Thursday, July 30, 2026

पंडित वसंतराव देशपांडे : संगीतविश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व


३० जुलै ही तारीख आणि त्या आसपासचा काळ हा भारतीय संगीतसृष्टीला धक्का देणारा दिवस आहे. ३१ जुलै १९८०ला मोहम्मद रफी यांचे निधन झाले, तर ३० जुलै १९८३ला पंडित वसंतराव देशपांडे यांचे निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत विश्वात आपल्या अथांग अभ्यासाने, अनोख्या शैलीने आणि गानप्रतिभेने अढळ स्थान निर्माण करणारे महान गायक म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. केवल शास्त्रीय संगीताच्या चौकटीत न अडकता, संगीताच्या विविध प्रकारांवर लीलया प्रभुत्व मिळवणारे ते एक कलंदर आणि अवलिया कलाकार होते.


पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी महाराष्ट्रातील मूर्तीजापूर, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई सुशीलाबाई देशपांडे या उत्तम गात असत. लहान वयातच वसंतरावांमधील संगीताची ओढ ओळखून त्यांना संगीताचे पद्धतशीर शिक्षण देण्यात आले. त्यांच्या संगीत प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाच घराण्यापुरते मर्यादित न राहता अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरूंकडून संगीताचे धडे घेतले.

त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या पंडित शंकरराव सप्रे यांच्याकडून शिक्षण घेतले. किराणा घराण्याचे उस्ताद असद खान यांच्याकडून शिक्षण घेतले. पटियाला घराण्याच्या उस्ताद अमन अली खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्याकडून शिक्षण घेतले. याशिवाय भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमानत अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले होते. अनेक प्रकारच्या गायकीचे शिक्षण घेणारे असे ते बहुआयामी गायक होते. या विविध घराण्यांच्या शिक्षणामुळे वसंतरावांच्या गायकीत एक अनोखा संगम पाहायला मिळाला. त्यांनी सर्व घराण्यांतील उत्कृष्ट गोष्टी आत्मसात करून स्वत:ची ‘वसंत शैली’ विकसित केली.


शास्त्रीय संगीताबरोबरच मराठी संगीत रंगभूमीला वसंतराव देशपांडे यांनी दिलेल्या योगदानामुळे ते घरोघरी पोहोचले. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात त्यांनी साकारलेली ‘खाँसाहेब आफ्तब हुसेन’ यांची भूमिका अजरामर ठरली. त्यांनी गायलेली आणि अभिनय केलेली नाटके म्हणजे, ‘कट्यार काळजात घुसली (खाँसाहेब)’, ‘मानापमान’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’ यांचा उल्लेख करावा लागेल. ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘घेई छंद मकरंद’, ‘सुरत पिया की’, ‘या भवनातील गीत पुराणे’, ‘दिल की तपिश’ ही गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

वसंतराव देशपांडे हे केवळ शास्त्रीय किंवा नाट्यसंगीत गाणारे गायक नव्हते. ख्याल, ठुमरी, दादरा, गझल, भावगीत आणि अभंग या सर्वच प्रकारांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या तानांची गती, हरकती, तानबाजीतील लयकारी आणि गझल-ठुमरीतील भावपूर्णता थक्क करणारी असे. ते केवळ एक गायकच नव्हते, तर तबला, पेटी (हार्मोनियम) आणि सितार ही वाद्येही उत्तम वाजवत असत. संगीताच्या शास्त्राचा आणि लयीचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल होता. त्यांनी ‘संगीतातील लय आणि ताल’ या विषयावर विशेष संशोधनही केले होते. त्यांचा बहारदार आवाज हा कानांना सुखावणारा होता. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये ‘अष्टविनायक’ चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणे ऐकल्याशिवाय गेली पन्नास वर्षे एकही गणेशोत्सव पूर्ण होत नाही.


हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गायक मोहम्मद रफी यांनी ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी गायलेले ‘बाबुल की दुवाऐ लेती जा’ हे गाणे कन्यादान करतानाचे बापाच्या तोंडचे मुलीला निरोप देणारे अजरामर गाणे म्हणून ओळखले जाते. यातील रफीचा आवाज आणि बलराज सहानीचा अभिनय हृदय पिळवटून टाकतो. पण त्याच तोडीचे गाणे ‘अष्टविनायक’ चित्रपटात वसंतराव देशपांडे यांनी गायले होते. ते म्हणजे ‘दाटून कंठ येतो’. हे गाणे तितकेच अजरामर झाले. पण याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नीलकमल’साठी गायक आणि अभिनेता वेगळे होते. पण पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका चोख बजावल्या होत्या, ही त्यांची फार मोठी ताकद होती.

त्यांच्या या कारकिर्दीसाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानही लाभले. त्यांच्या या अफाट संगीतोपासनेसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले. यात पद्मभूषण पुरस्कार हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपद आणि अनेक संगीत संमेलनांचे प्रमुखपद त्यांनी भूषवले होते.


३० जुलै १९८३ रोजी या महान संगीततज्ज्ञाने जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा संगीताचा वारसा आजही पुढे सुरू आहे. त्यांचे नातू राहुल देशपांडे हे आजच्या काळातील एक आघाडीचे शास्त्रीय गायक असून, त्यांनी वसंतरावांची गायकी आणि संगीत परंपरा समर्थपणे पुढे चालू ठेवली आहे. पंडित वसंतराव देशपांडे म्हणजे संगीत जगताला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. रागसंगीतातील कठीण नक्षीकाम सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत सहज पोहोचवण्याचे सामर्थ्य त्यांच्या आवाजात होते. मराठी संगीतसृष्टीच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णअक्षरांनी कायम कोरलेले राहील.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स



No comments: