दासबोधातील दुसºया दशकातील पाचव्या समासात समर्थांनी रजोगुण लक्षणे सांगितली आहेत. गुण किती व कोणते, ते ओळखावे कसे, त्यांचा शुद्ध व शबल असा भेद यांचे वर्णन ते येथे करतात. मुळात आपला देह सत्त्व, रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे. त्यांपैकी सत्त्वगुण उत्तम होय. सत्त्वगुणामुळे भगवंताची भक्ती उत्पन्न होते. रजोगुणामुळे पुन: जन्म घेऊन यावे लागते. तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनीत जन्म घेतात.
येथे गीतेतील चौदाव्या अध्यायातील अठराव्या ओवीचा दाखला स्वामी देतात. ते म्हणतात की, सत्त्वप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीस जातात. रज:प्रधान माणसे मध्ये राहतात, हीनगुण असलेल्या स्वभावाची तम:प्रधान माणसे खाली जातात. गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणार आहे. जे निर्मल असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते. शुद्ध व शबल यांची लक्षणे आता येथे समर्थ सांगतात. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल गुण सांसारिक असतो. प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की, त्याच्या देहामध्ये तिन्ही गुण काम करतात. एका गुणाचा जोर झाला की, दुसरे दोन मागे जातात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. रजोगुणाचे कार्य कसे चालते ते आता समर्थ येथे सांगतात.
समर्थ म्हणतात की, जीवनामध्ये जी गतिमानता आहे, परिस्थितीवर स्वामित्व गाजविण्याची लालसा आहे, बदलण्याची हौस आहे, ती रजोगुणाचे व्यक्तिरूप समजावे. कोणतेही मोठे ध्येय गाठण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते. पण तो प्रपंचाकडे वळला की, त्याचा दुरुपयोग होतो. त्याचे वर्णन श्री समर्थ करतात. शरीरांत रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो अगदी लक्ष देऊन ऐकावे. हे घर माझे, हा संसार माझा आहे. त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला! असा जो खात्रीने ठरवतो तो रजोगुण होय.
मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वांत मीच थोर आहे, असे जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय. रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने, ममत्वाने कसा गुंतलेला असतो याचे वर्णन झाले. आता वासना गुंतल्यामुळे तो कसा दु:ख भोगतो ते समर्थ सांगतात. दुसºयाचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय. ज्याच्या मनात कपट असते, जो दुसºयाचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुसºयास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. आपल्या निकटच्या नातेवाइकाबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दु:ख वाटते, तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे.
संसारामध्ये फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल, या विचारांनी मन चिंता करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दु:ख वाटू लागले म्हणजे तो रजोगुण होय. दुसºयाचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. त्या इच्छेपायी जो दु:ख करतो तो रजोगुण होय. जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते हवे म्हणून मनाने मागितले. परंतु ते मिळाले नाही तर जे दु:ख होते तो रजोगुण होय. ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते जो शृंगारिक गाणी गातो, राग, स्वर, ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे. जो दुसºयाची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्याने वाद माजतो, जो सदा सर्वकाळ हास्यविनोद करतो त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे मानावे. ज्याच्या अंगांत अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ, धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय.
जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शोकीन असतो, निरनिराळ्या खेळांत पैसा घालवितो त्यांच्या अंतरी रजोगुण असतो. अंमल किंवा धुंदी आणणाºया पदार्थांवर अतिशय प्रेम, गावगुंडीचे किंवा गावच्या भानगडीचे सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतीची आवड, या गोष्टी जेथे असतात तेथे रजोगुण असतो.
रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेच नव्हे तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागे असतो. हे वर्णन झाल्यावर त्याला भक्ती, वैराग्य, सत्समागम ही आवडत नाहीत असे श्री समर्थ सांगतात.
चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते, दुसºयाचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो रजोगुण होय. देवाचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय. गोड खाण्याची मनापासून आवड असते, देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो, आणि उपवास केला तर तो सहन होत नाही तो रजोगुण होय. शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात, भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय.
परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन:जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीने तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय. रजोगुण हा असा आहे. मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लावतो. प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो. तो भयंकर दु:ख भोगायला लावतो. रजोगुणामुळे वासना प्रपंचात गुंतून राहते. तेथून ती सुटण्यास भगवंताची भक्तीहाच खरा उपाय आहे. आपले मन भगवंताला अर्पून त्याच्यावर प्रेम करायला शिकावे. शबल रजोगुण संसारिक बनवतो तर शुद्ध रजोगुण भक्तीचा मार्ग दाखवतो.
आता रजोगुण हा तर सुटता सुटत नाही, संसाराची बंधने तर काही तुटत नाहीत, वासना तर प्रपंचात गुंतून राहते. यावर काय उपाय करावा! याला एकच आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती साधण्यास वैराग्य हवे, म्हणजे प्रपंच्यात मन आसक्त नसावे, हे जर साधलेले नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणे भगवंताचे भजन करावे.
कायेने, वाचेने आणि मनाने पान, फूल, फळ व पाणी अगदी मनापासून ईश्वराला अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे, आपणास शक्य असेल तेवढे दान करावे, पुण्यकर्म करावे. परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे. तसेच संसारामधील सुखदु:खे भोगीत असता फक्त भगवंताचेच चिंतन करावे. या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवच शिल्लक उरतो. मध्येच तेवढी ही माया दिसते. म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भरवसा ठेवावा.
शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो हे ध्यानात ठेवावे. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्त्वगुणात आढळतात. तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा