता, पण निर्माता म्हणून त्यांनी धुमधडाक्यात ‘धुमधडाका’ने सुरुवात केली. हा चित्रपट ‘प्यार किये जा’ या १९६६ च्या चित्रपटाची रिमेक होती. यात शशी कपूर, मेहमूद, किशोर कुमार, ओमप्रकाश, मुमताज हे कलाकार होते. तुफान विनोदी चित्रपट म्हणून त्या चित्रपटाला त्या काळात यश मिळाले होते. त्याची वीस वर्षांनी मराठी रिमेक महेश कोठारेंनी केली. ‘धुमधडाका’ या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांची चांगली भट्टी जमली. याशिवाय निवेदिता, प्रेमा किरण, सुरेखा राणे या नवोदित अभिनेत्री होत्या. शरद तळवलकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर या चित्रपटात बाजी मारली होती, पण या चित्रपटाने रिमेकच्या माध्यमातूेन एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर रिमेक करण्याची चटकच महेश कोठारेंना लागली.

महेश कोठारेंनी आपला पुढचा चित्रपट आणला तो ‘सुपर स्नुपर’ या इंग्रजी चित्रपटाची कथा होती. ‘धुमधडाका’चे यश या चित्रपटाला मिळाले नाही, पण हा चित्रपट चांगला चालला, पण त्यानंतर नव्या कथानकाचे चित्रपट काढायला त्यांनी सुरवात केली, मात्र दोन चित्रपट त्यांनी मराठीतून हिंदीत केले. ते डब केले होते, त्यामुळे त्याला रिमेक म्हणता येणार नाही. त्यामध्ये ‘माझा छकुला’ हा चित्रपट ‘मासूम’ म्हणून हिंदीत काढला होता, तर ‘झपाटलेला’ हा तुफान गाजलेला महेश कोठारेपट ‘खिलौना बन गया खलनायक’ या नावाने काढला, पण रिमेकला प्रतिसाद चांगला मिळाला होता.


दादा कोंडके यांनी हिंदीत चित्रपट काढायचा विचार केला तेव्हा त्यांनी आपल्याच मराठी चित्रपट ‘राम राम गंगाराम’ची रिमेक केली होती. नायक दादा, नायिका उषा चव्हाणला घेऊन ‘तेरे मेरे बीच में’ हा ‘राम राम गंगाराम’चा रिमेक बनवला. मराठीतील द्वयर्थी विनोदांची मजा हिंदीत येत नाही हे दादांना समजले होते. तरी विनोदाचा अस्सलपणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्यांनी ‘मला घेऊन चला’ या चित्रपटाचाही त्यानंतर ‘आगे की सोच’ नावाने रिमेक केला होता.

१९७० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड असा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’. या चित्रपटाचा व्ही. शांताराम यांनीच हिंदीत ‘पिंजडा’ नावाचा चित्रपट केला होता. श्रीराम लागू, संध्या ही प्रमुख भूमिका असलेली पात्रं असली तरी अस्सल बिहारी ग्रामीण भागात जाऊन त्याचे चित्रीकरण करून माधोपूरचे वातावरण तयार केले होते. नीळू फुलेंच्या जागी या चित्रपटात राजा गोसावींना हिंदीत संधी मिळाली होती. मराठी ‘पिंजरा’चे यश हिंदी ‘पिंजरा’ला मिळाले नाही, पण चांगल्या प्रकारे रिमेक केला होता.


१९७० च्या दशकातील उत्तरार्धात आलेल्या ‘सासुरवाशिण’ या मराठी चित्रपटाचा हिंदीत ‘सौ दिन सास के’ नावाने रिमेक झाला होता. मराठीत या चित्रपटात ललिता पवार, निळू फुले, आशा काळे, रंजना, कृष्णकांत दळवी, यशवंत दत्त, अशोक सराफ असे कलाकार होते. ललिता पवार आणि निळू फुले यांच्या खल प्रवृत्तीभोवती फिरणारा हा चित्रपट असल्याने यात रंजनाला थोडा वाव होता. मराठीत हा चित्रपट फत्तेलाल यांनी काढला होता. त्याचा रिमेक हिंदीत बनवताना चंदन सदनाह यांनी ललिता पवार आणि निळू फुले यांना त्याच भूमिका दिल्या होत्या. आशा काळेची भूमिका आशा पारेखने केली होती, तर रंजनाची भूमिका रिना रॉयने केली होती. अन्य भूमिकांत अशोक कुमार, राज बब्बर आदी कलाकार होते. हा चित्रपट मराठी आणि हिंदीतही तुफान गाजला होता.

कथानकं चांगली असतील आणि त्याचा आपल्या भाषेत चपखल प्रयोग केला, तर चांगली रिमेक यशस्वी होते हे चित्रपटसृष्टीने दाखवून दिले आहे. चित्रपटसृष्टीत असे असंख्य चित्रपट या ना त्या चित्रपटावरून बनत असतात. ‘रोझा’, ‘बॉम्बे’सारखे कितीतरी दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत बनले आहेत. ते सातत्याने बनत राहणार. कारण रिमेक म्हणजे पुन: प्रत्ययाचा आनंद असतो.