खरं तर हे अत्यंत हास्यास्पद आहे की, विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेस, जे जंतरमंतरवरून संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारावर गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिसादासाठी आग्रही होते, ते अचानक त्यांचा प्रतिसाद ऐकण्यास टाळाटाळ करत आहेत. राहुल गांधी यांनी तर असेही म्हटले की, जर गोळीबार करण्याचे कथित आदेश त्यांनी दिले नसतील, तर ते कोणी दिले हे त्यांना माहीत नव्हते का? पण एकूणच संसदेत सभागृहात बोलण्यापेक्षा रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत टीव्ही कॅमेºयांपुढे बोलण्याचे सडकछाप राजकारण सुरू आहे. यांना संसदेत चर्चा करायला येत नाही तर खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. जनता यांची थेरं पाहत आहे. राहुल गांधी आणि त्यांचे मित्र पक्ष सभागृहात चर्चा करण्यात पुढाकार घेत नाहीत यातून त्यांचेच अवमूल्यन होत आहे.
यापेक्षा अधिक हास्यास्पद काही असू शकते का? राहुल गांधी या मुद्द्यावर गृहमंत्र्यांनी त्यांना हवी असलेली उत्तरे द्यावीत, असा आग्रह धरत आहेत असे वाटत नाही का? विरोधी पक्षांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हे सरकार ठरवेल, असे जर त्यांनी उद्या म्हटले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. या विचित्र वृत्तीमुळे सत्ताधारी पक्षाचे खासदार ‘राहुल गांधींनी पळून जाऊ नये’ अशी मागणी करणारे फलक घेऊन संसद परिसरात दिसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर बुधवारी संसदेबाहेर येऊन आम्ही अखंड चर्चा करायला तयार आहोत, काहीही विचारा, प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देतो असे सांगूनही काँग्रेस आणि विरोधी पक्ष पळून जात आहेत हे त्यांचे सडकछाप राजकारण आहे.
झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या प्रकरणीही राहुल गांधींना उत्तर देण्यास सांगण्यात आले. ही परिस्थिती अधोरेखित करते की, संसदेत कोणत्याही विषयावर गंभीर चर्चेसाठी असलेली जागा कशी सातत्याने कमी होत आहे. संसदेत रस्त्यावरील राजकारण प्रचलित आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संसदेत गोंधळ घालून विरोधी पक्ष केवळ स्वत:चेच नुकसान करत नाही, तर सत्ताधारी पक्षाचे काम सोपे करतो आणि त्यांना जबाबदार धरण्याची संधीही गमावतो, हे साधे सत्य समजून घेण्यास विरोधी पक्ष तयार नाही. कारण विरोधक फक्त सडकछाप राजकारण करू इच्छितात.
विरोधी पक्षांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या गदारोळानंतरही अनेक विधेयके मंजूर होत आहेत. याचा सरळ अर्थ असा होत नाही का की, कोणत्याही प्रस्तावित कायद्यात कोणत्या तरतुदी केल्या जात आहेत हे समजून घेण्यात विरोधी पक्षाला काहीही रस नाही? संसदेत चर्चा न करता विधेयके मंजूर करणे योग्य नाही, पण हेच घडत आहे. यासाठी विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. तो संसदेला ओलीस धरून अत्यावश्यक कामात अडथळा आणत आहे, तसेच एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका जाणीवपूर्वक सोडून देत आहे. हे सर्व त्यांच्या गदारोळाच्या आवडीमुळे घडत आहे. सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मतदार त्यांना निवडून देत आहेत. पण काँग्रेसला सडकछाप राजकारण करायची सवय लागली आहे, त्यामुळे मतदार पुन्हा त्यांना रस्त्यावरच ठेवतील हे लक्षात घेतले पाहिजे.
संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचाराची परिस्थिती, राम मंदिरातील चोरीची कारणे आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे, हे विरोधी पक्षाला खरोखरच जाणून घ्यायचे आहे की नाही, याबद्दल शंका आहे. या मुद्द्यांवर अत्यंत संवेदनशील असल्याचा आव आणण्यास तो उत्सुक आहे, पण तो जी संवेदनशीलता दाखवतो, ते खरे तर अत्यंत सुमार सडकछाप राजकारण आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याऐवजी या फालतुगिरीच्या राजकारणाला योग्य प्रकारे प्रत्युत्तर द्यायला शिकले पाहिजे. विरोधकांचा खोटारडेपणा सत्ताधाºयांनी आता उघड पाडला पाहिजे. विरोधकांना संसदेचे कामकाज करण्यात काहीही रस नाही आणि फक्त गदारोळ घालायचा आणि रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करण्याचे काम जर विरोधक करत असतील तर सत्ताधाºयांनी विरोधकांचा नाकर्तेपणा जनतेला दाखवून दिला पाहिजे. अशा नाकर्ते लोकांना तुम्ही निवडून देणार का, असा सवाल प्रत्येकाचा चेहरा समोर आणून दाखवला पाहिजे. विरोधकांना सत्तेपासून दीर्घकाळ दूर राहिल्यामुळे नेमके काय करावे हे समजेनासे झालेले आहे. कोणताही विकासाचा अजेंडा त्यांच्याकडे नाही. कोणताही पर्याय उभा करण्याची ताकद नाही. त्यामुळे फक्त सरकारच्या नावाने खडे फोडत रस्त्यावर उतरून सडकछाप राजकारण करणे एवढेच त्यांच्या हातात आहे. हे प्रकार आता बंद झाले पाहिजेत. इंडिया या विरोधकांच्या आघाडीतही काही चांगली लोक, वक्ते असू शकतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे या अत्यंत अभ्यासपूर्ण बोलणाºया आहेत. लोकशाही मूल्यांचे जतन करून त्या संसदेत वावरतात. पण विरोधी आघाडी जर संसदेत कामच करत नसेल, त्यांच्यासारख्या विद्वान, हुषार वक्त्यांचा काय उपयोग होणार? विरोधी आघाडीत सगळेच राहुल गांधी नाहीत, काही अभ्यासू लोकही आहेत. त्यांना सभागृहात चर्चा करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे हे सडकछाप राजकारण आता काँग्रेसने थांबवले पाहिजे.
No comments:
Post a Comment