समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातील चौथ्या दशकातील चौथ्या समासात पादसेवन भक्ती म्हणजे काय हे सांगितले आहे. ‘पादसेवन’ म्हणजे ईश्वराच्या, गुरूंच्या किंवा संतांच्या चरणांची सेवा करणे. परंतु समर्थ रामदास स्वामी यांच्या निरुपणात या भक्तीला केवळ भौतिक पायांना स्पर्श करण्याच्या पलीकडे नेऊन व्यापक अर्थ देण्यात आला आहे. ईश्वराच्या सृष्टीची सेवा करणे, संतांच्या आज्ञेचे पालन करणे आणि ईश्वरी तत्त्वाला शरण जाणे म्हणजे पादसेवन भक्ती.
पादसेवन भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व फार मोठे आहे. यातले पहिले महत्त्व म्हणजे अहंकाराचा पूर्ण नाश करणे हे आहे. कोणाच्या तरी पायाशी लीन होणे यासाठी मोठा नम्रभाव लागतो. पादसेवन भक्तीमुळे माणसातील ‘मी-पणा’ आणि अहंकार जळून खाक होतो. वारकरी संप्रदायात हा अहंकार गळून पडतो म्हणून एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा आहे. तिथे लहान मोठा असा काही भेदभाव पाहिला जात नाही. खेळ मांडीयेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे। क्रोध अभिमान गेला पावटणी। एक एका लागतील पायीं रे/ हे वर्णनच पादसेवन भक्तीतील अहंकाराच्या नाशाचेआहे.
पादसेवन भक्तीने गुरूकृपेची प्राप्ती होते. संतांची आणि गुरूंची सेवा केल्याने त्यांच्यातील ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा भक्ताला प्राप्त होते. पण इथे समर्थ रामदास स्वामी सांगतात की, सृष्टीसेवा म्हणजेच ईश्वरसेवा आहे. या जगात असणाºया प्रत्येक जीवात ईश्वर आहे, ही भावना ठेवून केलेली सेवा हीच खरी पादसेवन भक्ती आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे आपण म्हणतो ते यासाठीच. त्यांनी स्वत:चा विचार केलेला नाही तर समस्त सृष्टीचा, विश्वाचा केलेला आहे. या विश्वाच्या पाया पडणे, त्याला जवळ करणे ही पादसेवन भक्ती आहे.
या भक्तिप्रकारात समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. समर्थांनी पादसेवनाचे सूक्ष्म आणि व्यावहारिक पैलू मांडले आहेत. त्यांनी प्रथम चरणांचे महत्त्व कथन केले आहे. गुरू किंवा ईश्वराचे चरण हे ज्ञानाचे अधिष्ठान मानले जातात. चरणावर मस्तक ठेवणे म्हणजे आपली बुद्धी आणि अहंकार त्यांच्या चरणी समर्पित करणे. त्याचप्रमाणे आज्ञापालन करणे हीच खरी सेवा आहे. केवळ पायांना हात लावणे म्हणजे पादसेवन नव्हे, तर गुरूने किंवा संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आणि त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करणे हीच खरी पादसेवन भक्ती आहे.
यामध्ये निष्काम सेवा भाव प्रकट होत असतो. सेवा करताना कोणताही मोबदला किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, केवळ नम्रभावाने सेवा करणे गरजेचे आहे. म्हणूनच या पादसेवन भक्तीचे फलित काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. या भक्तीमुळे भक्तामध्ये लीनता, सहनशीलता आणि प्रेम हे गुण विकसित होतात. माणसाचे मन कठोर न राहता अत्यंत कोमल आणि करुणाभरित बनते. थोडक्यात सांगायचे तर अहंकार सोडून ईश्वराच्या आणि संतांच्या चरणी पूर्णपणे शरण जाणे हीच पादसेवन भक्ती आहे.
व्यावहारिक जगात विशेषत: राजकारणात पादसेवन मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. पण इथे भक्ती नाही तर तो स्वार्थ असतो. काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. राजकीय पक्षप्रमुख, अध्यक्ष, मोठे नेते यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या श्रद्धेने पाया पडतात. पण हा केवळ दिखाऊपणा असतो. आजकाल राजकारणात पाया पडावे असे पाय तरी कुठे दिसतात? पण केवळ ती औपचारिकता असते. त्या पाया पडण्याला पादसेवन नाही तर लाचारी म्हणावी लागेल. मी निष्ठावंत आहे हे दाखवण्यासाठी असे पाया पडण्याचे प्रकार केले जातात. नंतर हेच पाया पडणारे कधी पाय खेचतील हे सांगता येत नाही. हा सगळा स्वार्थीपणा असतो.
पादसेवन भक्तीत समर्थ रामदास स्वामींना समर्पण अपेक्षित आहे. निरपेक्ष वृत्तीने आपल्या गुरूच्या पायांना स्पर्श करणे, पाया पडणे हे फार महत्त्वाचे असते. या भक्तीमध्ये भगवंतांच्या, गुरूच्या पायावर सर्वकाही आपले तन मन धन अर्पण करणे हे अभिप्रेत आहे. कोणताही दिखाऊपणा नसतो, कसलीही अपेक्षा नको. पाया पडल्यावर आपल्याला आशीर्वाद मिळावा ही पण अपेक्षा करायची गरज नसते. कारण गुरू हा दत्त म्हणजे देणारा आहे. आपण निसर्गदत्त म्हणतो त्याप्रमाणे तो आपल्याला सर्व काही देण्यासाठीच सिद्ध असतो. त्याच्याकडे मागण्याइतके आपल्याकडे प्रतिभा पण नसते. धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, दीर्घायुष्य यापलीकडे आपण काय मागू शकतो? पण त्याही पलीकडे गुरू, ईश्वर, परमेश्वर तुम्हाला काही देऊ शकत असेल तर मागून आपला कमीपणा कशासाठी दाखवायचा? म्हणूनच पादसेवन भक्तीत आपले सर्वस्व भगवंतांच्या, गुरुच्या चरणी अर्पण करणे हे महत्त्वाचे आहे. त्यात त्यागभावना आहे. त्यागानंतर मिळणारा आनंद आपल्याला ही भक्ती देते. भक्तीचा कोणताही मार्ग असला तरी त्याचे अंतिम ध्येय एकच आहे. जसे आपण गाडीने, रेल्वेने, जहाजाने, विमानाने कुठेही प्रवासाला जातो. अनेक मार्ग अवलंबू शकतो. पण शेवटी अंतिम प्रवासाचे स्टेशन ठरलेले असते. तसेच पादसेवन भक्तीतही मुक्तीच्या मार्गावर जाण्याचा संदेश आपल्याला मिळतो.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment