Sunday, November 29, 2026

दासबोध : दशक ९ : समास ९ : संदेहवारण


श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील दशक ९ वा गुणनिरुपणा यातील नववा समास ‘संदेहवारण’ हा अद्वैत तत्त्वज्ञान, सृष्टीची मिथ्यात्वता आणि विवेकाचे सामर्थ्य स्पष्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा समास आहे. हा समास गुरू-शिष्य (वक्ता-श्रोते) संवादाच्या रूपात आहे. श्रोत्यांच्या मनात निर्माण झालेल्या मूलभूत तात्त्विक शंकेचे म्हणजेच अखंड आणि निर्गुण ब्रह्म असताना हे दृश्य ब्रह्मांड त्यात कसे आले आणि त्याने ब्रह्माला भेदले का? याचे समर्थ अत्यंत तर्कशुद्ध आणि अनुभवाधिष्ठित उत्तर या समासात देतात.


या समासात पहिली श्रोत्यांची शंका म्हणजे, ब्रह्म अखंड तर ब्रह्मांड कसे? (ओव्या १ ते १२) इथे सुरुवातीला श्रोते आपली शंका मांडतात. त्यात ते ब्रह्माचे अखंडत्व याबाबत विचारतात. ब्रह्माला बाजूला सारता येत नाही, त्यात कमी-जास्त करता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत आणि ते भेदताही येत नाही (ओव्या १-३). त्यानंतर सृष्टीचा प्रश्न उपस्थित होतो. मग पर्वत, शिखरे, भूगोल आणि हे अफाट ब्रह्मांड त्या परब्रह्मामध्ये कसे शिरले? पृथ्वी ब्रह्मात आहे की ब्रह्म पृथ्वीमध्ये, असे एकात एक दिसते (ओव्या ४-६). यातील विरोधाभास इथे स्पष्ट करून शंका विचारली जाते. सूक्ष्म ब्रह्माला ब्रह्मांड ‘भेदते’ असे म्हणणे विपरीत वाटते; पण ब्रह्मांड दिसते तर खरे. मग याचे नेमके सत्य काय? (ओव्या ७-११)

यावर समर्थ म्हणजे वक्ता श्रोत्यांना सावध करून संदेहाचे निराकरण करण्यास सज्ज होतो (ओवी १२). यासाठी ते प्रथम आकाशाचा दाखला आणि दृश्य सृष्टीचे स्वरूप (ओव्या १३ ते २२) सांगतात. ब्रह्माचे सूक्ष्म व अचल स्वरूप समजावून सांगण्यासाठी समर्थ आकाशाचे रूपक वापरतात. समर्थ म्हणतात, आकाशात दिवा लावला, तरी तो दिवा आकाशाला बाजूला सारू शकत नाही. जल, तेज, वायू ही भूतेही आकाशाला हलवू शकत नाहीत (ओव्या १३-१४). कठीण पृथ्वीच्याही अणुरेणूत आकाश व्यापलेले असते; जणू काही ते सर्वांग भेदून उरले आहे (ओवी १५).


इथे समर्थ आकाश आणि ब्रह्म यातील फरक सांगतात. ते म्हणतात, जे जडत्वास येते ते नाश पावते, पण आकाश चळत नाही. मात्र, आकाश हे पंचभूतांपैकी एक भूत असल्याने ते ‘अचल ब्रह्म’ नव्हे; तर निर्गुण ब्रह्माची कल्पना सुचवणारा एक अनुमान दाखला आहे. परब्रह्म हे ‘निराभास’ आणि ‘निर्विकल्प’ आहे (ओव्या १६-२१).

त्यानंतर समर्थ या समासात भ्रमाची मिथ्यात्वता आणि ‘सागरातील खसखस’ (ओव्या २३ ते ३१) यावर बोलतात. सृष्टीची उत्पत्ती व लय दाखवताना समर्थ पंचभूतांच्या विलीनीकरणाचा क्रम सांगतात. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ सांगतात, पृथ्वी पाण्यात विरते, पाणी अग्नीत, अग्नी वायूत आणि वायूही पुढे लय पावतो. जे येते आणि जाते ते मिथ्या असते (ओव्या २३-२४).


मग समर्थ या समासात पुढे भ्रमाचे स्वरूप सांगतात. भ्रमाने जे दिसते ते मुळात खोटे असते. खोट्याने काही केले असे मानले तरी सत्यात काहीच बदल होत नाही (ओव्या २५-२८). ज्याप्रमाणे सागरातील खसखस तसाच हा प्रकार आहे. अफाट सागरात खसखशीचा दाणा असावा, तसे परब्रह्माच्या ठिकाणी हे दृश्य विश्व आहे. माणसाची मती जितकी विशाल होते, तितका ज्ञानप्रकाश वाढतो आणि हा प्रचंड ब्रह्मगोल त्याला लहान (कवठाएवढा किंवा बोराएवढा) भासू लागतो (ओव्या २९-३१).

पुढे या समासात समर्थ रामदास स्वामी विवेकाची उंची आणि संदेहाची निवृत्ती (ओव्या ३२ ते ४१) यावर भाष्य करतात. हा समास विवेकाला सर्वोच्च स्थान देतो. त्यासाठी देहबुद्धी विरुद्ध विवेक यावर ऊहापोह होतो. आपण देहबुद्धीच्या भ्रमात अडकलो की लहान होतो आणि जग मोठे वाटते. परंतु विवेकाने वृत्ती विशाल केली की मर्यादा गळून पडतात; ब्रह्मांड ‘वटबीजाप्रमाणे’ किंवा त्याहूनही सूक्ष्म दिसू लागते. वृत्ती पसरून ‘ब्रह्माकार’ झाली की द्वैत उरत नाही (ओव्या ३२-३७).


त्यानंतर समर्थ संदेहवारण आणि साक्षात्कार याची महती सांगतात. विवेकाने अनुमान तुटते, मनाला समाधान मिळते आणि आत्मनिवेदन घडते. सारासार विचार, मनन आणि निदिध्यासन यांच्या योगाने ‘मीच तो आत्माराम’ हा प्रत्यय येतो आणि साधक पावन होतो (ओव्या ३८-४१).

या समासाचा थोडक्यात सार व आजचा अर्थ लक्षात घ्यायचा झाले तर मुख्य प्रश्नअखंड ब्रह्मात दृश्य जग व त्यातील द्वंद्व कसे भासते? मुख्य साधन विवेक (सारासार विचार व सूक्ष्म आकलन) आहे. यातील प्रमुख रूपके आकाशात दिवा, सागरातील खसखस, वटबीज, वृत्तीचे विरघळणे हे आहे. तर अंतिम फलित भ्रम व संदेहाची निवृत्ती होऊन आत्मस्वरूपाची प्रचिती घेणे आहे.


व्यावहारिक दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनात समोर येणाºया समस्या, गैरसमज किंवा तात्त्विक गुंतागुंत आपल्याला ‘खूप मोठी’ वाटतात, कारण आपली दृष्टी मर्यादित असते. विवेकाची बैठक पक्की केली की प्रश्नांचे आकारमान बदलते आणि संदेह आपोआप गळून पडतो हाच या समासाचा गाभा आहे.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: