श्री समर्थ रामदास स्वामीकृत ‘श्री दासबोध’ या ग्रंथाच्या पहिल्या दशकाचे नाव स्तवननाम दशक असे असून, त्यातील दुसरा समास म्हणजेच यात गणेशस्तवन समर्थांनी केलेले आहे. कोणताही ग्रंथ वा कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे आणि ग्रंथाची सुरुवात मंगलमय व्हावी, यासाठी भारतीय परंपरेनुसार प्रथम आराध्य दैवत श्री गणेशाचे स्तवन केले जाते. या समासात समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाचे तात्त्विक (निर्गुण) आणि सगुण (रुपवर्णन) असे दोन्ही प्रकारे अत्यंत सुंदर व सविस्तर निरूपण केले आहे.
श्री गणेशाचे तात्त्विक व आध्यात्मिक स्वरूप (निर्गुण निरूपण) करताना समर्थ समासाच्या सुरुवातीला समर्थ गणेशाला केवळ भौतिक देवता न मानता त्याचे परब्रह्मस्वरूप स्पष्ट करतात. गणनायक व सिद्धिफळदाता असा आहे. गणेश हा सर्व गणांचा पती (नायक) आणि सर्व प्रकारच्या सिद्धी व फळे देणारा आहे. त्याचप्रमाणे तो अज्ञानभ्रांतीच्छेदक असा आहे. जो माणसाच्या मनातील अज्ञान, भ्रम आणि संशयाचे आवरण दूर करून शुद्ध बोध (ज्ञान) रूप प्रकाश देतो, तो गणेश होय.
गणेश हा काळावर विजय मिळवणार आहे असे या स्तवनात समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की, गणेशाच्या कृपेचे सामर्थ्य इतके अफाट आहे की, त्याच्या कृपेने माणसाचे अज्ञान तर विरघळून जातेच, पण संपूर्ण विश्व गिळून टाकणारा ‘काळ’ सुद्धा त्याच्या दास्यात (गुलामगिरीत) येतो.
या स्तवनात समर्थ गणरायाच्या विघ्नहर रूपाचेही वर्णन करतात. समर्थ म्हणतात की, गणेशाच्या केवळ नामस्मरणाने सर्व प्रकारची संकटे आणि बाधा थरथर कापत दूर पळून जातात, म्हणूनच त्याला ‘विघ्नहर’ किंवा अनाथांचे माहेर म्हटले आहे.
याठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाच्या सगुण रूपाचे विलोभनीय वर्णन केलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी गणेशाच्या सगुण रूपाचे अत्यंत चित्रमय आणि सुंदर शब्दांकन केले आहे. गणेशाची प्रसन्न व भव्य मूर्ती त्यांच्या डोळ्यांपुढे आहे. श्री गणेश हे सदा आनंदात डुलणारे, गंडस्थळावरून मद (अद्भूत सुगंधी द्रव) गळणारे आणि सदैव प्रसन्न वदनाचे आहेत. त्यांची मूर्ती भव्य, महाप्रचंड आणि विस्तीर्ण मस्तकावर शेंदूर चर्चिलेली किंवा लेपलेली अशी आहे.
गणेशाच्या अलंकार व मुकुटाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, त्यांच्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळाळत आहे, ज्यातून नानाविध रंगांच्या किरणोत्सर्गाची कीळ पसरते. कानातील कुंडले आणि नीळमणी चमकत असतात. गणेशाच्या विविध अवयवांचे वर्णन करताना या समासात समर्थ म्हणतात की, पांढरे शुभ्र सुदृढ दात, सोटासारखी लांब सरळ किंवा मुरडलेली सोंड, लहान चंचल डोळे आणि पंख्यासारखे हलणारे मोठे कान (कर्णथापा) यांमुळे त्यांचे रूप अधिकच खुलून दिसते.
गणेशाच्या भोवती असलेले नागबंध व आभूषणे याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, त्यांच्या मोठ्या सुटलेल्या पोटाभोवती (लंबोदर) जिवंत नाग वेढा घालून बसलेला असतो आणि तो फणा काढून फुत्कार टाकत असतो. गळ्यात सुंदर फुलांच्या माळा आणि हृदयावर रत्नजडित पदक शोभून दिसते.
त्याचप्रमाणे गणेशाच्या नृत्यकला निपुणतेबाबत समर्थ म्हणतात की, गणेश हे चंचल व अत्यंत नटखट स्वरूपात विविध छंदांनी नृत्य करतात, ज्यांचे लावण्य पाहून सर्व देवही तटस्थ (थक्क होऊन) पाहत राहतात. असे अत्यंत सुंदर आणि अद्भूत असे वर्णन या गणेश स्तवन नाम समासात रामदास स्वामी करतात.
समर्थ इथेच थांबत नाहीत, तर ते या समासात गणेशोपासनेचे महत्त्व आणि फळश्रुती पण सांगतात. या समासाच्या शेवटी समर्थ गणेशाच्या उपासनेचे महत्त्व सांगताना म्हणतात की, याच्या स्तवनाने बुद्धीचा विकास होतो. हे बुद्धीचे दैवत आहे. ज्या लोकांची बुद्धी मंद असते, जे लोक अज्ञानी, हीन किंवा अवलक्षणी असतात, ते जरी गणेशाचे चिंतन करू लागले तरी ते सर्व विद्यांमध्ये (विशेषत: चौदा विद्या आणि ६४ कलांमध्ये) प्रवीण, हुशार व तार्किक बनतात.
कोणत्याही कार्यसिद्धीसाठी गणेशाचे महत्त्व खूप आहे. आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना श्रीगणेशाने केली असे म्हणतो. त्यामागे कार्य सिद्धी होणे अभिप्रेत असते. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना श्री गणेशाचे ध्यान व वंदन केल्यास कोणतीही बाधा किंवा अडथळा येत नाही आणि कार्य यशस्वी होते, याचा विश्वासच समर्थ रामदास या समासात देतात. दासबोधातील पहिल्या दशकातील या दुसºया समासात समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाच्या बाह्य सौंदर्याचे जसे डोळ्यांत भरण्यासारखे वर्णन केले आहे, त्याचबरोबर त्याच्या आंतरिक व आध्यात्मिक सामर्थ्याद्वारे मानवाचे अज्ञान कसे नष्ट होते, याचे विलक्षण दर्शन घडवले आहे.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment