Saturday, July 25, 2026

संत निवृत्तीनाथांची ओढ


निवृत्ती प्रसादे विठ्ठल देखिला। निमाली ही त्रिकुटी मनाची।। असे संत निवृत्तीनाथ म्हणतात. गुरूंच्या कृपेने जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घडते, तेव्हा मनातील सर्व संभ्रम, सुख-दु:खाचे खेळ संपून मन शांत होते. संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक आणि संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव व संत मुक्ताबाई यांचे थोरले बंधू आणि गुरू मानले जातात. त्यांनी आपल्या अभंगांतून भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि गुरुकृपेचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दांत शिकवले आहे.


गुरुकृपेचे महत्त्व म्हणजे गुरू हीच खरी दिशा आहे हे त्यांनी दाखवून दिले. संत निवृत्तीनाथांच्या शिकवणीचा मुख्य गाभा म्हणजे गुरुभक्ती. ते मानतात की, गुरूंशिवाय ईश्वराची किंवा ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या एका अभंगात निवृत्तीनाथ म्हणतात की, अमृताची फळे अमृताचे झाड। गुरुकृपा गोड निरंतरी॥ निवृत्ती म्हणे गुरुकृपेचा प्रकाश। तेणे प्रकाशे दिसे हा जगदाभास॥ म्हणजे, जसे अमृताच्या झाडाला अमृताचीच फळे येतात, तशी गुरूंची कृपा माणसाचे आयुष्य गोड आणि समृद्ध करते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपी प्रकाशामुळेच जगाचे आणि जीवनाचे खरे स्वरूप स्पष्ट दिसते.

आषाढी वारीचा मुख्य गाभा हा नामस्मरण भक्तीचा आहे. त्याबाबतही निवृत्तीनाथ म्हणतात की, नामस्मरणाची ताकद म्हणजे विठ्ठल नाम हेच सार आहे. संसारातील दु:खांमधून आणि भवसागरातून तरुण जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ हरिनाम किंवा विठ्ठल नामाचा सोपा मार्ग सांगतात. ते म्हणतात की, हरि उच्चारितां दोष जातील लया। क्षणे एका तथा न लगती॥ निवृत्ती म्हणे हरि हाचि माझा प्राण। बीज हे प्रमाण सकळीकांचे॥ म्हणजे ते सांगतात की, मुखाने ‘हरि’ (विठ्ठल) नामाचा उच्चार करताच मनातील सर्व वाईट विचार आणि दोष एका क्षणात नष्ट होतात. निवृत्तीनाथ म्हणतात की, हरिनाम हाच माझा प्राण आहे आणि सर्व साधनांचे मूळ बीज तेच आहे. केवळ बाह्य कर्मकांड न करता अंत:करणापासून भक्ती करणे महत्त्वाचे आहे, अशी त्यांची शिकवण होती.


एका अभंगात ते म्हणतात की, कृष्ण नामाचा गजरू। तेणे निवाले हे शरीरू॥ निवृत्ती म्हणे भाव धरी। विठ्ठल राहे त्याच्या अंतरी॥ जेव्हा माणूस भगवंताच्या नामात तल्लीन होतो, तेव्हा त्याच्या शरीराला आणि मनाला परम शांती मिळते. ज्याच्या मनात सच्चा भाव असतो, त्याच्या अंत:करणात विठ्ठल कायम वास करतो. त्यांनी आपल्या बंधू-भगिनींना दिलेला ज्ञानाचा वारसा फार महत्त्वाचा आहे. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेवर मराठीत टीका (ज्ञानेश्वरी) लिहिण्याची आज्ञा दिली, ज्यामुळे सामान्य माणसाला ज्ञानाचा मार्ग खुला झाला.

निवृत्तीनाथांच्या मते ज्ञान हे गुप्त ठेवण्यासाठी नसून ते सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी असते. गुरू निष्ठा म्हणजे गुरूच्या चरणी समर्पण वृत्ती ठेवणे. नामस्मरण म्हणजे विठ्ठल नामाचा विसर न पडू देणे. सदाचार व नम्रता याचा अर्थ अहंकार सोडून सर्व प्राणिमात्रांशी प्रेमाने वागणे. ही त्यांची सहज अशी शिकवण होती. निवृत्तीनाथांच्या शिकवणुकीतून उभी राहिलेली पंढरीची वारी सर्व संतांचा मेळा घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात येते तेव्हा सर्व वातावरण विठ्ठलमय होते.


मग आमचे तुकोबाराय म्हणतात की, खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।। चंद्रभागेच्या वाळवंटात आता भक्तीचा खेळ रंगला आहे. सर्व वारकरी भाऊ एकत्र येऊन आनंदाने नाचत आहेत. आता विठू माऊलीच्या दर्शनाचा महासोहळा आहे! त्यानंतर आषाढी एकादशीचा महाप्रसाद व कृतज्ञता भाव मनात उमटतात. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय! अशा घोषणांनी वातावरण पवित्र होते. आज आषाढी एकादशी! विठ्ठल माऊलीने आपल्या सर्व लेकरांना सुखात ठेवले. वारीचा हा प्रवास जरी संपला, तरी मनातील विठ्ठल नामाची वारी अखंड चालू राहो, हीच माऊली चरणी प्रार्थना. हीच प्रार्थना सर्व संत करत आले त्यालाच संतकृपा असे म्हणता येईल.

संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठातील शेवटच्या अभंगात म्हटले आहे, सर्व सुखाची लहरी हरिनाम बोहरी। प्रपंच नास करी क्षणाधारे॥ १॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ २॥ हरिविण देव कोठेही न दिसे। चराचरी वसे हरि एकू॥ ३॥ ज्ञानदेवा पुसशी हरिची प्रचिती। संतांचे संगती लाभे हरि॥ ४॥ हरिचे नाम हे सर्व सुखांची लहरी (लाट) आहे, जे संसारातील सर्व दु:खांचा नाश करते. हे नाम एका क्षणाच्या आधाराने प्रपंचाची आसक्ती नष्ट करून टाकते. या जगामध्ये हरिशिवाय दुसरा कोणताही देव नाही, तो एकटाच संपूर्ण चराचरात भरून राहिला आहे. माऊली म्हणतात की, जर तुम्हाला हरिची खरी प्रचिती हवी असेल, तर ती केवळ संतांच्या संगतीतच मिळू शकते, कारण संतांच्या माध्यमातूनच हरिचा खरा अनुभव येतो.


यानंतर ते हरिपाठाची फलश्रृती काय ते सांगतात. हरि नामे पावन जाले हे प्रपंच। नामेचि हा साच पार पावे॥ १॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ २॥ हरिपाठी सुटला संशयाचा पाश। हरि चरणी वास निरंतर॥ ३॥ ज्ञानदेवा चित्त हरिपाठी गेले। तेणे रूप जाले हरिचे पै॥ ४॥ हा हरिपाठाचा शेवटचा अभंग असून, ही एक प्रकारे फलश्रुती आहे. माऊली म्हणतात की, हरिनामाच्या प्रभावाने हा प्रपंचसुद्धा पावन (पवित्र) होतो आणि नामाच्याच बळावर माणूस खºया अर्थाने पैलतीराला (मोक्षाला) पोहोचतो. हरिपाठाच्या सततच्या अभ्यासाने मनातील सर्व संशयांचे पाश तुटून जातात आणि हरिच्या चरणांशी निरंतर वास मिळतो. ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात की, माझे चित्त आता पूर्णपणे हरिपाठात विलीन झाल्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्वच आता हरिमय झाले आहे. हे हरिमय होणे म्हणजे वारी पूर्ण होणे.

प्रफुल्ल फडके/संतकृपा



No comments: