दासबोधातील चौथ्या दशकातील सहाव्या समासात समर्थ रामदास स्वामींनी वंदन भक्ती म्हणजे काय? हे सांगितले आहे. ‘वंदन’ म्हणजे नम्रतेने नमस्कार करणे. ईश्वराला, गुरूंना, संतांना, माता-पित्यांना आणि या जगतातील प्रत्येक जीवाला आदराने नमन करणे म्हणजेच वंदन भक्ती. समर्थ रामदास स्वामींच्या मते, वंदन हे केवळ शरीराने वाकणे नसून, ते हृदयातील नम्रतेचे प्रतीक आहे.
ज्यांच्यात अशी नम्रता नसते ते वंदन करायला, वंदे मातरम्ला विरोध करतात. वंदे मातरम् किंवा वंदन करायला तयार नसतात ते अहंकाराचा संचय करतात. तर वंदन करण्याची इच्छा आहे ते अहंकाराचा त्याग करत असतात. या वंदन भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व काय आहे? तर सर्वात प्रथम अहंकारावर प्रहार करणे. माणसाच्या विनाशाचे मुख्य कारण त्याचा ‘अहंकार’ असतो. जेव्हा माणूस दुसºयासमोर किंवा ईश्वरासमोर वाकतो, तेव्हा त्याचा ताठरपणा नष्ट होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुणांचा अंगीकार यातून होतो. ज्याप्रमाणे पाणी नेहमी सखल (खोल) भागात साचते, त्याचप्रमाणे ज्ञानाची आणि कृपेची प्राप्ती नेहमी नम्र व्यक्तीलाच होते. वंदन भक्ती ही ज्ञानप्राप्तीची पायरी आहे.
याशिवाय सलोखा आणि प्रेम राखण्यासाठी वंदन महत्त्वाचे असते. सगळ्यांशी आदराने आणि नम्रतेने वागल्यामुळे समाजात प्रेम, शांतता आणि सलोखा निर्माण होतो. आजकाल विरोधकांना तिरस्काराचे राजकारण करून सामाजिक जातीय सलोखा मोडून काढायचा आहे. त्यामुळे तिरस्काराचे, नकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम विरोधक करताना दिसतात. अर्वाच्य भाषेत टीका करून विरोधक तिरस्काराचे वातावरण निर्माण करून सामाजिक तणाव निर्माण करतात. अशा परिस्थितीत नम्रतेने वागणे आणि हात जोडून समोरच्याचे मन जिंकणे सहज शक्य असते. हात जोडणे म्हणजे अहंकाराला झटकणे आहे. नमस्कारात नमन आहे, वंदन आहे. नम्रता आहे. जिथे नम्रता आहे तिथे आनंद आहे. त्यामुळे वंदन भक्तीचेही फार महत्त्व आहे.
समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक भूमिका या भक्ती प्रकाराबाबत समजून घेतली पाहिजे. समर्थांनी वंदन भक्तीचे सूक्ष्म अर्थ स्पष्ट केले आहेत. त्यांनी सांगितले आहे की, कायिक, वाचिक आणि मानसिक वंदन करायला पाहिजे. कायिक म्हणजे शरीराने वाकून नमस्कार करणे. वाचिक म्हणजे गोड आणि नम्र शब्दांत संवाद साधणे. तसेच मानसिक म्हणजे मनात कोणाबद्दलही द्वेष न ठेवता सर्वांप्रति आदर बाळगणे. यातून खरा हा भक्तिमार्ग पूर्ण होतो.
यासाठी सर्वव्यापी ईश्वरभाव जाणला पाहिजे. केवळ मंदिरातील देवालाच नमस्कार करायचा आणि बाहेर माणसांचा तिरस्कार करायचा, हे खोटे वंदन आहे. प्रत्येक जीवात ईश्वर आहे हे ओळखून सर्वांना वंदन केले पाहिजे. हा खरा मानवता धर्म आहे.
नम्रतेची ताकद खूप मोठी आहे. नम्रता आहे तिथे विजय आहे. एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन अशी अहंकाराची राजकीय भाषा करणारे कोलमडून पडतात, पराभूत होतात. पण नम्रता अंगी असेल तर ते देवेंद्र होतात. ही नम्रतेची ताकद आहे. नम्रता हा दुबळेपणा नसून ते ज्ञानाचे लक्षण आहे. म्हणूनच वंदनामुळे क्रोधावर विजय मिळवता येतो.
या वंदन भक्तीचे फलित काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वंदन भक्तीमुळे माणसाला सार्वत्रिक आदर आणि प्रेम मिळते. शत्रूही मित्र बनतात आणि अंत:करण पूर्णपणे शांत होते. थोडक्यात मनातील ताठरपणा सोडून सर्वत्र ईश्वर पाहून नम्र होणे हीच वंदन भक्ती आहे. वंदन भक्ती ही नवविधा भक्तीतील (भक्तीचे नऊ प्रकार) एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ईश्वर, गुरू, संत किंवा ज्येष्ठांसमोर लीन होऊन, स्वत:चा अहंकार बाजूला सारून नतमस्तक होणे म्हणजेच ‘वंदन’ होय. वंदनाद्वारे साधक आपले मन, बुद्धी आणि शरीर ईश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे ‘मी सर्व काही करतो’ हा भाव संपून ‘सर्व काही ईश्वरच करत आहे’ ही भावना दृढ होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. श्रद्धापूर्वक आणि आदराने मारलेल्या साष्टांग नमस्कारामुळे किंवा वंदनामुळे मनात शांतता, प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
आदर आणि सन्मानाची संस्कृती यातून निर्माण होते. वंदन भक्ती केवळ देवापुरती मर्यादित नसून, आई-वडील, गुरू आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची शिकवण देते, ज्यामुळे जीवनात संस्कार आणि मूल्यांचे जतन होते. थोडक्यात सांगायचे तर, वंदन भक्ती ही मानवाला अहंकारापासून मुक्ती देऊन ईश्वरी कृपेचा आणि आत्मशांतीचा मार्ग दाखवणारी एक सोपी व प्रभावी भक्ती आहे.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment