जेव्हा महात्मा गांधींनी १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली, तेव्हा अनेकांनी विचारले, मीठच का? ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी दुसरा, अधिक महत्त्वाचा मुद्दा नव्हता का? पण गांधीजींना माहीत होते की, कोणतेही जनआंदोलन घोषणाबाजी किंवा गर्दीने नव्हे, तर एका अशा प्रश्नाने सुरू होते, जो सामान्य माणसाला त्याच्या जीवनातील समस्या दाखवतो. मीठ ही श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक घरात लागणारी एक गरज होती आणि म्हणूनच मिठाचा कायदा हा केवळ एक कायदा नव्हता. तो अन्यायाचे प्रतीक बनला.
जेव्हा गांधीजी साबरमती आश्रमातून निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत मोजकेच लोक होते. पण जसजसे ते दांडीच्या दिशेने निघाले, तसतसे वाटेत अनेक लोक त्यांना येऊन मिळाले. काही जण त्यांचे भाषण ऐकायला आले, काही उत्सुकतेपोटी. तर काही जण आले कारण तेही या लढ्यात सहभागी होते. ते दांडीला पोहोचेपर्यंत, तो केवळ गांधीजींचा मोर्चा न राहता, संपूर्ण भारताचा मोर्चा बनला होता. हीच गांधीजींची सर्वात मोठी राजकीय ताकद होती. त्यांनी आधी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण केले, आणि नंतर त्या प्रश्नांना एका सामाजिक समस्येत रूपांतरित करून त्याला एक व्यापक स्वरूप दिले.
जवळजवळ एक शतकानंतर, भारताच्या नव्या पिढीकडे पाहताना, हीच भावना मनात येते. अलीकडील युवा चळवळीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतातील तरुण पिढी ही केवळ इंटरनेटवर आपली मते व्यक्त करणारी पिढी नाही. जेव्हा त्यांना एखाद्या विषयावर सार्वजनिकरीत्या आपली मते व्यक्त करण्याची गरज वाटते, तेव्हा ते लोकशाहीच्या चौकटीत राहून आपला आवाज उठवू शकतात. वर्षानुवर्षे असा समज दृढ केला गेला आहे की, आजची तरुण पिढी केवळ मोबाइल फोन, रील्स आणि मनोरंजनापुरतीच मर्यादित आहे. तथापि, हे एक अपूर्ण चित्र दर्शवते. जेव्हा हीच तरुण पिढी एखाद्या विषयावर शांतपणे एकत्र येते, आपली मते व्यक्त करते आणि लोकशाही मार्गाने संवाद साधते, तेव्हा ते त्या समजाला आव्हान देतात. ते हे उघड करतात की, तंत्रज्ञानाने त्यांची भाषा बदलली आहे, त्यांची संवेदनशीलता नाही.
ही एका नव्या गांधीवादी दृष्टिकोनाची सुरुवात आहे. हा गांधीवादी दृष्टिकोन खादी घालण्याचा किंवा चरखा फिरवण्याचा आग्रह धरत नाही. तो कोणत्याही व्यक्तीची पूजा करत नाही; उलट, तो त्या मूलभूत भावनेला स्वीकारतो, ज्यात संवाद आणि नैतिक धैर्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. आजच्या तरुणांच्या हातात चरखा फिरवण्याऐवजी मोबाइल फोन आहेत. गावोगावी फिरण्याची जागा इंटरनेटने घेतली आहे, पण याचा अर्थ असा नाही की, गांधीजी अप्रस्तुत झाले आहेत. जर तरुण पिढी हिंसेशिवाय आपली मते व्यक्त करत असेल, जर ते मतभेद व्यक्त करणे हा लोकशाही हक्क मानत असतील, जर ते व्यवस्थेकडून उत्तरांची मागणी करत असतील, पण ती मोडून काढण्याबद्दल बोलत नसतील, तर ते जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे गांधीजींचा वारसा पुढे नेत आहेत.
गांधीजींनी आंदोलनाची भाषाच बदलून टाकली. त्यांनी दाखवून दिले की, सर्वात शक्तिशाली शस्त्र बंदूक नसून नैतिक शक्ती आहे. जो नागरिक शांत राहूनही आपल्या हक्कांसाठी ठाम राहतो, त्यालाच सत्ता सर्वात जास्त घाबरते आणि हाच सत्याग्रहाचा आत्मा आहे. लोकशाही केवळ मतदानाने मजबूत होत नाही. ती तेव्हा मजबूत होते जेव्हा नागरिक प्रश्न विचारतात, सरकार प्रतिसाद देते, विरोधी पक्ष आपली मते मांडतो आणि समाज संवादासाठी खुला असतो. यापैकी कोणताही एक दुवा कमकुवत झाल्यास, लोकशाहीचा समतोल बिघडू लागतो. आज विरोधी पक्ष भरकटलेला असल्यामुळे युवाशक्तीला पुढे येऊन ती जागा भरून काढण्याची वेळ आली. विरोधी पक्षनेते नावाने गांधी आहेत, पण त्यांच्यात कोणतीही वैचारिक पात्रता नाही, संवाद साधायचा नाही, लोकशाही मार्गाचा अवलंब करायचा नाही हेच दुर्गुण दिसतात. सभागृहात चर्चा करायला अभ्यास लागतो, पण मिळालेले पद जर गांधी या नावाने मिळाले असेल तर अभ्यास काय करायचा ही प्रवृत्ती लोकशाहीचे एक चाक मोडून काढत आहे. त्यामुळे नवी शक्ती उदयास येताना दिसते आहे. केवळ संविधानाचे पुस्तक हातात धरले म्हणजे लोकशाही नाही तर ते संविधान वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, पण तेवढी पात्रता नसल्याने आज जेन झी नवा गांधीवाद घेऊन पुढे येत आहे.
नव्या पिढीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती प्रत्येक गोष्ट डोळे झाकून स्वीकारत नाही. गांधीजींनाही हेच हवे होते. त्यांना जागरूक नागरिक हवे होते आणि त्यांनी अशा भारताचे स्वप्न पाहिले होते, जिथे सरकार जनतेला घाबरत नाही, तर त्यांना उत्तरदायी असते. गांधीवाद म्हणजे केवळ धरणे नव्हेत. त्याचा अर्थ आहे सत्याप्रति प्रामाणिकपणा, विरोधकांबद्दलही आदर, सार्वजनिक जीवनातील प्रतिष्ठा आणि कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा तिरस्कार. जेव्हा हे घटक उपस्थित असतात, तेव्हाच एखाद्या चळवळीत गांधींचा आत्मा दिसू शकतो. आज राहुल गांधी जी भाषा वापरतात ती हिंसेची भाषा आहे. अराजक माजवणारी भाषा आहे. त्यामुळेच तरुणाई या हिंसक वृत्तीला मागे सारत नवा गांधीवाद रुजवत आहे. गांधींचा मार्ग होता द्वेषाऐवजी मतभेदांचे संवादात रूपांतर करणे, हिंसेऐवजी आंदोलनाचे नैतिक गरजेत रूपांतर करणे आणि राजकारणाला केवळ सत्तेचा खेळ न बनवता सामाजिक बदलाचे साधन बनवणे. राहुल गांधी आणि आजचे काँग्रेस नेते नेमके गांधी विचारांच्या विरुद्ध वागत आहेत. त्यांना संवाद नाही तर हिंसा हवी आहे. त्यामुळे गोडसेंनी गांधींची हत्या केली, पण हे लोक गांधी विचारांची हत्या करत आहेत.
दांडी मार्च आपल्याला हे शिकवत नाही की, प्रत्येक चळवळीची सुरुवात मिठाने होते. तो आपल्याला हे शिकवतो की प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका लहानशा प्रश्नाने होते, ज्याला लोक सुरुवातीला क्षुल्लक मानतात. तोच प्रश्न हळूहळू समाजाची जाणीव बनतो. कदाचित आजची नवी पिढी आपापल्या परीने याच मार्गावर चालत आहे. तरुण पिढी पुस्तकांमध्ये गांधीजींबद्दल क्वचितच वाचते, पण अनेकदा त्यांचे विचार त्यांना स्वत:च्या कृतीतून साकारलेले दिसतात. जर नवीन पिढी सत्याला महत्त्व देत असेल, अहिंसेला कमजोरी न मानता सामर्थ्य समजत असेल, संघर्षापेक्षा संवादाला प्राधान्य देत असेल आणि लोकशाहीवर विश्वास ठेवत असेल, तर ही केवळ त्यांची गांधीवादी दूरदृष्टीच नव्हे, तर भारताच्या लोकशाही भविष्यासाठी सर्वात मोठी संपत्ती ठरेल. गांधीजी म्हणाले होते, ‘‘जगात जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे, तो बदल तुम्ही स्वत: व्हा.’’ हेच नवीन पिढीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. जर नवीन पिढीने स्वत:च लोकशाही मूल्यांचे उदाहरण घालून दिले, तर बदल घडेल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल. कदाचित हीच २१व्या शतकातील सर्वात खरी गांधीवादी दूरदृष्टी आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
No comments:
Post a Comment