Saturday, September 12, 2026

दशक दुसरा : समास आठवा : सद्विद्या निरूपण


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील मूर्खलक्षणनाम या दुसºया दशकातील आठव्या समासात सदविद्या निरुपण केलेले आहे. समर्थ म्हणतात, सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणे ऐकायला गोड असतात. विवेकाने ती आपल्या अंगी येऊ शकतात. म्हणून आता सद्विद्येची लक्षणे ऐका. ती फारच शुद्ध आणि चांगली आहेत. जर त्या लक्षणांवर विचार केला तर सद्विद्या आपणहून जबरदस्तीने अंगी बाणते. जो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगी विशेष उत्तम लक्षणे असतात.त्याचे गुण ऐकत असताना मनाला फार संतोष वाटतो.


इथे समर्थ उत्तम पुरुषाचे सामान्य वर्णन करतात. सद्विद्येचा पुरुष अति निष्ठावंत असतो, सत्त्वगुणाने संपन्न असतो, प्रेमळ असतो, तो शांती-क्षमा-दयाशील असून अति नम्र असतो, कोणत्याही कार्यासाठी तो मनापासून झटतो आणि अगदी अमृताप्रमाणे गोड बोलतो.

त्यानंतर पुढील सात ओव्यांमध्यें श्रीसमर्थांनी लक्षणांच्या काही जोड्या सांगितल्या आहेत. एक लक्षण अंगी असेल तर दुसरे बहुधा अंगी आढळत नाही. त्यातील एक जोडी जरी कुणाच्या अंगी आली तरी तो थोरपण गाजवितो. मग ज्याच्या अंगी पुष्कळ जोड्या असतात त्याचे थोरपण काय सांगावे! फक्त महानुभाव पुरुषाच्या अंगीच अशा अनेक जोड्या आढळतात.


उत्तम पुरुष अति सुंदर आणि मोठा चतुर असतो, अति बलवान आणि मोठा शांत, सौम्य असतो, अति श्रीमंत असून अतिशय उदार असतो. तो महाज्ञानी असून उत्तम भक्त असतो, मोठा पंडित असून अति विरक्त असतो, मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो. मोठा वक्ता असून तो निलोभी असतो, सर्व जाणता असून दुसºयाला मोठ्या आदराने वागवितो. स्वत: श्रेष्ठ असून सर्वांशी अगदी लीन असतो. तो राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा असतो, मोठा शूर असून अति विवेकी असतो, अगदी तरुण असून अतिशय नियमांच्या बंधनात वागतो, वडिलांनी घालून दिलेल्या मार्गांनी तो चालतो, पण त्याचबरोबर कुलांत चालत आलेले आचार पाळतो, नियमित व योग्य प्रमाणात जेवण करतो. पण कोणत्याही विकाराला बळी पडत नाही, हटकून यश देणारा असून, हातावर यशाचे चिन्ह कमळ असून तो परोपकारी असतो. मोठा कार्य करणारा असून, तो तितकाच निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवंतांची भक्ती करतो व भक्त म्हणून नाव कमावतो, मोठे वैभव असूनही अत्यंत प्रेमाने व आस्थेने तो भगवंतांचे भजन करतो. मोठा तत्त्वज्ञानी असून तो अत्यंत अनासक्त असतो, मोठा विद्वान असून अति सज्जन असतो, राजाला सल्लामसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून तो अत्यंत सद्गुणी आणि तितकाच नीतिमान असतो.

समर्थ सांगतात, हा आदर्श पुरुष जितका अंतरी पवित्र असतो तितकाच सदाचारी आणि प्रसंग ओळखून वागणारा असतो. ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये निश्चित मत देण्याइतका तो बहुश्रुत असतो. कोणाचा व किती आदर राखावा, कोणाचा व कसा सन्मान करावा, हे तारतम्य तो बरोबर जाणतो. त्याचप्रमाणे कोठे कोणता प्रयोग करायचा, वेळप्रसंग कोणता आहेत हे त्याला बरोबर समजते. कारणांची व कार्याची चिन्हे म्हणजे लक्षणे त्याला माहीत असतात, तो मोठ्या हुशारीने बोलणारा असतो. तो सावधपणे वागतो, नेहमी उद्योगशील असतो, तो आपली साधकवृत्ती सोडीत नाही. तो वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करतो, तसेच आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव यांचा स्वानुभवाने निश्चयात्मक बोध तो करून देतो.


तो बोलतो कसा चालतो कसा, लोकांशी वागतो कसा, दिसतो कसा, याचे वर्णन करून मग तो साधन कसे करतो ते या ठिकाणी समर्थ सांगतात. तो कधी पुरश्चरणे करतो, कधी तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन राहतो, कधी कठीण व्रते करतो तर कधी देहाला कष्ट देतो. उपासना कशी करावी हे माहीत असल्याने उपासना चालू असताना इंद्रियांना ताब्यात ठेवून तो वागतो. त्याचे बोलणे सदैव सत्य असते, शुभ असते, मृदू असते, निश्चित असते, कायमचे असते व आल्हादकारक असते. त्याचा सर्व वासना तृप्त झालेल्या असतात, तो मोठा कोहोळ व गूढ अभ्यास करणारा योगी असतो. दिसायला तो भव्य व अतिशय प्रसन्न असतो. अंगी खरी विरक्ती असूनही तो अति सौम्य व सात्त्विक असतो. तसेच अत्यंत निष्कपट आणि निर्व्यसनी असून तो नेहमी पवित्र मार्गाने जीवन जगतो. कोणतेही काम तो चतुरपणे करतो, तो उत्तम संगीत जाणतो व त्याचा बरोबर रस घेतो, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो लोकांना सन्मार्गाला लावतो. सर्व प्राणीमात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी तो अत्यंत सरळपणे वागतो.

पैसा आणि बायका यांच्या बाबतीत त्याचे वर्तन अत्यंत पवित्र असते, त्याची सर्व वागणूक अगदी नीतीमर्यादेला धरून असते. जबरदस्त वक्तृत्वशक्ती अंगी असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो. तो स्वत: सर्व विषय जाणतो तरी दुस‍ºयाचे सांगणे मनापासून ऐकतो. तसेच हरिकथा व प्रवचन ऐकत असता प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे लक्ष असते. संभाषणामध्ये तो कधीही वितंडवाद करीत नाही. कोणतीही उपाधी तो आपल्या अंगी लागू देत नाही. त्यामुळे तो अलिप्तपणे राहतो. तो भलती आशा ठेवीत नाही. तो कधी क्रोधाच्या आधीन जात नाही, अत्यंत निर्दोष व मत्सरापासून मुक्त असतो.


त्याचे ज्ञान-अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुद्ध व निश्चित असते. समाधान प्राप्त झालेले असून तो भगवंतांचे भजनपूजन करतो, भक्तपणे वागतो आणि सिद्धावस्था साधल्यावरही साधकपणाने राहतो, साधनाचे रक्षण करतो.

संस्कृतमध्ये नामांना मंत आणि वंत असे प्रत्यय लागून सामान्यत: विशेषणे बनतात. जसे की, रूपवंत, गुणवंत, कीर्तिमंत, लक्ष्मीवंत इत्यादी. पुष्कळपणा, प्रशंसा, नित्यसंबंध, जवळ असणे, मध्ये असणे, असा अर्थ हे प्रत्यय दाखवितात. त्यानंतर पुढील पाच ओव्यांमध्ये आदर्श किंवा उत्तम पुरुषाच्या अंगी असणारी महत्त्वाची सर्व लक्षणे श्रीसमर्थांनी विशेषणरूपांनी मोठ्या चातुर्याने एके ठिकाणी गुंफिली आहेत. ती सांगताना त्यांची निर्मळ स्फूर्ती स्पष्टपणे दिसते हे तर खरेच परंतु त्याबरोबर त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्वही प्रत्ययास येते. समर्थ म्हणतात, साद्विद्येने संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत सुख व संतोष आहे असे त्याला पाहिल्यावर वाटते. तो आनंदमूर्ती असतो. अखंड प्रसन्न राहतो. आत्मरूपाने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो. आत्मवत सर्व भूतेषु असे त्याचे वागणे असते. तो भाग्यवंत व जयवंत असतो, रूपवंत व गुणवंत असतो. तो आचारवंत व क्रियावंत असून शिवाय विचारवंत असतो आणि अशी त्याची अवस्था असते. तो यशवंत व कीर्तिवंत असतो, शक्तिवंत व सामार्थ्यवंत असतो, वीर्यवंत किंवा पराक्रमी असतो व ज्याचा आशीर्वाद फळास येतो असा असतो. तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो.


हा समास संपविताना श्रीसमर्थ एक अति महत्त्वाची गोष्ट सांगतात ती ही की, जर कोणी प्रयत्न करील तर हे उत्तम गुण तो अंगी आणू शकेल. हाच त्याचा खरा प्रयत्नवाद! सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून, प्रयत्न करून अंगी आणता येत नाहीत. ते गुण सहज व उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाही. पण इतर उत्तम गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात. ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: