Tuesday, July 21, 2026

संत सोपानदेव यांचे विचार


सदा सर्वकाळ नाम विठ्ठलाचे। तेणे सुखाचे भरते आले।। असे संत सोपानदेव म्हणतात. म्हणजे जो सर्वकाळ विठ्ठलाच्या नामात मग्न असतो, त्याच्या आयुष्यात सुखाची मोठी भरती येते. संत सोपानदेव जे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचे बंधू होते. संत सोपानदेव हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत अध्यात्म बहुजन समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या अभंगांमध्ये अद्वैत भक्ती, आत्मज्ञान आणि गुरुकृपेचे महत्त्व प्रामुख्याने दिसून येते. त्यांची समाधी सासवड (पुणे) येथे कºहा नदीच्या तीरावर आहे.


संत सोपानदेवांचे अभंग हे मुख्यत्वे ‘सोपान म्हणे’ या नाममुद्रेने संपतात. सोपान म्हणे होय अंतरीं प्रकाश... हा त्यांचा अभंग अलौकिक असा आहे. सोपान म्हणे होय अंतरीं प्रकाश। जंव या सद्गुरूचा लाभ झाला॥ भवभय वाया गेले लयासी। जंव देखिलें तयासी आत्मरूपीं॥ म्हणजे या अभंगात संत सोपानदेव गुरुकृपेचे आणि सद्गुरूंच्या महत्त्वाचे वर्णन करतात. ते म्हणतात की, जेव्हा जीवनात खºया सद्गुरूंचा लाभ होतो, तेव्हा अंत:करणात ज्ञानाचा प्रकाश पडतो. सदु९रीच्या दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या आत्मज्ञानामुळे मनातील संसाराचे भय (जन्म-मरणाची भीती) पूर्णपणे लयाला जाते आणि स्वत:मध्येच परमात्म्याचे रूप दिसू लागते.

आणखी एका अभंगात ते म्हणतात, आम्ही दळूं हरिकथा ओव्या गाऊं गीता। चित्त ठेवूनियां हरीच्या चरणांवरता॥ इथे ते सांगतात की, हा अभंग घरगुती आणि रोजच्या कामाच्या (उदा. जाते दळणे) माध्यमातून भक्ती कशी करावी हे शिकवतो. सोपानदेव म्हणतात की, आम्ही आमचे दैनंदिन काम करत असताना देवाच्या कथांचे चिंतन करतो आणि भगवद्गीतेसारख्या पवित्र ग्रंथातील ओव्या गातो. शरीर कामात व्यस्त असले तरी आमचे चित्त (मन) मात्र सदैव हरीच्या (देवाच्या) चरणांवर स्थिरावलेले असते. म्हणजेच कर्म करत असतानाही नामस्मरण चालू ठेवणे हीच खरी भक्ती आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनीच नामस्मरणाचे महत्त्व आपापल्या शैलीत सांगितले आहे तसे हे सोपानदेवांनी सांगितले आहे.


सोपान म्हणे विठ्ठल हाची आत्मा। दुसरा नाहीं जगीं कोणी आम्हां॥ असे म्हणून संत सोपानदेवांची भक्ती ही केवळ सगुण मूतीर्पुरती मर्यादित नव्हती, तर ती अद्वैत विचारांवर आधारित होती. ते सांगतात की, हा जो विठ्ठल आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वत:चा 'आत्मा' आहे. संपूर्ण जगात विठ्ठलाव्यतिरिक्त (किंवा त्या आत्मतत्वाव्यतिरिक्त) आमचे दुसरे कोणीही नाही. सर्व चराचरात एकच परमेश्वर भरून राहिला आहे, हाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच सोपानदेवांनीही आपल्या मोठ्या बंधूंना (संत निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर) गुरू मानून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. साध्या आणि सरळ मराठी भाषेत गूढ आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडणे हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अभंगांमधून एक प्रकारची शांतता आणि संसाराविषयीची विरक्ती प्रकषार्ने जाणवते. संत सोपानदेवांच्या अभंगांचे वाचन आणि निरूपण ऐकल्याने माणसाच्या मनातील संभ्रम दूर होऊन आत्मिक शांतता लाभते.

संत सोपानदेवांचा आणखी एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा अभंग आहे. "सुखाचा सागर विठ्ठल गा बापा। हरीनाम जपतां न बाधी पापु॥"विठ्ठल हे सुखाचे माहेरघर आहे. संत सोपानदेव या अभंगात सांगतात की, विठ्ठल (परमेश्वर) हा केवळ सुख देणारा नाही, तर तो स्वत: "सुखाचा सागर" आहे. संसारातील सुखे ही क्षणभंगुर आणि मर्यादित असतात, पण विठ्ठलाच्या भक्तीतून मिळणारे सुख हे अथांग सागरासारखे अनंत आणि कधीही न संपणारे आहे.ते पुढे म्हणतात की, जो माणूस विठ्ठलाचे किंवा हरीचे नाव सतत जपत राहतो, त्याला कोणत्याही प्रकारच्या पापाची बाधा होत नाही. नामस्मरणामुळे माणसाचे अंत:करण शुद्ध होते आणि त्याच्या हातून घडलेली वाईट कर्मे किंवा वासना नष्ट होतात. सदगुरूंच्या कृपेने जेव्हा हरिनामाची गोडी लागते, तेव्हा माणसाला संसारातील दु:खाची झळ सोसावी लागत नाही. कर्म करत असतानाही देवाचे नाव मुखात असणे, हीच खरी आणि सोपी भक्ती आहे, हेच सोपानदेवांना या अभंगातून अधोरेखित करायचे आहे.


प्रफुल्ल फडके/ संतकृपा


No comments: