Sunday, August 30, 2026

दशक पहिला : समास सहावा : श्रोतेजनस्तवन


समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध हा अत्यंत अद्भूत असा ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी श्रोत्यांचाही विचार केला आहे. वाचक आणि श्रोता हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जे काही लिहिले आहे ते वाचणारे आणि ऐकणारे कोणी असेल तर त्या लिहिण्याला अर्थ आहे. म्हणूनच त्यांनी श्रोत्यांचेही स्तवन केलेले आहे. समर्थ म्हणतात की, हा ग्रंथ श्रावण करण्यास किती थोर श्रोते बसले आहेत ते ऐका. आता दासबोध ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न आणि सत्यवादी असे हे श्रोते आहेत.


पहिल्या दशकातील या सहाव्या समासात समर्थ म्हणतात की, एक जण सत्त्वगुणाचा समुद्र तर दुसरा विलक्षण बुद्धिमान, तर तिसरा शब्दरत्नांची जणू खाणच आहे. त्याच्यापाशी शब्दांचे अपार भांडार भरलेले आहे. कोणी असे की वक्ता जे बोलेल त्याचा अर्थ बरोबर समजून रस घेणारे, तर कोणी असे आहेत की प्रसंग पडला असता उत्तम वक्तृत्व गाजविणारे, तर कोणी असे अत्यंत निश्चित मताचे की कोणतीही शंका फेटाळून टाकणारे. कोणी ईश्वराचे अवतारच वाटतात. कारण ज्ञान साठवण्याची त्यांच्या बुद्धीची शक्ती अफाटच असते. प्रत्यक्ष देवच सभेत येऊन बसले आहेत असे वाटते. असे श्रोते पाहिले म्हणजे वाटते की, मूर्तिमंत शांती असलेली आणि सत्त्वगुणाने भरलेली ऋषिमंडळी सभेला आली असून, त्यांच्यामुळे सभा शोभून दिसते. श्रोत्यांना किती श्रेष्ठ मानले आहे, समर्थांनी येथे हे दिसून येते.

स्वामी म्हणतात की, त्यांच्या अंत:करणात वेदांचा खरा अर्थ सहजपणे वावरतो, त्यांच्या तोंडांत म्हणजे जिभेवर सरस्वती खेळते. काव्य, नाटक, कथा, इत्यादी साहित्य प्रकारांवर ते भाषण करू लागले तर प्रत्यक्ष बृहृस्पतीसारखे वाटतात. ते अग्निसारखे पवित्र असतात तर स्फूर्तिरूपी किरणांचे सूर्यच वाटतात. ज्याप्रमाणे सूर्यापासून प्रकाश किरणे अखंड बाहेर पडतात, त्याचप्रमाणे त्यांची स्फूर्ती सदैव जागी असते. त्यांचे ज्ञान इतके अमर्याद असते की, त्यांच्या दृष्टीने आपले हे विश्व अगदीच क्षुल्लक समजले जाते. सदैव सगळीकडे त्यांचे लक्ष असते. त्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते. ते आत्मज्ञानी असून, सदैव अत्यंत अभिमानरहित असतात. सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या नजरेखालून गेले नाही असे जगात काही उरत नाही. दृश्य आकार घेतलेल्या यच्चयावत वस्तू त्यांनी मनाने पाहिलेल्या असतात. श्रोत्यांची फार मोठी महती येथे समर्थ सांगतात.


समर्थ म्हणतात की, आपण अगदी विचार करून जे काही सांगायला जावे तर ते या श्रोते मंडळींना आधीच माहीत असते. असा अनुभव येतो. मग आपल्याकडे ज्ञातेपणा घेऊन त्यांच्यापुढे नवीन काही कसे सांगता येणार?

परंतु असे असूनही हा दासबोध आपण का सांगत आहोत हे सांगताना समर्थ म्हणतात की, भाग्यवान व ऐश्वर्य संपन्न पुरुष आपल्यासमोर जे येईल त्याचा अव्हेर करीत नाहीत. ते गुणग्राही असतात, प्रत्येकातील गुणांचे सेवन करतात. त्याचप्रमाणे दासबोधाचे श्रोते अत्यंत गुणग्राही असल्यामुळे मी मोकळेपणाने ग्रंथ सांगत आहे. ऐश्वर्य संपन्न पुरुष नेहमी उत्तम उत्तम पक्वान्ने सदा सेवन करतात. पण तोंडाची चव पालटण्याकरिता व पक्वान्नांची रुची राहण्याकरिता मधूनमधून ते साधे अन्न खातात. त्याचप्रमाणे नेहमी संस्कृत वेदांतवाड्‍:मय सेवन करणा‍ºयांनी माझा हा प्राकृत किंवा मराठी ग्रंथ केवळ रुचिपालट होण्यासाठी वाचावा. परमेश्वराची यथासांग पूजा करणे कठीण आहे हे खरे. तरी पण आपल्या शक्तीप्रमाणे आपण मनापासून त्याची पूजा करतोच. त्याची पूजा कठीण म्हणून ती करूच नये असे कोणी कुठे सांगत नाही.


हा दासबोध लिहिताना रामदास स्वामींनी घेतलेली नम्र भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणतात की, त्याचप्रमाणे माझे श्रोते केवळ परमेश्वरस्वरूपच आहेत. मी वाचेने दुर्बल आहे. माझी वाचा जे बडबडेल त्या ओबडधोबड शब्दांनी श्रोतेरूप परमेश्वराची पूजा मी करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक मी कसा आहे ते पाहा. माझ्यापाशी पद्धतशीर अभ्यासाने येणारी विद्वत्ता नाही, कला नाही की चातुर्य नाही. मला व्यवस्थित मांडणी केलेला ग्रंथ लिहिता येत नाही. माझ्यापाशी भक्ती, ज्ञान व वैराग्य नाही. मला सुंदर शब्दरचना करता येत नाही. माझा वाड्‍:मयप्रकार हा असा आहे. पण पूजा करणाºयाच्या प्रेमाचा रस ईश्वर सेवन करतो. म्हणून मी स्वस्थपणे ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त झालो. माझ्या शब्दरचनेकडे तो पाहणार नाही.

त्यानंतर संतरूपी श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे पण आपलेपणाने समर्थ विनंती करतात की, तुम्ही श्रोते प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात. तुमच्यापुढे माझी विद्वत्ता केव्हाही अपुरी पडेल. मी मंदबुद्धी आहे, माझे विचार प्रगल्भ नाहीत. मी तुमच्याशी सलगीने एखाद्या थोर माणसाचा मुलगा मूर्ख असला तरी जगात त्याला मोठेपणा मिळतो. त्याच न्यायाने मी हिनदीन असलो तरी तुमचा आहे. म्हणून मी तुमच्याशी इतक्या निकटपणे वागतो. वाघ आणि सिंह या भयंकर प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात. पण त्यांची पिल्ले नि:शंकपणे त्यांच्यासमोर खेळतात. त्याचप्रमाणे मी तुम्हा संतांचे लेकरू आहे. तुमच्यापुढे दासबोध सांगतो आहे. तुम्ही माझी काळजी घ्याल यात शंकाच नाही.


रामदास स्वामी अखेरीस म्हणतात की, आपले पोर काही वावगे बोलले तर मायबापांना ते सांभाळून न्यावे लागते. तसे करा म्हणून त्यांना सांगावे लागत नाही. तसे दासबोध सांगताना मी जर काही वावगे बोललो तर तुम्ही संत आपणहून ते संभाळून घ्याल हे सांगणे नलगे. माझ्या सांगण्यात जे उणे पडेल ते तुम्ही आपोआप मला संभाळून न्याल. कारण जेथे प्रेम असते, तेथे मन स्वाभाविकपणे असे वागते. माझ्या मनातील हेतू तुम्ही आपल्या मनाने ओळखावा आणि जे योग्य असेल ते करावे. पुढे येणारा विषय मनापासून लक्ष देऊन ऐकावा अशी हा दासांचा दास रामदास तुमची प्रार्थना करतो.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



No comments: