जाणोनी नेणते करी हे मन। हरिपाटी दोन प्रहर उभा।। असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपले मन कितीही चंचल किंवा हुशार असले, तरी देवासमोर ते लहान मुलासारखे ‘नेणते’ करावे आणि हरिपाठात स्वत:ला झोकून द्यावे. किती निरागसपणे हे सांगितले आहे. हा भावच अत्यंत निर्मळ वाटणारा आहे.
हरिपाठात ज्ञानेश्वर म्हणतात की, सात पाच तीन दशकांचा मेळा। एक तत्त्वी कळा दावी हरि॥ १॥ तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ। तेथे काही कष्ट न लागती॥ २॥ अजपा जपणे उलट प्राणाचा। येथेही मनाचा निर्धार असे॥ ३॥ ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ। रामकृष्णी पंथ क्रमियेला॥ ४॥ म्हणजे ज्ञानेश्वर सांगतात की, हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पाच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे, तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असे मानतात. सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. असा तत्त्वविचार करण्यापैकी हरिचे नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. रात्री व दिवसा मिळून एकवीस हजार सहाशे वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यात होणाºया उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिच्या नामस्मरणावाचून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर हरिचे भजन करीत आहे.
जप तप कर्म क्रिया नेम धर्म। सर्वांघटी राम भाव शुद्ध॥ १॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो। रामकृष्ण टाहो नित्य फोडी॥ २॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात। भज का त्वरित भावनायुक्त॥ ३॥ ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी। वैकुंठभुवनी घर केले॥ ४॥ या अभंगातून संत ज्ञानेश्वर म्हणतात की, जपतपादी कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मारामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे. जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेकरून परमात्मरूपाला पाहणे, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नको. या भावामध्ये बिघाड आणणाºया सर्व संशयास फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत राहा. अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादी गोष्टीच्या भानगडीत पडू नको. शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरिला जप. या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तू भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्में कर व द्रव्यार्जन, संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर म्हणजे अशा करण्याने प्रापंचिक बाधा होणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळे वैकुंठलोकी माझे घर झाले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, आमचे घर वैकुंठभुवनांत झाले आहे, म्हणजे वैकुंठरूप हरिचे ठिकाणी आमची वस्ती झाली आहे.
त्यानंतर संत ज्ञानेश्वर सांगतात की, जाणीव नेणीव भगवंती नाही। हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा॥ १॥ नारायण हरि उच्चार नामाचा। तेथे कळिकाळाचा रीघ नाही॥ २॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी। ते जीवजंतूंसी केवी कळे॥ ३॥ ज्ञानदेव फळ नारायण पाठ। सर्वत्र वैकुंठ केले असे॥ ४॥ म्हणजे, भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाहीत, तर त्यांच्या नामस्मरणाने दोघांनाही सारखीच मुक्ती मिळते. नारायणहरि या नामाचा उच्चार करणाºयाकडे कळीकाळाचा प्रवेश होत नाही. हरिच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे जळेल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिच्या नामस्मरणाने सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे. नामस्मरण, नामजपाची सर्वोच्च ताकद येथे दिसून येते.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
No comments:
Post a Comment