समर्थ रामदास स्वामींनी श्रीदासबोधातील दशक ८, समास ६ हा दुश्चित्तनिरुपण या नावाने सांगितला आहे. श्रोता-वक्ता संवादाच्या माध्यमातून अध्यात्म श्रवणातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे दुश्चित्तपणा. हे उलगडून दाखवणारा अत्यंत रोखठोक आणि परखड असा हा समास आहे.
या समासात प्रारंभी श्रोत्याचा पहिला प्रश्न सरळ येतो. तो विचारतो सत्संगाची महिमा कैसी? किती दिवसांनी मोक्ष लाभतो? त्यावर समर्थांचे उत्तर तत्काळ आणि अटींवर आधारित आहे. समर्थ सांगतात मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्वासतां निरुपणीं । दुश्चितपणीं हानी । होतसे ॥ ३ ॥ येथून समासाचा केंद्रबिंदू बदलतो. मोक्षाचा कालावधी किती, यापेक्षा श्रोत्याची अंत:स्थिती काय आहे, यावर समर्थ लक्ष केंद्रित करतात.
या समासाची रचना चार टप्प्यांत उभी राहते. अवधानाची समस्या आणि उपाय (ओव्या १-६). एकाग्रता तुटल्यावर मन पुन्हा वळवण्याची कृती. विषयाकडील ओढ तोडणे, अर्थ-प्रमेय शोधणे आणि पुन्हा श्रवण करणे. इथे समर्थ पाषाणाचे तिखट रुपक (ओव्या ७-१८) दाखवतात. अर्थ न समजता केवळ शरीर हजर ठेवून बसणाºयाला समर्थ मनुष्यवेषातील पाषाण म्हणतात; उलट मूळ पाषाण (माणिक, परिस, मंदिर-मूर्तींचे दगड) किती गुणवान ठरतो, हे दाखवून देतात.
यानंतर पुढे दुश्चित्तपणाचे परिणाम आणि आळस-निद्रेचे दुष्टचक्र (ओव्या १९-४०) यावर समर्थ भाष्य करतात. यामध्ये कार्यनाश, चिंता, विस्मरण, विवेकलोप आणि शेवटी आळस, निद्राविलास, आयुष्यनाश ही साखळी मांडतात. यामध्ये मूळ प्रश्नाचे उत्तर व कठोर शब्दांमागचा हेतू (ओव्या ४१-५४) स्पष्ट करतात. प्रज्ञा, विश्वास आणि अनन्यभाव असल्यास तत्क्षणी मोक्ष कसा शक्य आहे, आणि शेवटी न्यायनिष्ठुर बोलण्यामागची करुणा स्पष्ट करतात.
या समासातील महत्त्वाचे रुपक व तात्त्विक बारकावे म्हणजे पाषाण आणि मनुष्यवेषातील पाषाण. ओवी ७ ते १८ मधील उलटपालट लक्षणीय आहे. सामान्यत: दगड जड व निर्जीव मानला जातो; पण समर्थ दाखवतात की, दगडाला आकार दिला तर तो टिकतो; मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा चिकटते (सांगतां अवगुण गेला। पुन्हा मागुतां जडला॥). माणिक, मोती, पोवळे, परिस, सूर्यकांत-सोमकांत (औषधी मणी) आणि देवळातील मूर्ती-घाट-वापी उभारणारे दगड हे सर्व पाषाणच आहेत. ज्याच्या देहातून सत्कर्म किंवा आत्महित घडत नाही, असा दुश्चित देह त्याहूनही निष्प्रयोज्य ठरतो.
दुसरे म्हणजे दुश्चित्तपणाची साखळी ते सांगतात. चित्तविचलन ते आयुष्य क्षय याबाबत समर्थ केवळ आध्यात्मिक नुकसान सांगून थांबत नाहीत; तर ते व्यवहार आणि मानसशास्त्र दोन्हीला स्पर्श करतात. याचे बाह्य परिणाम काय ते सांगतात. समर्थ म्हणतात, कार्य नासते, चिंता वाढते, स्मरण राहत नाही, शत्रू जिंकतो (दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे).
याचा आंतरिक परिणाम काय तर. श्रवण, विवरण, साधन, भजन आणि निश्चय हे सगळे कोलमडते. यातील पुढील पायरी म्हणजे दुश्चित्तपणातून सुटला तरी त्याला आळस घेरतो, आळसातून निद्राविलास वाढतो आणि अंतिमत: आयुष्याचाच क्षय होतो.
पुढचा विचार तत्क्षणी मोक्ष आणि प्रज्ञा-विश्वासाचे समीकरण. ओवी ४३ ते ४९ मध्ये समर्थांनी परिसाचे, सागरातील थेंबाचे आणि गंगेतील सरितेचे रुपक वापरून तत्क्षणी होणाºया स्थित्यंतराची खूण सांगितली आहे. पण ही खूण कोणासाठी? प्रज्ञा नसेल तर अर्थ कळत नाही. विश्वास नसेल तर वस्तुप्राप्ती होत नाही. प्रज्ञा + विश्वास + अनन्यभाव एकत्र आले की देहाभिमान गळे आणि साधनाचे सायास न लागता विवेकदृष्टी जागृत होते. जे अनन्य-प्रज्ञावंत नाहीत, त्यांच्यासाठी निरुपण आणि साधनाचा सातत्यपूर्ण मार्ग अनिवार्य राहतो.
इथे शेवटची ओवी (५४) महत्त्वाची आहे. गुरूच्या न्यायनिष्ठुरतेची कारणमीमांसा समासाच्या शेवटी समर्थ श्रोत्याला संभाव्य रागापासून सावध करतात. अवगुण त्यागावया कारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें। श्रोतीं कोप न धरणें। ऐसिया वचनाचा॥ ५४ ॥ येथे न्यायनिष्ठुर हा शब्द महत्त्वाचा आहे. पक्षपाती कठोरपणा नव्हे, तर सत्याच्या आणि हिताच्या न्यायाने केलेला कठोर प्रहार. श्रोत्याला दुखवण्यासाठी नव्हे, तर झोपेची आणि विस्मरणाची गुंगी फोडण्यासाठी हा आघात आहे.
आजच्या काळाशी आणि वाचन-संवादाशी नाते आहे. आज माहितीचा महापूर आणि सतत लक्ष विचलित करणारी माध्यमे असताना, दुश्चित होणे ही केवळ पारमार्थिक समस्या राहिलेली नाही; ती अवधान-संकटाची समस्या आहे. कोणताही ग्रंथ, संवाद किंवा विचार केवळ समोर असणे पुरेसे नाही तर अर्थ-प्रमेयाशी भिडणे, मनन करणे आणि त्यानुसार आचरणात बदल घडवणे, हेच खरे श्रवण ठरते.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment