दासबोधाच्या चौथ्या दशकातील दुसºया समासात रामदास स्वामींनी कीर्तन भक्ती म्हणजे काय? हे सांगितले आहे. ‘कीर्तन’ म्हणजे भगवंतांचे गुण, नाम, रूप आणि लीला यांचे प्रेमाने गाऊन आणि आनंदाने वर्णन करणे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीनंतर कीर्तन भक्तीचा क्रमांक लागतो. श्रवणाने जो विचार मनात रुजतो, तोच विचार कीर्तनाच्या माध्यमातून प्रकट होतो. समर्थ रामदास स्वामी यांच्या मते, कीर्तन हे केवळ संगीत किंवा गायन नसून, तो ईश्वराशी संधान साधण्याचा आणि समाजाला सन्मार्गावर आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच आपल्याकडे म्हटले आहे की, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनात परिवर्तनाची ताकद आहे.
सर्वात प्रथम कीर्तन भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व समजून घेतले पाहिजेत. आपल्याकडे दोन प्रकारची कीर्तने होतात. एक नारदीय कीर्तन आणि दुसरे वारकरी कीर्तन. नारदीय कीर्तनात कीर्तनकार आणि त्याचे साथीदार फक्त तबला आणि पेटीवादक असतात. तो स्वत: टाळ किंवा चिपळी हातात घेऊन कीर्तन करतो. वारकरी कीर्तनात सामूहिक अविष्कार असतो. कीर्तनकार एक असतो आणि गायक आणि समुहात साथ देणार बाजूला उभे असतात. पण दोन्हीचा उद्देश मात्र भक्ती आणि ज्ञानदान हाच आहे.
या भक्तीत भाव आणि भक्तीचा आविष्कार महत्त्वाचा असतो. कीर्तनात केवळ बुद्धीचा खेळ नसतो, तर त्यात हृदयातील निखळ भाव असतो. जेव्हा भक्त भगवंताच्या नामाचा आणि कथांचा जयघोष करतो, तेव्हा त्याच्या मनातील संशय आणि निरुत्साह दूर होतो. त्यामुळेच वातावरण आणि समाज शुद्धी करण्याचे काम कीर्तनातून होते. कीर्तनामुळे केवळ कीर्तनकाराचाच उद्धार होत नाही, तर ते ऐकणाºया संपूर्ण श्रोतृवृंदाचे मन पवित्र होते. जिथे हरिचे नाव गुंजते, तिथली नकारात्मकता नष्ट होते. कीर्तनामुळे अहंकाराचा विलय होतो. सगळ्यांसमोर भगवंताचे गुणगान करताना माणसातील संकोच आणि अहंकार गळून पडतो. भगवंताच्या प्रेमात तल्लीन होऊन गाणे हा अहंपणा घालवण्याचा उत्तम मार्ग आहे.
समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरूपण हे फार वेगळे आणि अद्वितीय असे होते. समर्थ रामदास स्वामींनी कीर्तनाला खूप मोठे सामाजिक आणि अध्यात्मिक महत्त्व दिले आहे. त्यांनी उत्तम कीर्तनकाराची लक्षणे काय आहेत हे पण सांगितले आहे. कीर्तन करणाºया व्यक्तीकडे ज्ञान, विवेक आणि अंगी नम्रता असावी. त्याने केवळ लोकरंजनासाठी किंवा पैशांसाठी कीर्तन करू नये, तर ईश्वराच्या आणि समाजाच्या उद्धाराच्या भावनेने करावे, असे समर्थ सांगतात.
कीर्तनातून विवेक आणि अध्यात्माची सांगड घालता येते. कीर्तनात केवळ कथा नसाव्यात, तर त्यात अध्यात्मज्ञान आणि व्यावहारिक नीतिमत्ता यांची सांगड असावी, जेणेकरून लोकांचा अज्ञानरूपी अंधार दूर होईल. म्हणून तर ज्ञानदीप लावू जगी असे म्हटले जाते. कीर्तनाची तीच तर खरी ताकद आहे. यासाठीच राष्ट्रोद्धारासाठी राष्ट्रीय कीर्तनकार निर्माण झाले. गोविंदस्वामी आफळे, कोपरकरबुवा अशा अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांनी झोपलेल्या समाजाच्या मनात राष्ट्रभक्ती जागवली. स्वातंत्र्य प्राप्तीसाठीही कीर्तनाचा वापर समाजप्रबोधनासाठी झालेला होता. आणीबाणीच्या काळात अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधन केले होते. इंदिरा गांधींनी अनेक कीर्तनकारांना अटकही केली होती. पण जुलमी हुकुमशाही सत्ता उलथून टाकण्याचे सामर्थ्य याच कीर्तनकारांनीही केले होते. कारण ती समर्थांची प्रेरणाच होती. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे असेच ते म्हणत होते. आजही अंधपणे एखाद्या कळपात शिरून अनागोंदी माजवणारी प्रवृत्ती राजकारणात शिरत असताना समाज प्रबोधन करण्यासाठी या कीर्तन भक्तीचा प्रसार होणे गरजेचे आहे. भरकटलेल्या व्यसनाधीन, बाहेरच्या देशातील पैशावर मजा मारून इथली लोकशाही खिळखिळी करू पाहणाºया प्रवृत्तीमागे जर जेन-झी लागत असेल तर त्यांचे प्रबोधन करण्याचे काम कीर्तन भक्तीतून होऊ शकते. कारण यात खूप मोठे सामर्थ्य आहे.
कीर्तनाचा मुख्य उद्देश भक्तीचा प्रसार करणे हा आहेच. कीर्तन हे भक्तीचा प्रसार करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. संतांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच समाजातील विषमतेवर प्रहार केला आणि भक्तीचा मार्ग सर्वांसाठी मोकळा केला. म्हणून तर वारीच्या मार्गावर कीर्तन भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी मानवता धर्माची स्थापना करण्यासाठी आणि जातीभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी, भेदभाव विरहीत समाजनिर्मितीसाठी कीर्तन भक्तीच स्वीकारली होती. असंतोषाची कीर कीर सगळीकडे असेल, सुजाण समाज कुरकुरत असेल तर त्याचे तन, मन आणि चित्त थाºयावर आणण्यासाठी कीर्तन हे प्रभावी ठरते.
कीर्तन भक्तीचे फलित हे फार विशेषत्वाने मिळते. कीर्तन भक्तीमुळे माणसाचे मन निर्भय बनते. माणसाला ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते. मनातील विषयांची आवड कमी होऊन ईश्वरी प्रेमाची गोडी लागते. थोडक्यात कीर्तन भक्ती ही स्व-उद्धारासोबतच पर-उद्धार (दुसºयांचा उद्धार) करणारी भक्ती आहे. म्हणूनच समर्थांनी या भक्तीचे महात्म्यही दासबोधातील चौथ्या दशकातील दुसºया समासात सांगितले आहे.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment