श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत दासबोधातील दशक पहिला हा स्तवनांचा आहे. यातील समास पहिला- ‘ग्रंथारंभलक्षण’ याचे सविस्तर वर्णन करतो. या ग्रंथाचे स्वरूप आणि नाव काय आहे असा प्रश्न उपस्थित करतच हा ग्रंथ सुरू होतो. गुरू-शिष्य संवादातून निर्माण झालेला हा ग्रंथ आहे. आपल्याकडे गुरूचरित्रही सिद्ध आणि नामधारक या गुरू-शिष्यांच्या चर्चेतून तयार झालेला ग्रंथ आहे. त्यानंतरच्या काळात समर्थांनी लिहिलेला दासबोध हा सर्वप्रकारच्या विद्या, शिक्षण, व्यवस्थापन, ज्ञान आाणि मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. यातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात गुरू-शिष्य संवाद प्रकट होताना दिसतो. हा ग्रंथ सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील अत्यंत सोप्या व अर्थपूर्ण संवादाच्या रूपात रचला गेला आहे.
समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव ‘दासबोध’ असे असून यात प्रामुख्याने भक्तिमार्ग, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्म निरोपण (अध्यात्माचे विवेचन) सविस्तरपणे सांगितले आहे. या ग्रंथाचा मुख्य उद्देश व प्रतिपाद्य विषय काय आहे तर याची यादीच येथे दिलेली आहे. या पहिल्या दशकातील पहिल्या समासात समर्थांनी ग्रंथात पुढे काय काय स्पष्ट केले आहे, याची यादी दिली आहे. यामध्ये निश्चयात्मक ज्ञान म्हणजे काय हे सांगितले आहे. नवविधा भक्ती, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, विदेहस्थिती, अलिप्तपणा आणि ‘आपण स्वत: कोण आहोत’ (आत्मा व परब्रह्म) या विषयांचा ठाम निश्चय यात सांगितला आहे.
याशिवाय चातुर्य व व्यवहार याचे शिक्षण ते येथे देतात. केवळ परमार्थच नाही, तर उत्तम उपासना, कवित्व, चातुर्य, पंचभूतांचे लक्षण आणि सृष्टीचा कर्ता कोण याबद्दलचे व्यावहारिक व अध्यात्मिक ज्ञान यात दिले आहे.
याशिवाय शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ आहे. श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय, किंतू आणि आशंका दूर करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. त्याशिवाय प्रमाणांची (प्रमाणीकरण) विविधता येथे दिसून येते. समर्थ स्पष्ट करतात की हा ग्रंथ स्वत:च्या कल्पनेने रचलेला नाही. याला उपनिषिदे, वेद, श्रुती, भगवद्गीता, गणेशगीता, गुरुगीता, भागवत इत्यादी अनेक प्राचीन ग्रंथांचे प्रमाण (संमती) आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात ‘आत्मप्रचिती’ (स्वत:चा अनुभव) आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड दिली आहे.
या ग्रंथाची फळश्रुती (श्रवणाचे फायदे) काय हे पण समर्थ येथे सांगतात. हा ग्रंथ मनापासून ऐकल्याने किंवा वाचल्याने मानवी जीवनात तत्काळ सकारात्मक बदल घडून येतात. आज माणसाच्या मनात सकारात्मक विचार असणे ही काळाची गरज आहे. सगळीकडे तिरस्काराची भावना, कपटाचे राजकारण चालू असताना समाजाला भरकटवणाºया प्रवृत्तीपासून प्रत्येकाचे मन सावरले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. त्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे.
हा ग्रंथ अज्ञानाचा नाश करतो. संशय, दु:ख आणि भ्रांती नष्ट होऊन शीघ्र ज्ञानप्राप्ती होते. यामुळे माणसाच्या वर्तनात बदल घडतो. भ्रांत, अवगुणी आणि अवलक्षणी माणसे सुलक्षणी व चतुर होतात. आळशी माणसे उद्योगी बनतात आणि निंदक सुद्धा भक्तिमार्गाला लागतात. या ग्रंथामुळे मोक्ष व समाधान प्राप्त होते असे या पहिल्या समासात समर्थ सांगतात. बद्ध जीव मुमुक्षू (मोक्षाची इच्छा असणारे) बनतात, संसारातील उद्वेग शांत होतो आणि मनाला परम शांती व समाधान लाभते.
थोडक्यात सांगायचे तर दासबोधातील दशक एक समास पहिल्यामध्ये समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथाची प्रस्तावना मांडली आहे. हा ग्रंथ माणसाला अज्ञानातून काढून ज्ञानाकडे नेणारा, संशयांचे छेद करणारा आणि प्रत्यक्ष अनुभूतीवर आधारित असलेला एक महान मार्गदर्शक ग्रंथ आहे. तो प्रत्येकाने वाचला पाहिजे. आपल्याला फक्त भगवतगीता माहिती असते. ती पण पूर्ण नाही. पण दासबोधात चोवीस प्रकारच्या गीता आढळून येतात. यातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात ओवी १८मध्ये समर्थांनी स्पष्ट केले आहे की, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत. त्याचप्रमाणे ओवी १९मध्ये भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे आणि श्रीमद्भगवत पुराण इत्यादी विविध ग्रंथांचा सिद्धांत आणि विचार येथे (या ग्रंथात) अगदी स्पष्टपणे आणि निश्चितीने मांडला आहे. हे सर्व भगवंताचेच यथार्थ वचन आहे. या या श्लोकांमध्ये आलेले प्रमुख ग्रंथ किंवा विविध गीता म्हणजे, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता यांचा समावेश आहे. याशिवाय इतर धार्मिक ग्रंथांपैकी वेद, वेदांत (उपनिषदे) आणि भागवत पुराणातील दाखले येथे आहेत असे समर्थ या पहिल्या समासात सांगतात. त्यामुळेच हा ग्रंथ अत्यंत परिपूर्ण असा आहे.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment