समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील चौथ्या दशकातील सातव्या समासात दास्य भक्ती म्हणजे काय, ते सांगितले आहे. ‘दास्य’ म्हणजे ईश्वराचा सेवक किंवा दास बनून राहणे. ‘मी ईश्वराचा आहे आणि ईश्वर माझा मालक आहे’ या भावनेने जीवन जगणे म्हणजेच दास्य भक्ती. या भक्तीचे सर्वात मोठे आणि आदर्श उदाहरण म्हणजे श्रीहनुमान, ज्यांनी श्रीरामांची निष्काम भावाने दास म्हणून सेवा केली. समर्थ रामदासही स्वत:ला रामाचे दास म्हणत होते. त्यांनीही हनुमंताप्रमाणेच दास्य भक्तीचा अंगीकार केला होता.
दास्य भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व म्हणजे कर्तेपणाचा त्याग करणे. मी हे केले, मी ते केले, हा कर्तेपणा सोडून, सर्व काही ईश्वरच माझ्याकडून करून घेत आहे, अशी भावना ठेवणे म्हणजे दास्यत्व. यामध्ये सर्वात प्रथम आज्ञापालन आणि निष्ठा महत्त्वाची असते. मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पूर्ण करणे हे सेवकाचे कर्तव्य असते. तसेच, ईश्वराच्या इच्छेला आपली इच्छा मानणे म्हणजे दास्य भक्ती.
यामुळे अहंकारमुक्ती होते. स्वत:ला मालक किंवा श्रेष्ठ मानण्याऐवजी दास मानल्याने अहंकार उरत नाही. म्हणूनच या दास्यभक्तीबाबत समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक विचार समजून घेतले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी स्वत:ला ‘रामदास’ (रामाचा दास) म्हणवून घेत असत. त्यांनी या भक्तीचे महत्त्व विशेष रूपाने मांडले आहे.
यामध्ये सावध आणि तत्पर सेवा करणे हे व्रत आहे. ईश्वराचा दास आळशी असून चालत नाही. तो नेहमी सावध, तत्पर आणि कर्तव्यदक्ष असला पाहिजे. त्याने लोकसंग्रह आणि धर्मकार्य याकडे लक्ष दिले पाहिजे. ईश्वराचे काम म्हणजे समाजाची सेवा करणे, सत्याची स्थापना करणे. समर्थांच्या मते, राष्ट्र आणि धर्माची सेवा करणे हीसुद्धा ईश्वराची दास्य भक्तीच आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजणे त्यासाठी आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती करणारे, समाजाची सेवा करणारे समाजसेवक असतील तर त्यांनी प्रत्यक्ष देवाची, परमेश्वराची पूजा केली नाही तरी ती भगवंताने स्वीकारलेली असते. कारण त्यांनी माणसातील देव जाणलेला असतो, माणसातील परमेश्वर ओळखलेला असतो. त्यांचे दास्यत्व ते पत्करत असतात. असे समाजसेवकही भक्त असतात.
आजकाल राजकारणात भक्त आणि अंधभक्त दोन्हीही पाहायला मिळतात. अंधभक्त म्हणून राष्ट्रप्रेमींना हिणवणारे मंदभक्तही दिसून येतात. पण आपण कोणाचे दास्यत्व स्वीकारत आहोत, तो त्या लायकीचा आहे का, याचाही विचार करण्याची गरज असते. आम्हाला काहीतरी मिळेल या भावनेने दास्यत्व असेल तर त्याला लाचारी म्हणावी लागते. आपला नेता चुकीचा वागत असेल, गद्दारी करत असेल, जनमताचा कौल डावलून निकालानंतर दुसºयाबरोबर हातमिळवणी करत असेल तर अशा दांभिक नेत्यांचे दास्यत्व करणे हे पण पाप आहे. त्या पापाची शिक्षा नंतर त्यांना मिळते आणि असा एक नाथ बंड करतो की, त्या दांभिक नेत्याला पदच्युत करतो. म्हणूनच दास्य भक्तीत आपला मालक कोण आहे हे समजून घेतले पाहिजे. दास्यत्व स्वीकारायचे तर योग्य मालकाचे स्वीकारले पाहिजे. चुकीचे वागणाºया मालकाचे दास्यत्व म्हणजे त्याच्या पापाचे भागीदार होणे असते. म्हणूनच या भक्तीचा अर्थ समजला पाहिजे. हनुमानाने राम जाणला होता, म्हणून त्याने रामाचे दास्यत्व स्वीकारले. बिभीषणाने रावणाचा कपटीपणा ओळखला होता म्हणून त्याचे दास्यत्व नाकारले होते. चुकीच्या व्यक्तीचे दास्यत्व स्वीकारले की अधर्म घडतो. भीष्म, द्रोण यांनी धृतराष्ट्र, दुर्योधन यांचे दास्यत्व स्वीकारले त्यांना धारातीर्थी व्हावे लागले. विदुराने धर्माची बाजू घेतली तो श्रेष्ठ ठरला. त्यामुळे प्रामाणिकपणे कोणाचेही दास्यत्व केले तरी त्याचे फळ चांगले मिळेल असे नाही. तर योग्य मालकाचे, परमेश्वराचे दास्यत्व स्वीकारणे हे या भक्तीतील महान तत्त्व आहे.
फळाची अपेक्षा न ठेवणे हे या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. दासाने सेवेच्या बदल्यात कसलीही फळाची आशा ठेवू नये. निष्काम सेवेनेच ईश्वर प्रसन्न होतो. या दास्य भक्तीचे फलित काय आहे तर दास्य भक्तीमुळे भक्ताला अफाट शक्ती, निर्भयता आणि ईश्वराचे सामीप्य लाभते, जसे हनुमंताला मिळाले. स्वत:चा स्वार्थ सोडून ईश्वराच्या कार्यात सेवक म्हणून समर्पित होणे म्हणजेच दास्य भक्ती. हनुमान आणि समर्थ रामदास स्वामी हे दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण आहेत. त्याचप्रमाणे नवनाथात अत्यंत समर्पणाने आपल्या गुरूला स्वत:ला अर्पण केलेले गोरक्षनाथ हे मच्छींद्रनाथांचे परमभक्त म्हणता येतील. आपल्या मालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करणारे गोरक्षनाथ श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांनी केवळ एका वड्यासाठी आपल्या गुरूसाठी स्वत:चा डोळा काढून दिला होता. हनुमंताने रामाला आपली छाती फाडून दाखवली होती. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचा शिष्य कल्याण हे देखील दास्य भक्तीतील श्रेष्ठ भक्ताचे उदाहरण आहे.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment