Tuesday, September 15, 2026

दशक दुसरा : समास दहावा : पढतमूर्ख लक्षण


समर्थ रामदास स्वामींनी मूर्खलक्षणनाम दुसºया दशकातील दहाव्या समासात पढतमूर्खाची लक्षणे सांगितलेली आहेत. समर्थ म्हणतात शहाणा म्हणवितो आणि मूर्खपणाने वागतो तो पढतमूर्ख असतो. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्याचे वर्णन समर्थ इथे करतात. त्यांना पढतमूर्ख हे नाव आहे. त्यांची काही लक्षणे आपल्या अंगी आढळली तरी श्रोत्यांनी मनाला लावून घेऊ नये, ते अवगुण प्रयत्नाने सोडता येतात व नंतर माणूस सुखी बनतो.


समर्थ म्हणतात, ज्याच्या जीवनात विचार आणि आचार, ज्ञान आणि क्रिया, किंवा ध्येय आणि साधन यांमध्ये समजून विरोध आढळतो तो श्री समर्थांचा पढतमूर्ख आहे. जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि स्वत: विद्वान आहे, जो सुंदर सरळ रीतीने ब्रह्मज्ञान सांगतो, पण वासना आणि अभिमान बाळगतो तो पढतमूर्ख होय. ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसे वागणे, बंधनरहित आचरण करावे असे प्रतिपादन करतो, सगुणाची भक्ती व्यर्थ आहे असे जो सांगतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पढतमूर्ख असतो.

योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि कोणी ऐकत नसून बोलण्याचे विनाकारण श्रम करतो, ज्याचे बोलणे कठोर असते तो पढतमूर्ख होय. एखादा बहुश्रुत आणि तोंडाळ श्रोता गुणांच्या साहाय्याने वक्त्याला कमीपणा आणील तो पढतमूर्ख होय. जो दुसºयाचे दोष काढून त्याला नावे ठेवतो. पण तेच दोष स्वत:च्या अंगी आहेत हे ज्याच्या लक्षात येत नाही तो तो पढतमूर्ख होय. जर मोठा अभ्यासी असल्याने सगळ्या विद्यांचे ज्ञान करून घेतो, परंतु जो लोकांना सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही तो पढतमूर्ख.


कामवासना, पैसा आणि लौकिक यांच्या आधीन होऊन जो भगवंताला विसरतो तो पढतमूर्ख असतो. कोळ्याच्या अंगातील नाजुक तंतूंनी एखादा हत्ती बांधून ठेवतात किंवा सुगंधाच्या लोभाने एखादा भुंगा कोमल कमळात अडकून मरून जातो, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्याचे समर्थ असणारा जो प्रपंचात गुंतून फुकट जातो तो पढतमूर्ख होय. जो स्त्रियांच्या संगतीत रमतो, स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, निंद्य वस्तूंचे सेवन करतो तो पढतमूर्ख होय. ज्याने स्वत:ला कमीपणा येतो तेच जो मनांमध्ये घट्ट धरून ठेवतो, मी देहच आहे अशी ज्याची भावना असते तो पढतमूर्ख.

भगवंतांची स्तुती करण्याचे सोडून जो माणसाची स्तुती करतो किंवा ज्याच्याशी गाठ पडते त्याचीच फार तारीफ करू लागतो तो पढतमूर्ख. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो किंवा त्यांची नाना सोंगे घेऊन त्यांचा हावभाव, अभिनय करून दाखवितो, जो भगवंताला विसरतो तो पढतमूर्ख. ऐश्वर्य असेल तर त्याच्या घमेंडीमध्ये सर्व जीवमात्रांस हीन समजतो, शास्त्रविरुद्ध मतांचे जो प्रतिपादन करतो, त्यांना आधार देतो तो पढतमूर्ख.


समर्थ म्हणतात, भगवंताला विसरणे हे तर पढतमूर्खांचे लक्षण आहेच, परंतु जो कशालाच व कोणालाच मानीत नाही, जो बोलतो एक व करतो दुसरेच, आणि जो स्वहित करून घेत नाही तो मोठा पढतमूर्ख समजावा. जो कधीं भक्तिमार्गाने गेलाच नाही, ज्याच्या अंगी वैराग्य नाही, ज्याने कधी भक्तपूजन केले नाही, आणि असे असून जो आचरणरहित ब्रह्मज्ञान बोलतो तो पढतमूर्ख. तीर्थ, क्षेत्र, वेद आणि शास्त्र यांपैकी जो काहीच मानीत नाही, पवित्र कुळात जन्म येऊन जो अपवित्रपणे म्हणजे भ्रष्टपणे वागतो पढतमूर्ख असतो.

जो कोणी आपल्याला आदर देतो त्याची जो मनधरणी करतो, ज्याची खरी योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो, पण लगेच त्याची निंदा व अनादर करायला तयार होतो तो पढतमूर्ख होय. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे आणि त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे ही ज्याच्या वागण्याची नेहमीची पद्धत असते, जे बोलतो एक तर करतो दुसरेच तो पढतमूर्ख. ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो, परमार्थाबद्दल अत्यंत अनादर असतो, समजून उमजून जो प्रपंचाचा आधार घेतो तो पढतमूर्ख. जे योग्य आहे ते सांगायचे सोडून केवळ दुस‍ºयाला बरे वाटावे म्हणून जो अयोग्यही बोलतो, जो दुसºयावर अवलंबून जगतो तो पढतमूर्ख समजावा.


जो चांगले वागण्याचे सोंग बरोबर करतो किंवा ज्याचे वरवरचे वागणे सोंगाप्रमाणे बरोबर चालते, पण करू नये तेच कर्म जो लपून करतो, आपला मार्ग चुकला हे समजूनही केवळ हट्टाने त्यापासून बाजूला सरत नाही, तो पढतमूर्ख होय. रात्रंदिवस चांगल्या उपदेशाचे श्रवण करीत राहूनसुद्धा जो आपले अवगुण सांडीत नाही, आणि स्वत:चे हित कशात आहे हे ज्याला कळत नाही तो पढतमूर्ख.

जो लोकसंग्रह करू शकत नाही, जो सद्गुरूला विसरतो, जो आपल्या प्रपंचासाठी परमार्थ वापरतो आणि अखेर धड प्रपंच ना परमार्थ अशी ज्याची अवस्था होते तो पुरुष पढतमूर्ख समजावा असे समर्थ सांगतात. त्याचे प्रवचन ऐकायला थोर सज्जन व पारमार्थिक अधिकारी येऊन बसले असता त्यांची क्षुद्र न्यूने काढून बाजूला जो बोलतो तो पढतमूर्ख. ज्याचा शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि त्याने गुरूचा अपमान केला, तरी जो पुन्हा त्याची अपेक्षा धरतो तो पढतमूर्ख. कीर्तन, प्रवचन वा पुराण श्रवण करीत असता देहधर्मामुळे काही उणेपणा आला, खोकला आला किंवा शिंक आली किंवा कमरेला कळ लागली तर जो रागाने तणतणतो तो पढतमूर्ख. आपल्या ऐश्वर्याच्या घमेंडीने व उन्मादाने जो सद्गुरूची किंमत ठेवीत नाही, जो आपली गुरुपरंपरा कोणाशी सांगत नाही तो पढतमूर्ख. ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारून जो आपला स्वार्थ साधतो, एखाद्या कंजुष माणसाप्रमाणे पैसा साठवितो, पैसा मिळविण्यासाठी जो परमार्थ वापरतो तो पढतमूर्ख.


आपण स्वत: तसे न वागता जो लोकांना तसे वागण्याचा उपदेश करतो, स्वत: ब्रह्मज्ञानी नसून लोकांमध्ये ब्रह्मज्ञान पेरण्याचा खटाटोप करतो, त्याचा प्रसार करण्याच्या नादी लागतो, विरक्तपणाचा पेशा असून जो परतंत्रपणे दुस‍ºयाच्या अधीन होऊन वागतो तो पढतमूर्ख. जी कर्मे केली असता सगळा भक्तिमार्ग मोडकळीस येतो आणि स्वत:चे जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते ती कर्मे करण्यास जो मागेपुढे पाहात नाही तो पढतमूर्ख होय. प्रपंच अशाश्वत म्हणून तो हातचा गेला, परमार्थ खोटा मानला गेला म्हणून तो केला नाही, अशी अवस्था असूनही जो देवाब्राह्मणांचा द्वेष करतो तो पढतमूर्ख होय.

समर्थ म्हणतात, अवगुण सोडावे हा हेतू मनात बाळगून पढतमूर्खाची काही लक्षणे मी सांगितली, विचारवंतांनी त्यामधील न्यून पूर्ण करावे व मला क्षमा करावी. या संसारामध्ये सुख मिळेल असे जो मानतो तो मूर्खांमधील मोठा मूर्ख समजावा. कारण या संसारदु:खासारखे दुसरे दु:ख नाही. पुढील दशकांत त्याचेच वर्णन आहे. इथे दशक दुसरा समाप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ!


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: