Friday, July 24, 2026

नामस्मरण आणि वारी


एक वेळ हरि उच्चारिता वाचे। जळतील पापे जन्मांतरची।। असे संत ज्ञानेश्वर एका अभंगात म्हणतात. केवळ एक वेळ का होईना, पण अंत:करणापासून मुखाने ‘हरि’ म्हटले, तरी जन्माजन्मांतरीचे क्लेश आणि पापे नष्ट होतात. आपल्या संत परंपरेत नामस्मरणाचे खूपच महत्त्व संतांनी विविध मार्गांनी सांगितले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तर नवविधा भक्तीतील नामस्मरण भक्तीवर दासबोधातून फार मोठी शिकवण दिलेली आहे. त्याचप्रमाणे नामस्मरण करण्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ, तयारी, अवस्था असण्याची गरज नाही हे वेळोवेळी मनाचे श्लोकातून सांगितले आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा असे ते म्हणतात. मुखी ग्रास घेता म्हणावे श्रीराम असेही रामदास स्वामी म्हणतात. एका श्लोकात ते म्हणतात की, मना सर्वदा रामनामी जिव्हावे, असे अनेक श्लोकातून राम, हरि यांच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. सर्वात सोपा आणि प्रबळ भक्तीचा मार्ग म्हणून नामस्मरणाला महत्त्व आहे.


संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठातील २६व्या अभंगात हेच विस्तृत सांगितले आहे. एक तत्त्व नाम दृढ धरी मना। हरिसी करुणा येईल तुझी॥ १॥ ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्‍गद जपे आधी॥ २॥ नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा। वाया आणिक पंथा जाशील झणी॥ ३॥ ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी। धरोनी श्रीहरी जपे सदा॥ ४॥ येथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हरिचे नाम हेच तत्त्व आपल्या मनामध्ये बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत राहा, त्या योगाने हरिला तुझी दया येईल. राम कृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे, म्हणून अगोदर ते प्रेमाने घे. हरिच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरे साधन नाही. तू दुस‍ºया साधनांकडे जाशील तर फसशील. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मी मौन घेऊन अंत:करणामध्ये जपमाळ धरून निरंतर श्रीहरिचा जप करीत आहे.

तर पुढच्याच अभंगात ते म्हणतात की, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी। रिकामा अर्धघडी राहू नको॥ १॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार। वायां येरझार हरिविण॥ २॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप। रामकृष्णी संकल्प धरूनी राहे॥ ३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी। इंद्रियांसवडी लपू नको॥ ४॥ तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा। शांति दया पाहुणा हरि करी॥ ५॥ किती अधिकारवाणीने ज्ञानेश्वरांनी येथे सांगितले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. साही शास्त्रांनी हरिच्या नामांत सर्व सुखमाधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे. (देह हा सादर पाहावा निश्चित। सर्व सुख येथे नाम आहे) त्याचे नेहमी तू सेवन कर, अर्धा घटकादेखील रिकामा राहू नको. कारण देहादिक संसार आणि त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरिला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. म्हणून हरिनाममंत्राचा तू निरंतर जप करीत जा, या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरिता रामकृष्णनाम घेण्याविषयीचा निश्चय तू आपल्या मनाशी पक्का करून राहा. गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहांतून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ती उत्पन्न कर आणि त्या योगाने सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी दया बाळग; कारण जेथे शांती दया असतात, तेथे देवाची वस्ती असते, म्हणून तू आपल्या हृदयांत शांती दया ठेवून तेथे श्रीहरि वस्तीला येईल असे कर. आपल्यात संतपण निर्माण करणे, आपल्या हृदयमंदिरात परमेश्वराला स्थान देण्याचे अत्यंत सहजपणे ज्ञानदेव सांगतात. याचा पाया हा नामस्मरणाचा आहे. त्यामुळे हरिनाम संकीर्तन करीत एकेक पाऊल टाकीत वारी पंढरपुराच्या सीमेवर पोहोचते. तो आनंद सोहळा म्हणजे विठ्ठल मला भेटणार की, मी विठ्ठलाला भेटणार हेच समजत नाही इतका पवित्र भाव असतो.


प्रफुल्ल फडके/संतकृपा


No comments: