Friday, August 28, 2026

दशक पहिला : स्तवननाम १ समास चौथा : सद्गुरुस्तवन


गुरू-शिष्य संवादाचा असलेल्या दासबोधातील पहिल्या दशकातील चौथ्या समासात सद्गुरूचे स्तवन समर्थांनी केलेले आहे. या समासात समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, श्रीसद्गुरू हे वर्णनातीत आहेत. आता सदगुरूंचे स्तवन करायचे. पण श्रीसमर्थ म्हणतात की, सद्गुरूच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही. आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतील असते. त्यामुळे सद्गुरूस्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते. म्हणून सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. श्रुती ही आत्मविद्येची आई आहे. परमात्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तिने प्रयत्न केला. पण अखेर ते स्वरूप कळत नाही; ते असे नव्हे, असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली. तेथे आपल्यासारख्या मूर्खाची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करील. असे म्हणून सद्गुरूची अमर्याद व्याप्ती येथे ते दाखवतात.


समर्थ म्हणतात की, सद्गुरूस्वरूपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात की, हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. मुख्य परमात्मा आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरूस्वरूप अनाकलनीय आहे तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन. जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूची वंदना करतो.

श्री समर्थांनी केलेले सद्गुरूचे स्तवन अतिशय सुंदर असे आहे. विश्वाला भरून उरणारा, विश्वाचे मूळ, सर्वोत्तम पुरुष. मोक्षाची विजयपताका आणि दीनांचा मित्र असा जो सद्गुरू, त्याचा जयजयकार असो. येथे ते सद्गुरूंना सूर्यप्रकाशाची उपमा देतात. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो. त्याचप्रमाणे सद्गुरूचा अभयहस्त ज्याच्या मस्तकी राहतो, त्याची कृपा ज्याच्यावर होते, त्याच्यावर असलेला या अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो. याशिवाय उपमेतील उणेपणा ते दाखवून देतात. सूर्यप्रकाश असतो तर तोपर्यंत अंधार नसतो हे खरे. पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की, रात्र होते आणि पुन: अंधार ब्रह्मांडांत भरतो. सद्गुरू स्वामीराजा तसा नाही. अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो. त्याचा ठावठिकाणा साफ नाहीसा करतो. त्यामुळे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतो.


या समासात समर्थ शिष्याला सोने आणि सरिता यांची उपमा देतात. सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही. तसे सद्गुरूच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की, त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते. मग तिला गंगेतून वेगळी काढायचे म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट व संगती होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो. परंतु सद्गुरूची गाठ फसली की, तो लगेच तद्रूप होतो. त्याला सद्गुरूचा अधिकार येतो.

उपमा द्यायची आणि त्यातील उणेपणाही दाखवून द्यायचा हे समर्थ साहित्यातील फार मोठे लक्षण आहे. येथे समर्थ परिसाची उपमा व तिचा उणेपणा दाखवतात. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुस‍ºया लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाही. पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा की, शिष्याला गुरूपद प्राप्त होते.


येथे सागर व त्याचा उणेपणापण समर्थ सांगतात. सद्गुरू सागरासारखा आहे आहे म्हणावे तर ते योग्य नाही. सागराचे पाणी खारट असते. म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरूंना काय उपमा द्यायची? समर्थ म्हणतात की, सद्गुरू गगनासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते. पण सद्गुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे. म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय आणि गंभीर आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल, पण सद्गुरू अभंग राहील.

समर्थ इथेच थांबत नाहीत. ते म्हणतात की, सद्गुरू सूर्यासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही सूर्याचा प्रकाश तो किती? शास्त्रांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत. पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाहीत. सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कुठेच मर्यादा नाहीत. म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो. आता शेषाची उपमा घ्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ती उपमा उणी पडते.


सद्गुरू पाण्यासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही पाणी चंचळ असते. आणि कालांतराने सगळे आटून जाते. परंतु सद्गुरूस्वरूप मोठे निश्चल असून, ते कधीच नाश पावत नाही. सद्गुरूंपुढे अमृतही उणे पडते. सद्गुरू अमृतासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. स्वर्गांत राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात. पण सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात तो ख‍ºया अर्थाने अमर बनतो.

सद्गुरू कल्पतरूपेक्षाही मोठा आहे हे सांगताना कल्पतरू व त्याचा उणेपणा समर्थ या समासात सांगतात. सद्गुरू कल्पतरूसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो. परंतु सर्व मानवी कल्पनाच्या पलीकडे असणाºया सद्गुरूपुढे कल्पतरूची किंमत राहत नाही. किंबहुना कल्पना ओलांडूनच सद्गुरूपाशी जावे लागते. म्हणून ही उपमा उणी पडते.


सद्गुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंताच उरू देत नाही. ज्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही. म्हणून ही उपमा उणी पडते.

त्यानंतर समर्थ श्रीमंती व तिचा उणेपणा दाखवून देतात. सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते. पण सद्गुरूच्या द्वाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्याचे ऐश्वर्य ही सगळी कालांतरानी नाश पावतात. पण सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती झाली की, ती कोणत्याही काली नाश पावत नाही. म्हणून ही उपमा उणी पडते.


सद्गुरूचे व्यापक स्वरूप समर्थांनी या स्तवनात फारच सुंदरपणे वर्णन केलेले आहे. विनाशी विश्व उपमेस उणे आहे हे पण समर्थ सांगतात. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात. एक सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशपणे टिकते. सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरूस्वरूपात नाही.

त्यानंतर समर्थ म्हणतात की, वर्णन करता येत नाही हेच सद्गुरूचे वर्णन आहे. या कारणास्तव सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता न येणे हेच त्याचे वर्णन समजावे. सद्गुरूरूपाचा अनुभव ही आतील अवस्था आहे. जे स्वत: अंतर्यामी स्थिर झाले आहेत. त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात. म्हणून या समासांत सद्गुरूबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल, असे सुंदर सद्गुरूंचे स्तवन या चौथ्या समासात समर्थ करतात.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


No comments: