Thursday, July 23, 2026

संत मुक्ताबार्इंचे तत्त्वज्ञान


तुम्ही संत मायबाप। कृपेचे सागर।। असे संत मुक्ताबाई म्हणतात. संत हे जगाचे मायबाप आहेत. त्यांच्या मनात केवळ कृपेचा सागर असतो. संतांच्या संगतीत राहिल्याने मानवी जीवन धन्य होते. ही संतांची संगत आपल्याला वारीत दिसते. त्यालाच सत्संग असे म्हणतात. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक अत्यंत श्रेष्ठ, आदरणीय आणि ज्ञानी स्त्रीसंत होत्या. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या. वयाने लहान असूनही त्यांचे आध्यात्मिक ज्ञान, विचार आणि प्रगल्भता अथांग होती. संत मुक्ताबार्इंचा जन्म १३व्या शतकात आपेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे चौघा भावंडांनी अत्यंत खडतर आणि उपेक्षापूर्ण परिस्थितीचा सामना केला. वयाने सर्वात लहान असूनही मुक्ताबार्इंनी आपल्या भावांची (विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांची) मातेच्या ममतेने काळजी घेतली आणि त्यांना कठीण प्रसंगात आध्यात्मिक धीर दिला.


१४०० वर्षे जगलेल्या आणि तपस्वी असलेल्या चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना आत्मज्ञानाची अनुभूती मुक्ताबार्इंनीच दिली. चांगदेवांनी मुक्ताबार्इंना आपले गुरू मानले. मुक्ताबार्इंचे अभंग आणि ‘ताटीचे अभंग’ हे खूप मार्गदर्शक असे आहेत. संत मुक्ताबार्इंचे अभंग सोपे, सरळ परंतु गूढ आध्यात्मिक अर्थ आणि व्यावहारिक विवेक सांगणारे आहेत. ज्या वेळी समाजाने केलेल्या छळाला कंटाळून संत ज्ञानेश्वर महाराज दु:खी होऊन झोपडीचे दार (ताटी) बंद करून आत बसले होते, तेव्हा मुक्ताबार्इंनी ताटीबाहेर उभे राहून त्यांची आळवणी केली. या प्रसंगी रचलेल्या अभंगांना ‘ताटीचे अभंग’ म्हणतात.

यातील अभंगात मुक्ताबाई म्हणतात, संत जेणे व्हावे। जग जगबोली सहवे।। म्हणजे ज्याला संत व्हायचे आहे, त्याने जगाचे बोल आणि अपमान सहन केले पाहिजेत. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा।। म्हणजे खरा योगी तोच, ज्याचे मन पवित्र आहे आणि जो लोकांचे अपराध पोटात घालतो आणि माफ करतो. ज्ञानदेवांना मुक्ताबाई विनवतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा..., हे ज्ञानेश्वरा, दाराची ताटी उघडा आणि जगाच्या कल्याणासाठी बाहेर या. यातील जगाच्या कल्याणाचा विचार हा फार महत्त्वाचा आहे.


त्यांनी अद्वैत ज्ञान, भक्ती आणि सद्गुरूंचे महत्त्व यांवर अनेक कूट अभंग म्हणजे गूढ अर्थ असलेले अभंग आणि विराण्या रचल्या आहेत. ‘मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळिले सूर्याशी' यांसारख्या कूट अभंगांतून त्यांनी कठीण आध्यात्मिक संकल्पना सहजतेने मांडल्या आहेत. मुक्ताबार्इंच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा म्हणजे सहनशीलता हा आहे. समाजाने कितीही त्रास दिला, तरी संतांनी रागावू नये; उलट जगाला प्रेमाने आणि ज्ञानाने जवळ करावे. मुक्ताबार्इंच्या विचारानुसार, ईश्वर हा वेगळा नसून तो प्रत्येकाच्या आत्म्यात वास करतो. जात, पात, वय किंवा लिंग या गोष्टी आत्मज्ञानाच्या मार्गात अडथळा ठरत नाहीत, हा विचार त्यांनी आपल्या वर्तनातून सिद्ध केला. वयाने लहान असूनही त्यांचे विचार अत्यंत प्रौढ आणि विवेकवादी होते. संन्यासाचा अतिरेक किंवा जगाचा त्याग करण्यापेक्षा जगात राहून निष्काम वृत्तीने कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत होते. १३व्या शतकात स्त्रियांना धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार नसताना मुक्ताबार्इंनी आपल्या अथांग ज्ञानाच्या बळावर वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण समाजात आदराचे स्थान मिळवले. म्हणूनच संत मुक्ताबाई केवळ एक संत नव्हत्या, तर त्या ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची मूर्ती होत्या. त्यांनी रचलेले ‘ताटीचे अभंग’ आजही मानवी मनाला शांतता, संयम आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवतात. तापी नदीच्या तीरावर तापी-प्रकाशा संगमाजवळ मुक्ताईनगर (कोथळी) येथे त्यांनी ऐहिक जगाचा त्याग केला. त्या काळात स्त्रियांच्या हक्कासाठी आणि आजच्या भाषेत सांगायचे तर जेंडर इक्विटीसाठी लढणाºया त्या समाजसुधारक अशा संत होत्या. वारकरी संप्रदाय हा समाजसुधारकांचा संप्रदाय आहे. वारीत समानतेची शिकवण दिलेली आहे. त्यात मुक्ताबार्इंचे तत्त्वज्ञान फार मोठे आहे.

प्रफुल्ल फडके/ संतकृपा



No comments: