नित्य सत्य मऊ वाचेसी बोलणें। गळालें अंथुरणें अहंतेचें।। असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. त्यांना सांगायचे आहे की, ज्याच्या वाणीमध्ये नेहमी सत्य आणि नम्रता (मऊपणा) असते, त्याच्या मनातील अहंकाराचे अंथरूण कायमचे गळून पडते. हरिपाठात ज्ञानदेव सांगतात, नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ। लक्षुमीवल्लभ तयां जवळी॥१॥ नारायण हरि नारायण हरि। भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या॥२॥ हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा। यमाचा पाहुणा प्राणी होय॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड। गगनाहूनि वाड नाम आहे॥४॥
म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सतत हरिचे नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मीळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पती विष्णू असतो. नेहमी नारायण हरि, नारायण हरि, अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य व सलोकतादि चारी मुक्ती असतात. जन्मास येऊन जर हरिची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावे, आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यमलोकास जातो, आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरू जे निवृत्तिनाथ, त्यांस हरिचे नाम केवढे आहे असा आपले इच्छेनुरूप प्रश्न केला असता, त्यावर गुरू निवृत्तिनाथांकडून आकाशापेक्षाही नाम मोठे आहे असे उत्तर मिळाले.
त्याआधीच्या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं। दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण। जडजीवां तारण हरि एक॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची। उपमा त्या देवाची कोण वानी॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ। पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा॥४॥ म्हणजे, हरिचे नाम घेण्याला शुद्ध काळवेळेची जरूर नाही. ते हवे तेव्हा घ्यावे, त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोहोंचाही उद्धार होतो. याचा आणखी एक दुसरा अर्थ आहे तो म्हणजे, नाम घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उद्धार होतो. रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणारे आहे. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरिच आहे. हरिचे नाम हेच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी? म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरिचे चिंतन यथासांग झाले, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
हरिपाठ हा अहंकाराला हरवतो आणि हरिच्या सान्निध्यात घेऊन जातो. ज्ञानेश्वर म्हणतात, सात पांच तीन दशकांचा मेळा। एक तत्त्वी कळा दावी हरि॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ। तेथें कांहीं कष्ट न लागती॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा। येथेंही मनाचा निर्धार असे॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ। रामकृष्णीं पंथ क्रमियेला॥४॥ म्हणजे, हा संसार कोणी सात तत्त्वात्मक आहे, कोणी पाच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे, तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असे मानतात. किंवा सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. असा तत्त्वविचार करण्यापैकी हरिचे नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. रात्री व दिवसा मिळून एकवीस हजार सहाशे वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यात होणाºया उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडल्यास (म्हणजे २१६०० श्वास जे होतात त्यांमधून सोहं असा होणारा जप मी करतो असे म्हणून उदक सोडल्यास) साधकाचे मनाचा निश्चय असे करण्याकडे असतो. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरणावाचून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर हरिचे भजन करीत आहे. हे हरिचे भजन अहंकार नष्ट करते आणि परमेश्वराच्या हरिच्या सान्निध्यात नेते.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
No comments:
Post a Comment