समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध या ग्रंथातील दशक ८, समास ८ हा आत्मदर्शन या नावाने ओळखला जातो. आत्मदर्शन हा समास साधना आणि ज्ञान यांच्या सीमेवरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा स्पष्ट करतो. मागील समासांमध्ये परमात्मा तो तूच आहेस या तत्त्वाची मांडणी झाली; या समासात त्या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव (स्व-ओळख) कसा होतो, भक्तीची परिसीमा कोणती आणि देहातीत होण्याचा खरा अर्थ काय, याचे विवेचन आहे.
या समासाची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की, मी कोण? याचा शोधसमर्थ या समासाची सुरुवात परमात्म्याच्या स्वरूपाने करतात. जो अजन्मा, निर्गुण, निराकार, अनंत आणि सर्वव्यापक आहे. वेदांचे वर्णन तिकडे बोट दाखवते, पण परमात्म्याची अनुभूती भक्तीनेच होते. नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन हे सर्वात श्रेष्ठ आणि सारभूत मानले आहे. याचा अर्थ केवळ बाह्य कर्मकांड किंवा मस्तक अर्पण करणे नसून, आधी पाहावे मी कोण या प्रश्नापर्यंत पोहोचणे आहे. स्वत:चा देह, मन आणि अहंकार यांच्या पलीकडचे मूळ स्वरूप ओळखले की मी आणि देव हा फरक गळून पडतो.
या समासातील प्रमुख टप्पे आणि विचारसूत्रे महत्त्वाची आहे. पहिल्या टप्प्यात परमात्म्याचे लक्षण काय आहे ते समजून घ्यावे. जन्म-मृत्यू रहित, निर्गुण, निराकार, अतर्क्य परमात्मा बाह्य वस्तू नसून अद्वैत तत्त्व आहे हे लक्षात घ्यावे. त्यानंतर नवविधा भक्ती व आत्मनिवेदन याचा टप्पा समजून घ्यावा. नवविधा भक्तीत आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे. स्वत:ला ओळखणे हेच खरे समर्पण आहे. सायुज्यमुक्ती व ऐक्य इथे स्पष्ट होते. जसे की नदी सागरात मिसळते तसा देवाशी एकरूप होणे. म्हणजे द्वैत संपून अद्वैत अनुभूती येते. देहातीत अवस्था काय आहे हे ओळखावे. देह असतानाही देहबुद्धी नसणे, बाह्य प्रपंच चालू असतानाही आतील शांतता निजध्यास व अंतिम साक्षात्कार होणे. म्हणजे स्वप्नातून जागा झाल्यावर भास जाणे. अज्ञानाचा पडदा सरून स्वचीच भेट होते. या समासात परमात्म्याचे अद्वैत स्वरूप (ओव्या २-५) मध्य सांगितले आहे. म्हणजे, जन्म नाही मृत्यू नाही। येणे नाही जाणे नाही। बद्ध मोक्ष दोनी नाही। परमात्मयासी ॥ २॥...परमात्मा पाविजे भक्त। येथ संशय नाही॥ ५॥ म्हणजे सामान्य माणूस काळाच्या चौकटीत जगतो. जन्म, मृत्यू, येणे-जाणे, बंधन आणि सुटका या द्वंद्वात अडकलेला असतो. पण, परमात्मा काळाच्या व द्वंद्वाच्या पलीकडे आहे. तो निर्गुण, निराकार आणि अचल आहे. याचा सखोल अर्थ असा की, शास्त्र किंवा तर्क केवळ या सत्याची रूपरेषा सांगू शकतात; पण अनुभवाला येणे हे भक्तीशिवाय शक्य नाही. भक्ती म्हणजे केवळ बाह्य पूजा नव्हे, तर सत्याशी एकरूप होण्याची आंतरिक ओढ.
या समासात समर्थ रामदासस्वामींचे प्रमुख दृष्टांत इथे घडतो. या समासात गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान सोपे करण्यासाठी समर्थांनी अत्यंत प्रभावी दृष्टांत वापरले आहेत. नदी आणि सागर (ओवी २१). नदी एकदा सागराला मिळाली की तिला वेगळे निवडता येत नाही. तसेच, साधक भगवंताशी एकरूप झाल्यावर द्वैत उरत नाही. लोखंड आणि सोने (ओवी २१) याचे उदाहरण : परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले की, त्याचा मूळचा काळसरपणा परत येत नाही. त्याचप्रमाणे वाटेतील मुळी आणि सर्प (ओवी ४३) हा एक दाखला इथे आहे. अंधारात सर्पासारखी दिसणारी मुळी प्रकाश पडताच मुळी असल्याचे कळते; भीती आपोआप संपते. मृगजळ (ओवी ४५) हे पण उदाहरण इथे दिले आहे. दूरवरून पाणी वाटणारे मृगजळ जवळ गेल्यावर नसल्याचे कळते. भयानक स्वप्न आणि जागृती (ओवी ४६, ६९) याबाबतही या समासात समर्थ सांगतात. स्वप्नातील भीती जागृती आल्यावर खोटी ठरते; तसेच अज्ञान सरताच माणूस आपणासी आपण सापडतो.
इथे नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन (ओव्या ७, ८, १३) ते समजावतात. तया नवविधामध्ये सार। आत्मनिवेदन थोर। तयेचा करावा विचार। स्वानुभवे स्वये॥ ७॥... आत्मनिवेदनाचे लक्षण। आधी पाहावे मी कोण। मग परमात्मा निर्गुण। तो वोळखावा ॥ १३॥ म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण यांसारख्या नऊ भक्तीप्रकारांत आत्मनिवेदन हे सर्वोच्च मानले आहे. याचा अर्थ स्वत:ला देवाला अर्पण करणे योग्य पण ते अंधपणे नव्हे, तर स्वानुभवाने आणि विचारपूर्वक. याचा सखोल अर्थ असा की समर्थांचा मुख्य प्रश्न मी कोण? हा आहे. जोपर्यंत मी देह, मी पद, मी भूमिका या मर्यादेत अडकलो आहोत, तोपर्यंत देवाची ओळख पटत नाही. आधी स्वत:चे मूळ स्वरूप तपासणे आणि मग परमात्म्याशी त्याचे नाते जोडणे, हाच खरा आत्मनिवेदनाचा मार्ग आहे.
या समासात समर्थ देहातीत होण्याचा अर्थ सांगतात. पळून जाणे नव्हे, तर दृष्टी बदलणे हा या समासातील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. म्हणजे मोक्षासाठी देह संपण्याची किंवा कल्पांताची वाट पाहण्याची गरज नाही. माया असोनिच नाही। देह असताच विदेही। (ओवी ४०). सैन्य नष्ट झाल्यावर राज्य मिळवण्यापेक्षा, सैन्य असतानाच राज्य चालवणे अधिक शहाणपणाचे; तसेच संसाराचा त्याग करण्यापेक्षा संसारात राहून आसक्ती आणि देहबुद्धी सोडणे हे खरे आत्मदर्शन आहे.
थोडक्यात या समासाचा सार म्हणजे आत्मदर्शन. हा समास सांगतो की, सत्य बाहेर कुठेही लपलेले नाही. साधक जेव्हा स्वत:च्या अहंकाराचे आणि अज्ञानाचे पडदे बाजूला सारतो, तेव्हा त्याला बाहेरून काही मिळत नाही, तर अनेक दिवसांनी स्वत:ची स्वत:शीच भेट होते.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment