Sunday, August 23, 2026

आत्मनिवेदन भक्ती (दशक ४ समास ९)


दासबोधातील चौथ्या दशकातील नवव्या समासात समर्थ रामदास स्वामींनी आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय याचे विवेचन केलेले आहे. ‘आत्मनिवेदन’ ही नवविधा भक्तीची अंतिम आणि सर्वोच्च पायरी आहे. ‘आत्म’ म्हणजे स्वत:चे अस्तित्व आणि ‘निवेदन’ म्हणजे अर्पण करणे. स्वत:चे शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि सर्व अस्तित्व ईश्वराला समर्पित करून, ‘मी आणि ईश्वर वेगळे नाहीच’ या अद्वैत भावाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती.


या आत्मनिवेदन भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व काय आहेत तर सर्वात प्रथम या भक्ती प्रकारात अहंकाराचा पूर्ण लय होतो. पहिली ते आठवी भक्ती करताना ‘मी भक्त आहे आणि तो ईश्वर आहे’ हा भेद असतो. पण नवव्या पायरीवर ‘मी’ ही भावनाच संपून जाते. संत एकनाथांनी दत्ताच्या आरतीत म्हटले आहे की, मी तू पणाची झाली बोळवण तो प्रकार इथे पाहायला मिळतो.

याशिवाय अद्वैत ज्ञान इथे दिसून येते. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर आपले वेगळे अस्तित्व गमावून समुद्रच बनून जाते, तसेच भक्त ईश्वरात लीन होऊन ईश्वररूप बनतो. या प्रकारात मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग दिसतो. ही भक्ती म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्तीच असते. सर्व दु:खांतून, जन्माच्या फेºयांतून आणि भ्रमातून कायमची मुक्ती मिळणे हेच याचे फलित आहे.


समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरुपण याचा विचार करता समर्थ रामदास स्वामी यांनी आत्मनिवेदनाचा विचार अतिशय तत्त्वज्ञानात्मक आणि सोप्या पद्धतीने मांडला आहे. या भक्तीत ‘मी कोण?’ याचा शोध ते घेतात. आत्मनिवेदन करण्यासाठी आधी ‘मी कोण आहे?’ हे शोधावे लागते. हे शरीर, मन किंवा बुद्धी म्हणजेच ‘मी’ नव्हे, तर मी शुद्ध आत्मा आहे हे ओळखणे. त्यासाठी विवेक आणि आत्मविचार करावा लागतो. जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत आणि केवळ एकच परमात्मा शाश्वत आहे, हा विवेक जागृत झाल्यावरच आत्मनिवेदन शक्य होते.

या भक्ती प्रकारात सर्वस्व समर्पण ही भावना असते. आपले गुण-अवगुण, कर्मे आणि कर्माची फळे सर्व काही ईश्वराला अर्पण करून ‘सर्व काही तूच आहेस’ या भावात राहणे, म्हणजे आत्मनिवेदन भक्ती.


या आत्मनिवेदन भक्तीचे फलित काय आहे तर या भक्तीमुळे भक्ताला परम शांती, परमानंद आणि मोक्ष मिळतो. भक्ताला संपूर्ण सृष्टीत केवळ आणि केवळ भगवंतच दिसू लागतो. थोडक्यात सांगायचे तर स्वत:चे अस्तित्व ईश्वरात पूर्णपणे विलीन करून ईश्वरी रूप होणे हीच भक्तीची पराकाष्ठा म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. आत्मनिवेदन भक्ती ही नवविधा भक्तीतील नववी आणि सर्वोच्च पायरी मानली जाते. यामध्ये भक्त ‘मी’ आणि ‘माझे’ या संकल्पनेचा त्याग करतो. स्वत:ला ईश्वराचे केवळ एक साधन मानतो. शरीराचा किंवा बुद्धीचा अहंकार गळून पडणे ही या भक्तीची मुख्य अट आहे. भक्त आणि ईश्वर यांच्यातील वेगळेपणा संपून भक्त ईश्वराशी एकरूप होतो. अशा भक्ती करणाºया काही विभूतींची उदाहरणे द्यायचे झाले तर सर्वात प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज यांचे उदाहरण द्यावे लागेल. त्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन आणि ज्ञान ईश्वराला अर्पण केले. ‘ज्ञानेश्वरी’च्या शेवटी त्यांनी मागितलेले ‘पसायदान’ हे विश्वात्मक देवाप्रति असलेल्या आत्मनिवेदनाचेच प्रतीक आहे. आपले मुख्य कार्य झाल्यावर त्यांनी कोणत्याही अभंगात किंवा रचनेत ज्ञाना म्हणे असे न म्हणता बाप रखुमादेवी यांच्या नावाने केले आहे. म्हणजे ते इतके विठ्ठलमय होऊन गेले होते. की या रचना मी नाही तर साक्षात पांडुरंगाने केलेल्या आहेत, मी त्याच्यात असल्याने त्या झाल्या आहेत असे त्यांनी दाखवून दिलेले आहे.

याशिवाय संत तुकाराम महाराजांचे उदाहरण द्यावे लागेल. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता किंवा माझे मज झाले वैरी यांसारख्या अभंगांमधून त्यांनी आपला अहंकार आणि अस्तित्व विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे समर्पित केल्याचे स्पष्ट होते. पुराण कथांमध्ये जायचे झाले तर भक्त प्रल्हादाचे उदाहरण देता येईल. दैत्यकुळात जन्म घेऊनही प्रल्हादाने सर्व संकटांत स्वत:चे अस्तित्व आणि प्राण भगवंतांच्या हाती सोपवले होते. राक्षसकुळातील बळी राजा हे एक उदाहरण देता येईल. भगवंतांच्या वामन अवताराला तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा कमी पडली, तेव्हा बळीराजाने स्वत:चे मस्तक पुढे केले आणि स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले. नंतरच्या काळात संत मीराबाई हे आत्मनिवेदन भक्तीचे उत्तम उदाहरण आहे. मीराबार्इंनी संसार व लोकलाजेचा त्याग करून ‘मेरो तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई’ म्हणत स्वत:चे सर्वस्व श्रीकृष्णाला अर्पण केले होते.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: