दासबोधाच्या चौथ्या दशकातील तिसºया समासात स्मरण भक्ती म्हणजे काय? हे समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितले आहे. ते म्हणतात ‘स्मरण’ म्हणजे भगवंतांचे नाव, रूप किंवा त्यांच्या अस्तित्वाची अखंड आठवण ठेवणे. नामस्मरण भक्ती. दिवसभरात कोणतेही काम करत असताना, मनाच्या कोपºयात ईश्वराचे नाम चालू ठेवणे म्हणजेच स्मरण भक्ती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, नामस्मरण ही अत्यंत सोपी, पण कमालीची प्रभावी भक्ती आहे, ज्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची, जागेची किंवा कर्मकांडाची अट नसते. आपल्या विविध श्लोकांमध्ये मनाच्या श्लोकांमधून त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावे. मुखी ग्रास घेता म्हणावे श्रीराम. असे आपल्या प्रत्येक दैनंदिन कृतीमध्ये भगवंतांचे नामस्मरण करणे ही फार मोठी भक्ती आहे.
या भक्तीसाठी कसलीही तयारी करावी लागत नाही. या भक्तीसाठी कसलेही परावलंबित्व नाही. श्रवण भक्तीत कोणीतरी सांगणारा, बोलणारा, कथन करणारा असला तरच आपण श्रवण करणार. कीर्तन भक्तीत साथीदार हवेत, विशिष्ट प्रकारचा पोषाख हवा, ठरावीक वेळ हवी. त्याची मांडणी पूर्वरंग, उत्तररंग असे सगळे आले. या दोन्ही भक्तीत परावलंबित्व आहे. तयारी आहे. वेळेचे बंधन आहे. पण नामस्मरण भक्तीला कसलेही बंधन नाही. तुम्ही ते केव्हाही करू शकता. अगदी चोवीस तास, २४*७ तुम्ही भगवंतांच्या जवळ असता, इतका हा सोपा आणि छान मार्ग आहे.
स्मरण भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व म्हणजे अखंड अनुसंधान साधता येते. पूजा किंवा कीर्तन एका विशिष्ट वेळीच करता येते, पण नामस्मरण हे उठता, बसता, खाता, पिता किंवा काम करतानाही करता येते. यामुळे माणसाचे ईश्वराशी अखंड नाते टिकून राहते. त्याचप्रमाणे नामस्मरण करताना माणसाच्या चित्तवृत्तीत एकाग्रता राहते. आपले मन सतत भटकत असते. नामस्मरणामुळे मनाला एक आवलंबन मिळते, ज्यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि एकाग्रता वाढते.
पापनाश आणि भीतीमुक्ती यातून रामनाम किंवा नामस्मरण हे अत्यंत प्रभावी असते. यासाठी कसली तयारीही करावी लागत नाही. भगवंतांचे नाव हे महाऔषधासारखे आहे. ते मनातील वाईट विचार, वासना आणि संकटांची भीती दूर करते. या नामस्मरण भक्तीची निर्मिती ही नवनाथातील गहिनीनाथ यांनी केलेली आहे. मच्छींद्रनाथांनी गहिनीनाथांना सांगितले होते की, कलियुगात माणूस जास्त कर्मकांड, पूजाअर्चा आणि कठोर तपश्चर्या करू शकणार नाही. तरी त्याला ताकद देण्यासाठी अशा सोप्या भक्तीचा मार्ग तू शोधून काढ. तेव्हा गहिनीनाथांनी नामस्मरण या भक्तीचा मार्ग सांगितला. गहिनीनाथांपासून गुरूपरंपरेने वारकरी संप्रदाय निर्माण झाला. त्यातही नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. ज्ञानदेवांनी तर हरिपाठाची निर्मिती ही नामस्मरण भक्तीसाठीच केलेली होती. समर्थ रामदास स्वामी हे पण नाथ संप्रदायातील एक सिद्धच होते. त्यामुळे त्यांनीही हा मार्ग आपल्या दासबोधातील नवविधा भक्तीतून सांगितला आहे.
समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरुपण म्हणून याकडे पाहिले पाहिजे. झाले तर समर्थ रामदास स्वामी यांनी नामस्मरणाची महती सांगताना व्यावहारिक बारकावे स्पष्ट केले आहेत. यामध्ये त्यांनी नामाची शक्ती काय आहे हे सांगितले आहे. रामनाम किंवा ईश्वराचे कोणतेही नाव हे अफाट शक्तिदायी आहे. संकटाच्या काळात किंवा मोहाच्या क्षणी घेतलेले नाव माणसाला सन्मार्गावर ठेवते. यामध्ये सात्यत्य आणि निष्ठा असते. स्मरण हे केवळ तोंडाने नव्हे, तर अंत:करणापासून झाले पाहिजे. संकटात आठवणे आणि सुखात विसरणे म्हणजे खरे स्मरण नव्हे; तर सुखात आणि दु:खात समान भावाने स्मरण ठेवणे ही खरी भक्ती आहे. हे करत असताना आपले मनच नाही तर अगदी आपला श्वाससुद्धा जप करत असतो. आपल्या स्पर्शातही भगवंतांचा वास जाणवतो. संत जनाबार्इंच्या शेणाच्या गोवºयांमधूनही ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. कारण ती एकाग्रता त्यांना साधली होती ती नामस्मरणातून. ही नवविधाभक्तीतील अत्यंत सोपी आणि अत्यंत प्रभावी अशी भक्ती मानली जाते.
नामस्मरण भक्ती हा एक अत्यंत सुलभ मार्ग आहे. ज्यांना कठीण तपश्चर्या, योग किंवा मोठे यज्ञयाग करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी नामस्मरण हा कलियुगातील सर्वात सोपा आणि मोक्षदायी मार्ग आहे. शिवाय स्मरण भक्तीचे फलितही फार मोठे आहे. अखंड स्मरणाने माणसाच्या अंत:करणात शांती निर्माण होते. संसारातील ताणतणाव आणि चिंता माणसाला शिवू शकत नाहीत, कारण तो सर्व काही ईश्वरावर सोपवून निर्भय झालेला असतो. थोडक्यात सांगायचे तर, नामस्मरण ही मनाची मशागत आहे, ज्यामुळे चित्त शुद्ध होऊन ईश्वराचा अनुभव मिळतो. या अत्यंत सोप्या भक्तिमार्गाचे वर्णन दासबोधातील चौथ्या दशकात तिसºया समासात समर्थांनी केलेले आहे.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment