Thursday, November 19, 2026

दासबोध : दशक ८ : समास ९ : सिद्धलक्षण


समर्थ रामदास स्वामींच्या ‘श्रीदासबोध’ ग्रंथातील आठव्या दशकातील नववा समास हा ‘सिद्धलक्षण’ म्हणून ओळखला जातो. या समासाचा मुख्य विषय व पार्श्वभूमी म्हणजे या समासामध्ये श्रोत्याने संत किंवा ‘सिद्ध’ पुरुषाची बाह्य व आंतरिक लक्षणे कशी असतात, असा प्रश्न विचारला आहे. आत्मज्ञान झालेला पुरुष बाहेरून कसा वागतो आणि त्याची अंत:स्थ स्थिती कशी असते, याचे अतिशय सुंदर आणि तात्त्विक स्पष्टीकरण समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये केले आहे.


इथे प्रथम समर्थ सिद्धाचे स्वरूप आणि अंत:स्थ स्थिती (ओव्या १ ते १८)आत्मज्ञान आणि सिद्धता याबाबत सांगतात. समर्थ म्हणतात, ज्याने स्वस्वरूपाचा (आत्म्याचा) पूर्ण अनुभव घेतला आहे आणि जो त्या स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झाला आहे, त्यालाच खरा ‘सिद्ध’ असे म्हणतात. वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्येही स्वयंसिद्ध स्वरूपाशी एकरूप झालेल्या पुरुषालाच सिद्ध मानले आहे (ओवी ३-५).

याची बाह्य वागणूक व आंतरस्थिती कशी आहे? तर सिद्ध पुरुष जरी बाह्य जगात इतर सामान्य माणसांसारखाच कर्म करताना किंवा वावरताना दिसला (जशी स्वप्नातील रचना भासते), तरी त्याची आंतरस्थिती पूर्णपणे अचल आणि स्थिर असते (ओवी ७, १५). त्याचे स्वरूपानुसंधान कसे असते तर निरंतर स्वस्वरूपाचे अनुसंधान ठेवणे हेच साधूचे मुख्य लक्षण आहे. तो जगात राहूनही जगापासून निराळा (अनासक्त) असतो. त्याचे बाह्य आचरण उत्तम साधकासारखे असले, तरी अंतर्यामी तो पूर्णपणे स्वरूपाकार झालेला असतो (ओवी ९, १२).


यानंतर या समासात समर्थ सिद्धांचे सद्गुण आणि मानसिक स्थिती (ओव्या १९ ते ४५) याबाबत सांगतात. समर्थ रामदास स्वामींनी सिद्धाच्या लक्षणांचे वर्णन करताना त्यांच्या अंगी असणाºया सहज गुणांचा उल्लेख केला आहे. तो निष्काम व क्रोधरहित असतो. सिद्ध पुरुष सर्व नाशिवंत पदार्थांचा मनाने त्याग करतो. त्याचे स्वस्वरूप हाच अक्षय ठेवा असल्याने त्याच्या मनात कोणतीही कामना उरत नाही. जिथे द्वैतच उरलेले नाही, तिथे कोणावर क्रोध किंवा मत्सर करावा, असा प्रश्नच निर्माण होत नाही (ओवी २४-३०). तो नि:प्रपंच व निर्लोभ अशा अवस्थेत असतो. ज्याने पाच भौतिक पसाºयाला आणि दृष्य जगाला मिथ्या जाणले आहे, त्याला प्रपंचाचा मोह किंवा कशाचाही लोभ उरत नाही. अवघे ब्रह्मांड हेच त्याचे घर बनलेले असते (ओवी ३२-३४). सिद्ध हा शोकरहित, मोहातीत व निर्भय असतो. नाशवंत गोष्टींचे बंधन सुटल्यामुळे आणि शाश्वत परब्रह्माशी ऐक्य झाल्यामुळे तो शोक, मोह आणि सर्व प्रकारच्या भयापासून पूर्णपणे मुक्त (अभय) असतो (ओवी ३६-४१).

सिद्धाच्या ठायी अखंड समता असते. देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे त्याच्या मनात कोणताही खेद उरत नाही. तो स्वत:ला सर्वत्र एकरूप पाहतो, त्यामुळे द्वैत किंवा भेदभावाला त्याच्या जगात स्थान नसते (ओवी ४२-४५). त्यामुळेच अनासक्ती, निर्मळता आणि आचरण (ओव्या ४६ ते ५५) त्याला जमते. उदासीनता आणि मृदू स्वभाव त्याच्यामध्ये असतो. परमार्थाची गोडी लागल्यामुळे त्याच्या मनातील स्वार्थी दुराशा नष्ट झालेली असते. आकाशाप्रमाणे त्याचा स्वभाव अत्यंत मृदू व कोमल असतो, तो कधीही कठोर वचन बोलत नाही (ओवी ४६-४७). त्याने मानापमान आणि उपाधींचा त्याग केलेला असतो. सिद्ध पुरुष नेहमी नि:संग राहतो; त्यामुळे मान किंवा अपमान या दोन्ही गोष्टींचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. सर्व प्रकारच्या उपाधींपासून तो मुक्त असतो (ओवी ५०-५१).


सिद्धाला स्वधर्म आणि निर्मळता समजते. मायारूपी मळ त्याच्या आत्म्याला कधीही मलीन करू शकत नाही. निरंतर स्वत:च्या मूळ स्वरूपात (आत्मस्वरूपात) राहणे हाच त्याचा मुख्य स्वधर्म असतो (ओवी ५३-५४). त्याची साधना आणि उपसंहार (ओव्या ५६ ते ६०) काय तर तो सत्संगतीचे महत्त्व जाणतो. संतसंगती धरल्याने आणि त्यांच्या मुखातून अमृत (अध्यात्मनिरुपण) ऐकल्याने आपोआप स्वरूपस्थिती बाणते. जो निरंतर स्वरूपात रममाण होतो, त्याचे सर्व अवगुण नष्ट होतात आणि तो ब्रह्मरूप बनतो (ओवी ५५-५८).

शेवटी समर्थ रामदास स्वामी श्रोत्यांना सावध करतात की, सर्व सृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव सारखा नसतो; त्यामुळे वेगवेगळ्या स्थितींमधील लोकांचे अनुभव कसे असतात, हे आपण पुढील समासात समजून घेऊया (ओवी ५९-६०). या समासातून समर्थ आपल्याला हे शिकवतात की, खरा साधू किंवा सिद्ध पुरुष हा वेषाने नाही, तर आपल्या आंतर्बाह्य स्थिरतेने, निरहंकारी वृत्तीने, निर्लोभ स्वभावाने आणि अखंड स्वरूपानुसंधानाने ओळखला जातो. बाह्य जगत कसेही असो, ज्याची बुद्धी आणि वृत्ती परब्रह्मात स्थिरावली आहे, तोच जीवनमुक्त आहे.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: