Sunday, September 13, 2026

दशक दुसरा : समास नववा : विरक्त लक्षण


दासबोधातील मूर्खलक्षणनाम दुसºया दशकातील नवव्या समासात समर्थ रामदास स्वामींनी विरक्तीच्या लक्षणांचा ऊहापोह केला आहे. माणसाच्या अंगी वैराग्य बाणले म्हणजे त्यास कोणकोणत्या गोष्टी साधतात त्याचे वर्णन ते करतात. समर्थ म्हणतात, विरक्तीच्या अंगी कोणते गुण असावेत ते सांगतो. त्या गुणांनी त्याच्या अंगी योग्याचे सामर्थ्य बाणते. या गुणानी कीर्ती सगळीकडे पसरते, आपल्या जन्माचे सार्थक होते, आणी विरक्ताचे वैभव वाढते. या गुणांनी परमार्थ साधतो, स्वानंद उचंबळून येतो, आणि आत्मानात्मविवेकासकट वैराग्याला दुप्पट तेज येते.


या गुणांनी आत्मसुख भरून वाहू लागते, सद्विद्या वास होते म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येतो, आणि मोक्षासह सर्व भाग्य व ऐश्वर्य जीवनात विलसू लागते. या गुणांनी मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, सा‍ºया इच्छा पुरतात, आणि अत्यंत गोड बोलण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती मुखात येऊन राहते. विरक्ताची ही लक्षणे ऐकावीत, मनात ती घट्ट धरून ठेवावीत. म्हणजे मग माणूस जगामध्ये प्रख्यात होतो.

समर्थांचा विरक्त स्वत: मोठा ब्रह्मज्ञानी, अत्यंत निष्काम, विलक्षण शांत आणि चतुर लोकसंग्रहकर्ता पुरुष आहे. मोठ्या धीराने तो आपले नेतेपण सांभाळतो, तो लोकांना अध्यात्म शिकवितो, त्यांच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण करतो, समाजातील उच्च, नीच, उत्तम, हीन, वगैरे सर्व कक्षेतील माणसांना जवळ करून तो त्यांना सन्मार्गाकडे वळवितो. तो सर्वांचे समाधान करतो. विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा, त्याने लोकांमध्ये अध्यात्म वाढवावे आणि इंद्रिये आवरून ताब्यात ठेवण्याविषयी त्याने मोठे धैर्य दाखवावे. त्याने आपले साधन चांगले सांभाळावे. त्याने लोक भजनास लावावे म्हणजे भगवंतांच्या मार्गास लावावे, पण त्याने विशेषत: ब्रह्मज्ञान प्रकट करावे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे असते हे स्वानुभवाने व शब्दाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे. त्याने लोकांमध्ये भक्तिमार्ग वाढवावा, शांती कशी असते हे त्याने शांती ठेवून दाखवावे, आपली विरक्ती त्याने मोठ्या प्रयत्नाने सांभाळावी. त्याने सत्कर्मांना महत्त्व देऊन त्यांची स्थापना करावी, त्याने विरक्तीचा, वैराग्याचा अनासक्तीचा प्रसार करावा, आणि स्वत: निर्वासनता, निष्कामता आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावी.


त्याने धर्मांचे महत्त्व वाढवावे, त्याचे पुनरुज्जीवन करावे, त्याने अत्यंत नीतिमान असावे, आणि अगदी मनापासून आपली क्षमाशील वृत्ती जपावी. त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज करावा, त्याने सदा चिंतनशील असावे, विचाराची कक्षा वाढवीत असावे, आणि सत्त्वगुण जवळ ठेवून नेहमी सन्मार्गाने जावे. त्याने श्रद्धावंतांना सांभाळावे, भगवंतांवर प्रेम करणा‍ºयांचा मनस्ताप शांत करावा, आणि भोळ्याभाबड्या पण शरण आलेल्या माणसांना दूर करू नये. त्याने अतिसावधपणे वागावे, त्याने दुसºयाचे अंतरंग ओळखून असावे, आणि त्याने नेहमी परमार्थाचा कैवार घ्यावा, परमार्थाची बाजू उचलून धरावी. त्याने नेहमी अभ्यास करावा, त्याने बहुश्रुत असावे, त्याने नेहमी उद्योगरत राहावे, आणि आपल्या वक्तृत्वाच्या बळाने बिघडलेला किंवा मंद झालेला परमार्थ पुन्हा प्रचलित करावा. त्याने शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान सांगत जावे, त्याने वैराग्याची स्तुती करीत जावी, आणि लोकांच्या शंकांचे निवारण करून त्यांना खात्रीने भरलेले समाधान द्यावे.

समर्थ सांगतात, विरक्ताने अध्यात्म वाढवावे व परमार्थ उजळावा असे सांगितले. भक्तिमार्गाचा प्रसार होण्यासाठी विरक्त कोणते उपाय करू शकतो त्याचे वर्णन आता ते इथे सांगतात. प्रचंड प्रमाणावर पर्वांचा उत्सव विरक्ताने करावा, भक्ताचे मोठे समुदाय एकत्र आणावे, आणि भजन, पूजन, जप, कीर्तन वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवाने साजरे करावे. पुष्कळ हरिकीर्तने करावी, प्रवचने आणि निरुपणे यांची तर नुसती गर्दी करून सोडावी, आणि अशा रीतीने जे निंदक, दुर्जन असतात त्यांना भक्तिमार्गाच्या ऐश्वर्याने लाजवून टाकावे. विरक्ताने खूप लोकांवर उपकार करावा, सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा, आणि आग्रहाने पुण्यमार्गाचा प्रसार करावा. अध्यात्माचा विस्तार करताना विरक्ताने स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवंतांचे भजन, नित्यनेम आणि पवित्रपणा या सर्व गोष्टींचा समावेश करावा. त्याबरोबरच अंत:करण शुद्ध असावे. विरक्ताने अति दृढ निश्चयाने वागावे, सर्वांना सुख लागेल अशा त‍ºहेने प्रपंच करावा, आणि केवळ आपल्या सहवासाने सर्व लोकांचे कल्याण करावे.


श्री समर्थांचा विरक्त पुरुष एकांतप्रिय असून मोठाच लोकसंग्रही असतो. विरक्ताने निर्भय व गंभीर असावे, उदार असावे आणि प्रवचनाच्या बाबतीत तर त्याने अत्यंत प्रामाणिक व वाहिलेले असावे. त्याने नेहमी सावध असावे, केव्हाही शुद्ध मार्गानेच जावे आणि अशा रीतीने लोकांकरिता झिजून आपले नाव मागे ठेवावे. विरक्ताने आपल्यासारखे विरक्त पुरुष शोधून काढावे, साधु पुरुष ओळखून काढावे, आणि संत, योगी व सज्जन यांच्याशी मित्रत्वाचा स्नेहसंबंध जोडावा. त्याने स्वत: पुरश्चरणे करावी, हिंडून तीर्थस्नाने पाहावी, आणि उपासनेला योग्य अशी निरनिराळी स्थाने सुंदर बनवून टाकावी. विरक्ताने लोकांची म्हणजे, परोपकाराची कामे आपल्या मागे लावून घ्यावी. परंतु आपली अलिप्तपणाची अंतरस्थिती कायम ठेवावी, मागे लावून घेतलेल्या कामांमध्ये आसक्त होऊन गुंतून जाऊ नये. तसेच कशाबद्दलही कोणतीही अपेक्षा त्याने आपल्या मनात ठेवू नये. विरक्ताने नेहमी अंतर्मुख वृत्तीने असावे, तरीपण त्याने आचरणाने पवित्र असावे, कोणाच्या तरी ताब्यात जाऊन त्याने कधीही मिंधेपण घेऊ नये.

समर्थ सांगतात, विरक्त खºया अर्थाने बहुश्रुत असावा. त्याच्या ज्ञानाला खोली असली पाहिजे हे तर खरेच, पण त्याचबरोबर त्यास लांबी व रुंदीही हवी असा श्री समर्थांचा दृष्टिकोन आहे. भगवंतांच्या सगुण चरित्राचे वर्णन, वेदांतसिद्धांताचे विवेचन, सगुण रूपाचे भजनपूजन, परमात्मस्वरूपाचे ज्ञान, शरीररचनेचे ज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व अध्यात्म अंगांचे ज्ञान विरक्ताला असावे. तसेच कर्ममार्ग म्हणजे काय, उपासनामार्ग कोणता, ज्ञानमार्ग कसा असतो, सिद्धांत मार्ग कशाला म्हणतात, प्रवृत्तीमार्ग व निवृत्तिमार्ग यांची लक्षणे कोणती या सगळ्या परमार्थ साधनांचे ज्ञान विरक्ताला असावे.


हे सांगून झाल्यावर सर्वसाधारणपणे आपल्या वागण्यात विरक्ताने कोणते धोरण सांभाळावे ते समर्थ इथे सांगतात. विरक्ताने जगमित्र असावे, त्याने संपूर्णपणे स्वतंत्र असावे, तो विचित्र व विलक्षण दिसेल इतके नाना त‍ºहेचे गुण त्याच्या अंगी असावे. विरक्ताने अगदी खरोखर वैराग्यसंपन्न असावे, तो भगवंतांचा भक्त असावा, कशातही आसक्ती न ठेवता त्याने सदैव मोकळे, बंधनरहित असावे. विरक्ताने शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करावा, परमार्थाला घटक असणारी, विरोध करणारी मते खोडून काढावी, आणि भगवंतांच्या प्राप्तीची इच्छा असणा‍ºया लोकांना शुद्ध साधनमार्गाला लावावे. शेवटी या महत्त्वाच्या समासाचा श्री समर्थ उपसंहार करतात. ते म्हणतात, अशी ही उत्तम लक्षणे आहेत. एकाग्र मन करून ती ऐकावीत. विरक्त पुरुषाने त्यांचा अव्हेर करू नये. ही उत्तम लक्षणे न स्वीकारता अवलक्षणाचा अंगीकार केला तर माणसाच्या जीवनाला काही ताळतंत्र राहत नाही, अशा माणसाच्या अंगी पढतमूर्खपणा येऊ पाहतो. पुढील समासांत त्या पढतमूर्खाच्या लक्षणाचे विवेचन आहे.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: