Friday, September 11, 2026

दशक दुसरा : समास सातवा : सत्त्वगुण लक्षण(२)



दासबोधातील दुसºया दशकातील सातवा समास थोडा मोठा असल्याने त्याचे विवेचन आपण दोन भागात केले आहे. मूर्खलक्षणनाम या दुसºया दशकातील सातव्या समसात सत्त्वगुणाची लक्षणे सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, ज्याचा देहाचा अभिमान क्षीण होऊ लागतो, दृश्याबद्दलचे वैराग्य जोराने वाढू लागते, मायेचा पसारा भ्रमात्मक आहे असे कळू लागते तो सत्त्वगुण समजावा. संसारामध्ये गुंतून राहण्यात काही अर्थ नाही, त्यातून मोकळे होण्याचा काही तरी उपाय करायला पाहिजे, असा आत्मानात्मविवेक ज्याच्या अंतर्यामी उत्पन्न होतो तो सत्त्वगुण असतो. संसाराच्या कटकटींनी ज्याचे मन त्रासते आणि त्यामुळे काही तरी उपासना करावी असा परमार्थ विचार मनात उत्पन्न होतो तो सत्त्वगुण समजावा. ब्रह्मचारी असो किंवा गृहस्थ असो, ज्या आश्रमात तो असतो त्यात अति आदराने नित्यनेमाचे पालन करतो, परंतु सदैव त्याचे मन भगवंतांच्या प्रेमामध्ये गुंतलेले राहते तो सत्त्वगुण असतो.


समर्थ म्हणतात, ज्याला भगवंतांवाचून इतर सर्व गोष्टींचा वीट येतो, जो परमार्थ अत्यंत जवळ करतो, आपलासा करतो आणि संकट आले असता त्यास शांतपणे तोड देण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तो सत्त्वगुण होय. जो सदासर्वकाळ अनासक्त असतो म्हणजे कशात गुंतलेला नसतो, नाना प्रकारच्या देहसुखांना ज्याचे मन विटलेले किंवा कंटाळलेले असते, ज्याला सारखी, पुन:पुन्हा भगवंतांची आठवण होते तो सत्त्वगुण होय. कोणत्याही दृश्य वस्तूवर ज्याचे मन अडकत नाही. मनामध्ये भगवंतांचे स्मरण सतत चाललेले असते, अशी ज्याची पक्की निश्चल निष्ठा असते तो सत्त्वगुण होय. भगवंतांवरील त्याचे प्रेम पाहून लोक म्हणतात हा वेडा आहे, याचे डोके बिघडले आहे, तरीपण त्याचे प्रेम अधिकच वाढत जाते. त्याच्या मनाचा पूर्ण निश्चय होतो तो सत्त्वगुण होय.

सत्त्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते. शांती, क्षमा व दया हे दिव्य सद्गुण अंत:करणात स्थिर होतात. वासना शांत होते, रसना ताब्यात येते. तात्पर्य, स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी हाती येते. अंतर्यामी स्फूर्ती जागी होते, आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धी भरून जाते, वाईट संशय आपोआप नाहीसे होतात तो सत्त्वगुण होय. या शरीराचा उत्तम उपयोग करावा अशी ओढ अंत:करणात उत्पन्न होते. सत्त्वगुणाचे कार्य हे असे आहे.


ज्याच्या वागण्यामध्ये शांती, क्षमा आणि दया दिसू लागतात, भगवंतांच्या भक्तीचा निश्चय ज्याच्या मनात उत्पन्न होतो, त्याच्या अंतर्यामी सत्त्वगुण उदय पावला असे समजावे. अतिथी किंवा अभ्यागत घरी आले असता काहीतरी खाऊ घातल्याशिवाय त्यांना जो जाऊ देत नाही, त्यांना यथाशक्ती दान देतो तो सत्त्वगुण होय. बैरागी, गोसावी किंवा कोणी दु:खी दरिद्री माणूस आस‍ºयासाठी आला तर गृहस्थाश्रमाचे कर्तव्य म्हणून जो त्यांना आश्रय देतो तो सत्त्वगुण समजावा. आपल्या घरात पोटभर खायला नसूनसुद्धा जो कोणी येईल त्याला काही खायला दिल्यावाचून जो जाऊ देत नाही, आपल्या शक्तीप्रमाणे जो नेहमी देत राहतो तो सत्त्वगुण होय. ज्याने आपली जीभ जिंकली आहे, ज्याची वासना तृप्त झाली आहे, ज्याला कामना, इच्छा उरली नाही तो सत्त्वगुण होय. जे व्हायचे ते होतच जाते, या नियमानुसार प्रपंचामध्ये मोठे संकट आले असता ज्याचे मन डळमळत नाही, जो शांतचित्त राहतो तो सत्त्वगुण होय.

एका भगवंतांसाठी इतर सर्व सुखे जो सोडून देतो, इतकेच नव्हे तर देहाचे प्रेमसुद्धा जो सोडतो तो सत्त्वगुण होय. बाहेरच्या वस्तूंकडे वासना खेचीत असता ज्याचे मन डगमगत नाही किंवा ज्याचे मनोधैर्य चळत नाही तो सत्त्वगुण होय, शरीर दारिद्र्याने पिडले आहे, तहान-भुकेने व्याकूळ झाले आहे. अशा अवस्थेतसुद्धा भगवंतांच्या भक्तीचा ज्याचा निश्चय भक्कम राहतो तो सत्त्वगुण होय.


दु:ख गिळणे, निंदकावर उपकार करणे, इंद्रियदमन करणे, नामस्मरणी विश्वास असणे, संताला शरण जाणे, त्याची कृपा होणे, लोक शहाणे करणे, ग्रंथ जमविणे, दुसºयाचे दु:ख सहन न होणे, ही सत्त्वगुणाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. इथे समर्थ सांगतात, आपण अन्याय केला नसताना कोणी आपल्याला छळतात, अनेक प्रकारे दु:ख देतात. ते सगळे जो शांतपणे गिळतो, सहन करतो, तो सत्त्वगुण असतो. जो देहाने दुस‍ºयासाठी झीज सोसतो, दुर्जनाशी आपलेपणाने वागतो, निंदकावर उपकार करतो, तो सत्त्वगुण समजावा. मन ऐकत नाही, नको त्या गोष्टीच्या मागे धावतो तो विवेकाने जो आवरतो, इंद्रिये ताब्यात ठेवून वागतो तो सत्त्वगुण समजावा. ज्याला प्रात:स्नान आवडते, पुराण ऐकणे आवडते, ज्याला मंत्र म्हणून केलेली देवाची पूजा आवडते तो सत्त्वगुण असतो. ज्याला पर्वकाळाबद्दल मोठा आदर असतो, वसंतपूजेची फार आवड असते, आणि देवाच्या जन्मोत्सवाबद्दल अति प्रेम असते तो सत्त्वगुण होय. कोणी बेवारस परदेशी माणूस मेला तर जो त्याचा अग्निसंस्कार करतो किंवा त्या संस्काराला हजर राहतो तो सत्त्वगुण होय.

एक इसम दुस‍ºयाला मारहाण करीत असेल तर मध्ये पडून जो मारामारी थांबवितो, अडकलेल्या लोकांना सोडवितो तो सत्त्वगुण होय. लिंगार्चन करणे, लक्षावली(फुले, बेल आदी), अभिषेक करणे, नामस्मरणावर श्रद्धा असणे, काही करून देवदर्शनासाठी वेळ काढणे म्हणजे सत्त्वगुण. संत बघितल्याबरोबर चटदिशी त्याच्याजवळ जातो, त्याच्या दर्शनाने आनंदाने भारून जातो, आणि अगदी मनापासून त्याला नमस्कार करतो तो सत्त्वगुण. संताची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्त्वगुणामुळे त्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो.


समर्थ म्हणतात की, आता विस्ताराने सांगितलेले सत्त्वगुणाचे लक्षण आता पुरे. थोडक्यात सांगतो की, देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे, ज्याचे चित्त देवात आणि धर्मांत रमते, आणि इच्छा न ठेवता जो भगवंतांची भक्ती करतो तो सत्त्वगुण होय. सात्त्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्त्वगुण संसारसागरातून तारणारा आहे. त्याने ज्ञानमार्गातील आत्मनात्मविवेक उत्पन्न होतो. सत्त्वगुणाने भगवंतांची भक्ती घडते, सत्त्वगुणाने ज्ञानाची प्राप्ती होते, मनुष्य आत्मज्ञानी होतो. सत्त्वगुणानेच सायुज्यमुक्ती मिळते. अशी सत्त्वगुणाची अवस्था थोडक्यात माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितली. श्रोत्यांनी सावध व्हावे व पुढील समासाकडे लक्ष द्यावे, असे समासाच्या अखेरीस समर्थ सांगतात.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: