समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातील मूर्खलक्षणनाम दशक दोनमधील सहाव्या समासात तमोगुण लक्षणांचे वर्णन केलेले आहे. मागच्या समासात रजोगुण प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा प्रगट होतो हे दाखवून त्याची लक्षणे सांगितली. आता तमोगुण सांगतो तो ऐका असे समर्थ म्हणतात. संसारात दु:ख भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे मनात जो उद्वेग उत्पन्न होतो किंवा परमावधीचा क्रोध आला म्हणजे तो तमोगुण होय. अंगात एकदा का क्रोध भरला म्हणजे मग तो आई, बाप कोणी ओळखत नाही. भाऊ, बहीण, बायको यांना बडवितो तो तमोगुण. रागाच्या भरात दुसºयाचा प्राण घ्यावा किंवा आपण आपला प्राण घ्यावा असे वाटते, आपल्या जीवाचा विचार विसरतो, तो तमोगुण होय. क्रोधाचे वारे अंगात शिरून एकदा का तो बेफाम झाला की, मग तो एखाद्या पिशाच्च्यासारखा वागतो, कितीही उपाय केले तरी तो आवरत नाही, तो तमोगुण होय.
समर्थ पुढे सांगतात की, तमोगुणी माणसाला संघर्षाची भारी आवड असते, आपण आपल्याच शस्त्र चालवून जखम करतो किंवा दुसºयावर शस्त्र चालवून त्याचा घात करतो, असा प्रसंग येतो तेव्हा तो तमोगुण होय. डोळ्यांनी प्रत्यक्ष लढाई बघावी, युद्ध चालू असताना रणांगणावर जावे, असे मनापासून वाटते, तो तमोगुण असतो. ज्याच्या मनात नेहमी गोंधळ, घोटाळा व संशय असतो, ज्याचा निश्चय सारखा बदलतो, ज्याला झोप अतिशय आवडते, तो तमोगुण असतो. ज्याची भूक अतिशय मोठी असते, भूकेपुढे ज्याला कडू गोड समजत नाही, जो फार मूर्ख असतो तो तमोगुण होय. अत्यंत प्रेमाचे आपले माणूस मरून गेले तर त्याच्यासाठी जो जीव देतो किंवा जो स्वेच्छेने आत्महत्या करतो, तो तमोगुण असतो. किडे, मुंग्या व जनावरे यांना ठार मारण्याची आवड असणे, तसेच अत्यंत निर्दय असणे तो तमोगुण आहे. स्रिया व मुले यांचा वध करणे, पैशांसाठी हत्या करणे, गायी ठार मारण्याची आवड असणे, तो तमोगुण असतो.
समर्थ म्हणतात की, तमोगुणी माणसाला विषसेवनाची व मारामारीची आवड असते. द्वेषाने दुसºयाचा काटा काढणे, पापाचे भय नसणे ही व अशी तमोगुणाची चिन्हे आहेत. विष खाण्याचे व्यसन ज्याला आहे, अशा माणसाच्या आग्रहाने ज्याला विषसेवन करावेसे वाटते, परंतु दुसºयाला मारून टाकावे असे मनात येते, तो तमोगुण असतो. मनामध्ये दृष्टबुद्धी धरून जो दुसºयाचे कमालीचे नुकसान करतो, जो सदैव उन्मत आणि उर्मट असतो, तो तमोगुण आहे. कुठे तरी भांडणतंटा व्हावा असे ज्याला वाटते, धक्काबुक्की करावी अशी इच्छा ज्याला होते, ज्याच्या मनात द्वेष पेट घेतो, तो तमोगुण असतो. लढाई स्वत: पाहावी किंवा लढाईच्या गोष्टी ऐकाव्या किंवा स्वत: लढाई करावी, शत्रूला मारावे तरी नाहीतर स्वत: मरावे असे ज्याला वाटते, तो तमोगुण समजावा. जो भक्ती करतो त्याच्या मत्सराने भक्तीमध्ये विघ्ने घालून ती मोडावी असे वाटणे, देवालये पाडावी असे वाटणे, चांगली फळे धरणारी झाडे तोडावी असे वाटणे तो तमोगुण आहे. ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत, नाना तºहेचे दोष मात्र आवडतात, ज्याच्या मनात पापाचे भय नसते, तो तमोगुण समजावा.
या समासात समर्थ पुढे सांगतात की, लोकांना पीडा देणे, निर्दयपणे वागणे, भ्रष्टाचार करणे या गोष्टी तमोगुणी माणसाला सहज असतात. दिलेली वतने, वर्पासने, निर्वाहाची साधने जो नष्ट करतो, प्राणीमात्रांना उगीच दु:ख देतो, ज्याला मुद्दाम मोठ्या चुका करण्याची आवड असते, तो तमोगुण असतो. जो आगी लावतो, शस्त्रांनी मारतो, पिशाच्चबाधा करून देतो, विष खायला घालतो आणि मत्सराने जीव घेतो तो तमोगुण समजावा. दुसºयाच्या दु:खाने जो आनंदी होतो, निर्दयपणे वागण्याची ज्याला हौस आहे, जो प्रपंचाला त्रासत नाही तो तमोगुण असतो. लोकात भांडण लावून द्यावे आणि आपण त्याची मजा पाहावी अशी दुष्टबुद्धी ज्याच्या अंतर्यामी असते तो तमोगुण आहे. पुष्कळ पैसा मिळून श्रीमंती आल्यावर सुद्धा जो जीवाला उगीच कष्ट देतो, ज्याला दुसºयाबद्दल दया येत नाही, ती व्यक्ती तमोगुणी असते. ज्याला भक्ती, भाव, तीर्थ व देव मुळीच आवडत नाही, वेद, शास्त्र, वगैरे काही ज्याला मुळीच नको, तो तमोगुण असतो. स्नानसंध्या वगैरे काहीही नेम ज्याला नसतो, आचारधर्म न पाळल्याने जो केवळ भ्रष्ट दिसतो, इतकेच नव्हे तर जे करायला नको तेच जो करतो तो तमोगुण समजावा.
वडील बंधू, आई, बाप यांचे बोलणे ज्याला सहन होत नाही, त्यांच्या बोलण्याने एकदम संतापून जो घरातून निघून जातो तो तमोगुण आहे. काही काम न करिता खावे, आळशीपणाने असावे, उगीच एके ठिकाणी बसून राहावे, असे ज्याला वाटते आणि ज्याला कशाचेच स्मरण नाही तो तमोगुण समजावा.
तमोगुणी लोक जेव्हा देवाचे काही करतात, तेव्हा ते किती अघोरीपणाने ते करतात यांचे वर्णनही समर्थ येथे करतात. जारण मरण उच्चाटन या चेटकीविद्येचा अभ्यास करावासा वाटतो, शस्त्रविद्या शिकण्याची हौस असते, मल्लविद्या याविशी वाटते तो तमोगुण होय. मानेला गळ अडकवून लोंबकळण्याचा नवस करणे, धगधगीत आगीतून चालण्याचे कष्ट सोसणे, लाकडी यंत्राने त्रिशुलाने जीभ टोचून घेणे हे प्रकार तमोगुण आहेत. डोक्यावर खापर ठेवून त्यात निखारे जाळावे, पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके द्यावे किंवा आपण स्वत: शरीराला शस्त्र टोचून ठेवावे असे वाटणे तो तमोगुण आहे. आपले डोके कापून ते देवाला वाहावे किंवा एखादे अंग, अवयव तोडून देवाला अर्पण करावा किंवा आपणहून आपला कडेलोट करून घ्यावा असे वाटणे तमोगुणाचे लक्षण आहे. हट्टाने देवापुढे धरणे धरणे, देहाला टांगून घेणे, देवाच्या दारात जीव देणे हे सर्व तमोगुण आहेत. जो फळे खाऊन किंवा पाणी पिऊन राहतो किंवा कडकडीत उपवास करतो, पंचाग्नीसाधन करतो म्हणजे आपण मध्ये बसून चार बाजूस पेटलेली अग्नीची कुंडे आणि डोक्यावर तळपणारा सूर्य अशा पाच अग्नीमध्ये बसून जप करतो, धूम्रपान साधन करतो म्हणजे आपण स्वत:ला उलटे टांगून घेतो व खाली जमिनीवर पेटविलेल्या अग्नीचा धूर नाकातोंडात ओढतो किंवा जो स्वत:ला पुरून घेतो तो तमोगुण आहे. मनात एखाद्या वस्तूची वासना ठेवून अनुष्ठान करणे, उगीच नुसता प्राणायाम करणे किंवा अहोरात्र जमिनीवर पडून राहणे हे सर्व तमोगुण आहेत.
त्याचप्रमाणे नखे व केस वाढवायचे हात कायमचा वर करून ठेवायचा, बोलणे कायमचे बंद करायचे हे सर्व तमोगुण आहेत. नाना प्रकारच्या क्रियांनी देहाला पीडा देणे, पण देहाला दु:ख झाले की, मनात चरफडणे, रागाने देवाला फोडून टाकणे हे सर्व तमोगुण आहेत. जो माणूस देवाची निंदा करतो तो वासनेत अडकलेला भयंकर माणूस असतो. जो संतसंग धरीत नाही तो तमोगुण होय. तमोगुण हा असा आहे. तो असाधारण म्हणजे विलक्षण आहे. तो सोडून द्यावा यासाठी थोडक्यात त्याचे विवेचन केले आहे. तमोगुण प्रत्यक्ष वर्तनात कसा आढळतो हे आतापर्यंत सांगितले. तो अधोगतीला नेण्यास कारण होतो. तमोगुणापाशी मोक्षप्राप्ती करून देण्याचे लक्षण नाही. माणूस जी कर्मे करतो त्यांचे संपूर्ण फळ आज ना उद्या त्याला मिळते. राजोगुण आणि तमोगुण प्रपंचात गुंतवून ठेवतो, सर्व दु:खाचे मूळ जो जन्म तो रजतमांनी तुटत नाही. जन्म येणे थांबवण्यासाठी सत्त्वगुण अवश्य आहे. त्यांचे वर्णन पुढील समासात केले आहे.
- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment