Tuesday, November 24, 2026

उत्तर प्रदेशातील बदलणारे निवडणुकीचे चित्र


पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण असे मानले जाते की, दिल्लीला जाणारा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो. कदाचित याच कारणामुळे पंतप्रधान मोदींना २०१४ मध्ये गुजरातहून उत्तर प्रदेशात यावे लागले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर परत येऊन आधीच इतिहास रचला आहे आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी तसेच सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले आहेत. २०२९ मध्ये लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे, २०२७च्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी खूप संवेदनशील आहेत, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत, मोदींनी वाराणसीमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे हाती घेतली असूनही, उत्तर प्रदेशातील भाजपच्या लोकसभा जागा ६२ वरून ३३ पर्यंत घसरल्या इतकेच नाही, तर वाराणसीमधील त्यांच्या विजयाचे अंतरही २०१९च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होते. तर मग, उत्तम प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, जनकल्याण आणि विकास या गोष्टी सत्ताधारी पक्षाला मते मिळवून देत नाहीत का?


उत्तर प्रदेशात अलीकडेच काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत, ज्यांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनामुळे राज्यातील १२.७ दशलक्षाहून अधिक हिंदू मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, तर मुस्लीम मतदारांच्या संख्येत १.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनीही हे मान्य केले आहे की, राज्यातील विधानसभा मतदार यादीतील ग्रामीण मतदारांची संख्या पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीपेक्षा २.३८ कोटींनी कमी आहे. याची चौकशी केली जाईल आणि पडताळणीनंतर सर्व पात्र नागरिक, शिधावाटपधारक, १८ वर्षांवरील नागरिक आणि विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांचा समावेश करण्यासाठी दोन्ही याद्या जुळवून घेतल्या जातील. ही मोहीम नोव्हेंबरमध्ये सुरू झाली. जर मुख्यमंत्री योगी यांचे म्हणणे खरे असेल, तर याचा अर्थ असा होतो की, उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा जागांपैकी प्रत्येक जागेतून सरासरी ३१,५०० हिंदू मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे निवडणुकीत भाजपला नुकसान होऊ शकते. तथापि, हा केवळ एक सरासरी अंदाज आहे, कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वेगवेगळे असते.

दुसरे म्हणजे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी १२ डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याचा आपला इरादा जाहीर केला, परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘शून्य’ जागा देण्याचे आवाहन अयोध्येच्या जनतेला करणार असल्याचे सांगून त्यांनी याला निवडणुकीच्या राजकारणाशी जोडले. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर मंदिराला भेट देण्यासाठी त्यांना जवळपास तीन वर्षे का लागली, हे जाणून घेण्याची जनतेला उत्सुकता असेल. अपेक्षित निवडणूक घोषणेच्या जवळपास महिनाभर आधी त्यांना रामलल्लाला भेट देण्याची आठवण कशी झाली? प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण झाले आहे, असे सांगून अखिलेश यांनी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे कारण भाजपला दिले होते, परंतु ते स्वत:च आपल्या अयोध्या दौºयाचे राजकारण करत आहेत. १९९० मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारने कारसेवकांवर केलेल्या गोळीबाराबद्दल अखिलेश यांनी माफी मागावी, अशी मागणी अयोध्येतील संतांनी केली आहे. त्यांच्या या यू-टर्नमुळे मुस्लीम समाज दुरावू शकतो. अखिलेश यांची सौम्य हिंदुत्वाची भूमिका पाहता, हा पक्ष बसप किंवा इतर पक्षांकडे जाईल का? तरीही, अखिलेश यांचे सप सरकार २०१२ मध्ये केवळ २९ टक्के मतांनी स्थापन झाले होते, आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात २९ जागा गमावूनही, भाजपचा मतांचा वाटा ४१ टक्क्यांवर कायम राहिला, जो तिरंगी लढतीत स्पष्ट बहुमतासाठी पुरेसा होता. २०१४ पासून, भाजपने ‘सबका साथ, सबका विकास’ या आपल्या सर्वसमावेशक प्रतिज्ञेसह जन राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे, आणि सत्तेत व संघटनेत समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करून लोकांचा विश्वास जिंकला आहे, तर दुसरीकडे इतर पक्ष अजूनही संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याच्या वचनबद्धतेपासून खूप दूर आहेत. जिथे सप मागास, दलित आणि अल्पसंख्याक यांचे समर्थन करते, तिथे बसप दलितांसाठी बोलते. लोकशाही व्यवस्थेत, जो सर्वांना सोबत घेऊन जात नाही, तो कसा जिंकू शकतो?


तिसºया घडामोडीनुसार, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम)चे चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशात ‘सोशल चेंज फ्रंट’ची स्थापना केली आहे, जी दलित-मुस्लीम युतीच्या माध्यमातून विधानसभेच्या सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवेल. ओवैसी काही मुस्लिमांना त्यांच्या उमेदवारांना मत देण्यासाठी प्रवृत्त करू शकतील, तरीही बहुसंख्य मतदार भाजपला पराभूत करण्यास सक्षम असलेल्या सप, बसप किंवा काँग्रेसच्या उमेदवारांनाच मतदान करण्याची शक्यता आहे. तथापि, काही मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, विरोधी पक्षांनी भाजपबद्दल तयार केलेला वृत्तांत खोटा आहे. यासोबतच, विविध विकास योजना आणि तिहेरी तलाकपासून दिलासा मिळालेल्या मुस्लीम महिलांच्या भाजपबद्दलच्या दृष्टिकोनात बदल दिसून आला आहे.

चौथी घडामोड म्हणजे, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-सप युती स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, सप काँग्रेसला जितक्या जास्त जागा देईल, तितकेच ते स्वत:च्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात घालतील. असे उमेदवार बंड करून नुकसान पोहोचवू शकतात. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३९९ जागा लढवल्या आणि केवळ दोन जागा जिंकल्या. त्यांना २.३३ टक्के मते मिळाली. ३८७ जागांवर त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. समाजवादी पक्षाने अशा पक्षासोबत युती का करावी? राज्यात आपला पाठिंबा वाढला आहे, असे सुचवणाºया काँग्रेसने काय केले आहे? डॉ. लोहिया यांनी पुरस्कृत केलेल्या काँग्रेसविरोधी मार्गावरूनच समाजवादी पक्षाचा जन्म झाला आहे. तर मग, समाजवादी पक्षाने डॉ. लोहियांच्या विचारधारेविरोधातील आपली भूमिका बदलली आहे का? त्यांनी आपल्या विरोधकांना बाजूला सारले आहे का? दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ‘आम्ही हे करून दाखवू’ या घोषणेने सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष हे कसे हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

No comments: