Wednesday, November 25, 2026

नव डाव्यांकडून लोकशाहीवर हल्ला


विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अमेरिकेत भारताची लोकशाही व्यवस्था, निवडणूक प्रणाली आणि अर्थव्यवस्थेवर केलेली वक्तव्ये त्यांची भविष्यातील राजकीय दिशा दर्शवतात. अलीकडेच हैदराबादमध्ये ‘इंडिया समिट २०२६’ आयोजित करून, त्यांनी या परिषदेला एका जागतिक मोहिमेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. या परिषदेची संकल्पना ‘नव्या जगाची उभारणी’ ही होती. काँग्रेसने याचे वर्णन जागतिक न्याय, लोकशाही, बहुपक्षीयता, मतदारांचे हक्क आणि द्वेषाचे राजकारण यांवरील पर्यायी विचारांसाठीचे व्यासपीठ असे केले. यामुळे त्याचा खरा उद्देश समजणे सोपे जाते.


त्याच शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून, इटालियन पार्टी आॅफ युरोपियन सोशलिस्ट्सचे सरचिटणीस जियाकोमो फिलिबेक यांनी राहुल गांधींच्या शैलीची आठवण करून देणाºया पद्धतीने मतचोरांनो, सिंहासन सोडा ही घोषणा वापरली. त्यांनी असेही म्हटले की, भारतातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासोबत उभे आहेत. या समर्थनाचा अर्थ काय? हा विरोधी पक्षाच्या माध्यमातून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये एका परकीयाचा थेट हस्तक्षेप आहे. समोर बसून राहुल गांधी ज्या प्रकारे हसले आणि टाळ्या वाजवल्या, त्यावरून असे सूचित होते की ते आता हाच मार्ग अवलंबणार आहेत.

आज जगभरात एका विचित्र प्रकारचा नव-डाव्या विचारसरणीचा गट उदयास आला आहे. ते स्वत:ला उदारमतवादी आणि पर्यायी विचारांचे प्रतिनिधी म्हणतात. काही देशांच्या सरकारांमध्येही त्यांचे अस्तित्व आहे. युरोपपासून अमेरिका, आफ्रिका आणि आशियापर्यंत, कट्टर इस्लामी गटही त्यांच्यासोबत दिसतात आणि त्यांचा अजेंडा पुढे नेत आहेत. राहुल गांधींचे परदेश दौरे २०१७ मध्ये सुरू झाले. त्यांनी या लोकांशी संपर्क आणि संबंध विकसित केले आणि तेव्हापासून त्यांच्या भाषेत आणि वागणुकीत एक स्पष्ट बदल दिसून येतो. ते परदेशात भारतविरोधी व्यक्तींना भेटायला किंवा लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार इत्यादींच्या नावाखाली आपल्याच देशावर टीका करायला अजिबात संकोच करत नाहीत. हे देशापुढील एक फार मोठे आव्हान आहे, ज्याचा सामना केलाच पाहिजे. हे नव-डावे केवळ आपल्याच राष्ट्रवाद्यांना लक्ष्य करत नाहीत, तर त्या नेत्यांना आणि देशांनाही लक्ष्य करतात, जे आपल्या सभ्यता, संस्कृती आणि क्षमतांच्या जोरावर श्रेष्ठत्व प्राप्त करण्याची आणि आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची क्षमता बाळगतात. असे दिसते की, काँग्रेस पक्षातील रणनीतीकारांनी राहुल गांधींना भारतात अशी शिखर परिषद आयोजित करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून त्यांचे संपर्क, आदर आणि मोहिमांना देशांतर्गत आणि परदेशातही व्यापक पाठिंबा आहे हे सिद्ध करता येईल. भविष्यात असे आणखी कार्यक्रम आणि मोहिमा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


मात्र, काँग्रेसला भारत शिखर परिषदेसाठी देशात आणि जगभरात अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही. राहुल गांधींनी दूरदृष्टीच्या नावाखाली जे व्यक्त केले, त्यात एका गंभीर जागतिक दृष्टिकोनाचा अभाव होता. खरे तर, मोदी सरकारला फॅसिस्ट राजवट म्हणून चित्रित करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेत ते परिषदेत म्हणाले, फॅसिस्टांचा आवाज अधिक बुलंद होत आहे. गेल्या दशकापासून फॅसिस्ट घोषणा देत आहेत आणि बहुसंख्य जनता काय घडत आहे ते पाहात आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही पहिल्यांदाच पाहिले की लाखो डॉलर्स खर्च केले जात होते. आम्हाला धक्का बसला होता. राहुल गांधींना विचारले पाहिजे की, त्यावेळी केंद्रात त्यांचे सरकार सत्तेत होते आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. तरी हे कसे घडले? ते पुढे म्हणाले, मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की आम्ही मोदींना हरवणार आहोत. त्यांना मोदी आणि अमित शाह यांच्या डोळ्यात भीती दिसते, आणि तीही पराभवाची! खरे तर, त्यांना देशांतर्गत आणि परदेशी लोकांमध्ये अशी भावना निर्माण करायची आहे की, तीन पराभवांनंतर आता ते जिंकून सत्तेत येणार आहेत. गोंधळ निर्माण करण्यापासून ते निवडणुकांपर्यंत, अशा प्रकारच्या वातावरणाचा सामूहिक मानसिकतेवर परिणाम होतो. ही त्यांची रणनीती आहे.

खरे तर, राहुल गांधी आणि त्यांच्या देशांतर्गत व परदेशी रणनीतीकारांचे ध्येय आणि दिशा स्पष्ट आहे. देशात आणि जगभरात असे वातावरण निर्माण करण्यासाठी बोलत राहणे आणि इतरांना प्रोत्साहित करणे, की भारतातील सरकार ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वावर स्थापन होत नाहीये, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत आणि निवडणूक आयोग भाजप सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. ही नव-डाव्यांची कार्यशैली आहे, ज्यात पूर्वीप्रमाणे हिंसक क्रांती आणि शस्त्रबळाने सत्ता काबीज केली जात नाही, तर लोकांच्या निवडून आलेल्या सरकारला कमकुवत करण्यासाठी आणि सत्तांतराचा मार्ग मोकळा करण्यासाठी हिंसक अराजकता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण केले जाते. अशी हिंसक आंदोलने आणि सत्तांतर अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही एक चिंताजनक परिस्थिती आहे. राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्या पक्षाची अनेक राज्यांमध्ये सरकारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय आणि घटनात्मक शक्ती आहे. यामुळे आव्हान आणखी वाढते. भारतविरोधी शक्ती या परिस्थितीचा कसा आणि कोणत्या थराला जाऊन गैरफायदा घेतील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण राहुल गांधींची ही रणनीती देशाला नुकसान पोहोचवणारी असेल. केवळ जनाधार मिळत नाही, मते मिळत नाहीत, जनता वारंवार नाकारत आहे त्यामुळे सत्ता मिळत नसल्याने वेडेपिसे झालेले राहुल गांधी असे देशविरोधी कृत्य करत आहेत. त्यासाठी परकीय शक्तींचा वापर करून घेत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

No comments: