जेव्हा एखाद्या उद्योजकाला त्याच्या पहिल्या बिलाचे पेमेंट मिळते, तेव्हा त्याला आत्मविश्वास वाटतो की त्याच्या कल्पनेला ग्राहक मिळाला आहे. जेव्हा त्याची कंपनी कर्मचाºयाला पहिला पगार देते, तेव्हा ती दुसºया कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावते. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) प्रगतीने लोकांच्या उदरनिर्वाहाला आधार दिला पाहिजे. अलीकडेच, इंडिया एआय मिशनने तीन स्वदेशी एआय मॉडेल्स सादर केले आहेत. या स्वदेशी एआय मॉडेल्सचा आर्थिक फायदा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना मिळेल. यासाठी कंपन्यांना व्यवसाय सुरू करण्याचा खर्च कमी करणे, नवीन ग्राहक मिळवणे आणि पुन्हा पुन्हा व्यवसाय मिळवणे आवश्यक असेल.
स्वदेशी एआयने नवीन व्यवसाय सुरू करणे परवडणारे बनवले पाहिजे. जे उद्योजक तयार मॉडेल्सना त्यांच्या गरजेनुसार जुळवून घेतात, ते त्यांच्या मर्यादित भांडवलाचा मोठा भाग ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुंतवू शकतात. यामुळे, एखाद्या विशिष्ट व्यवसायाचे किंवा स्थानिक बाजारपेठेचे ज्ञान असलेल्यांना त्यांच्या अनुभवाचे व्यवसायात रूपांतर करणे सोपे होईल. उदाहरणार्थ, मुंबईमधील एका अकाउंटंटला लहान दुकानदारांना अकाउंटिंगमध्ये येणाºया आव्हानांची जाणीव आहे. ती एका सॉफ्टवेअर डेव्हलपरसोबत मिळून अशी सेवा तयार करू शकते, जी बिले व्यवस्थित लावते, मराठी, हिंदीमध्ये अकाउंटिंग समजावून सांगते आणि संभाव्य चुका तपासण्यासाठी सूचना देते. तिचे ज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास ही तिची ताकद असेल. सॉफ्टवेअर योग्यरीत्या कार्य करणे, नोंदी सुरक्षित असणे आणि ग्राहक पैसे देण्यास तयार असणे हे देखील महत्त्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी, लहान व्यवसायांना वापराच्या स्पष्ट अटी, पूर्वनिश्चित शुल्क आणि तांत्रिक साहाय्य मिळाले पाहिजे. सरकारी कार्यक्रमांनी त्यांना ग्राहकांच्या समस्यांवर त्यांची उत्पादने तपासण्यास मदत केली पाहिजे. व्यवसायांना आवश्यक असल्यास त्यांचा डेटा परत मिळवता आला पाहिजे आणि सेवा प्रदाते बदलता आले पाहिजेत. असे व्यवसाय देशाच्या एआय संशोधनाला मार्गदर्शनही करू शकतात.
मॉडेल्स ग्राहकांची भाषा किंवा कार्यपद्धती समजण्यात कुठे कमी पडतात, हे उद्योजक अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील. उपयुक्त सेवांमधून मिळणारा महसूल जसजसा वाढेल, तसतसे अधिक चांगले मॉडेल्स विकसित करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधीही वाढतील. अशा प्रकारे, संशोधन आणि व्यवसाय एकमेकांना पूरक ठरतील. एआयमुळे, तज्ज्ञ सेवा लहान ग्राहकांसाठीही सुलभ होऊ शकतील. जे लहान निर्यातदार अधूनमधून परदेशात माल पाठवतात, त्यांच्यासाठी कागदपत्रांकरिता एक टीम सांभाळणे खर्चिक असते. एक उद्योजक एआयकडून कागदपत्रे तयार करून घेऊ शकतो आणि ती तज्ज्ञांकडून प्रमाणित करून घेऊ शकतो. अनेक निर्यातदारांना ही सेवा पुरवल्याने, तज्ज्ञाचा खर्च विभागला जाईल आणि ग्राहकांना कमी खर्चात मदत मिळेल. यामुळे सेवा खर्च कमी करण्यास वाव मिळेल आणि नफा वाढेल. ग्राहक जसजसे वाढतील, तसतशी व्यवसायातील गुंतवणूक आणि मनुष्यबळाची गरजही वाढू शकते. २०२५ मध्ये ‘क्वार्टर्ली जर्नल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्रकाशित झालेला एक अभ्यास हे स्पष्ट करतो. एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ग्राहकांना मदत करणाºया ५,१७२ कर्मचाºयांच्या अभ्यासात, एआयच्या मदतीने प्रति तास सोडवल्या जाणाºया समस्यांची संख्या सरासरी १५ टक्क्यांनी वाढली. यावरून एआय कमी वेळेत अधिक ग्राहकांना कशी मदत करू शकते हे स्पष्ट होते. स्थानिक भाषांमधील ग्राहक साहाय्य आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा व्यवसायाच्या संधी निर्माण करतात. रोजगाराच्या वाढीचे प्रमाण हे कमी झालेल्या खर्चामुळे मागणी किती वाढते आणि व्यवसायाचा किती विस्तार होतो यावर अवलंबून असेल.
एखादा व्यवसाय शाश्वत राहण्यासाठी, त्याला ग्राहकांकडून पुन्हा पुन्हा काम मिळणे आवश्यक असते. नवीन कंपन्यांसमोर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी कामाची गरज असण्याचे आव्हान असते, परंतु खरेदीदार सर्वप्रथम कामाचा अनुभव मागतात. खुल्या स्पर्धेतून निवडलेल्या कंपन्यांना छोटे प्रकल्प देऊन त्यांची चाचणी घेतली जाऊ शकते. आॅनलाइन सरकारी खरेदी प्लॅटफॉर्म असलेल्या GeM चे ‘स्टार्टअप रनवे’ हे वैशिष्ट्य, नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या कंपन्यांना सरकारी खरेदीदारांपर्यंत पोहोचण्याची संधी देते. याच्या माध्यमातून विभाग विशिष्ट कामांसाठी चाचण्या घेऊ शकतात. अंदाजपत्रक, पेमेंटच्या तारखा आणि गुणवत्तेचे निकष आगाऊ स्पष्ट असावेत. यशस्वी कंपन्यांना मोठ्या कंत्राटांसाठी स्पर्धा करण्याची संधी दिली पाहिजे आणि पेमेंट वेळेवर केले पाहिजे. चाचण्यांमध्ये कामाची अचूकता आणि एकूण खर्च विचारात घेतला पाहिजे. बचतीची गणना करताना, प्रणाली स्थापित करणे, एआय चालवणे, त्याची देखभाल करणे आणि परिणामांची पडताळणी करणे यासाठी लागणाºया कर्मचाºयांच्या खर्चाचाही विचार केला पाहिजे.
वेळ आणि पैशांची बचत सध्याच्या कामाच्या तुलनेत स्वतंत्रपणे मोजली पाहिजे. कामगिरी किंवा पुरस्कारांपेक्षा, सरकारी आणि खासगी ग्राहकांकडून पुन्हा मिळणारे काम हा अधिक विश्वासार्ह निकष आहे. संशोधनासाठी अनुदान, ग्राहक मिळवण्यासाठी आणि विस्तारासाठी हिस्सेदारीच्या बदल्यात गुंतवणूक, आणि निश्चित मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्ज उपयुक्त ठरतील. इंडिया एआय मिशनच्या स्टार्टअप आर्थिक साहाय्याने या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. ज्या उद्योजकांना कंत्राटे मिळाली आहेत, त्यांनी पगार आणि एआय कार्याचा खर्च उचलला पाहिजे, तर नवीन प्रयोग करणाºया उद्योजकांना शिकण्यासाठी आणि जोखीम पत्करण्यासाठी वाव हवा. जेव्हा लोक आपल्या कौशल्यांचा उपयोग करून ग्राहकांचा विश्वास जिंकणारे आणि रोजगार टिकवून ठेवणारे व्यवसाय उभारतील, तेव्हाच भारताला एआयचे पूर्ण फायदे मिळतील.
No comments:
Post a Comment