आपला देश विशेषत: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत हे आपल्या परमार्थातील फार मोठे माध्यम आहेत. म्हणूनच दासबोधातील पहिल्या दशकातील पाचव्या समासात समर्थ रामदास स्वामी संतांचे स्तवन करतात. समर्थ म्हणतात, परमार्थाचा आधार असणाºया सज्जनांना म्हणजेच संतांना मी आता नमस्कार करतो. सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान गुप्त असते. संतांच्या अस्तित्वामुळे लोकांमध्ये ते प्रकट होते. परमात्मवस्तु अतिशय दुर्लभ आहे. ती मिळणे हाच खरा अलभ्य लाभ असतो. ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने सुलभरीतीने लाभते.
समर्थ इथे वर्णन करतात की, खरे सांगायचे म्हणजे ती आत्मवस्तू अगदी उघड आहे. पण देहबुद्धीने पाहू म्हटले तर ती कोणासच दिसत नाही. ती प्राप्त व्हावी म्हणून नाना प्रकारच्या साधनांचे कष्ट केले तरी ती अनुभवाला येत नाही. अनेक वस्तू ओळखून काढणारे चांगले पारखी आत्मवस्तूच्या बाबतीत फसतात. डोळे असून देखील तेथे म्हणजे आत्मवस्तू पाहण्याच्या बाबतीत आंधळेपणाचा अनुभव येतो. पाहण्याचा प्रयत्न करीत असूनसुद्धा स्वत:पाशीच असणारी ती वस्तू माणसे पाहायला चुकतात. दिव्याच्या प्रकाशाने ती दिसत नाही. अनेक प्रकारच्या इतर प्रकाशांनी ती सापडत नाही. डोळ्यात अंजन घालून पाहू गेले तरी ती नजरेसमोर येत नाही. सोळा कळांनी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आत्मवस्तू दाखवू शकत नाही. इतकेच नव्हे तर प्रकाशाच्या सगळ्या कळा ज्याच्यापाशी आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तू दाखवू शकत नाही. कोळ्याच्या अंगातून बाहेर येणारा अत्यंत बारीक धागा सूर्याच्या प्रकाशाने दिसतो. अणु व रेणूसारखे अतिशय बारीक पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने दिसतात. इतकेच काय, पण केसांचे टोक चिरले तर तेसुद्धा सूर्यप्रकाशाने दिसते. हे जरी खरे असले तरी त्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसू शकत नाहीत. ती वस्तू संतांच्या कृपेने साधकाला प्राप्त होते.
इथे रामदास स्वामी म्हणतात, वाणी, मन व बुद्धी यांच्या शक्तीच्या पलीकडे आत्मवस्तू आहे. आत्मवस्तूचे स्वरूप असे आहे की, तिच्यापुढे साºया शंका मावळतात, प्रयत्न वाया जातात; तर्काच्या साहाय्याने ती जाणायला गेल्यास तर्कच क्षीण होऊन जातो. तसेच विवेकाने तिचा शोध घेऊ म्हटले तर विवेक लुळा पडतो. शब्द स्फुरणे बंद पडते, आणि चंचल मनाची धडपड उपयोगी पडत नाही. पुराणांतरी असे वर्णन आहे की, शेषाला हजार तोंडे आहेत आणि प्रत्येक तोंड बोलू शकते. अर्थात, त्याचा बोलकेपणा सर्वांच्यापेक्षा अधिक आहे. परंतु परमात्मवस्तू एवढी अपार आहे की, तिचे स्वरूपवर्णन करता करता तोही थकून गप्प बसला. जगातील सर्व ज्ञान वेदाने प्रकाशात आणले असे ज्ञानी माणसे सांगतात. वेदांमध्ये नाही असे कांही नाही. असा सर्वज्ञ वेददेखील आत्मवस्तू कोणास दाखवू शकत नाही.
संतांची महती सांगताना समर्थ म्हणतात, सत्संगाने स्वानुभव येतो व ती वस्तू कळते. संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते. त्या सत्संगाचा महिमा शब्दांनी सांगणारा माणूस जगात नाही. मायेच्या अंगी अनेक विचित्र व अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला आणि शक्ती तिच्यापाशी नाही. मायेच्या पलीकडे असणाºया अनंत परमात्मवस्तूच्या प्राप्तीचा सोयीचा उपाय फक्त संतच सांगू शकतात.
इथे रामदास स्वामी संतांचे सांकेतिक वर्णनही करतात. ते म्हणतात, संत आत्मस्वरूपच असतात. आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही. म्हणून तेथे शब्द कामास येत नाहीत. हे जरी खरे तरी संत कसे असतात त्याचे खुणेने वर्णन करता येईल. संत परमानंदाचे स्थान, संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे मूळ असतात. संतांपाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते. भक्तीचे पर्यवसान झाले की संतपण येते.
संत हा तीर्थाप्रमाणें धर्माला जगवतो. संताचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच आहे. संताचा देह म्हणजे पुण्य साठविण्याची पवित्र जागाच असते. संताच्या देहरूपी मंदिरांत समाधीरूपी देवता वास करते. संतांच्या अंतरात उत्तम विचारांचे मोठे भांडार भरलेले असते. संतांचे जीवन म्हणजे सायुज्यमुक्तीचे विश्रांतिस्थात असते. काही झाले तरी संत सत्याला कधीही सोडत नाहीत. संताचे चरित्र म्हणजे सफल जीवनाचे दृश्य रूप असते. संतांची भेट होणे म्हणजेच आत्मवस्तू प्राप्त होण्याची वेळ आपणहून चालत येणे असे समजावे, हे समर्थ इथे पाचव्या समासात सांगतात.
समर्थ म्हणतात, संत मोठें श्रीमंत असतात. मोक्षरूपी संपत्तीने ते श्रीमंत बनतात. असंख्य दरिद्री जीवांना ही मोक्षलक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले, अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनीं आत्मज्ञानसंपन्न केले. संत मोठे सामर्थ्यवान असतात व अत्यंत उदारपणे आपले सामर्थ्य दुसºयाला साहाय्य करण्यासाठी वापरतात. ते विलक्षण दानशूर असतात. अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल. अर्थात, त्यांच्याकडूनच आत्मज्ञान मिळणे शक्य असते. आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराजे व चक्रवर्ती राजे झाले, सध्या आहेत व पुढे होतील. परंतु यांपैकी कोणी सायुज्यमुक्ती देऊ शकणार नाही.
पहिल्या दशकातील पाचव्या समासाच्या समारोपात समर्थ म्हणतात, त्रैलोक्यात शोधले तरी सापडणार नाही असे अलौकिक दान संत देत असतात. त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दांनी वर्णन करावा. जे परब्रह्म या दृश्य विश्वाहून निराळे आहे, वेद व श्रुती ज्याला जाणू शकत नाहीत ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाच्या अंत:करणात प्रगट होते. हा संतांचा महिमा आहे. तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्याव्या त्या सगळ्या अपुºया पडतात. संतांमुळे मुख्य परमात्मा प्रगट होतो.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment