समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’तील दुसºया दशकातील सातव्या समासात सत्त्वगुणाची लक्षणे सांगितलेली आहेत. अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्त्वगुण परमार्थाचे सौंदर्य आहे असे समर्थ म्हणतात. भजनाला सत्त्वगुणाचा आधार लागतो, योग्यांना त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दु:खाचे मूळ असलेला संसार सत्त्वगुणच नाहीसा करतो. सत्त्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंतांच्या दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्यमुक्ती हाती येते. सत्त्वगुण भक्तांचा आधार आहे, त्याच्या भरवशावर भवसागर तरून जाता येतो आणि मोक्षरूपी लक्ष्मीचे तो ऐश्वर्य आहे, म्हणजे मुक्त पुरुषाच्या वागण्यात तो दिसतो.
तो परमार्थाचे सौंदर्य आहे, तो माहात्म्याचे भूषण आहे. म्हणजे सत्त्वगुणामुळे परमार्थ मन हरण करून नेतो, आकर्षण करतो आणि स्वानुभवी पुरुषाच्या वागण्याला त्याच्यामुळे शोभा येते. त्याच्यामुळे रज, तम या गुणांचे निरसन घडते. सत्त्वगुण अत्यंत सुख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव देऊन तो जन्ममृत्यूचे निवारण करतो.
समर्थ म्हणतात, सत्त्वगुण अज्ञानाचा नाश करतो, तो सर्व पुण्याचे मूळ स्थान आहे, म्हणजे सत्त्वगुणांतून सर्व पुण्य उदय पावते, सत्त्वगुणानेच परमार्थ मार्ग दिसू लागतो. ईश्वरावर प्रेम, विवेकी वृत्ती, परमार्थाची आवड, हरिकथेची गोडी ही सत्त्वगुणाची महत्त्वाची लक्षणे आहेत. इतर सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम असणे, चार लोकांप्रमाणे प्रपंच सांभाळणे, आणि हृदयात सदैव विवेक जागा ठेवणे म्हणजे सत्त्वगुण होय. जो संसारातील दु:खाचा विसर पाडतो, भक्तिमार्ग स्पष्टपणे दाखवितो आणि प्रत्यक्ष भजन करायला लावतो तो सत्त्वगुण असतो.
जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो, आत्मतत्त्वाची गोडी निर्माण करतो आणि परोपकार करण्याची उत्सुकता देतो तो सत्त्वगुण होय. जो पुण्यकर्मे सहज करतो. ज्याचे अंत:करण निर्मळ असते तसेच बाह्यांग म्हणजे शरीर व कपडे स्वच्छ असतात तो सत्त्वगुण होय. यजन म्हणजे स्वत: यज्ञ करणे, यजन म्हणजे दुसºयाकडून यज्ञ करविणे, अध्ययन म्हणजे स्वत: अभ्यास करणे. अध्यापन म्हणजे दुसºयास शिकविणे, दान करण्याचे पुण्यकर्म करणे, ही लक्षणे जेथे आहेत तो सत्त्वगुण समजावा. परमार्थ व तत्त्वज्ञान किंवा वेदांत ऐकण्याची आवड, भगवंतांच्या सगुण चरित्राची गोडी, आणि श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यात ताबडतोब बदल करण्याची शक्ती असणे तो सत्त्वगुण असतो.
सत्त्वगुणी माणूस नाना प्रकारची दाने करतो, व्रते करतो, मंदिरांना मदत करतो, इतकेच नव्हे तर स्वत: देवाच्या सेवेत झिजतो. घोडे, हत्ती, गाई, भूमी, अनेक प्रकारची रत्ने दान करतो तो सत्त्वगुण होय. धन, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करतो, तसेच जो ब्राह्मणांस भोजन घालतो तो सत्त्वगुण होय. कार्तिक व माघ महिन्यांतील स्नाने, व्रते, उद्यापने व अनेक दाने जो करतो, काही कामना न ठेवता जो तीर्थाटन व उपवास करतो तो सत्त्वगुण होय.
सहस्र भोजने, लक्ष भोजने, तशीच नाना प्रकारची दाने माणूस सत्त्वगुणामुळे अत्यंत निष्काम मनाने करतो, त्यात कामना असेल तर तो रजोगुण होय. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जो गरिबांना अग्रहारे म्हणजे इनाम जमीन अर्पण करतो, विहिरी व तळी बांधतो, देवळे व शिखरे बांधतो तो सत्त्वगुण होय. देवाच्या दारापाशी देवळाला लागून जो धर्मशाळा बांधतो, पायºया, दीपमाला, वृंदावने आणि पिंपळाचे पार बांधतो तो सत्त्वगुण होय. देवासाठी जो लहानमोठ्या बागा लावतो, बगीचे तयार करतो, पाण्याची सोय करतो, जो तपस्वी लोकांच्या मनास शांती देतो तो सत्त्वगुण होय.
जो संध्येचे मठ आणि भुयारे बांधतो, नदीकाठी पायºया बांधतो व देवाच्या दारी जो कोठारे बांधतो तो सत्त्वगुण होय. निरनिराळ्या देवांची जी स्थाने आहेत तेथे नंदादीप ठेवतो आणि देवाला दागिने, वस्त्रे, भूषणे अर्पण करतो तो सत्त्वगुण होय. तबला, मृदंग, टाळ, दमामे (मोठे नगारे) नगारे, ढोल, डफ इत्यादी गोड आवाजांची अनेक वाद्ये, आणि अनेक प्रकारची सुंदर सामग्री देवळाला अर्पण करतो व जो भगवंतांच्या भजनासाठी उत्सुक असतो तो सत्त्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, निशाणे, चवºया, अवदागिºया इत्यादी देवाला अर्पण करतो तो सत्त्वगुण होय. वृंदावने, तुळशीची वने म्हणजे मोठ्या बागा, रांगोळ्या, संमार्जने म्हणजे जागा झाडून सावरून स्वच्छ करावयाची साधने देवाला अर्पण करण्याची आवड तो सत्त्वगुण होय. नाना प्रकारची पूजेची भांडी, मंडप, चांदवे व आसने देवळाला अर्पण करणे तो सत्त्वगुण होय. देवाला खायला देतो व जो देवाला नाना प्रकारचे नैवेद्य करतो, दुर्मीळ व सुंदर अशी फळे जो देवाला अर्पण करतो तो सत्त्वगुण होय. अशा प्रकारची भक्तीची आवड ज्याला असते, देवांचे अगदी हलके काम सेवा म्हणून करणे ज्याला मनापासून गोड वाटते, जो स्वत: देऊळ झाडतो तो सत्त्वगुण होय.
मनुष्य उत्सवप्रिय असतो. एरवी नियमाने उपासना करणाºया भक्ताला उत्सवामध्ये भगवंतांचे विशेष प्रेम येते. अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, चांगले श्रवण घडते. संतांचा समागम होतो. म्हणून सत्त्वगुणी माणसाला उत्सवाची आवड असते :
पुण्यतिथी, पर्वणी व महोत्सव यामध्ये ज्याचा जीव गुंतलेला असतो, ते येण्याची जो वाट पाहतो आणि कायावाचामनाने जो आपले सगळे अर्पण करतो तो सत्त्वगुण होय. जो भगवंतांची कथा ऐकण्यास उत्सुक असतो, सुवासिक गंध, फुलांच्या माळा व बुक्का घेउन जो सारखा देवापुढे उभा असतो तो सत्त्वगुण होय. स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येक जण आपल्या अनुकूलतेप्रमाणे देवाला आवडणारे साहित्य घेऊन देवालयात उभा असतो तो सत्त्वगुण होय.
जो कधी कठोर शब्द बोलत नाही, जो अतिशय नियमाने वागतो, जो योग्यांना खूश करतो तो सत्त्वगुण होय. जो अभिमान सोडतो व अत्यंत निष्काम वृत्तीने कीर्तन करतो आणि कीर्तन करताना घाम, रोमांच, वगैरे सात्त्विक भाव ज्याच्या अंगावर उमटतात तो सत्त्वगुण होय. जो अंतर्यामी देवाचे ध्यान करतो आणि त्यामुळे ज्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात व त्या प्रेमामध्ये ज्याला स्वत:च्या देहाचे विस्मरण घडते तो सत्त्वगुण होय.
स्वत:चे विस्मरण होणे हीच साधना बरोबर चालण्याची खूण आहे. भगवंतांचे स्मरण अधिकाधिक स्थिर होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊ लागला की वैराग्याला जोर चढतो, भोगाचा वीट येतो आणि दृशांतून मन निवृत्त होते. ज्याला भगवंतांच्या सगुण चरित्राची फार गोडी असते, त्या प्रेमामध्ये कधीही बिघाड उत्पन्न होत नाही, आणि भगवंतांचे प्रेम आरंभापासून शेवटपर्यंत जास्त वाढतच जाते तो सत्त्वगुण होय. जो मुखाने भगवंतांचे नाम गातो, हाताने टाळ्या वाजवितो, नाचत नाचत भगवंतांची ब्रीदे म्हणतो आणि भक्तांची पायधूळ घेऊन आपल्या कपाळी लावतो तो सत्त्वगुण होय.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment