Wednesday, August 19, 2026

अर्चन भक्ती (दशक ४ समास ५)


समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातील चौथ्या दशकातील पाचव्या समासात अर्चन भक्ती म्हणजे काय? हे सांगितले आहे. ‘अर्चन’ म्हणजे ईश्वराची पूजाअर्चा करणे. देवाच्या मूर्तीला किंवा प्रतीकाला फुले, पत्री, चंदन, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून शास्त्रोक्त किंवा भावपूर्ण पद्धतीने पूजन करणे म्हणजेच अर्चन भक्ती. समर्थ रामदास स्वामी यांनी या समासात बाह्य पूजेसोबतच मानस पूजेचे (मनाने केलेल्या पूजेचे) देखील महत्त्व सांगितले आहे. खरे तर मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ आहे. पण चित्त स्थिर होण्यासाठी आपल्याला मूर्ती आणि अन्य प्रतीकांची गरज असते.


समर्थ रामदास स्वामींनी अर्चन भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व या समासात वर्णन केले आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम सगुण पूजेचे महत्त्व इथे विषद केलेले दिसते. सामान्य माणसाला निराकार ईश्वरावर ध्यान लावणे कठीण जाते. म्हणूनच सगुण (मूर्ती किंवा चित्र) रूपाची पूजा केल्याने मनाला एक आकार मिळतो आणि एकाग्रता साध्य होते. मनुष्य एकाग्र होतो तेव्हाच तो चालू शकतो. लहान मूल आधी सरकते, मग रांगते, मग आपण त्याला वॉकर देतो. हा वॉकर चालण्याची सवय लावतो. हळहळू आपण वॉकर काढतो आणि लहान मूल चालायला लागते. अगदी त्याप्रमाणे मन एकाग्र होण्यासाठी मूर्तीची गरज असते. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे ही अर्चन भक्तीची अपेक्षा आहे.

सगुण-साकार पूजा करणे म्हणजे अर्चन भक्ती. अर्चन भक्तीमध्ये ईश्वराच्या सगुण रूपावर ध्यान केंद्रित करून त्यांची विविध उपचारांनी (षोडशोपचार पूजा) सेवा केली जाते. या १६ उपचार (षोडशोपचार) यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध (चंदन), पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, परिक्रमा आणि वंदन या १६ क्रियांद्वारे ईश्वराची पूजा केली जाते. याशिवाय पंचोपचार पूजाही करता येते. वेळ किंवा साधनांचा अभाव असल्यास केवळ ५ गोष्टींनीही अर्चन केले जाते, यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य.


याने चित्तशुद्धी आणि एकाग्रता साधता येते. पूजेतील विविध क्रिया आणि मंत्रोच्चार यामुळे मन भटकणे थांबते व ईश्वराच्या चरणी एकाग्र होण्यास मदत होते. अर्चन भक्तीत बाह्य साहित्यापेक्षा समर्पणाची भावना सर्वांत महत्त्वाची मानली जाते. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं’ या न्यायाने अगदी बाहेरील कोणतेही साधे फूल किंवा पाणी अर्पण केले तरी ते भक्तिभावाने स्वीकारले जाते.

पुराणकाळात राजा पृथूने अर्चन भक्ती केली होती. श्रीमद्भागवतानुसार राजा पृथू यांनी उत्कृष्ट अर्चन भक्ती करून भगवंतांची कृपा प्राप्त केली होती. त्याचप्रमाणे अंबरीष राजानेही अशीच अर्चन भक्ती केलेली होती. राजा अंबरीष यांनीही आपल्या सर्व इंद्रियांचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी व अर्चनासाठी केला होता.


अर्चन भक्तीमध्ये सात्त्विकता आणि शिस्त असते. पूजा करताना घर किंवा परिसर स्वच्छ केला जातो, ताजी फुले आणली जातात, यामुळे जीवनात सात्त्विकता, स्वच्छता आणि शिस्त येते. याशिवाय अर्चन भक्तीमध्ये सद्भावना आणि अर्पण भाव दिसून येतो. देवाला उत्तम वस्तू अर्पण करताना माणसातील लोभ कमी होतो आणि ‘सर्व काही ईश्वराचेच आहे’ ही भावना दृढ होते. समोर ईश्वराची मूर्ती असेल तर ती जास्तीत जास्त छान कशी दिसेल, ती कशी सजवली जाईल, फुलांनी ती शोभिवंत कशी होईल? रांगोळीने ती सजवली कशी जाईल हे सगळे या भक्तीत दिसून येते. सगळे चांगले करणे आणि दीप लावून उजळवणे, प्रकाशमान करणे हे अर्चन भक्तीचे वैशिष्ट्य आहे.

चौथ्या दशकातील या समासात समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरुपण फार महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी पूजेतील भावनेला जास्त महत्त्व दिले आहे. पूजा करताना भक्तिभावाची गरज असते. पूजेचे साहित्य किती महागडे आहे यापेक्षा भक्ताचा भाव किती शुद्ध आहे, याला ईश्वर महत्त्व देतो. भाव नसेल तर ती केवळ एक रूढी किंवा देखावा ठरतो. पूजेत कधीही अवडंबर असता कामा नये तर भक्ती असली पाहिजे. यासाठीच अर्चन पूजेतच मानसपूजेचे महत्त्व समर्थ इथे दाखवून देतात.


मानसपूजा (अंतरंग पूजा) ही अत्यंत महत्त्वाची आहे. जर बाह्य साहित्य उपलब्ध नसेल, तर मनाने ईश्वराची सुंदर मूर्ती कल्पून तिला हृदयात आसन देणे, कल्पनेनेच तिची पूजा करणे ही ‘मानसपूजा’ श्रेष्ठ मानली जाते. इथे सर्वभूती ईश्वरभाव असतो. मूर्तीची पूजा करतानाच, सर्व प्राणिमात्रांमध्ये तोच ईश्वर वसलेला आहे याचे भान ठेवून व्यवहार करणे म्हणजेच खरी अर्चन भक्ती.

समर्थ रामदास स्वामींनी अर्चन भक्तीचे फलितही या समासात सांगितले आहे. ते म्हणतात, अर्चन भक्तीमुळे माणसाचे मन शांत, पवित्र आणि प्रसन्न राहते. ईश्वराप्रति आदर आणि वात्सल्याची भावना वाढीस लागते. थोडक्यात सांगायचे तर श्रद्धेने आणि शुद्ध भावाने ईश्वराला समर्पित होऊन केलेली पूजा हीच अर्चन भक्ती आहे.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: