Tuesday, November 24, 2026

घटनात्मक वचन पूर्ण करण्याचे आव्हान


शिक्षणाचा, विशेषत: उच्च शिक्षणाचा मूलभूत उद्देश व्यक्तींमध्ये स्वतंत्र आणि चिकित्सक विचार विकसित करणे हा आहे. शिक्षणाने व्यक्तींना जन्माने लादलेल्या सामाजिक उतरंडी आणि पूर्वग्रहांपासून मुक्त करायला हवे, परंतु विरोधाभासाने, आपल्या शैक्षणिक संस्था आजही त्याच उतरंडींना नव्या स्वरूपात पुनरुत्पादित करत आहेत. विद्यापीठे ही तर्क, बुद्धी आणि संवादाची केंद्रे असायला हवीत, परंतु तिथे जे घडते ते अनेकदा पूर्वग्रहांना अधिक दृढ करणारे दिसते. घटनात्मक हमी, आरक्षण आणि शिक्षणाचा विस्तार असूनही, जात प्रतिष्ठेच्या अनुभवावर कसा परिणाम करते, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कदाचित साहित्य आपल्याला हा प्रश्न समजून घेण्यास मदत करू शकेल. ओमप्रकाश वाल्मीकी यांचे ‘जुठन’ हे आत्मचरित्र, शिक्षण हा सामाजिक मुक्तीचा मार्ग कसा आहे, पण त्याचबरोबर जातीवर आधारित अपमान आणि भेदभावही सोबत कसा येतो, याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण आहे. बामा यांची ‘करुक्कू’ ही कादंबरीसुद्धा, शिक्षण आणि सामाजिक गतिशीलता आपोआप जात नाहीशी करतात या कल्पनेला आव्हान देते. समानतेच्या भाषेखालीसुद्धा, नातेसंबंधांमध्ये आणि संस्थात्मक प्रथांमध्ये जात टिकून राहू शकते.


अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यापीठातील प्रवेश हे केवळ एक वैयक्तिक यश नसते. ज्या पिढ्यांना ज्ञान आणि शैक्षणिक संधी नाकारल्या गेल्या, त्यांच्या आकांक्षांचे ते प्रतीक असते. अनेकदा, गुणवत्तेचा सामाजिक परिस्थितीशी काहीही संबंध नाही असे भासवले जाते, पण सत्य हे आहे की चांगल्या शाळा, पुस्तके, शिकवणी, संगणक, पोषक कौटुंबिक वातावरण आणि सामाजिक संबंध गुणवत्ता विकसित करण्यात भूमिका बजावतात. ज्या परिस्थितीत गुणवत्ता विकसित होते आणि प्रदर्शित होते, त्या परिस्थितीतील विषमतेकडे दुर्लक्ष करून आपण गुणवत्तेचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन कसे करू शकतो?

दया पवार यांची ‘बलुतं’ ही कादंबरी, जात मानवी प्रतिष्ठा आणि परावलंबित्वावर कसे नियंत्रण ठेवते, या सामाजिक व्यवस्थांचे पितळ उघड करते. शरणकुमार लिंबाळे यांची ‘अक्करमशी’ ही कादंबरी, स्वत:च्या अस्तित्वालाच काही वैधता नाही असे वाटायला लावल्याने होणाºया वेदना प्रकट करते. प्रेमचंद यांची ‘सद्गती’ ही कादंबरीसुद्धा अशा प्रश्नांना सामोरे जाते, ज्यांना आधुनिक भारत कदाचित आता भूतकाळातील मानून विसरू इच्छितो. गिरिराज किशोर यांची ‘परिसंधी’ ही कादंबरी असेच प्रश्न देशातील प्रतिष्ठित तांत्रिक शिक्षण संस्थांच्या केंद्रस्थानी घेऊन जाते. आधुनिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गुणवत्तावाद यांसारख्या शब्दजालामागे जातीय पूर्वग्रह कसा टिकून राहू शकतो, हे ती दाखवते.


समकालीन आकडेवारी या साहित्यिक अनुभवांना केवळ भूतकाळ किंवा काल्पनिक म्हणून फेटाळून लावण्यास जागाच सोडत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने ७०४ विद्यापीठे आणि १,५५३ महाविद्यालयांच्या आकडेवारीच्या आधारे एका संसदीय समितीला सादर केलेल्या अहवालानुसार, उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाच्या तक्रारी २०१९-२० मधील १७३ वरून २०२३-२४ मध्ये ३७८ पर्यंत वाढल्या आहेत. या आकडेवारीचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. तक्रारींमधील वाढ ही वाढत्या घटना, सुधारित जागरूकता आणि तक्रार नोंदवण्याची पद्धत, किंवा या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे असू शकते. परंतु आकडेवारीच्या पलीकडे, प्रश्न हा आहे की तक्रार दाखल झाल्यानंतर पुढे काय होते. २०१६ मध्ये हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांचा अलीकडील मृत्यू, या घटनांनी जात, वंचित समाजातील विद्यार्थ्यांची असुरक्षितता आणि संस्थात्मक प्रतिसाद यांच्यातील संबंधांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे आवश्यक आहे, आणि हा प्रश्न विचारला पाहिजे, की उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना सामोरे जाव्या लागणाºया अपमान, एकाकीपणा आणि बहिष्काराच्या प्रकारांना सामोरे जाण्यास आपल्या संस्था सक्षम आहेत का?

भेदभाव मान्य केल्याने प्रतिमेला धक्का बसू शकतो, म्हणून एका प्रतिष्ठित विद्यापीठाची जबाबदारी कमी होत नाही. विद्यापीठे केवळ प्रशिक्षण देण्याची आणि पदव्या प्रदान करण्याची ठिकाणे नाहीत. ती नागरिकत्वाची मूल्ये जोपासणारी ठिकाणेही आहेत. येथेच समानता आणि बंधुत्वाचा अनुभव घेतला जातो किंवा ते नाकारले जाते. संविधान कायद्यासमोर समानतेची हमी देते, परंतु घटनात्मक नैतिकता केवळ संविधानाच्या पानांपुरती मर्यादित राहू शकत नाही. ती संस्थात्मक वर्तनाचा भाग बनली पाहिजे. एखाद्या विद्यापीठाची समानतेप्रति असलेली बांधिलकी केवळ प्रवेश आणि विविधतेच्या आकडेवारीवरून मोजली जाऊ नये, तर विद्यार्थी अपमान किंवा भीतीशिवाय मतभेद व्यक्त करू शकतात, संवाद साधू शकतात आणि आकांक्षा बाळगू शकतात की नाही यावरून मोजली जावी. जर जात अजूनही हे ठरवत असेल की कोणाला स्थान आहे आणि कोणाला स्वीकृतीसाठी सतत संघर्ष करावा लागेल, तर समानतेच्या घटनात्मक वचनाचे पालन करण्यात हे आपले सामूहिक अपयश आहे. खरे तर, वर्गातील जात ही आपल्या लोकशाहीतील अंतर्निहित विषमतेचा आरसा आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि डोळेझाक केल्याशिवाय समानतेचा दावा करू शकत नाही.

No comments: