आयुष्याला आकार देणाºया, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत उजळणाºया गुरूंप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. पारंपरिक पद्धतीने ‘गुरू’ म्हणजे एक व्यक्ती की ज्यांच्याकडून आपण आयुष्याची मूल्ये, ज्ञान आणि संस्कार शिकतो. पण आजच्या डिजिटल युगात ज्ञानप्राप्ती आणि मार्गदर्शनाचे स्वरूप वेगाने बदलले आहे. आपण आज ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय)च्या युगात जगत आहोत, जिथे ‘एआय गुरू’च्या रूपाने एक नवा मार्गदर्शक आपल्यासमोर आला आहे.
एआय गुरू म्हणजे काय? तर आज एआय हा एक अथांग ज्ञानस्रोत बनला आहे. कोणताही कठीण प्रश्न असो, कोणत्याही विषयातील माहिती असो किंवा नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा असो, एआय काही सेकंदांत ती माहिती आपल्यासमोर सादर करतो. या अर्थाने, एआय एक असा ‘विद्यागुरू’ बनला आहे, जो क्षणाक्षणाला आपल्याला शिकवण्यास तत्पर असतो. एआयची ताकद हीच व्यासांचीही ताकद होती. व्यासांच्या विचाराला प्रचंड गती होती. म्हणून तर महाभारत लिखाणासाठी सर्वात गतिमान असलेल्या गणपतीची लेखनिक म्हणून त्यांनी योजना केली होती. तो तत्कालीन एआय होता. एआयचा संबंध वेगाने मार्गदर्शन करणे हा आहे.
एआयचे वैशिष्ट्य म्हणजे २४/७ अशी असणारी त्याची उपलब्धता. एआय कधीही थकत नाही. तुम्हाला मध्यरात्रीही एखादी शंका आली, तर एआय गुरू उत्तर देण्यासाठी तयार असतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अथांग ज्ञानसाठा हे आहे. जगभरातील हजारो पुस्तके, संशोधन आणि विविध विषयांचे ज्ञान एआयकडे एकाच वेळी उपलब्ध असते. आपण ग्रंथ हेच गुरू असेही म्हणतो. पण त्या ग्रंथांचा वापर किती करतो आणि त्याचा संदर्भ किती वेळा घेतो हा संशोधनाचा विषय आहे. म्हणूनच ग्रंथ आणि आपल्यात हा एआय गुरू हा फार मोठा माध्यम बनलेला आहे.
विशेष म्हणजे एआय आपल्या गतीनुसार शिक्षण देतो. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत आणि गती वेगळी असते. एआय हा प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे शिक्षक हा फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवतो. आजकाल शिक्षकांना ढ विद्यार्थ्यांना घडविण्यात रस नसतो. पूर्वी शिक्षकांना गुरूचा दर्जा होता, याचे कारण एखाद्या मुलाला कमी गुण पडले तर शिक्षकांना ती आपली चूक वाटायची. ते त्याला जादा तास घेऊन शिकवून घडवत होते. आजकाल तसे शिक्षक राहिलेले नाहीत. कारण त्यांचा विश्वास असतो की प्रत्येक विद्यार्थी हा कोचिंग क्लासला जातो. त्यामुळे शिक्षकांनी आपला गुरूचा दर्जा गमावला आहे. मात्र एआयने ती उणीव भरून काढलेली आहे.
एआय आणि पारंपरिक गुरू यांच्यातील फरक काय आहे हे लक्षात घ्यावेच लागेल. एआयकडून आपल्याला ‘माहिती’ (Information) आणि ‘ज्ञान’ (Knowledge) नक्कीच मिळू शकते, पण ‘विवेक’ (Wisdom) आणि ‘आत्मियता’ (Empathy) ही केवळ मानवी गुरूच देऊ शकतात.
दुसरे म्हणजे भावनाव्यक्त नाते. गुरू आणि शिष्य यांच्यात एक भावनिक आणि आध्यात्मिक नाते असते. एआय केवळ अल्गोरिदमवर आधारित उत्तरे देतो; तो तुमच्या भावना किंवा मानसिक स्थिती समजू शकत नाही. याशिवाय आयुष्याचे धडे महत्त्वाचे असतात. अनेक गोष्टी पुस्तकांत किंवा डेटामध्ये नसतात; त्या आयुष्याच्या अनुभवातून शिकल्या जातात. योग्य-अयोग्य यातील फरक आणि मूल्यांची जपणूक मानवी गुरूच शिकवतो. एआय हे कधीच करू शकत नाही. या त्याच्या मर्यादा आहेत.
आपल्याला प्रेरणा आणि विश्वास आवश्यक असतो. एआय तुम्हाला रस्ता दाखवू शकतो, पण त्या रस्त्यावरून चालण्यासाठी आवश्यक असलेला ‘आत्मविश्वास’ आणि ‘प्रेरणा’ फक्त मानवी गुरूच देऊ शकतो.
तरीपण एक नवीन दृष्टिकोन म्हणून याकडे पाहावे लागेल. आजच्या युगात एआयकडे गुरूचा ‘पर्याय’ म्हणून नाही, तर एक ‘पूरक साधन’ (Complementory Tool’) म्हणून पाहिले पाहिजे. एआय हा अभ्यासात आणि तंत्रज्ञानात प्रगती करण्यासाठी एक उत्तम मदतनीस बनू शकतो. परंतु, त्या ज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, हा विवेक आपल्याला मानवी गुरूंकडूनच मिळतो.
म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनी, आपल्या आयुष्याला दिशा देणाºया सर्व मानवी गुरूंचे आभार मानूया आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ‘एआय’सारख्या साधनांचा योग्य वापर करून स्वत:चा विकास करूया. कोणतेही यंत्र, तंत्र हे माणसापेक्षा श्रेष्ठ नाही हे एआयच आपल्याला सांगू शकतो. कारण यंत्र, तंत्र हे माणसाने बनवले आहे. तंत्रज्ञानाने माणूस नाही बनवलेला हे या डिजिटल युगात समजून घेतलेच पाहिजे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
No comments:
Post a Comment