आपल्याकडे श्रावण महिना म्हटले की, भक्तिभावाने आणि भक्तिरसाने ओथंबून जाणारे वातावरण तयार होते. एरवी नाही जमले तरी किमान श्रावणात तरी भक्तिमार्ग जोपासू असे अनेकांना वाटते. समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकात मनाला उपदेश करतानाच सांगितले आहे की, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. त्यासाठी हा भक्तिपंथ म्हणजे नेमका कसा आहे, यावर दासबोधात चौथा दशक आहे.
दासबोधात प्रत्येक दशक हा काहीतरी तत्त्वज्ञान सांगतो. तसेच ४ था दशक हा भक्तिमार्गाची ओळख करून देतो. या दशकात नवविधा भक्तीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. यातील पहिला समास हा ‘श्रवण भक्ती’चा आहे.
श्रवण भक्ती म्हणजे काय? ‘श्रवण’ म्हणजे केवळ कानाने शब्द ऐकणे नव्हे, तर ते विचार मनापासून ग्रहण करणे आणि आत्मसात करणे. भगवंताचे गुणगान, त्याच्या लीला, संतांचे चरित्र, अध्यात्मिक ग्रंथ (उदा. दासबोध, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी) आणि गुरू मुखातून निघणारे ज्ञान हे पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने ऐकणे म्हणजेच श्रवण भक्ती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, माणसाच्या ज्ञानाची आणि अध्यात्मिक प्रगतीची सुरुवात ही ऐकण्यापासूनच होते.
श्रवण भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व काय आहेत, तर भक्तीची पहिली पायरी (पाया) म्हणजे श्रवण करणे. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया भक्कम असणे गरजेचे असते, तसेच भक्तीच्या प्रवासात श्रवण भक्ती हा पाया आहे. जोपर्यंत आपण योग्य आणि चांगले विचार ऐकत नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वर, धर्म, कर्तव्य आणि विवेकाची ओळख होत नाही. जो ऐकून घेतो तो विद्वान होतो. उत्तम श्रोता असणे हे आपल्या विकासासाठी, ज्ञानी होण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.
श्रवण भक्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मन:शांती आणि चित्तशुद्धी यामुळे होते. माणसाचे मन सतत चंचल असते आणि त्यात विविध विषयांचे विचार येत असतात. परंतु जेव्हा माणूस एकाग्रतेने सत्संग किंवा हरिपाठ ऐकतो, तेव्हा मनातील इतर सर्व अनावश्यक विचार शांत होतात. श्रवणामुळे मनातील मळ (अहंकार, काम, क्रोध, लोभ) धुऊन निघतो आणि चित्त शुद्ध होते.
श्रवण भक्तीने विवेक आणि ज्ञानाची प्राप्ती होते हे समर्थ आपल्याला दासबोधातील चौथ्या दशकातील पहिल्या समासात सांगतात. काय योग्य आणि काय अयोग्य, काय शाश्वत आणि काय नश्वर यातील फरक समजणे म्हणजेच ‘विवेक’. हा विवेक माणसाला उत्तम श्रवणानेच प्राप्त होतो. चांगले ऐकल्याने विचारांची दिशा बदलते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन हा नेहमीच व्यावहारिक बाबींकडे लक्ष देणारा राहिलेला आहे. समर्थ रामदास स्वामी हे अत्यंत व्यावहारिक संत होते. त्यांनी केवळ अध्यात्मिक नव्हे, तर दैनंदिन आयुष्यासाठीही श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. श्रवणाचे अनेक प्रकार आहेत. श्रवण केवळ अध्यात्माचेच नाही, तर शास्त्रांचे, नीतिमत्तेचे आणि व्यवहाराचेही केले पाहिजे. ज्ञानी लोकांचे बोलणे ऐकल्याने माणसाचा अज्ञानरूपी अंधार दूर होतो. समर्थ म्हणतात कुसंगती आणि असत्य श्रवण टाळणे आवश्यक आहे. असत्य कथन म्हणजे आजकाल राजकारणात जनाधार मिळत नाही म्हणून फेक नेरेटिव्ह सेट करणे. हे समर्थांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. असत्य कथन करायचे, सकाळसकाळ कॅमेºयापुढे येऊन काहीही बोलायचे हे प्रकार टाळले पाहिजेत. संविधान बदलणार असे असत्य कथन केल्याने २०२४ची निवडणूक डळमळली होती. परंतु सत्य समोर आल्यावर पुन्हा खुट्टा बळकट झाला. व्यवहारात असत्य श्रवण टाळले पाहिजे. असत्य श्रवण होण्याची जागा म्हणजे कुसंगती असते. ती टाळली पाहिजे हे समर्थ रामदास आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगतात.
जसे चांगले ऐकल्याने मन शुद्ध होते, तसेच वाईट, निंदा किंवा आळसाच्या गोष्टी ऐकल्याने मन दूषित होते. त्यामुळे समर्थ सांगतात की, भक्ताने नेहमी ‘सत्संग’ (चांगल्या लोकांची संगत) धरून केवळ सत्य आणि ईश्वरविषयक गोष्टींचेच श्रवण करावे.
श्रवण केल्याने अहंकाराचा नाश होतो. अनेकदा माणसाला वाटते की, ‘मला सर्व काही समजते.’ परंतु जेव्हा तो संतांचे विचार ऐकतो, तेव्हा त्याला स्वत:च्या मर्यादांची जाणीव होते आणि त्याचा अहंकार गळून पडतो. म्हणूनच नेमके श्रवण कसे केले पाहिजे हे पण समर्थ या समासात सांगतात.
श्रवण कसे करावे? किंवा श्रवणाची पद्धत कशी असावी याबाबत समर्थ स्पष्टपणे सांगतात. समर्थांच्या मते, श्रवण करताना काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. ती म्हणजे एकाग्रता असली पाहिजे. कानाने ऐकत असताना मन भलतीकडेच असेल, तर त्या श्रवणाचा काहीही उपयोग होत नाही. श्रवण करताना नम्रता असली पाहिजे. मी शिकायला आलो आहे, या भावाने आणि नम्रतेने श्रवण करावे. मनन आणि आचरण केले पाहिजे. केवळ ऐकून सोडून देणे म्हणजे श्रवण नव्हे. ऐकलेल्या गोष्टींवर विचार (मनन) करणे आणि त्या दैनंदिन आयुष्यात उतरवणे (आचरण) हेच खºया श्रवणाचे फलित आहे.
थोडक्यात सांगायचे तर, श्रवण भक्ती ही सर्व भक्तींचे मूळ आहे. जर श्रवण नीट झाले, तरच पुढची कीर्तन, स्मरण किंवा आत्मनिवेदन ही भक्ती साध्य होऊ शकते. श्रवणामुळे माणसाला स्वत:ची खरी ओळख होते, जीवनातील दु:खांचे निरसन होते आणि भगवंताप्रती अनन्य प्रेम निर्माण होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी दासबोधाच्या चौथ्या दशकाची सुरुवात या महान भक्तीने करतात.
- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment