Tuesday, September 15, 2026

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी


गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्य सरकारनेही गतवर्षी त्याला राज्याचा उत्सव म्हणून मान्यता देत त्याचे स्वरूप विस्तारलेले आहे. पण यानिमित्ताने गणेशाचे तत्त्व नेमके समजून घेणे महत्त्वाचे आहे. मूलाधार चक्र आणि गणपती यांचे नाते पुराण काळापासून वेद आणि शास्त्रांनी कथन केले आहे. आज श्रीगणेश चतुर्थी निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. श्रींच्या जन्माची कथा ही तशी सर्वश्रुत आहे. आज त्यांचे कार्य आणि एकंदर स्थान आणि वैश्विक महानता समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग’ हा बुद्धीचा ध्वनी आणि ‘ण’ हे विज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणजेच गणांचा अधिपती तो गणपती असे म्हणतात. नुसतेच विज्ञान कामास येत नाही. फक्त बुद्धी असूनही चालत नाही, तर प्रत्येक वेळी संस्करण करणारी शक्ती विज्ञानावर अंकुश ठेवून विज्ञानशक्तीला योग्य दिशा देणारी ती बुद्धी असली पाहिजे. आपल्या संस्कृतीप्रमाणे जी मूळ देवता ती म्हणजे गणेश. मुळात प्रत्येक कार्यामध्ये जर या दोन वृत्ती किंवा गुणांचे नीट व्यवस्थापन केले, तर विघ्न येतच नाही. अशा रीतीने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आद्यपूजेचा मान असलेली गणेश ही एक प्रभावी देवता आहे. यामुळेच गणेश देवताही समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक बनली आहे. साहजिकच याच्या सहचर जीवनसाथी पत्नीपदाला जाणाºया देवता या रिद्धी, सिद्धी आणि भारती अशा आहेत. आपल्या अंत:करणातच वैश्विक ऊर्जा आहे, याचे स्मरण सदैव मानवाला राहावे हे गणेश उपासनेमधील गुपित आहे. अथर्वशीर्षात म्हटले आहे की, त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वम् असि.. म्हणजे, तेच आहे. परमब्रह्म हे साक्षात तुम्हीच आहात, अशी एक ओळ आपल्याला गणपती अथर्वशीर्षामध्ये आढळते. अखिल जीवनाच्या उगमाचा आद्य ध्वनी जो ॐत्याच्या उगमाचा प्रतिनिधी म्हणजे भगवान गणेश. सर्व सामर्थ्यमंत्र, स्तोत्र-मंत्राची निर्मिती ही या ओम ध्वनीतूनच होते. सामर्थ्य आणि क्षमाशीलता, सामर्थ्य आणि सौंदर्य याचे संतुलन आपल्याला श्रीगणेशांच्या ठायी आढळते. म्हणूनच गणपती अथर्वशीर्षमध्ये रचनाकारांनी त्वमेव सर्वम् खल्विदम् ब्रह्म असि असे वर्णन करून श्रीगणेशाचे साक्षात ब्रह्म असणे, परमात्मा असणे अधोरेखित केले आहे.


आपल्या या सूक्ष्म देहामध्ये ऊर्जा केंद्र असतात. त्यांना हिंदू आणि बौद्ध धर्मातील तंत्र आणि योग परंपरेमध्ये चक्र ही संज्ञा आहे. अशा या सात चक्रांमधील सर्वात महत्त्वाचे चक्र म्हणजे मूलाधार चक्र. नावाप्रमाणेच हे चक्र म्हणजे शरीराचा मूळ आधार असते. मणक्यांच्या मुळाशी हे चक्र असते. भगवान सूर्यनारायणाकडून या चक्राला ऊर्जा मिळते आणि याचा रंग लाल असतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्यांच्या उत्पत्तीचे मूलाधार चक्र हे मूळ आहे. भगवान गणेश ही या मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे, असे शास्त्र सांगते. मूलाधार चक्राच्या चार लाल पाकळ्यांवर स्वर्णाक्षरांमध्ये व, श, ष, स हे चार संस्कृत ध्वनी लिहिलेले असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांचेही त्या प्रतिनिधित्व करतात. चारच पाकळ्यांनी युक्त हे कमळ म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. परमात्म्याची प्रधान शक्ती ही आदिशक्ती आहे. या आदिशक्तीची निर्मिती म्हणजे भगवान श्रीगणेश. स्त्री-पुरुष तत्त्वाच्या पलीकडे ही आद्यनिर्मिती आहे. या प्रधान शक्तीची निर्मिती असल्यामुळे त्या आदिमातेबरोबर तो सदैव आहे आणि त्यामुळेच मानवाच्या प्रत्येक चक्रामध्ये त्याचे वास्तव्य आहे. निर्मितीतील पावित्र्य, निरागसता, निष्पाप वृत्ती आणि शुद्धता यांचे तो प्रतीक आहे. गौरी प्रणयाय, गौरी प्रवणाय, गौर भावाय धिमही.. असे म्हणून आपण त्या आद्य दैवताचे आवाहन करतो. तोच आपणा सर्वांचा आद्यपूजेचा मानधारी परमप्रिय श्रीगणेश आहे. भगवान शंकर हे साक्षात परमेश्वर तर श्रीगणेश हा त्यांचा पुत्र. स्वत: देवत्वाला जाण्यासाठी आतुर असलेल्या जीवाचे ते प्रतीक आहेत. भगवान गणेशांच्या अंग-प्रत्यंगांमध्ये ही प्रतीकात्मकता दडलेली आहे. हत्तीचे मोठे शिर व्यापक विचार करावा यासाठी आहे. मोठे कान हे जास्त ऐकावे यासाठी आहेत. बारीक डोळे हे एकाग्रता साधण्यासाठी आहेत. छोटे तोंड हे कमी बोलण्याचा सल्ला देते. वरदहस्त म्हणजे आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी दिलेले अभय आणि आश्वासन आहे. सोंड ही श्वासावाटे येणाºया प्राणशक्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी आहे. एकच सुळा, दात म्हणजे चांगले ठेवा आणि वाईट त्या सर्वांचा त्याग करा हे सांगतो आहे. मोदक हे साधनेचे फलित आहे. विशाल पोट हे जगातील सगळे भलेबुरे पचवण्याची क्षमता तुमच्यात आहे हे सांगते. वाहन उंदीर म्हणजे लालसा, अभिलाषा यांचे प्रतीक आहे. लालसा, अभिलाषा यांच्यावर स्वार होऊन ताबा ठेवला तरच तुम्ही जीवनाचा प्रवास करू शकता. जीवनाच्या सर्वच परिघांना निकटपणे स्पर्श करणारा असा हा देवाधिदेव श्रीगणपती.. म्हणूनच सर्व धर्मांच्या परिसीमा पार करून हे दैवत आज जागतिक बनले आहे. अशा या गणेशाच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. तो सर्वांच्या घरी आनंद घेऊन येवो अशी प्रार्थना.

No comments: