अलीकडेच, उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवरील सोनाउली सीमा तपासणी नाक्याजवळ सीमा सुरक्षा दलाने जॉर्डन ब्राउन नावाच्या एका संशयित अमेरिकी नागरिकाला ताब्यात घेतले. ब्राउन वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय समुद्रमार्गे भारतात घुसला होता आणि दक्षिण भारतात बराच काळ घालवल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पोहोचला, जिथून तो बेकायदा नेपाळमध्ये सीमा ओलांडणार होता. या घटनेत अनेक धक्कादायक बाबी आहेत.
कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या ब्राउनने, अमेरिकन नौदलाच्या ‘नेव्ही सील्स’ या विशेष कमांडो युनिटमध्ये अनेक वर्षे सेवा बजावली. हे तेच गुप्तचर युनिट आहे ज्याने एकेकाळी पाकिस्तानात घुसखोरी करून ओसामा बिन लादेनला ठार केले होते. अमेरिकन नागरिक असूनही, ब्राउनकडे अमेरिकन पासपोर्ट नव्हता, परंतु त्याच्याकडून एक बनावट चिनी पासपोर्ट जप्त करण्यात आला. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, अमेरिकन लष्कराच्या विशेष गुप्तचर कमांडो युनिटचा एक माजी सदस्य, हेर किंवा दहशतवादी म्हणून परवानगीशिवाय भारतात घुसखोरी करून सीमावर्ती प्रदेशात काय करत होता?
ब्राउनचे प्रकरणही याला अपवाद नाही. गेल्या मार्चमध्ये, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कोलकाता आणि ईशान्य भारतात मॅथ्यू व्हॅन डाइक नावाच्या एका अमेरिकन नागरिकाला आणि सहा युक्रेनियन नागरिकांना अटक केली. ते युरोपमधून भारतात ड्रोनची तस्करी करत होते आणि म्यानमार व ईशान्य भारतात कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांवर हवाई हल्ले करण्यासाठी त्यांना उडवण्याचे प्रशिक्षण देत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी ईशान्य भारतातील अशा भागांमध्ये घुसखोरी केली होती, जिथे परदेशी नागरिकांना विशेष सरकारी परवानग्या घेणे आवश्यक असते. ब्राउनप्रमाणेच, डाइकचेही अमेरिकन सुरक्षा यंत्रणेशी जुने संबंध आहेत.
जेव्हा पाश्चात्त्य देशांनी लिबियातील कर्नल गद्दाफीला पदच्युत करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डाइक एका युद्ध पत्रकारातून गनिमी योद्धा बनला आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने गद्दाफी सरकारविरुद्ध लढणाºया गटात सामील झाला. पश्चिम आशियातील अनेक सशस्त्र संघर्षांमध्ये भाग घेतल्यानंतर, डाइकने २०१८ मध्ये ‘सन्स आॅफ लिबर्टी इंटरनॅशनल’ची स्थापना केली, जी जगभरातील अमेरिकेच्या हितासाठी काम करणाºया गनिमी आणि दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सल्ला देते. ही संघटना अमेरिकेच्या कॉर्पोरेट संरक्षण नेटवर्कचा एक भाग आहे, जे ब्लॅकवॉटरसारखे खासगी भाडोत्री सैनिक आणि विविध लढाऊ सेवा पुरवते. हे सुनियोजित संगनमत बरेच काही सांगून जाते.
अमेरिकन आणि पाश्चात्त्य नागरिकांनी भारताच्या सुरक्षेविरुद्ध काम करण्याची ही पहिली किंवा दुसरी घटना नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांच्या पाच मिनिटे आधी, इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना ईमेल पाठवून धमकी दिली होती आणि नंतर बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. नंतर, आश्चर्यकारकपणे हा ईमेल भारतात राहणाºया आणि अमेरिकन कट्टरपंथी चर्चशी संबंधित असलेल्या केनेथ हेवुड नावाच्या अमेरिकन नागरिकाच्या लॅपटॉपवरून सापडला. या प्रकरणाचा तपास करणाºया वादग्रस्त पोलीस अधिकाºयाने हेवुडला घाईघाईने निर्दोष ठरवले.
या निर्दोषत्वासाठी दिलेले एक विचित्र कारण असे होते की, दहशतवाद्यांनी हेवुडचे वायफाय कनेक्शन हॅक केले होते. तथापि, हेवुडला इंटरनेट तंत्रज्ञानाची चांगलीच माहिती होती आणि त्याने २० वर्षे एक कंपनी चालवली होती, जी भारतीयांना अमेरिकन कंपन्यांमधील नोकºयांसाठी प्रशिक्षण देत असे. हे हॅकिंग अविश्वसनीय होते. हेवुड सीआयएशी संबंधित होता आणि तो सिमी व इंडियन मुजाहिद्दीनचे विभाग चालवत होता, असे अहवाल समोर आले. असे असूनही, हे प्रकरण दाबून टाकण्यात आले.
हेवुड प्रकरणानंतर अवघ्या तीन वर्षांनी २६/११चे मुंबईत दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात डेव्हिड कोलमन हेडली या अमेरिकन नागरिकाची भूमिकाही उघड झाली. हेडली अनेक वर्षे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांसाठी माहिती देणारा होता आणि तो २६/११चा सूत्रधारही बनला. कोणीतरी अमेरिकेला विचारायला हवे की, हेडलीकडे भारतातील अमेरिकेच्या गुप्तचर कारवायांबद्दल अशी कोणती गुपिते आहेत की, त्याच्यावर योग्य कारवाई होण्याची शक्यता कमी वाटते. १६६ लोकांच्या हत्येसाठी जबाबदार असूनही, त्याला फाशीची शिक्षा, जन्मठेप किंवा भारताकडे प्रत्यार्पण का केले गेले नाही?
असेच एक प्रकरण सीआयए एजंट रोझियाना मिन्चेव यांचे आहे, ज्या २००५ मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या गुप्तहेर घोटाळ्यांपैकी एक असलेल्या ‘नेव्ही वॉर रूम लीक केस’ उघडकीस आल्यापासून बेपत्ता आहेत. २०१८ मध्ये, अमेरिकन ख्रिश्चन धर्मप्रचारक जॉन अॅलन चाऊ यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर आदिवासींच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता, आदिवासींनी त्यांची हत्या केली. लक्षात ठेवा, हा एक संरक्षित प्रदेश आहे, जिथे भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि लष्करालाही प्रवेश करण्यास मनाई आहे. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवादाची आग भडकवण्यात अमेरिकन मुत्सद्दी रॉबिन राफेल यांची भूमिका अविस्मरणीय आहे. राफेलने हुर्रियतच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हे सर्व स्पष्ट असूनही, अमेरिकन नागरिक त्यांच्या असंख्य भारतविरोधी कारवाया करूनही शिक्षा न भोगता राहिले आहेत. कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वी त्यांना कधीही पकडण्यात आलेले नाही. जरी ते नंतर पकडले गेले, तरी सरकारने त्यांना सहजपणे निसटून जाऊ दिले. ब्राउन आणि डायक प्रकरणांमध्ये, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा यांनी खबरदारीचे उपाय योजल्याबद्दल आणि कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच अमेरिकी गुप्तचर संस्थांशी संबंधित व्यक्तींना अटक केल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. ही प्रकरणे भारतीय प्रसारमाध्यमे आणि सामान्य भारतीयांसाठी एक धडाही आहेत की भारताचे शत्रू केवळ पाकिस्तानी किंवा चिनी नाहीत. तर अमेरिकेपासूनही सावध राहिले पाहिजे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
No comments:
Post a Comment