Sunday, July 19, 2026

संत तुकाराम महाराजांचा उपदेश


मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूचे दास। कठीण वज्रास भेदूं आम्ही।। असे संत तुकाराम महाराज म्हणतात. हरिचे दास (वारकरी) मनातून मेणापेक्षाही मऊ आणि दयाळू असतात. पण जर अन्यायाविरुद्ध उभे राहायचे असेल, तर ते वज्रापेक्षाही कठीण बनू शकतात. याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे. संत ज्ञानेश्वर आणि सर्वच संतांनी वारीतील नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे तसेच ते तुकोबारायांनीही सांगितले आहे. तुकोबा म्हणतात, अमृताहुनि गोड नाम तुझे देवा, अमृताहुनि गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा नेघे, कडू वाटे जीभ रोगाचिये सुती, गोड नाम प्रीती केवी उपजे।।


या अभंगात तुकाराम महाराज भगवंताच्या (विठ्ठलाच्या) नामाचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात की, देवाचे नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे. परंतु, तरीही माझे मन हे नाम घेण्यात का रमत नाही? याचे कारण देताना ते एक सुंदर उदाहरण देतात. ज्याप्रमाणे आजारी माणसाला जिभेच्या आजारामुळे (ज्वरामुळे) गोड वस्तूही कडू लागते, त्याचप्रमाणे आपल्या मनाला ‘भवोग’ (संसाराची आसक्ती, अज्ञान) जडला आहे. जोपर्यंत माणसाच्या मनातील हा अज्ञानाचा रोग दूर होत नाही, तोपर्यंत त्याला या नामस्मरणाची खरी गोडी कळत नाही.

तर एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।। हा अभंग संत तुकारामांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा गाभा आहे. खरा साधू किंवा सज्जन माणूस कोण, हे सांगताना ते म्हणतात की, जो समाजातील दु:खी, कष्टी आणि पीडित लोकांना आपले मानतो, त्यांच्या दु:खात धावून जातो, तोच खरा साधू आहे. भगवंताला शोधण्यासाठी मंदिरात किंवा हिमालयात जाण्याची गरज नाही; अशा भूतदया असणाºया माणसाच्या हृदयातच देव वास करतो. मानवकल्याण हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा संदेश यातून मिळतो. ज्ञानेश्वरांनी जो मानवता धर्म अपेक्षित केला होता त्याचा हा कळस आहे.


एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती। येणे सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। इथे पाहा किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पर्यावरण आणि मानवी मन यांचा सुंदर मिलाफ या अभंगात दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात की, हे वृक्ष, वेली आणि वनातील प्राणी आमचे सगेसोयरे (नातेवाईक) आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी सुंदर गाणी गातात, ज्यामुळे मनाला अथांग शांतता मिळते. मानवी समाजात राहून माणसाला एकमेकांचे गुण-दोष, हेवेदावे पाहावे लागतात; पण निसर्गाच्या एकांतात कोणताही विकार मनाला स्पर्श करत नाही. हा अभंग मानवाला निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची प्रेरणा देतो.

सर्व बाजूंनी विचार करणे हे संत तुकारामांचे वैशिष्ट्य होते. एका अभंगात ते म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारे।। या अभंगात तुकोबा देवाकडे ‘अहंकार’ नसलेले लहानपण मागतात. ते म्हणतात की, मोठेपणात नेहमीच त्रास आणि संकट असते. याचे उदाहरण देताना ते सांगतात की, ‘ऐरावत’ हा इंद्राचा हत्ती कितीही मोठा आणि मौल्यवान रत्न असला, तरी त्याला नेहमी माहुताच्या अंकुशाचा मार खावा लागतो. याउलट, मुंगी आकाराने अत्यंत लहान असते, पण तिला सहजपणे साखरेचा दाणा मिळतो आणि ती सुखात राहते. माणसाने जीवनात नम्र राहावे, गर्वाने फुगू नये, हाच या अभंगाचा मुख्य हेतू आहे. प्रबोधनाची वारी हे यासाठीच म्हटले जाते. वारीतून संतांनी केलेले प्रबोधन हीच खरी संतकृपा समाजावर आहे.


प्रफुल्ल फडके/ संतकृपा


No comments: