मनाच्या श्लोकात जसे गणाधीश जो ईश सर्वागुणांचा या पहिल्याच श्लोकात गणेशानंतर नमू शारदा मूळ चत्वारवाचा असे म्हणून शारदेचे स्मरण केले आहे. त्याचप्रमाणे दासबोधात दुसºया समासात गणेशाचे स्तवन केल्यानंतर तिसºया समासात शारदेचे म्हणजे सरस्वतीचे स्तवन केलेले आहे.
या समासात त्यांनी शारदेचे मूळ स्वरूप सांगितले आहे. तिचे वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात की, वेदांची आई, ब्रह्मदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्रीशारदा तिला मी नमस्कार करतो. हे सरस्वतीचे पूर्ण स्वरूप आपल्याला या वर्णनात दासबोधात दिसून येते.
त्यानंतर समर्थ रामदास स्वामी शारदा काय करते याकडे लक्ष वेधतात. ते सांगतात की, तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात, वैखरीने अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दांचे अंतरंग मंजे स्पष्ट करून दाखविते. त्याचप्रमाणे या समासात समर्थ जीवनात शारदा कुठे कुठे आढळते, याबाबत भाष्य करतात. ते म्हणतात की, योग्यांच्या समाधीमध्ये व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते. विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशा करते. आदिपुरुष जो ईश्वर त्याची ती भार्या आहे. ईश्चराशी अत्यंत निकट असता भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच आहे. तिच्या जोरावरच साधु पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रगत होते. ईश्वराची स्वत:ची ही शक्ती अत्यंत वासनारहित अवस्थेचे सौंदर्य समजतात.
यानंतर समर्थ या समासात शारदेचे सामर्थ्य समजावून सांगतात. शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि गंमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते. पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपांत लीन होऊन लपून बसते. इंद्रियांनी पाहू लागले तर ती दिसते, पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही. म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही. तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही.
समर्थ सांगतात की, शारदेचे विविध रंगी रूप आहे. विश्वरूपी नाटकांतील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचविते. जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती म्हणजे साक्षात तीच आहे. ज्ञानांमध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून, तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो.
शारदेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते, परब्रह्मरूप सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहय्याने ती नाहीसा करते. शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलांत मंगल अशी अमृतरूपी सतरावी जीवनकलाच ती आहे. लावण्यखाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे. अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते, त्याच्या संकल्पांचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरूकृपा ती हीच आहे. परमार्थाचे साधन करणाºया साधकाला आत्मानात्मविवेकाने शारदा आत्मस्वरुपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवणमनाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते. अशा प्रकारे पुष्कळ रूपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू आणि पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामी चार प्रकारे साचलेली आढळते.
समर्थ या समासात इथेच थांबत नाहीत तर हे घडणारे कर्तृत्व सगळे शारदेचे असल्याचे सांगतात. माणसाच्या अंत:करणाला परा, पश्यंती व मध्यमा या तीन वाणींमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दांत प्रगट होते. शब्दाने सर्व व्यवहार चालतो. म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालते. शारदा ब्रह्मादिकांची आई आहे. विष्णु शिव तिच्या पोटी जन्मतात. तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना एका शारदेचाच विस्तार आहे असे येथे वर्णन करतात.
त्यानंतर साधकाच्या जीवनात शारदेचे स्थान कुठे आहे याची जाणिव समर्थ करून देतात. ते सांगतात की, शारदा परमार्थाचे मूळच आहे, इतकेच नव्हे तर केवळ अत्म्विद्याच आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था असते. योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला शिकविणारी आणि सिद्धांच्या अंत:करणात समाधीरूपाने स्थिर होणारी तीच प्रत्यक्ष शारदाच असते.
शारदेचे स्वरूप आकलन झाले की, निर्गुणाची ओळख होते व स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते. सर्व दृश्य आकारांत ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती, इत्यादि ग्रंथ सारखे शारदेचेच स्तवन करतात. सगळी माणसेदेखील नाना रूपांनी तिलाच स्तुती अर्पण करतात. यानंतर समर्थ शारदेचे माहात्म्य वर्णन करताना, शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. वास्तविक परमात्मस्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द तेथे पोहोचूच शकत नाही. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून ‘परमात्मा’ असे नाव देणारी, उपमेच्या पलीकडे असणाºयाला उपमेच्या प्रांतांत आणणारी ही शारदा आहे. परमात्मास्वरूप ‘मी आहे’ अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे. मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धी आणि निश्चित बुद्धीरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांची भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाºया ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती आणि जीवन्मुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच आहे.
शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची किंवा ईश्वराची माया आहे. तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही. स्वत:ला ज्ञानी समजणाºया मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक गुंतवते. डोळ्यांनी जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे जे कल्पिता येते ते सगळे हिचेच रूप समजावे. भगवंताचे स्तवन असो, भजन असो किंवा त्याची भक्ती असो, शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही. माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल असे समर्थ येथे सांगतात. म्हणून शेवटी थोरांपेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणाºया शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तादात्म्यानेच मी नमस्कार करतो असे या समासात समर्थ म्हणतात.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment